श्रावण : वनस्पती, परिसंस्था आणि जैवविविधतेचा विज्ञानोत्सव
डॉ. दिपेश रामदास चिकणे
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण हा केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाशी सुसंवाद साधणारा पर्यावरणीय संदेश आहे. श्रावण महिन्यात साजरे होणारे नारळी पौर्णिमा, नागपंचमी आणि रक्षाबंधन हे तीनही सण वनस्पती, परिसंस्था (Ecosystem) आणि जैवविविधता (Biodiversity) यांच्याशी अतूटपणे जोडलेले आहेत. आपल्या पूर्वजांनी निसर्गसंवर्धनाची संकल्पना थेट सांगितली नाही, तर ती लोकपरंपरा, श्रद्धा आणि उत्सवांच्या माध्यमातून समाजात रुजवली. त्यामुळे हे सण म्हणजे भारतीय पर्यावरणशास्त्राचे जिवंत उदाहरण आहेत.

साधारण आषाढ महिन्यात सुरू झालेला मान्सून श्रावणात पूर्णपणे स्थिरावतो. वातावरणातील आर्द्रता ८०–९५% पर्यंत वाढते, जमिनीतील पाण्याची उपलब्धता वाढते आणि तापमान तुलनेने कमी होते. या काळात वनस्पतींमध्ये अनेक महत्त्वपूर्ण जैविक प्रक्रिया घडतात.
सुप्त अवस्थेतील बिया अंकुरण्यास सुरुवात करतात.
नवीन पाने आणि फांद्यांची वाढ वेगाने होते.
मुळांद्वारे पाणी व खनिजांचे शोषण वाढते.
प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढून जैवभार (Biomass) निर्माण होतो.
मातीतील जीवाणू, बुरशी, ऍक्टीनोमायसीट्स आणि गांडुळे सक्रिय होतात.
म्हणजेच श्रावण हा पृथ्वीवरील Primary Productivity सर्वाधिक वाढण्याचा काळ आहे. ही वाढ संपूर्ण अन्नसाखळीचा पाया बनते.
नारळी पौर्णिमा : किनारी वनस्पती रिसंस्थेचा उत्सव

नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राची पूजा एवढेच त्याचे स्वरूप नाही. हा सण किनारी परिसंस्था (Coastal Ecosystem) आणि नारळाच्या वृक्षाचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करणारा आहे. नारळ (Cocos nucifera) हा जगातील सर्वात उपयुक्त वृक्षांपैकी एक मानला जातो. समुद्रकिनारी वाढणाऱ्या या वृक्षामध्ये क्षारयुक्त माती, वेगवान वारे आणि दुष्काळ सहन करण्याची विलक्षण क्षमता असते.
किनारी परिसंस्थेमध्ये नारळाची भूमिका
नारळाच्या तंतुमय मुळा वाळू घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे किनारपट्टीची धूप (Coastal Erosion) कमी होते. चक्रीवादळाच्या

वेळीही ही मुळे जमिनीचे संरक्षण करतात. नारळाच्या बागांमध्ये अनेक प्रकारचे जीव आढळतात.
परागीभवन करणारे कीटक
मधमाश्या
फुलपाखरे
सरडे
पक्षी
सूक्ष्मजीव
उपजीवी वनस्पती (Epiphytes)
म्हणून नारळाची बाग म्हणजे लहान जैवविविधता केंद्र (Micro Biodiversity Hotspot) असते. याशिवाय नारळाची गळून पडलेली पाने आणि करवंटी विघटित होऊन मातीतील सेंद्रिय कार्बन वाढवतात. त्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि मातीची सुपीकता टिकून राहते. भारतीय संस्कृतीत नारळाला “कल्पवृक्ष” म्हटले जाते. वनस्पती विज्ञानाच्या भाषेत तो Zero Waste Plant आहे. मुळे, खोड, पाने, करवंटी, शेंडी, नारळपाणी आणि गर प्रत्येक भाग मानव आणि परिसंस्थेसाठी उपयुक्त आहे.
नागपंचमी : सर्प नव्हे, तर संपूर्ण कृषी परिसंस्थेचा सन्मान

नागपंचमी हा सर्पपूजेचा सण असला तरी त्यामागील खरी संकल्पना म्हणजे शेती आणि जैवविविधतेचे संरक्षण. पावसाळ्यात शेतीमध्ये वनस्पतींची वाढ झपाट्याने होत असते. याच काळात उंदरांची संख्या वाढते. उंदीर बिया, मुळे आणि धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. याच ठिकाणी साप परिसंस्थेतील सर्वोच्च जैविक नियंत्रक (Biological Pest Controller) म्हणून कार्य करतात.
जर साप नसतील तर—
उंदरांची संख्या वाढेल.
पिकांचे नुकसान वाढेल.
वनस्पतींचे उत्पादन घटेल.
अन्नसाखळी विस्कळीत होईल.
म्हणून नागपंचमी हा सर्पांचा नव्हे तर वनस्पती उत्पादन व्यवस्थेचा उत्सव आहे.
साप आणि वनस्पती यांचा अप्रत्यक्ष संबंध
वनस्पती - धान्य - उंदीर - साप - घार - ही संपूर्ण अन्नसाखळी संतुलित राहण्यासाठी प्रत्येक आवश्यक आहे. यालाच आधुनिक पर्यावरणशास्त्रामध्ये Ecological Balance म्हणतात. भारतीय समाजाने नागपूजेच्या माध्यमातून सापांचे संरक्षण केले आणि अप्रत्यक्षपणे शेती, वनस्पती आणि जैवविविधतेचे संवर्धन केले.
रक्षाबंधन : वृक्षसंरक्षणाचा आधुनिक संदेश

रक्षाबंधन म्हणजे संरक्षणाची प्रतिज्ञा. आज अनेक ठिकाणी “वृक्ष राखी” उपक्रम राबवले जातात. हा उपक्रम भारतीय संस्कृतीचा आधुनिक पर्यावरणीय विस्तार आहे. एका परिपक्व वृक्षामुळे
दरवर्षी शेकडो किलो कार्बन डायऑक्साइड स्थिर होतो.
हजारो लिटर पावसाचे पाणी जमिनीत मुरते.
तापमान कमी राहते.
सूक्ष्म हवामान तयार होते.
पक्ष्यांना घरटी मिळतात.
कीटकांना अधिवास मिळतो.
बुरशी आणि जीवाणूंचे जीवन टिकून राहते.
म्हणून एका वृक्षाचे संरक्षण म्हणजे संपूर्ण परिसंस्थेचे संरक्षण. वृक्षाभोवती निर्माण होणाऱ्या जैविक संबंधांच्या जाळ्याला Tree-centered Ecosystem असे म्हणतात. मोठ्या वृक्षावर — लायकेन; शेवाळ; वेली; ऑर्किड; मधमाश्या; मुंग्या; फुलपाखरे; पक्षी; वटवाघुळे यांचे संपूर्ण जीवन अवलंबून असते. यामुळे वृक्ष म्हणजे “Living Biodiversity Tower” आहे.
श्रावणातील जैवविविधतेचा विस्फोट
श्रावणात पावसामुळे परिसंस्थेमध्ये ऊर्जेचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढतो. वनस्पती प्रकाशसंश्लेषणाद्वारे सौरऊर्जेचे अन्नामध्ये रूपांतर करतात. हीच ऊर्जा पुढे कीटक, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, सूक्ष्मजीव यांच्यापर्यंत पोहोचते. यामुळे वनस्पती या पृथ्वीवरील प्रत्येक परिसंस्थेच्या प्राथमिक उत्पादक (Primary Producers) आहेत. वनस्पतींशिवाय अन्नसाखळी, जलचक्र, कार्बनचक्र आणि ऑक्सिजनचक्र अस्तित्वात राहू शकत नाही.
भारतीय सण : पर्यावरणीय शिक्षणाची प्राचीन पद्धत
पूर्वीच्या काळात पर्यावरण शिक्षणासाठी पुस्तके नव्हती. म्हणून समाजाने सण निर्माण केले.
नारळी पौर्णिमा - समुद्र आणि किनारी वनस्पती वाचवा.
नागपंचमी- साप आणि शेतीचे संरक्षण करा.
रक्षाबंधन- वृक्षांचे रक्षण करा.
ही संकल्पना आजच्या Conservation Biology, Restoration Ecology आणि Sustainable Development या आधुनिक विज्ञानाशी पूर्णपणे सुसंगत आहे. श्रावणातील प्रत्येक सण आपल्याल एकच संदेश देतो वनस्पतींचे संरक्षण म्हणजे पृथ्वीवरील जीवनाचे संरक्षण. नारळाचा वृक्ष किनारी परिसंस्था जपतो, साप कृषी जैवविविधतेचे संतुलन राखतात आणि वृक्षांना बांधलेली राखी मानवाच्या पर्यावरणीय जबाबदारीची साक्ष देते.
आज हवामान बदल, जंगलतोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास ही जागतिक आव्हाने बनली आहेत. अशा वेळी भारतीय परंपरेतील या सणांकडे केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहता वनस्पती विज्ञान, परिसंस्था संरक्षण आणि जैवविविधता संवर्धनाचा लोकविज्ञानाधारित संदेश म्हणून पाहणे आवश्यक आहे. श्रावणातील प्रत्येक हिरवे पान, प्रत्येक वृक्ष आणि प्रत्येक परिसंस्था आपल्याला सांगते “निसर्गाचे रक्षण हीच भविष्यातील सर्वात मोठी राखी आहे.”
(लेखक शिक्षण प्रसारक मंडळींच्या प्रिंसिपल बी व्ही भिडे फॉउंडेशन येथे प्रशिक्षण उपक्रम समन्वयक म्हणनू कार्यरत आहेत.)

Comments