शून्यापासून अनंतापर्यंत: प्रा. नारळीकर यांचा शाश्वत वारसा
- Jul 8, 2025
- 3 min read
Updated: Oct 24, 2025
डॉ. अरविदं रानडे

डॉ. जयंत नारळीकर असामान्य प्रतिभेचे अंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेले खगोल शास्त्रज्ञ. डॉ. नारळीकर वैज्ञानिक म्हणून जितके प्रसिद्ध होते तितकेच ते मराठीतून विज्ञान प्रसार करणारे एक अग्रणी होते. कोल्हापूर व वाराणसी येथे शालेय शि क्षण प्रादेशिक भाषांमध्ये होऊन देखील त्यांना शिक्षणाच्या माध्यमाची अडचण जाणवली नाही.

थोर विचारवंत, खगोल विज्ञानिक आणि हाडाचे विज्ञान प्रचारक प्रा. जयंत विष्णू नारळीकर गेल्याचे कळले आणि मन एकदम स्तब्द झाल. त्यांच्या जाण्याने भारतीय आणि जागतिक विज्ञानातील एका युगाचा अंत झाला हे निश्चित. गेल्या पन्नास वर्षांत ज्यांनी भारतीय विज्ञानाला आणि सर्वसामान्यांच्या ज्ञानाला एक वेगळाच आकार दिला अश्या थोर महात्म्याचे स्मरण आणि माझ्या आठवणी.

महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे जन्मलेले प्रा. नारळीकर यांचे बालपण -अश्या घरात झाले जिथे विज्ञान आणि परंपरा यांचा सुरेख संगम होता. त्यांचे वडील श्री विष्णू नारळीकर बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते, तर आई श्रीमती सुमती यांना शास्त्रीय साहित्य व कथाकथनाचा वारसा लाभलेला होता. तार्किक विचारशक्ती व काव्यात्मक कल्पनाशक्ती या दोन्हींचा संगम त्यांच्या जीवनमार्गाला दिशा देणारा ठरला. ते पुढे केंब्रिज विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी गेले, जिथे त्यांनी ख्यातनाम शास्त्रज्ञ फ्रेड होयल यांच्यासोबत संशोधन केले आणि होईल-नारळीकर सिद्धांत विकसित केला, जो आइंस्टाईनच्या ब्रह्मांडशास्त्राला पर्यायी व मोहक मॉडेल ठरला. त्यांचा स्थिर अवस्था सिद्धांत (‘स्टेडी-स्टेट थिअरी’) बिग-बँग संकल्पनेला पर्याय देत जागतिक वैज्ञानिक वर्तुळात तीव्र चर्चा घडवून आणणारा ठरला. नंतरच्या निरीक्षणांनी बिग-बँगला अधिक मान्यता दिली, तरी प्रा. नारळीकर कधीही प्रस्थापित मतांशी विसंगत राहण्यास घाबरले नाहीत. ते नेहमी म्हणत, "कोणताही सिद्धांत चुकलेला ठरत नाही जोपर्यंत तो पूर्ण सिद्ध होत नाही — आणि तेव्हा देखील त्याचे तुकडे आपल्याला नव्या शक्यतांचा आणि संशोधनाचे नवे मार्ग दाखवू शकतात." चुकीचे ठरण्याची भीती न बाळगता नवे प्रश्न विचारण्याचा त्यांचा धाडसी दृष्टिकोन त्यांना दुर्मिळ वैज्ञानिक बनवित होता.
दुसऱ्यांना संधी देणारा गुरू

१९७० च्या दशकात जेव्हा ते भारतात परतले, तेव्हा त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) येथील सैद्धांतिक खगोलशास्त्र विभागात कार्यरत होण्यास सुरुवात केली आणि नंतर १९८८ साली पुण्यात इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) या संस्थेची स्थापना केली. मात्र IUCAA ही केवळ एक संशोधन संस्था नव्हती, ती एक वैचारिक क्रांती होती. प्रा. नारळीकर यांनी ती अशा प्रकारे उभारली की प्रादेशिक विद्यापीठांतील, तुलनेने मर्यादित साधनसामग्री असलेल्या विद्यार्थ्यांनाही, ख्यातनाम शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून जगाच्या पातळीवरील संशोधनात सहभागी होता येईल.

IUCAA संस्थेला माझ्या हृदयात एक विशेष आणि भावनिक स्थान आहे. १९९८ साली मी पुणे विद्यापीठात एम.एस्सी. (अंतराळ विज्ञान) पदवीस प्रारंभ केला, तेव्हा अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्प करणे अनिवार्य होते. साहजिकच मी IUCAA मध्ये गेलो - जिथे त्यावेळी संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून प्रा. नारळीकर स्वतः सक्रियपणे कार्यरत होते.
माझे सुदैव असे की, मी माझ्या पीएच.डी.साठीही IUCAA मध्ये परतलो — जणू स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले. प्रा. नारळीकर आम्हाला सांख्यिकीय यांत्रिकी (statistical mechanics) व किरणोत्सर्जन स्थानांतरण (radiative transfer) हे विषय अतुलनीय स्पष्टतेने शिकवत असत. पण त्यांच्या शिकवण्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे विज्ञानाच्या सार्वत्रिक प्रसाराबाबतची त्यांची गहन बांधिलकी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रावरील सहज, सोप्या आणि संवादात्मक शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली. वैज्ञानिक कुतूहल निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयोगशाळा, प्रात्यक्षिके व कार्यशाळा आयोजित करत असू. या उपक्रमांमध्ये प्रा. नारळीकर स्वतःही हसतखेळत, अत्यंत संयमाने आणि उत्साहाने सहभागी होत असत. त्यांच्याकडून आम्ही हे शिकत गेलो की विज्ञान हे सर्वांसाठी सुलभ आणि उपलब्ध असले पाहिजे.

या अनुभवांमुळे आणि त्यांच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळेच मला विज्ञान प्रसार क्षेत्रात आपले करिअर घडवण्याची खरी प्रेरणा मिळाली आणि मी ‘विज्ञान प्रसार’ या संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून रुजू झालो, जेणेकरून विज्ञान शिक्षण संवादाच्या विस्तारासाठी समर्पितपणे कार्य करता येईल. अनेक वेळा, त्यांच्या दिल्लीतील भेटींमध्ये किंवा IUCAA मधील माझ्या वास्तव्यादरम्यान, आम्ही निरीक्षणात्मक व संगणकीय खगोलशास्त्रातील उदयोन्मुख क्षेत्रांवर विस्तृत चर्चा करत असू. आज जेव्हा मी याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा तेव्हा मला जाणवते की माझ्या मातृसंस्थेच्या म्हणजे IUCAA च्या गव्हर्निंग बोर्डवर सेवा देणे ही माझ्यासाठी एक अत्यंत गौरवाची आणि भावनिक बाब आहे ही तीच संस्था आहे, जी डॉ. नारळीकर यांनी स्वतः घडवली आणि ज्यामध्ये माझ्या वैज्ञानिक प्रवासाची पायाभरणी झाली.
जनतेसाठीचा शास्त्रज्ञ

प्रा. नारळीकर हे केवळ थरारक विज्ञानविषयक पुस्तके आणि भव्य दर्जेदार संशोधन लेख लिहिणारे शास्त्रज्ञ नव्हते, तर ते सर्वसामान्यांसाठी विज्ञान सांगणारे व लिहिणारे कुशल कथाकथनकार होते. विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात विशेषतः मराठी भाषेत त्यांनी केलेले कार्य खरोखर क्रांतिकारक ठरले. बालसाहित्य, दूरदर्शनवरील कार्यक्रम, व्याख्याने आणि विचारप्रवर्तक निबंध यांच्या माध्यमातून त्यांनी अवकाश, वेळ आणि गुरुत्वाकर्षण यासारख्या क्लिष्ट संकल्पना सहज आणि प्रभावी पद्धतीने सामान्य माणसापर्यंत पोहोचवल्या. याच उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना १९९६ मध्ये ‘युनेस्को कलिंग’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा. नारळीकर विज्ञानाधिष्ठित पुराव्यांवर आधारित शिक्षणासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी सक्रिय जनचळवळींमध्येही मनापासून सहभागी झाले होते. त्यांनी शाळांमध्ये, गावांच्या सभागृहांमध्ये व मोकळ्या जागांमध्ये असंख्य व्याख्याने दिली, व नेहमी सांगत असत, "तारे भविष्य ठरवत नाहीत; ते प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करतात." त्यांचे मराठी आत्मचरित्र ‘चार नगरांतले माझे विश्व’, ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला, हे अल्पसंसाधनातून पुढे येणाऱ्या वैज्ञानिक आकांक्षी युवकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.
त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आज जेव्हा मी त्यांच्या कार्याचा मागोवा घेतो, तेव्हा मला जाणवते की प्रा. नारळीकर यांच्या वारशाचे खरे मूल्य केवळ त्यांनी मांडलेल्या वैज्ञानिक सिद्धांतांमध्ये किंवा स्थापिलेल्या संस्थांमध्ये नाही, तर त्यांनी ज्यांच्या मनामनात विज्ञानाची ज्योत पेटवली त्या असंख्य जिज्ञासूंमध्ये आहे. त्यांनी आपल्यापैकी अनेकांना, मग आपण कुठल्याही पार्श्वभूमीचे असलो तरीही, विज्ञानाच्या या व्यापक मोहिमेत सहभागी होण्याचे स्वप्न पाहण्याची संधी दिली.


Comments