शैक्षणिक प्रशिक्षणातून सामाजिक व औद्योगिक नवोन्मेषाकडे: भिडे फाउंडेशनचा प्रवास
- smsrushtidnyan
- Jan 20
- 6 min read
डॉ. प्रशांत शरद दुराफे
शिक्षण प्रसारक मंडळींच्या प्रि. बि. व्ही. भिडे फाउंडेशनची स्थापना १९९७ साली स. प. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास व संशोधनाभिमुख शिक्षणासाठी झाली. आयुर्वेद, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र व वनस्पती उती संवर्धन या क्षेत्रांत प्रशिक्षण, चाचणी व अनुप्रयुक्त संशोधन हे फाउंडेशनचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. आयुर्वेदिक औषधे, पर्यावरणपूरक भस्मनिर्मिती, फळांच्या सालींपासून पेक्टिन व सॅनिटायझर निर्मिती, तसेच सुगंधी रसायनांचे प्रक्रिया प्रमाणीकरण असे अनेक नवोन्मेषी प्रकल्प येथे राबवले गेले आहेत. PCIMH, RGSTC, औद्योगिक संस्था व स्टार्ट अप्सच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण व प्रगतीपथावर आहेत. FDA/NABL मानांकनाच्या दिशेने वाटचाल करत फाउंडेशन औद्योगिक-शैक्षणिक दुवा मजबूत करून इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्र म्हणून विकसित होण्याचा प्रयत्न करत आहे.

शिक्षण प्रसारक मंडळींच्या प्रि. बि . व्ही. भिडे फाउंडेशनची स्थापना १९९७ साली स. प. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात झाली. रसायनशास्त्र विभागातील काही प्राध्यापकांनी एकत्र येऊन प्राचार्य भिडे सरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षणानंतर कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम सुरु केले. तेथून पुढे आयुर्वेद, रसायनशास्त्र आणि अन्य तदानुषंगिक विषयातील प्रशिक्षण, संशोधन आणि उपक्रम असे संस्थेचे स्वरूप राहिले. आयुर्वेदिक शिक्षण घेताना संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रासायनिक तसेच जैविक पृथःकरण आणि विश्लेषण करून देणाऱ्या प्रयोगशाळांची उपलब्धता अनेक वर्षे मर्यादित होती. ती उणीव भिडे फाउंडेशन काही प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे.
सध्या भिडे फाउंडेशन येथे सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पती उती संवर्धन विषयाच्या प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत. पुण्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयातून / संस्थांमधून विविध प्रकारचे नमुने चाचणीसाठी फाउंडेशनमध्ये येत असतात. त्यात प्रामुख्याने आयुर्वेदिक औषधी, पाणी, मृदा, रासायनिक संयुगे यांचे नमुने समाविष्ट होतात. आमची प्रयोगशाळा अद्ययावत असावी आणि येथील संशोधन गुणात्मकदृष्टया कुठेही उणे असू नये म्हणून आम्ही अन्न आणि औषध प्रशासन/ राष्ट्रीय परीक्षण राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यायन बोर्ड (FDA/NABL) मानांकनासाठी सध्या कार्यरत आहोत. गेल्या २८ वर्षात वर नमूद केलेल्या उपक्रमांशि वाय काही सरकारी तसेच अनेक खाजगी संस्थांचे संशोधन प्रकल्प येथे कार्यान्वित केले गेले. अनेक संस्थांबरोबर ठराविक कालावधीचे सहयोगी तत्वावर करार करून संशोधन प्रकल्प राबविण्यात आले. त्यातील काही प्रकल्पांची त्रोटक माहिती वानगीदाखल येथे देत आहे.
१. PCIMH प्रोजेक्ट
फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन & होमोयोपॅथी (PCIMH) च्या अंतर्गत दहा प्रकारची विविध आयुर्वेदिक रसायने तयार करून त्यांचे गुणधर्म तपासणे, विश्लेषण करणे यासाठी तीन वर्षासाठी संशोधन केले गेले ज्याचे निष्कर्ष एपीआय मध्ये (Ayurvedic Pharmacopoeia of India) अंतर्भूत केले गेले आहेत.
२. पर्यावरणपूरक भस्म उत्पादन प्रक्रिया

आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये भस्मांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो. सोने, जस्त, तांबे, शिसे, अर्सेनिक इत्यादी धातूंपासून तयार होणारी भस्मे अनेक जुनाट व असाध्य रोगांवर उपचारांसाठी वापरली जातात. भस्म निर्मितीची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असते. त्यात धातूंचे शुद्धीकरण, विशिष्ट प्रमाणात संयोजन, विशिष्ट रासायनिक बदल इत्यादी प्रक्रिया करून धातूंच्या ऑक्साईडचे ठराविक आकाराचे सूक्ष्म कण मिळवणे अपेक्षित असते. त्यामुळे भस्मांना अपेक्षित औषधी गुणधर्म प्राप्त होतात. या सर्व प्रक्रियेत महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण टप्पा म्हणजे गंधक आणि पारा यांच्या यांच्या संयुगांबरोबर धातूला घोटले जाते. हे मिश्रण अत्यंत उच्च तापमानाला तापवल्यानंतर त्यातील पारा वाफेच्या रूपाने निघून जातो. दुर्दैवाने पारंपारिक पद्धतीत हा पारा वातावरणात पसरतो व वातावरण दूषित करतो आणि वाया जातो. भिडे फाउंडेशन येथे आम्ही एक वैशिष्ट्यपूर्ण उपकरण तयार केले आहे ज्यात भस्म निर्मितीची प्रक्रिया नियंत्रित करता येते. तयार होणाऱ्या भस्माच्या गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड न करता पाऱ्याची वाफ वातावरणात जाण्यापासून रोखून तिचे पुनर्द्रवीकरण करता येते. या तंत्रज्ञानामुळे ९५% पारा पुन्हा वापरासाठी उपलब्ध होऊ शकतो. पर्यावरण पूरक भस्म निर्मिती आणि तीही कमी उत्पाद नमूल्यांमध्ये करणे यामुळे शक्य झाले आहे.
३. फळांच्या सालीपासून पेक्टिनची निर्मिती

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फळे आणि भाजीपाला उत्पादन करणारा देश आहे. सरासरी दोन लाख टन फळांच्या रसाचे उत्पादन दर वर्षी भारतामध्ये होते. फळांचा गर काढल्यानंतर उरणारा चोथा, साली इत्यादीची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे किंवा पुनर्वापर करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. भिडे फाउंडेशन येथे आम्ही फळांच्या साली पासून पेक्टिनची निर्मिती करण्याची प्रक्रिया विकसित केली आहे. या प्रक्रियेत फळांच्या साली सौम्य आम्लामध्ये ठेवून त्यानंतर रासायनिक प्रक्रियेने त्यातील २% पेक्टिन नावाचे रसायन सफरचंदाच्या सालीतून मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. पल्लवी टेक्नोलॉजीच्या सहकार्या ने केलेला हा प्रकल्प पुढे त्यांनी हिमाचल प्रदेश येथे व्यापारी स्तरावर सुरु केला आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग लिंबू वर्गीय फळे तसचे आंबा, डाळींब इत्यादी फळांपासून उपयोगी रसायने उत्पादन करण्यासाठी देखील होऊ शकतो.
४. फळांच्या सालीपासून सॅनिटायझर निर्मिती
एसेटिक आम्ल (६%-८%) आधारित उत्पादने जसे व्हिनेगर हे अत्यंत उपयुक्त सूक्ष्मजीवनाशक आहे. विविध प्रकारच्या मानवी आजारांना कारणीभूत असणारे जीवाणू, बुरशी, एकपेशीय जीव या आम्लतेत टिकाव धरू शकत नाहीत. भिडे फाउंडेशन येथे आम्ही फळांच्या साली, तसेच गरापासून किण्वन प्रक्रियेने पर्यावरणपूरक स्वच्छतेची रसायने (सॅनिटायझर) तयार करण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहोत. नैसर्गिक वातावरणात अनेक जीवाणू या प्रक्रियेसाठी सहाय्यभूत होत असतात. असे जीवाणू फळांच्या गरातून शोधून त्यांचे पृथःकरण करून हि प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भांडी घासण्याच्या, फरशी पुसण्याच्या रसायनांमुळे नैसर्गिक जलस्त्रोतांचे मोठ्या प्रमाणत प्रदूषण होत असते. हे प्रदूषण कमी करणे आणि मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या जैविक कचऱ्याचा योग्य पुनर्वापर होण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान उपयोगी ठरेल. ओजस्य प्युरिफायर्स या संस्थेबरोबर हे संशोधन चालू असून योग्य जिवाणूंचे समूह आम्हाला मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन करण्याचा ओजस्य प्युरिफायर्स यांचा मनोदय आहे.
५. सुगंधी रसायनांचे प्रक्रिया प्रमाणीकरण
सुगंधी रसायनांचा भारतातील व्यापार प्रती वर्षी सुमारे २००० कोटी रुपयांचा आहे. काही ठराविक रसायने वगळता बहुतेक प्रमुख घटक आपण चीन आणि अन्य देशांकडून आयात करत असतो. शांत सोल्युशन्स या संस्थेच्या सहकार्याने भिडे फाउंडेशन येथे यातील काही घटकांच्या उत्पादनाचे संशोधन सुरु आहे. चंदन आणि अंबर या प्रकारच्या सुगंधी रसायनांची उत्पादन प्रक्रिया, बासमती तांदूळाला असणाऱ्या वासाला कारणीभूत असणारा रासायनिक घटक, तसेच अन्य औषधी व्यवसायात लागणारे सुगंधी घटक प्रयोगशाळेत निर्माण करण्याच्या प्रक्रियेचे सर्वोत्तमीकरण सध्या आम्ही करत आहोत. या प्रक्रियेसाठी अत्यंत कुशल तंत्रज्ञांची तसेच सर्वोत्तम स्तराच्या रसायनांची आवश्यकता असते. आत्ता पर्यंत असे तीन घटक भिडे फाउंडेशन येथे तयार करण्यात आले जे पुढील काळात शांत सोल्युशन्सच्या वतीने बाजारात उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत. असे अजून अनेक घटक संशोधनाच्या विविध पातळीवर असून लवकरच ते देखील व्यावसायिक दृष्टया बाजारात आल्यास आपले परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाचून रोजगार निर्मिती होऊ शकेल.
सध्या चालू असलेले संशोधन प्रकल्प
१. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग (RGSTC) महाराष्ट्र राज्य पुरस्कृत मधुमेहावरील संशोधन प्रकल्प
भिडे फाउंडेशन आणि रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई यामध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये तीन वर्षासाठी शास्त्रीय संशोधनाचा एक करार करण्यात आला. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग यांच्या माध्यमातून समाजातील प्रमुख समस्यांवर संशोधन करून भारतीय नागरिकांसाठी उपाययोजना करणे असे या संशोधनाचे स्वरूप आहे. मधुमेहासाठी सध्या बाजारात अनेक आयुर्वेदिक उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु त्यातील प्रत्येक घटकाची पुरेशी शास्त्रीय मीमांसा न झाल्यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवर अजूनही अनेक भारतीय उत्पादनांना मान्यता मिळू शकलेली नाही. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील आठ संशोधन संस्थाना या विषयावर कार्य करण्यासाठी निवडण्यात आले. पुण्यातून केवळ भिडे फाउंडेशनची निवड झाली आहे. आपण सादर केलेल्या संशोधन प्रकल्पानुसार पाथरी, पानफुटी आणि मधुपर्णी या तीन वनस्पतीमधील घटक निवडून मधुमेहासाठी प्रभावी औषधी बनवणे, त्याची सर्व पातळ्यांवर चाचणी करणे आणि तीन वर्षाच्या कालावधीत नागरिकांसाठी ते उपलब्ध करून देणे असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. यातील मधुपर्णी वगळता अन्य दोन वनस्पती बद्दल पुरेसे संशोधन झालेले नांही परंतु अनेक पिढ्यांपासून त्याचा वापर विविध आजारांवर करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
२. युनिलिव्हर इंडस्ट्रीज प्रा. लि. पुरस्कृत करंजा तेलावरील संशोधन प्रकल्प
युनिलिव्हर इंडस्ट्रीज प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनी बरोबर संस्थेचा नुकताच एक सामंजस्य करार झाला. त्यानुसार करंजा तेलातील एक घटक वेगळा करण्याची प्रक्रिया अधिक सक्षम आणि उपयुक्त करण्यासाठी भिडे फाउंडेशन येथे संशोधन होणार आहे. ज्याचा उपयोग कंपनीच्या विविध उत्पादनांमध्ये केला जातो. या संशोधनामुळे प्रामुख्याने त्वचासौन्दर्याशी निगडीत उत्पादने अधिक प्रभावी आणि पर्यावरणपूरक होण्यास सहाय्य होणार आहे.
३. गोविज्ञान अनुसंधान संस्था पुरस्कृत पंचगव्यावरील संशोधन प्रकल्प
पंचगव्य हे देशी गायी पासून प्राप्त होणाऱ्या पाच पदार्थांपासून बनते जसे दुध, दही , तूप, गोमुत्र आणि शेण. धार्मिक कारणांसाठी त्याचा उपयोग आपल्याकडे पूर्वापारपासून होतो आहे. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून त्याच्यावर शास्त्रीय संशोधन देखील अलीकडच्या काळात सुरु झाले आहे. विविध जातींच्या देशी गायींपासून बनवलेल्या पंचगव्यातील घटकांचा तौलनिक अभ्यास करणे आणि प्रोबायोटिक म्हणून त्याचा उपयुक्तता सिद्ध करणे असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या वतीने सर्व प्रकारच्या सुविधा संस्थेला उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पटवर्धन, सदस्य एडव्होकेट मिहीर प्रभुदेसाई तसेच अन्य पदाधिकारी सदैव तत्पर असतात. पुढील काळात भिडे फाउंडेशनने औद्योगिक क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील दुवा साधण्याचे कार्य अधिक गतीने करावे असे संस्थेच्या व्यवस्थापन समितीने ठरवले आहे. त्यादृष्टीने अधिक सुसज्ज आणि मोठी प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे. केवळ रसायनशास्त्र आणि आयुर्वेद यापुरते सीमित न राहता फाउंडेशन पुढील काळात इनोव्हेशन आणि इनक्युबेशन केंद्र म्हणून प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी पूर्वीच्या नावात आवश्यक तो बदल केला आहे. अनेक संशोधक भिडे फाउंडेशन येथे आपले योगदान देत आहेत. डॉ. मीनल जोशी, डॉ. विजय गाडगीळ, डॉ. सुचेता गायकवाड, डॉ. अमेय शिरोळकर, डॉ. दिपेश चिकणे, डॉ. मानसी माळगावकर, विश्वनाथ तांबोळी, मंजुषा सावर्डेकर, गौरी साठ्ये अशी काही वानगीदाखल नावे येथे देता येतील.
संस्थेच्या सल्लागार मंडळावर अनेक मान्यवर शास्त्रज्ञ आणि आयुर्वेद तज्ञ आहेत ज्यांचाकडून संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. डॉ. मुकुंद चोरघडे, डॉ. श्रीरंग जोशी , डॉ. शशी कुमार मेनन, डॉ. विलास सिनकर, डॉ. श्रीकांत देशपांडे, डॉ. प्रसाद खंडागळे हे आपापल्या क्षेत्रातील नामांकित शास्त्रज्ञ, वैद्य रणजित निंबाळकर, वैद्य आशुतोष पाटणकर हे आयुर्वेदिक तज्ञ, श्री. गौतम मोरे, श्री. सागर पाटील हे स्टार्ट अप संचालक असे सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया आमच्या संकेतस्थळाला अथवा समाज माध्यमावरील हँडलला भेट द्यावी. आपला सक्रीय सहभाग आणि सूचनांचे स्वागत आहे.
पत्ता : प्रि. बि . व्ही. भिडे फाउंडेशन, १६५८, सदाशिव पेठ, लोकमान्य नगर, स. प. महाविद्यालय आवार, पुणे ३०
संपर्क: ८८८८८१०५५४, ८४२१४७९८२०
spm.bhidefoundation@gmail.com
(लेखक हे फाऊंडेशनचे मानद संचालक म्हणून काम बघतात)




Comments