top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

सुश्रुत : प्लास्टिक शस्त्रक्रियेचे आद्यप्रवर्तक शल्यचिकित्सेचा सुवर्णअध्याय

14 hours ago
6 min read

भारतासाठी अभिमानाचा क्षण : एडिनबर्ग येथे महर्षी सुश्रुतांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण 


मुकुंद भालेराव


एडिनबर्ग येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ही जगातील अत्यंत प्रतिष्ठित शल्यवैद्यकीय संस्था आहे. अशा संस्थेच्या परिसरात महर्षी सुश्रुतांचा पुतळा उभारला जाणे म्हणजे केवळ एका महान वैद्याला दिलेला सन्मान नसून, भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेला जागतिक स्तरावर मिळालेली मान्यता आहे. ही घटना जगाला स्मरण करून देते की आधुनिक शल्यचिकित्सेच्या अनेक मूलभूत संकल्पना आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेची (Plastic and Reconstructive Surgery) तत्त्वे प्राचीन भारतात विकसित झाली होती. आज जगभरातील वैद्यकीय क्षेत्र भारतीय ज्ञानपरंपरेचा नव्याने अभ्यास करीत असून, महर्षी सुश्रुतांचे कार्य त्यामध्ये प्रेरणादायी ठरत आहे.  


वैदकशास्त्राच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त अशी आहेत की, त्यांचे कार्य काळाच्या सीमा ओलांडून मानवजातीच्या ज्ञानपरंपरेचा अविभाज्य भाग बनते. भारतीय आयुर्वेदातील महान शल्यविशारद आचार्य सुश्रुत हे असेच एक अजरामर व्यक्तिमत्त्व होय. जगभरात त्यांचा उल्लेख Father of Surgery किंवा Father of Plastic Surgery असा केला जातो. तथापि, अशा उल्लेखामागे केवळ गौरवोद्गार नसून त्यामागे मूळ संस्कृत ग्रंथातील शास्त्रीय पुरावे, शस्त्रक्रियांचे तपशीलवार वर्णन आणि त्यांची चिकित्सकीय मांडणी आहे. सुश्रुतसंहितेत शस्त्रक्रियेचे तत्त्वज्ञान, शल्यवैद्याचे गुण, शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे, जखमांचे व्यवस्थापन, अस्थिभंग, नेत्ररोग, मूत्राशयातील खडे, प्रसूतीसंबंधी शस्त्रक्रिया आणि शरीराच्या विविध अवयवांवरील शस्त्रक्रियांचे अत्यंत सुसूत्र वर्णन आढळते. विशेषतः नाकाची पुनर्रचना (Rhinoplasty) आणि नाकावरील  आघातांचे उपचार यांबाबतचे वर्णन आजही वैद्यकीय इतिहासात विशेष महत्त्वाचे मानले जाते.


प्राचीन भारतातील शल्यचिकित्सेची परंपरा

आयुर्वेदाच्या अष्टांगांपैकी शल्यतंत्र हा एक अत्यंत विकसित विभाग होता. युद्धे, अपघात, पशूंचे हल्ले किंवा शिक्षेच्या स्वरूपात नाक, कान किंवा ओठ कापण्याच्या घटना त्या काळात घडत असत. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी केवळ औषधोपचार पुरेसे नव्हते; कुशल शस्त्रक्रियेची आवश्यकता होती.


सुश्रुतांनी शल्यक्रियेपूर्वी रुग्णाची तपासणी, शस्त्रक्रियेचे नियोजन, योग्य साधनांचा वापर, रक्तस्रावाचे नियंत्रण, जखमेची निगा आणि शस्त्रक्रियेनंतरचे उपचार यांचे अत्यंत पद्धतशीर वर्णन केले आहे. ही मांडणी पाहता, शल्यचिकित्सा ही त्या काळात स्वतंत्र आणि विकसित वैद्यकीय शाखा होती, हे स्पष्ट होते.


नाक पूर्णपणे कापले गेले असल्यास किंवा त्याचा मोठा भाग नष्ट झाला असल्यास, ही उपचारपद्धती अपुरी ठरते. अशा वेळी आवश्यक असते ती नासासंधान—म्हणजे नाकाची पुनर्निर्मिती. या अद्वितीय शस्त्रक्रियेचे वर्णन सुश्रुतांनी सूत्रस्थानात अत्यंत तपशीलवार केले आहे. हाच भाग आधुनिक प्लास्टिक शस्त्रक्रियेच्या इतिहासात विशेष महत्त्वाचा मानला जातो.


नासासंधान: सुश्रुतांनी वर्णन केलेली नाकाच्या या पुनर्निर्मितीची अद्भुत शस्त्रक्रिया 

नाक पूर्णपणे कापले जाणे किंवा त्याचा मोठा भाग नष्ट होणे ही केवळ शारीरिक विकृती नव्हे, तर व्यक्तीच्या श्वसनक्रिया, वाणी, चेहऱ्याचे सौंदर्य आणि सामाजिक जीवनावर परिणाम करणारी गंभीर अवस्था आहे. अशा वेळी नाकाची पुनर्निर्मिती कशी करावी हे खालील श्लोकातील प्रक्रिया वाचल्यानंतर लक्षात येईल. 

विश्लेषितायास्त्वथ नासिकायावक्ष्यामि सन्धानविधिं यथावत । नासाप्रमाणं पृथिवीरुहणां पत्रं गृहीत्वा त्ववलम्बितस्य ॥४९ || 

ज्याचे नाक कापले गेले आहे, त्याच्या पुनर्संधानाची पद्धत सांगत आहे. सर्वप्रथम झाडाचे एक पान घेऊन ते नाकाच्या आवश्यक आकारानुसार कापावे. हे पान म्हणजे नाकाचा साचा (Template) होय. आधुनिक पुनर्निर्माण शस्त्रक्रियेत दोषग्रस्त भागाचे अचूक मोजमाप करून टेम्पलेट तयार करण्याची जी पद्धत आहे, तिच्याशी हे वर्णन आश्चर्यकारक साम्य दर्शविते. 


तेन प्रमाणेन हि गण्डपार्श्वादुत्कृत्य बद्धं त्वथ नासिकाग्रम । विलिख्य चाशु प्रतिसन्दधीत तत् साधुबन्धैर्भिषगप्रमत्तः ॥५०||


पानाच्या मोजमापानुसार गालावरील त्वचेचा आवश्यक भाग कापून तो नाकाच्या जागी बसवावा आणि योग्य प्रकारे शिवून बंधन करावे. ही पद्धत आधुनिक वैद्यकशास्त्रात Pedicled Cheek Flap Reconstruction या तत्त्वाशी मिळतीजुळती मानली जाते. विशेष म्हणजे, त्वचा पूर्णपणे वेगळी न करता तिचा रक्तपुरवठा काही प्रमाणात कायम राहील, अशी कल्पना या वर्णनात सूचित होते. त्यामुळे नव्याने बसविलेल्या ऊती जिवंत राहण्याची शक्यता वाढते. ही संकल्पना पुनर्निर्माण शल्यचिकित्सेतील मूलभूत तत्त्वांपैकी एक मानली जाते. 


सुसंहितं सम्यगतो यथावन्नाडीद्वयेनाभिसमीक्ष्य बद्ध्वा । प्रोन्नम्य चैनामवचूर्णयेत्तु पतङ्गयष्टीमधुकाञ्जनैश्च ॥५१||


नाक योग्य प्रकारे बसवल्यानंतर दोन्ही नाकपुड्यांत दोन नळ्या ठेवाव्यात, जेणेकरून त्या बंद होणार नाहीत आणि श्वसनमार्ग मोकळा राहील. त्यानंतर पतंग, यष्टिमधु आणि अंजन या औषधींचे चूर्ण लावावे. आजच्या शस्त्रक्रियांमध्ये वापरल्या जाणाऱ्या Nasal stents किंवा Nasal splints यांची संकल्पना येथे स्पष्टपणे जाणवते. शस्त्रक्रियेनंतर केवळ बाह्य आकार नव्हे, तर नाकाचे कार्य (Function) टिकविणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हे सुश्रुतांनी ओळखले होते. शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांबाबत ते पुढे सांगतात—


सच्छाद्य सम्यक् पिचुना सितेन तैलेन सिञ्चेदसकुत्तिलनाम् । घ्रुतश्च पाय्यः स नरः सुजीर्णे स्निग्धो विरेच्यः स यथोपदेशम् ॥५२||


जखम स्वच्छ कापसाने झाकावी, तिळाच्या तेलाने ती ओलसर ठेवावी, रुग्णाला तूप द्यावे आणि योग्य वेळी स्नेहन व विरेचन करावे. यावरून शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी शस्त्रक्रियेनंतरची निगा (Post-operative Care) तितकीच महत्त्वाची आहे, याची सुश्रुतांना पूर्ण जाणीव होती.  शेवटी ते म्हणतात,


रूढश्च सन्धानमुपागतं स्यात् तदर्धशेषन्तु पुनर्निकृन्तेत् । हीनां पुनर्वर्धयितुं यतेत समाश्च कुर्यादति वृद्धमांसाम् ॥५३||


जखम भरल्यानंतर त्वचा जास्त राहिली असल्यास ती कापून योग्य आकार द्यावा; एखादा भाग कमी पडत असल्यास तो वाढविण्याचा प्रयत्न करावा; आणि वाढलेले मांस समतल करावे. आधुनिक भाषेत यालाच Revision Surgery किं वा Secondary Corrective Procedure असे म्हणतात. म्हणजेच, पहिली शस्त्रक्रिया ही अंतिम नसून आवश्यकतेनुसार पुढील सुधारणा करणेही उपचाराचा भाग आहे, ही अत्यंत प्रगत संकल्पना सुश्रुतांनी मांडली आहे.   



शास्त्रीय विश्षलेण

वरील पाच श्लोकांत आधुनिक Plastic Surgery मधील अनेक मूलभूत तत्वे स्पष्टपणे दिसतात.

  1. Pre-operative planning – पानाचा साचा वापरून अचूक मोजमाप.

  2. Cheek flap reconstruction – गालावरील त्वचेचा फ्लॅप तयार करणे.

  3. Pedicled flap technique – त्वचेचा रक्तपुरवठा टिकवून ठेवत नाकावर बसविणे.

  4. Airway maintenance – नाकपुड्या बंद होऊ नयेत म्हणून दोन नळ्या ठेवणे.

  5. Post-operative dressing – औषधी चूर्ण, कापूस व तिळाच्या तेलाने जखमेची निगा.

  6. Revision surgery – जास्त किंवा कमी झालेल्या ऊतींचे नंतर पुनः शस्त्रकर्म करून योग्य आकार देणे.


या पाच श्लोकांचा एकत्रित विचार केला असता असे दिसते की सुश्रुतांनी नासासंधान ही केवळ एक शस्त्रक्रिया म्हणून मांडलेली नाही; तर तिचे संपूर्ण शास्त्र विकसित केले आहे. रुग्णाचे मोजमाप, ऊतींची निवड, पुनर्निर्मिती, श्वसनमार्गाचे संरक्षण, जखमेची निगा आणि अंतिम सौंदर्यदृष्ट्या सुधारणा— हे सर्व टप्पे त्यांनी क्रमवार आणि चिकित्सक दृष्टीने स्पष्ट केले आहेत. त्यामुळे वैद्यकीय इतिहासात या वर्णनाला पुनर्निर्माण शल्यचिकित्सेच्या विकासातील एक मैलाचा दगड मानले जाते. 


सुश्रुतांनी शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांनाही (Post Operative Care) तेवढेच महत्त्व दिले आहे. जखम स्वच्छ ठेवणे, औषधी लेप लावणे, पट्ट्या नियमित बदलणे, योग्य आहार देणे आणि संसर्ग टाळणे या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला आहे. यावरून त्यांची दृष्टी केवळ यशस्वी शस्त्रक्रियेपुरती मर्यादित नव्हती, तर रुग्णाच्या संपूर्ण  पुनर्वसनावर (Rehabilitation) केंद्रित होती. 


भारतीय नासासंधान पद्धतीचा जागतिक प्रवास, सुश्रुतांचे स्थान, भारतीय नासासंधान पद्धतीचा जगावर प्रभाव 

सुश्रुतसंहितेतील नासासंधानाचे वर्णन अनेक शतकांपर्यंत भारतीय वैद्यकीय परंपरेत जतन झाले. मध्ययुगातही भारतातील काही वैद्य आणि कारागीर ही पद्धत वापरत असल्याचे उल्लेख आढळतात. अठराव्या शतकात या पद्धतीची जगभर पुन्हा चर्चा सुरू झाली.


सन १७९४ मध्ये पुण्याजवळ एका व्यक्तीवर करण्यात आलेल्या नाकाच्या पुनर्निर्मितीचे वृत्त इंग्लंडमधील The Gentleman’s Magazine मध्ये प्रसिद्ध झाले. युद्धात नाक गमावलेल्या एका व्यक्तीवर स्थानिक भारतीय शल्यकाराने कपाळावरील त्वचेचा उपयोग करून नाकाची पुनर्रचना केली होती. या वृत्ताने युरोपीय वैद्यकीय क्षेत्राचे विशेष लक्ष वेधून घेतले. यानंतर इंग्लंडमधील शल्यविशारद Joseph Constantine Carpue यांनी भारतीय पद्धतीचा अभ्यास करून सन १८१४ मध्ये यशस्वी नासासंधान शस्त्रक्रिया केली. त्यांनी या अनुभवावर ग्रंथही प्रकाशित केला. त्यामुळे भारतीय नासासंधान पद्धतीला युरोपमध्ये शास्त्रीय मान्यता मिळाली आणि पुनर्निर्माण शल्यचिकित्सेच्या इतिहासात तिचे महत्त्व अधोरेखित झाले.


अठराव्या शतकात भारतात प्रचलित असलेली कपाळावरील त्वचेचा उपयोग करणारी पद्धत आणि सुश्रुतांनी वर्णन केलेली गालावरील त्वचेची पद्धत यांत काही तांत्रिक फरक आहेत. तथापि, दोषग्रस्त नाकाची त्वचेच्या जिवंत फ्लॅपद्वारे पुनर्निर्मिती हा मूलभूत सिद्धांत दोन्ही ठिकाणी समान आहे. त्यामुळे वैद्यकीय इतिहासकार भारतीय पुनर्निर्माण शस्त्रक्रियेची परंपरा अत्यंत प्राचीन मानतात.


सुश्रुतांना “प्लास्टिक सर्जरीच जनक का म्हटले जाते? 

सुश्रुतांना “Father of Surgery” किंवा “Father of Plastic Surgery” असे संबोधले जाते. या उल्लेखांचा अर्थ समजून घेताना काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. सुश्रुतसंहितेत नाकाच्या पुनर्निर्मितीची क्रमबद्ध शस्त्रक्रिया, मोजमापासाठी साचा तयार करणे, त्वचेचा जिवंत फ्लॅप वापरणे, नाकपुड्या खुल्या ठेवण्यासाठी नळ्यांचा उपयोग, शस्त्रक्रियेनंतरची जखमेची निगा आणि आवश्यक असल्यास पुढील सुधारणा (Revision) यांचे स्पष्ट वर्णन आहे. या सर्व कारणांमुळे पुनर्निर्माण शल्यचिकित्सेच्या इतिहासात सुश्रुतांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पुनर्निर्माण शस्त्रक्रियेच्या मूलभूत तत्त्वांची शास्त्रीय मांडणी करणाऱ्या अग्रणी शल्यविशारदांमध्ये सुश्रुतांचे स्थान निर्विवाद आहे.


भारतीय वैद्यकशास्त्राच्या इतिहासात सुश्रुत हे केवळ एक प्राचीन वैद्य नाहीत, तर संशोधनवृत्ती, चिकित्सक दृष्टी आणि प्रयोगशीलतेचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याचा अभिमान बाळगण्याबरोबरच त्याचा शास्त्रीय अभ्यास करणे, मूळ ग्रंथांचे चिकित्सक वाचन करणे आणि जागतिक वैद्यकीय इतिहासात त्यांचे योगदान वस्तुनिष्ठपणे मांडणे ही आजच्या संशोधकांची जबाबदारी आहे. अशा दृष्टिकोनातून पाहिले असता, आचार्य सुश्रुत हे पुनर्रचनात्मक शल्यचिकित्सेच्या इतिहासातील एक अजरामर दीपस्तंभ ठरतात.


निष्कर्ष

सुश्रुतसंहितेतील नासाभंग चिकित्सा आणि नासासंधान या दोन्ही वर्णनांचा अभ्यास केल्यास एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर येतो. सुश्रुत हे केवळ कुशल शल्यवैद्य नव्हते, तर ते सूक्ष्म निरीक्षक, प्रयोगशील चिकित्सक आणि शस्त्रक्रियेचे तत्त्वज्ञ होते. रुग्णाची तपासणी, शस्त्रक्रियेचे नियोजन, अचूक मोजमाप, ऊतींची निवड, श्वसनमार्गाचे संरक्षण, शस्त्रक्रियेनंतरची निगा आणि आवश्यक असल्यास पुनः शस्त्रक्रिया—या सर्व टप्प्यांचा त्यांनी केलेला विचार त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची साक्ष देतो.

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी रचलेल्या ग्रंथात इतके परिपक्व आणि व्यवहार्य शस्त्रवैद्यकीय ज्ञान आढळणे ही भारतीय ज्ञानपरंपरेची उल्खनीय देणगी आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राने या ज्ञानाचा ऐतिहासिक सन्मान राखत त्याचा चिकित्सक दृष्टीने अभ्यास करणे, हीच आचार्य सुश्रुतांना खरी आदरांजली ठरेल.

कुठलेही राष्ट्र हे त्याच्या संस्कृतीमुळे जिवंत राहते. भौगोलिक सीमांनी निर्देषित ओळखल्या जातात ते फक्त देश असतात. संस्कृत राष्ट्राचे समग्र दर्शन घडविते. अर्थातच संस्कृती जिवंत ठेवण्याचे महत्वपूर्ण काम राष्ट्राचे नागरिक करीत असतात आणि त्यामुळे लोकांच्या आयुष्याशी जे जे निगडीत असेल ते ते सर्व संस्कृतीमध्ये अंतर्भूत होत असते. ‘आरोग्यं धनसंपदा’ यानुसार आरोग्याच्या निमित्ताने आपण सर्वजण आपल्या महान सनातन संस्कृतीचा एक महत्वाचा घटक म्हणून प्राचीन आरोग्यशास्त्रकडे पहायला हवे. 


संदर्भ :

१) सुश्रुतसंहिता, चिकित्सास्थान, अध्याय ३, श्लोक ४३– ४४ (नासाभंग चिकित्सा).

२) Kaviraj Dr. Ambika Datta Shastri (संपा.), सुश्तसं रु हिता, चौखम्बा संस्कृ त संस्थान, वाराणसी (आपण वापरलेली आवृत्ती) Edition: Reprint: 2013, ISBN: 978–81–89798–18–5

३) Carpue, J. C. An Account of Two Successful Operations for Restoring a Lost Nose, London, 1816 (Internet Archives)

४) Bhishagratna, K. L. (Trans.), An English Translation of the Sushruta Samhita (Internet Archives) 


(लेखक डॉ. हेडगेवार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व के. पाँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, छत्रपती संभाजी नगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.) 





 





 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page