top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

स्कॅलिडोफोरा

डॉ. पुरुषोत्तम काळे

आपण या पूर्वी पहिले की निर्मो चीपशुक (इकडाय सोझोआ) हा आद्यमुखि मं धील (प्रोटोस्टम्स) एकवंशोद्भवी (मोनोफाय लॅटीक) गट असून त्यात स्कॅलि डोफोरा (ज्यात लोरिसीफेरा, प्रायापुलिडा आणि काय नोऱ्हिन्का संघांचा समावेश होतो) आणि क्रिप्टोव्हर्मिस (ज्यात नेमॅटॉइडा व पॅनआर्थ्रोपोडा या उपगटांचा समावेश होतो) असे दोन उपगट आहेत. स्कॅलि डोफोरा हा समुद्री, छद्म-देहगुही प्राण्यांचा लहान गट निर्मोचनीय (झडून जाणारी) कायटिन या शर्करा बहुवारिकाची कठीण पण लवचिक उपत्वचा, अंतर्मुखावर (आंत ओढून घेता येईल असा सोंडेसारखा भाग) आकड्यांसारख्या कंटकांची वलये, पुष्पासम दिसणारी रसाय न-ग्राही ज्ञानेंद्रिये आणि अंतर्मुख (रिट्राक्टेबल प्रोबोसिस) आणि उदर यांना जोडणारा माने सारखा भाग या मूलभूत गुणधर्मांनी ओळखला जातो. स्कॅलिडोफोरा या गटात काय नोऱ्हिन्का, प्यारापुलिडा आणि लोरिसीफेरा या किरकोळ संघांचा समावेश होतो. रेण्विक वर्गी करणात मात्र लोरिसीफेरा संघ पॅन-आर्थ्रोपोडाच्या अधिक जवळचा असल्याचं आढळलंय.

कायनोऱ्हिन्का संघात समुद्र तळावर सर्वदूर राहणाऱ्या १ मिलीमीटर किंवा त्याहून लहान ‘पंक-दैत्य’ (मड-ड्रॅगन) प्राण्यांचा समावेश होतो. त्यांचे उपांगविहीन शरीर अंतर्मुख/ सोंड, मान आणि ११ खंडांनी युक्त धडानी बनलेलं असतं. अल्पवयीन प्राण्यांचं धड ८ ते ९ खंडांचं असतं. निर्मोचीपशुकांमध्ये केवळ कायननोऱ्हिन्का संघातील प्राण्यांच्या शरीरात खंडीभवन आढळते. इतर निर्मोचीपशुकांप्रमाणे यांच्याही शरीरावर रोमके (सिलिया) नसतात पण आत खेचता येणाऱ्या अंतर्मुखावर असणाऱ्या ५ - ७ आकड्यांसारख्या कंटकांच्या वलयांच्या आणि शरीरावर असणाऱ्या कंटकांच्या साहाय्याने त्यांचं चलन होतं. त्यांची शरीर भित्तिका संधींतपेशींनी बनलेल्या उपकला (एपिथेलियम) आणि त्यावर असलेल्या कायटिननी बनलेल्या उपत्वचेची असते. हे प्राणी चिखलातील करंडके (डायटम्स) आणि सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करतात.


मुख अंतर्मुखाच्या टोकावर असून ते घशात उघडतं. त्यापुढे अन्न-नलिका असते जिच्यात दोन जोड्या लालोत्पादक ग्रंथी आणि एक वा दोन जोड्या स्वादुपिंड ग्रंथी उघडतात. मध्यांत्र (जे जठर आणि लहान आतड्याचे काम करते) अन्न पचन व शोषणाचं कार्य करतं तर पश्चान्त्र मोठ्या आतड्याचे काम करतं. गुदद्वार शरीराच्या पाठच्या टोकाला असतं. श्वसन संस्था आणि अभिसरण संस्था या प्राण्यांत नसून उत्सर्जन संस्था एक जोडी आदी-उत्सर्जन नलि कांच्या (प्रोटो- नेफरीडिया) स्वरूपात असून या धडाच्या शेवटच्या खंडात बाहेर उघडतात. चेतासंस्था घशा भोवती असणाऱ्या चेता- वलय व उदरस्थ चेतारज्जू यांनी बनलेली असून ती शरीरावर असणाऱ्या संवेदनशील रोमके आणि काही जातींमध्ये असणाऱ्या नेत्रकांपासून भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान घेऊन त्यानुसार प्रतिसादात्मक कार्यवाही करते. प्रजनन लैंगिक पद्धतीनं होतं पण लिंगभेद करणं अशक्यप्राय असतं. जननग्रंथींची एक जोडी शरीरगुहेच्या पाठच्या भागात असून त्यांपासून निघणाऱ्या नलिका शेवटच्या खंडात बाहेर उघडतात. प्रजनना संबधीची विस्तृत माहिती उपलब्ध नसली तरी अंडी कवच व चिखलानी संरक्षित असतात. मुक्त-जीवी डिंभके असतात. इचिनोडेरेस, सेफेलोर्हनिका, फिशुरोडेरेस, मेरीस्टोडेरेस आणि पोलाकँथोडेरेस या सर्वाधिक आढळणाऱ्या प्रजाती या संघात आहेत.


प्रयापुडीला संघात समशीतोष्ण पट्ट्यातील समुद्र तळावरील चिखलात/ बारीक वाळूत राहणाऱ्या खंडविहीन, मानवी पुरुषाच्या लिंगासम दिसणाऱ्या ‘पेनीस वर्म्स’ चा समावेश होतो. हे ०.२ ते ४० सेंटीमीटर पर्यंत लांबीचे वाढतात. यांच्या काही जाती हायड्रो जन-सल्फाइड युक्त, अल्प-प्राणवायू असणाऱ्या व क्षारांचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी देखील राहू शकतात. त्यामुळे असे प्राणी खाड्या, नदी-मुखे, उपसागर अशा अधिवासांत आढळतात. त्यांचं शरीर आत ओढून घेण्याजोगी सोंड (अंतर्मुख) आणि खंडविहीन धड यांनी बनलेले असते. अंतर्मुखवर बाकदार कंटकांची वलये असतात. ते द्विपार्श्व् व अरीय सममिती दर्शवतात. काही प्रजातींत पुच्छ अथवा पुच्छांगे आढळतात. शरीरात मोठी देहगुहा असते पण त्यांत कोणतीही इंद्रिये नसल्याने व त्यातील द्रवात वायूवहनाची रंजके असणाऱ्या आणि अमिबासम पेशी असल्याने तिला अभिसरण पोकळी समजले जाते. पचनसंस्था सरळ नलिकेसम असून तीत बाहेर काढता येणारी घशाची पोकळी, आतडे व छोटे गुदाशय असते. हे प्राणी मृतोपजीवी (डेट्रीटीवोर्स), निस्यंदक अशन (फिल्टर फीडर) असतात. इतर सर्व इंद्रिय - संस्था कायनोऱ्हिन्का संघातील प्राण्यांप्रमाणेच असतात. प्रायाप्यूलस, हालीक्रिप्टस, ट्युबील्युकस, मक्काबियस इत्यादी प्रजाती या संघात आढळतात.


लोरिसिफेरा संघ सूक्ष्म (०.१ ते १ मि लीमीटर), गाळातील वालुका-कणांना चिकटून राहणाऱ्या , समुद्री प्राण्यांचा लहान (केवळ ४०-१५० जाती) व तुलनेनं अलीकडेच शोध लागलेला (क्रिस्टेन सन, १९८३) गट आहे. या प्राण्यांच्या शरीरावर संरक्षक आवरण (लॉरिसा/ काचोळी) असते. हे प्राणी समुद्रात सर्वत्र, विभिन्न खोलींवर आणि विभिन्न प्रकारच्या गाळांत आढळतात. यांचे शरीर डोके, आखूड मान आणि धड (जे ८ पट्टिकांच्या लॉरिसा अथवा काचोळी ने वेढलेले असते) यांनी बनलेले असते. लॉरिसा संरक्षक चिलखत प्रमाणे असते. पचन संस्था मुख, घसा, अन्न नलि का व आतडे यांनी बनलेली असून अंतर्मुखतील मुखाभोवती असणाऱ्या पोकळ तारा वापरीत हे प्राणी शैवाल आणि इतर सूक्ष्मजीवांच्या पेशीतील पेशीद्रव्य शोषून त्यावर उपजीविका करतात. चेता संस्था चेता वलय आणि चेता तंतूंनी बनलेली असनू ती संवदेना ग्रहण आणि त्यांना योग्य प्रतिसाद देण्याचे कार्य करते. प्रजनन लैंगिक पद्धतीने होत असून बहुतेक जातींत नार- मादी वेगळे असतात तर काही जाती उभयलिंगी असतात. अनिषके जनन (फलि त न झालेल्या अंडांपासून डिंभक बनणे) सामान्य असते. डिंभक देहगुहाहीन, बहुतके जातींतील प्रौढ छद्म-देहगुही तर काही जातींतील प्रौढ देहगुहाहीन असतात. या संघात नानालॉरिकस, आर्मोरलॉरिकस, औस्ट्रालॉरिकस, स्पिनोलॉरिकस, प्लिसिलॉरिकस, उर्णा लॉरिकस, वाटालॉरिकस या प्रजाती आढळतात.


(लेखक - रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय, घाटकोपर येथून प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले आहेत आणि पर्यावरण दक्षता मंडळ, ठाणे येथे निर्देशक म्हणून कार्यरत आहेत.)

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page