सस्य श्यामल सह्यगिरी - डॉ. मंदार दातार
- smsrushtidnyan
- Jun 4
- 5 min read
सह्याद्री पर्वतरांग, जी पश्चिम घाट म्हणूनही ओळखली जाते, ही जैवविविधतेने समृद्ध, सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची रांग आहे. सुमारे १६०० किमी लांबीची ही रांग सहा राज्यांत विस्तारलेली असून, अनेक नद्यांचा उगमस्थान, अनन्य प्रजातींचा आश्रय व विशिष्ट भूगोलाचे प्रतीक आहे. युनेस्कोने घोषित केलेल्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेला सह्याद्री, सदाहरित जंगलं, शोला वने, पठारे आणि नैसर्गिक गवताळ रानांनी युक्त आहे. त्याचे जैववैविध्य भारताच्या एकूण वनस्पती व प्राणी समृद्धीत महत्त्वाचे योगदान देते.

“सह्याद्रीनामे नग हा प्रचंड, हा दक्षिणेचा अभिमानदंड” असं स. आ. जोगळेकरांनी सह्याद्रीचे वर्णन केलय. भारतीत लोकसाहित्यात ज्याचे उल्लेख आणि वर्णन विपुलतेने आढळते तो सह्याद्री ब्रिटीशांच्या भारतातील सत्तेदरम्यान पश्चिम घाट म्हणुन ओळखला गेला. नॉर्मन मेयरने संकलित केलेल्या जागतिक पातळीवरील जैवविविधता मर्मस्थळांच्या यादीत पश्चिम घाट किंवा सह्याद्री आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. भारतीत लोकसाहित्यात ज्याचे उल्लेख आणि वर्णन विपुलतेने आढळते तो सह्याद्री पर्वत विशाल अन उत्तुंग आहे. लोकमानसातल्या त्याच्या स्थानाची तूलना कशाशीही करता येणार नाही. लेणी, गडकिल्ले, गगनाशी स्पर्धा करतील अशी शिखरे, शुभ्रधवल धबधबे, घनदाट अरण्ये, घळी, सुंदर फुलांचे ताटवे वाटावेत अशी पठारे असं सारं सह्याद्रीत आहे, तरीही तो या सगळ्याच्या पलिकडचा आहे. सह्याद्रीचं सौंदर्य जेवढं विलोभनीय आहे तेवढंच त्याचं जैववैविध्य विस्मयकारक आहे.

सिंधुसागराला समांतर असलेली सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही पर्वतरांग दक्षिणोत्तर सुमारे १६०० किलोमीटर पसरलेली अन १,६०,००० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणारी आहे. ब्रिटीशांच्या भारतातील सत्तेदरम्यान हा मुलुख पश्चिम घाट म्हणुन ओळखला गेला. नॉर्मन मेयरने संकलित केलेल्या जागतिक पातळीवरील जैवविविधता मर्मस्थळांच्या यादीत पश्चिम घाट किंवा सह्याद्री आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडु या राज्यात उत्तरेकडे तापीपासुन दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत त्याचा विस्तार आहे. या पर्वतरांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो. सह्याद्रीचा पश्चिम उतार हा तीव्र असुन पुर्वेकडे तो खूपच कमी आहे. महाराष्ट्रात कळसुबाई (समुद्रसपाटीपासुन १६४६ मीटर), गोव्यात सासोगड (१०२२ मीटर), कर्नाटकात मुलयनगीरी (१९२३ मीटर), केरळात अनायमुडी (२६९५ मीटर) व तामिळनाडुमधे दोडाबेट्टा (२६३७ मीटर) ही सह्याद्रीवरची सर्वोच्च शिखरे. भौगोलीक दॄष्ट्या सह्याद्रीचे तीन भाग पडतात. तापी नदीपासुन कर्नाटकातल्या काळी नदीपर्यंतचा प्रदेश म्हणजे उत्तरेचा सह्याद्री, काळी नदीपासुन पालघाट पर्यंतचा प्रदेश म्हणजे मध्य सह्याद्री आणि पालघाटच्या दक्षिणेचा भाग म्हणजे दक्षिण सह्याद्री. या मार्गात सह्याद्री सलग नाही, निलगीरी पर्वत अन अन्नामलाई पळणी डोंगररांगा यांच्या दरम्यान १३ किलोमीटरची एक चिंचोळी पट्टी आहे तिला म्हणतात पालघाटची गॅप. हा पालघर गॅप तामिळनाडूमधील कोईम्बतूर आणि केरळ मधील पल्लक्कड या शहरांच्या मध्ये आहे. सह्याद्रीचे दक्षिण टोक पूर्व घाटाला जोडलेले आहे.
सुमारे पंधरा कोटी वर्षांपूर्वी भारत दक्षिण गोलर्धातल्या प्रचंड खंडापासून फुटला अन हळू हळू उत्तरेकडे सरकू लागला. तुटताना जमीन उचलली जाऊन सह्याद्रीची पर्वतश्रेणी आणि पश्चिम किनारपट्टी तयार झाली. सुमारे दहा कोटी वर्षे हा प्रवास चालु होता, या कालखंडादरम्यानच पृथ्वीवर सपुष्प वनस्पती विकसित झाल्या. सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी भारतीय उपखंड उत्तरेकडे सरकताना पृथ्वीचे कवच अगदी पातळ असलेल्या भागात जेंव्हा येऊन पोचला तेंव्हा प्रचंड असे ज्वालामुखीचे उद्रेक झाले. अन त्या ज्वालामुखीतून जो लाव्हा रस उफाळला त्या रसातून दख्खनचे काळेकभिन्न पठार साकार झाले. एके काळी मादागास्कर, दक्षिण अफ्रिकेशी संलग्न असल्याने अजुनही सह्याद्रीत या प्रदेशांशी साम्य दाखवणार्या काही वनस्पती अन प्राण्यांच्या काही जाती आहेत. सह्याद्रीचे महत्व यासाठीच की द्वीपकल्पीय भारताला पाणीपुरवठा करणार्या अनेक नद्यांचा उगम सह्याद्रीतच आहे. कृष्णा, गोदावरी, कावेरी या मुख्य नद्या अन त्यांच्या अनेक उपनद्या सह्याद्रीतच उगम पावतात. सह्याद्रीच्या पुर्वेकडे आहे दख्खनचे पठार तर पश्चिमेकडे कोकण आणि मलबारची चिंचोळी किनारपट्टी. भारतीय उपखंडाच्या मानाने इथे असलेली माती, वेगळे पाऊसमान, तापमान, किनारपट्टीशी असणारी जवळीक आणि आर्द्रता इथल्या वेगळ्या अन वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेला कारणीभूत आहेत. भरपूर पावसामुळेच सह्याद्रीत अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. आता तर युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सह्याद्रीमधील काही कास पठारासारख्या ठिकाणांना स्थान मिळाले आहे.

सह्याद्रीची जैवविविधता हिमालयाच्या मानाने कमी असली तरी प्रदेशनिष्ठ जीवांच्या जाती सह्याद्रीतच जास्त आहेत. भारतीय भूभागाच्या केवळ ५% प्रदेश जरी सह्याद्रीने व्यापलेला असला तरी भारतात एकुण मिळणार्या वनस्पतींच्या तब्बल २७ % जाती (species) सह्याद्रीत आढळतात. यावरुनच सह्याद्रीचे भारताच्या जैवविविधतेमधील महत्त्वाचे स्थान सहज अधोरेखित होते. हिमालयातली जैवविविधता पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगला देश, चीन, ब्रह्मदेश यांच्याशी समाईक आहे, सह्याद्रीत तसे नाही. त्यामुळे प्रदेशनिष्ठता हे सह्याद्रीतल्या जैववैविध्याचे एक वेगळेपण. भारतात आढळणार्या सुमारे १८५०० वनस्पती जातींपैकी सुमारे साडे पाच हजार जाती केवळ सह्याद्रीतच आढळतात. यापैकी तब्बल दोन हजार म्हणजे एक त्रित्यांश जातीच्या वर सह्याद्रीला प्रदेशनिष्ठ आहेत. यापैकी अनेक जाती वर्षायु अन शाकीय वनस्पतींच्या आहेत. सह्याद्रीत नेच्यांच्या जवळपास ३२० जाती आढळतात. तसेच ५ जातींच्या अनावृत्तबिजी वनस्पती आहेत. फुलपाखरांच्या ३३० जातींपैकी ३७ प्रदेशनिष्ठ तर सरपटणार्या प्राण्यांच्या १५६ जातींपैकी ९७ प्रदेशनिष्ठ आहेत. बेडकांच्या शंभर जातींपैकी ८० आहेत प्रदेशनिष्ठ. सिसिलीयन या बेडुक कुलातील हात पाय नसलेल्या प्राण्याच्या २२ पैकी २० प्रदेशनिष्ठ तर सस्तन प्राण्यांच्या १२० जातींपैकी १४ प्रदेशनिष्ठ. गोड्या पाण्यातील माशांच्या २१८ जाती इथे आहेत त्यातल्या ११६ फक्त इथल्याच. शेवाळ गटातील करंडक वनस्पतींच्या (डायटम) सुमारे ९०० जाती सह्याद्रीत आहेत. भारतातील एकुण सदाहरित वृक्षांच्या तब्बल साठ टक्के जाती फक्त सह्याद्रीतच आहेत. सह्याद्री मधील प्राणीजीवनही खुप समृद्ध आहे. सिंहपुच्छ वानरे, निलगिरी लंगुर, शेकरु, मलबारी धनेश, चापड्यांच्या (पीट व्हायपर) काही जाती, वाघळांच्या अनेक प्रदेशनिष्ठ जाती इथे बस्तान बसवून आहेत. हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले निलगिरी बायोस्फिअर रिजर्व सह्याद्रीचाच भाग आहे. वनस्पतींच्या सिरोपेजीया किंवा कंदीलपुष्प, तेरडा यासारख्या काही प्रजातींमधील (Genus) अनेक जाती इथेच उत्क्रांत व विकसित झाल्या.

विषुववृत्तीय सदाहरित जंगले सह्याद्रीत आढळतात. ही वने मुख्यत: दक्षिण सह्याद्रीत केंद्रित आहेत. सदाहरित वनांमध्ये जेथे खुप मोठ्या प्रमाणावर दलदल असते तेथे फ्रेश वॉटर स्वॅम्प्स किंवा मायरिस्टीका स्वॅम्प्स नावाची विशेष वने आहेत. खारफुटी परिसंस्थेसारखी गुडघ्याच्या आकाराची जमिनीवर आलेली मुळे हे या वनांमधल्या वृक्षांचे वेगळेपण. सह्याद्रीच्या दक्षिण भागाचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे असलेली शोला प्रकारची वने. समुद्रसपाटीपासून जास्ती उंचीवरच्या प्रदेशात ही वने सिमीत आहेत. डोंगर उतारांवर असलेली नैसर्गिक गवताळ राने अन दर्यांमध्ये असलेली सदाहरित जंगले यांना मिळुन ’शोला’ वने म्हणतात. निलगीरी पर्वताच्या दक्षिणेला शोला वने आढळतात. शोला वनांमध्ये निलगिरी तहार नावाचा दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ प्राणी रहातो. दक्षिणेच्या सह्याद्रीत शोला प्रकारची वने विशेष करुन आढळतात तसे सडे किंवा पठारे हे उत्तरेच्या सह्याद्रीचे वैशिष्ट्य. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीत मुख्यत: निमसदाहरित जंगले. आर्द्र व शुष्क पानझडी वने आढळतात.


सह्याद्रीत होत असलेली शेतीसुद्धा जैवविविधतेचे मोठे भांडार आहे. अनेक पिकांचे स्थानिक वाण इथे जोपासले जातात. वेगवेगळ्या प्रदेशाचे वेगवेगळे हवामान अन तिथल्या गरजा लक्षात घेऊन ही वाणे वर्षानुवर्षे लागवडीखाली आणली गेली. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर गावरान वाणांच्या अनेक जाती सह्याद्रीत केल्या जाणार्या शेतीत लागवडी खाली आहेत. यात तांदुळाचे अनेक वेगवेगळे वाण आहेत. त्यापैकी आंबेमोहोर, वांदरसाळ, काळी कुसळ, काळभात, ईरकल, तांबडा रायभोग, घनसाळ, गिजगा हे वाण विशेष. याचसोबत खाद्य वनस्पतींचे, मसाल्याच्या झाडांचे सुमारे १४५ जातींचे रानटी भाऊबंध सह्याद्रीतल्या वनांमधे सापडतात. यात मिरी, वेलदोडा, फणस यांच्या रानटी जाती तर चटकन नजरेत भरतात. भविष्यकाळातीत अन्नधान्य पूर्ततेच्या दृष्टीने हा फार मोलाचा ठेवा आहे.
सह्याद्रीभर विखुरलेली अनेक अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने ही जैवविविधतेची बेटे मानली जातात. या आरक्षित वनांमध्ये संरक्षण, संवर्धनांच्या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर जैवविविधतेचे रक्षण झाले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मोलेम, नागरहोळे, कुद्रेमुख, बंदीपूर, सायलेंट व्हॅली, अन्नमलाई ही काही प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने. या अभयारण्यांमुळे अन सह्याद्रीमधील गिरीस्थानांमुळे सह्याद्रीत पर्यटन व्यवसायालाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे. लोकाश्रय लाभलेल्या देवराया देखील या बहुमोल ठेव्याच्या संवर्धना अन संरक्षणामध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत. देवराया अन अभयारण्यांमध्ये अनेक दुर्मिळ अन संकटग्रस्त सजीवांच्या जाती, औषधी वनस्पती, खाद्य वनस्पतींचे रानटी भाऊबंध टिकून आहेत म्हणुन या वनांचेही संरक्षणाला महत्त्व दिले जाणे अत्यंत गरजेचे आहे. लक्षावधी वर्ष जैवविविधतेची संपत्ती जतन करीत सह्याद्री उभा आहे. त्याच्या राकट, रांगड्या पण लोभसवाण्या रुपामागे हीच जैवविविधतेची दौलत आहे. हजारो जीवांना आजवर त्याने आश्रय दिला आहे, आजही देत आहे अन यापुढेही देत राहील.

(लेखक आघारकर संशोधन संस्था, गो. ग. आगरकर रस्ता, पुणे ४११ ००४ येथे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.)
Comments