top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

शास्त्रज्ञांचे मूल्यमापन आणिदिशाभूल करणारी मोजमापं

  • Dec 30, 2025
  • 8 min read

डॉ. किशोर पाकणीकर

आज विज्ञानाविषयी बोलताना आपण वारंवार आकड्यांचा आधार घेतो—“अमुक शास्त्रज्ञाने किती शोधनि बंध प्रकाशित केले?”, “त्यांच्या लेखांना किती citation मिळाले?”, “त्यांच्या नावावर किती पेटंट्स आहेत?”—अशा प्रश्नांवरूनच आपण बहुतेक वेळा त्या व्यक्तीची उंची ठरवतो. आकडे सोपे असतात; एका नजरेत निर्णय होतो आणि चर्चा झटपट संपते. म्हणूनच विद्यापीठे, निधी देणाऱ्या संस्था, सरकार आणि माध्यमे या आकड्यांना फार वजन देतात. मात्र विज्ञानाची खरी ताकद इतक्या सरळ चौकटीत मावते का? एखाद्या विद्यार्थ्याने किती वह्या भरल्या यावर त्याचे ज्ञान ठरवणे हा अन्याय ठरेल; विज्ञानाचे मूल्यमापनही अशाच प्रकारे केवळ संख्यांवर केले, तर त्यात अति सुलभीकरणाचा धोका आहे. विषय समज, नवीन कल्पना मांडण्याची हिमंत, काटेकोर प्रयोग, सहकार्याची पद्धत, समाजाशी नाते—हे सर्व घटक एकत्र येऊन संशोधनाला अर्थ देतात. पण या सर्वाचे मोजमाप एका-दोन आकड्यांत घट्ट बांधले तर खरे चित्र धूसर होऊ शकते.

दरवर्षी स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि एल्सेव्हियर मिळून जगातील अव्वल दोन टक्के संशोधकांची यादी प्रसिद्ध करतात. भारतात ही यादी आली की काही दिवस उत्सवाचे वातावरण निर्माण होते—विद्यापीठांत पोस्टर्स, वृत्तपत्रांत मथळे, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव. माझे नावही या यादीत आले आहे; म्हणून हा लेख मत्सरातून नव्हे, तर आत्मपरीक्षणातून लिहित आहे. प्रश्न इतकाच—ही यादी विज्ञानाचे खरे प्रतिबिंब दाखवते का, की ती फक्त बाह्य चमक आहे? संशोधनाच्या खोल मुळांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला वेगळ्या निकषांची गरज आहे का?


संख्या काय सांगतात?

स्टॅनफर्ड –एल्सेव्हियर यादीतील नावांची संख्या मोठी असते. एका वर्षाच्या कामगिरीवर सहा हजारांहून अधिक भारतीय, तर संपूर्ण कारकिर्दीवर साडेतीन हजार नावांचा उल्लेख—हे ऐकून आपण लगेच ठरवतो, “भारतीय विज्ञान शक्तिशाली आहे.” पण आकड्यांचा मोह सहज फसवू शकतो. विज्ञानातील योगदान असमान असते; काही मोजक्या संशोधकांच्या हातून बहुतेक मोठे शोध घडतात, तर अनेक जण रोजचे कष्ट घेऊनही तुलनेने मर्यादित परिणाम साधतात. अर्थशास्त्रातील “परेटोनियम”—२० टक्के लोकांकडून ८० टक्के परिणाम - इथेही लागू पडतो. त्यामुळे “जास्त लेख = जास्त योगदान” हा सरळ निष्कर्ष कधी कधी भ्रामक ठरतो.

उदाहरणार्थ, जीवनविज्ञानातील CRISPR–Cas9 तंत्रज्ञान. जेनिफर डौडना आणि इमॅन्युएल चार्पेंटीयर यांच्या एका कामाने जीन एडिटिंगची दिशा बदलली. या शोधानंतर हजारो लेख प्रसिद्ध झाले, पण मूळ क्रांती त्या एकाच संशोधनाने घडवली. भारतातही असेच दिसते. डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या पुढाकाराने आलेली सुधारित वाणं त्यांच्या नावावर किती लेख, किती citation झाले हे गौण; त्यांच्या कामामुळे भुकेचा प्रश्न कमी झाला, हा परिणामच निर्णायक. इस्रोच्या चंद्रयान–१ मोहिमेने चंद्रावर पाण्याचे अस्तित्व दाखवले. त्यासंबंधी लेख कमी असतील, तरी त्याचा राष्ट्रीय व वैज्ञानिक प्रभाव अफाट होता. खरा प्रश्न हा की संशोधनाने विज्ञानाची किंवा समाजाची दिशा किती व कशी पालटली.

सारे लेख एकसमान मूल्याचे नसतात. काही पायाभूत असतात, काही उपयुक्त पण पूरक. काही संशोधक हजारो पानांचे साहित्य निर्माण करतात, तर काही कमी लिहूनही विज्ञानाचा पाया बदलून टाकतात. त्यामुळे “लेखांची संख्या” ही फक्त एक माहिती; तिला अर्थ मिळतो तो संदर्भ, परिणाम आणि काळ यांच्यामुळे.


संख्या आणि समाजमान्यता

संख्यांचा मोह ही केवळ अकादमिक गोष्ट नाही; ती सामाजिक मानसिकता आहे. आपली शिक्षणव्यवस्था गुण, टक्केवारी, रँक यांवर उभी आहे. खेळात धावा व गोल, अर्थव्यवस्थेत GDP, उद्योगात महसूल—सगळीकडे आकडे बोलतात. त्यामुळे संशोधनाकडे पाहतानाही आपण आकड्यांचीच भाषा शोधतो. विद्यापीठे वार्षिक अहवालांत “या वर्षी इतके लेख, इतक्या citation, इतकी पेटंट्स” असा हिशेब मांडतात. भरती व बढतीतही हेच निकष पुढे येतात. परिणामी संशोधकांवर संख्यांचा दाब वाढतो; अनेकदा “गुणवत्तेपेक्षा संख्या” अशी वाट चोखाळली जाते. हे सर्वांना माहीत असूनही, प्रणाली त्यालाच पुरस्कार देते म्हणून तेच चालू राहते. संख्यांची भाषा सुलभ व आकर्षक असल्यामुळे सार्वजनिक संवादातही तीच ठळक होते; परंतु यामुळे संशोधनातील सूक्ष्मता हरवते.


भारतीय संदर्भ: आकडे, संस्था आणि दबाव

भारतात संशोधनासाठी सरकारी निधी मर्यादित असल्याने स्पर्धा तीव्र असते. निधी देणाऱ्या संस्थांना जलद, तुलनात्मक आणि “निष्पक्ष” निकष हवे असतात; तेव्हा citation, h-index, पेटंट संख्या या मोजमापांना प्राधान्य मिळते. अनेक विद्यापीठे व संशोधनसंस्था वार्षिक मूल्यमापनात “प्रति वर्ष किमान इतके लेख” असे लक्ष्य ठेवतात. काही ठिकाणी तर पदोन्नतीसाठी ठराविक Impact Factor च्या जर्नलमध्ये लेख आवश्यक मानले जातात. हेतू वाईट नसतो, पण अनपक्षिेत दुष्परिणाम होतात. “स्लाइसिगं”, सारख्याच निष्कर्षांना नव्या रूपात सादर करणे, कमी महत्त्वाच्या पण जलद प्रकाशित होणाऱ्या विषयांकडे ओढा. कराराधारित नोकऱ्यांवर असलेल्या तरुण संशोधकांना आकड्यांपासून दूर राहणे जवळजवळ अशक्य बनते.


इतिहासाचे धडे

विज्ञानाचा इतिहास स्पष्ट सांगतो की मोठे, परिवर्तन करणारे काम नेहमी “जास्त लेख, जास्त citation” या चौकटीत दिसत नाही. सी. व्ही. रमन यांच्या सुरुवातीच्या लेखांना कमी citation मिळाले; तरी रमन इफेक्टने भौतिकशास्त्राची दिशा बदलली आणि नोबेल त्यांना मिळाले. सत्येंद्रनाथ बोस यांचा लेख सुरुवातीला छापलाच गेला नाही; आइनस्टाइनने पुढाकार घेतल्यावर बोस– आइनस्टाइन सांख्यिकी विज्ञानाच्या भाषेत कायमची रुजली. ग्रेगर मेंडेल यांच्या प्रयोगांना त्यांच्या आयुष्यात मान्यता मिळाली नाही; पुढे ते आधुनिक आनुवंशिकतेचा पाया ठरले. वॉटसन व क्रिक यांचा डबल हेलिक्सवरील छोटासा पेपर काही पानांचा होता; तरी त्याने जीवशास्त्रात क्रांती घडवली.

थॉमस कुहनने The Structure of Scientific Revolutions मध्ये सांगितले की विज्ञान सरळ रेषेत न चालता “पॅराडाइम शिफ्ट्स ” मधून पुढे सरकते. जुनी चौकट तुटते, नवी चौकट जन्मते. डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत, न्यूटनचे नियम, क्वांटम भौतिकीची सुरुवात, पाश्चरचे जंतुसिद्धांत—ही सर्व पॅराडाइम शिफ्ट्स आहेत. अशा झेपांचे मोजमाप “या वर्षी किती पेपर्स?” किंवा “या दशकात किती citation?” या तक्त्यांत बसत नाही. त्यांचा प्रभाव पाठ्यपुस्तकांत, उद्योगधंद्यांत, आरोग्य यंत्रणेत, तंत्रज्ञानाच्या वापरात, म्हणजेच समाजाच्या रोजच्या जीवनात दिसतो.

विज्ञान आणि परिणाम

खरे मोजमाप शेवटी समाजात दिसते. पोलिओ लसीमुळे लाखो मुलांचे आयुष्य वाचले. हा परिणाम कोणत्याही citation संख्येपेक्षा बहुमोल. पाण्याच्या शुद्धीकरणातील नव्या तंत्रज्ञानाने ग्रामीण भागात रोगराई कमी केली—हा आकडा जर्नलच्या Impact Factor पेक्षा महत्त्वाचा. भारतातील आयटी क्रांतीचा उदय संगणक विज्ञान संशोधनाशी जोडलेला होता; सुरुवातीला प्रकाशनांचे आकडे मोठे नव्हते, पण रोजगार, सेवा आणि जागतिक प्रतिमेवर त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकला. अशा उदाहरणांतून एकच संदेश मिळतो—संख्यांपेक्षा परिणाम महत्त्वाचा. पाठ्यपुस्तकांमध्ये स्थान मिळणे ही अंतिम कसोटी; कारण तिथे पुढील पिढीसाठी “ही माहिती अपरिहार्य आहे” असा शिक्का बसतो.

h-index: दिसायला सोपा, पण अपुरा

आज संशोधकाचे मूल्यमापन करताना सर्वाधिक वापरला जाणारा आकडा म्हणजे h-index. त्याची व्याख्या सोपी आहे - एखाद्या संशोधकाचा h-index ५० म्हणजे त्याचे ५० लेख किमान ५० वेळा cited झाले आहेत. ही व्याख्या ऐकायला सरळ, लक्षवेधी आणि वापरण्यास सोपी आहे. म्हणूनच विद्यापीठे, निधी संस्था, भरती मंडळे, पुरस्कार समित्या सर्वत्र हा आकडा वापरतात. पण त्याच्या मर्यादा न समजल्या तर h-index दिशाभूल करणारा ठरतो.

citation चा अर्थ h-index मध्ये दिसत नाही. एखादा लेख हजारो वेळा cited झाला म्हणजे तो उत्कृष्ट आहेच असे नाही. कधी कधी पुढील संशोधक त्या लेखातील चूक दाखवण्यासाठीही त्याचा संदर्भ देतात. अशा नकारात्मक संदर्भांनीही h-index वाढतो, पण त्याचा अर्थ “गुणवत्ता” असा नसतो.

आज बहुतेक महत्त्वाचे लेख मोठ्या टीम्सनी लिहिलेले असतात. एखाद्या लेखावर शंभर लेखक असतात. त्या लेखाला मिळालेली citation सर्वांच्या नावावर जमा होते. पण प्रत्यक्ष योगदान सगळ्यांचे सारखे नसते. लहान टीममध्ये किंवा एकट्याने काम करणाऱ्यांचे h-index तुलनेने लहान दिसतो, जरी त्यांच्या कामाचा दर्जा उच्च असला तरी.

h-index वेळेसोबत नैसर्गिकरीत्या वाढतो. तीस– चाळीस वर्षं संशोधन केलेल्यांचा h-index मोठा असतो, तर दहा वर्षं काम करणाऱ्या तरुण संशोधकाचा लहान. अशी तुलना अन्यायकारक ठरते. क्षेत्रनिहाय फरकही मोठे आहेत. वैद्यक वा जीवनविज्ञानातील लेखांना citations पटकन मिळतात; गणित, भौतिकशास्त्र वा मानवशास्त्रात कामाला मान्यता मिळायला दशकं लागतात. त्यामुळे क्षेत्रांतील तुलना भ्रामक ठरते.

शिवाय, Google Scholar, Scopus, Web of Science - सगळीकडे h-index वेगळा दिसतो. परिषद लेख मोजले जातात की नाही, नावांची गफलत, नोंदींची चूक—या सगळ्यामुळे आकड्यांत बदल होतो. आणखी एक गंभीर बाब म्हणजे h-index कृत्रिमरीत्या फुगवण्याची शक्यता. self - citation, मित्रांचे परस्पर उद्धरण, विशेषांकांतील देवाणघेवाण - या मार्गांनी h-index वाढवता येतो. भारतातील काही विद्यापीठांत बढतीसाठी ठराविक h-index अनिवार्य केल्याने ही प्रवृत्ती वाढली आहे. म्हणूनच h-index उपयुक्त संकेत आहे, पण तो एकट्याने संशोधनाचे मोजमाप करू शकत नाही. संशोधनाचे खरे मूल्य ठरवताना विचारायला हवेत, काय cited झाले? का झाले? कोणत्या संदर्भात झाले? आणि त्या कामामुळे समाजात काय बदल झाला?

Impact Factor: पाठ्यपुस्तक हेच खरे प्रमाणपत्र

जर्नलचा Impact Factor (IF) ही अजून एक लोकप्रिय मोजणी आहे. IF म्हणजे त्या जर्नलमधील लेखांना मिळालेल्या उद्धरणांची सरासरी. IF जास्त म्हणजे जर्नल प्रतिष्ठित - अशी सर्वसामान्य समजूत आहे. पण वास्तव अधिक गुंतागुंतीचे आहे. एखादा लेख प्रचंड चर्चेत आल्याने त्या जर्नलचा IF उंचावतो; इतर लेख मात्र दुर्लक्षित राहतात. तरी सर्व लेखकांना “उच्च IF जर्नल”चा शिक्का मिळतो. शिवाय, वैद्यक वा जीवनविज्ञानातील जर्नल्स मध्ये citations पटकन वाढतात; गणित वा मानवशास्त्रातील लेख अनेक वर्षांनी मान्यता मिळवतात. त्यामुळे सर्व क्षेत्रांची तुलना IF वरून करणे चुकीचे ठरते. खरा प्रभाव तेव्हाच दिसतो जेव्हा एखादी संकल्पना इतकी मूलभूत ठरते की ती पाठ्यपुस्तकात जाते. न्यूटनचे नियम, मेंडेलचे आनुवंशिकतेचे सिद्धांत, रमन इफेक्ट ही उदाहरणे आजही पाठ्यपुस्तकात आहेत. जर्नलचा IF बदलतो, पण पाठ्यपुस्तकातील नोंद पिढ्यानपिढ्या टिकते. त्यामुळे पाठ्यपुस्तकात जागा मिळणे हेच खऱ्या प्रभावाचे प्रमाणपत्र आहे.

Review लेख आणि citation ची शर्यत

मूळ संशोधन लेख नवे प्रयोग, नवा डेटा आणि त्याचे विश्लेषण देतात. हे लेख लिहिणे वेळखाऊ, खर्चिक आणि कठीण असते. Review लेख मात्र आधी झालेल्या कामांचा सुलभ आढावा देतात, म्हणून विद्यार्थी , शिक्षक व संशोधकांसाठी ते उपयुक्त ठरतात. परिणामी Review लेखांना मूळ संशोधनापेक्षा जास्त citations मि ळतात. Review लिहिणार्यांचे h-index झपाट्याने वाढते. Self-citation, परस्पर उद्धरण, विशेषांकांतील देवाणघेवाण यामुळे हे आकडे अजून फुगतात. Review लेख महत्त्वाचे आहेत, पण फक्त citations वरून संशोधनाचे मूल्य ठरवणे धोकादायक आहे. कारण अनेकदा मूळ संशोधनातील कठीण पण क्रांतिकारक काम review लेखांच्या छायेत झाकोळले जाते.


भारतीय संदर्भ

भारतात h-index, IF आणि citations हेच निकष प्रचलित झाले आहेत. नवीन स्थापन झालेली Anusandhan National Research Foundation (ANRF) निधी देताना याच मोजमापांचा वापर करेल अशी शक्यता आहे. कारण प्रत्येक लेखाचे मूल्यांकन करण्यासाठी लागणारा वेळ व संसाधने संस्थांकडे नाहीत. त्यामुळे सोपे आकडेच सोयीचे वाटतात. पण त्यामुळे संशोधकांच्या प्राथमिकता बदलतात - “जास्तीत जास्त प्रकाशित करणे”, “उच्च IF जर्नलला पाठवणे”, “review लेख लिहि ण्याकडे कल”. समाजाला तातडीने हवे असलेले उपाय—पाणी शुद्धीकरण, पर्यावरणीय संकट, ग्रामीण आरोग्य—कधी कधी मागे पडतात, कारण त्यातून citations लगेच मिळत नाहीत.


उद्योग–संशोधन दरी

विज्ञानाची बीजे प्रयोगशाळेत रुजतात, पण त्यांना फळ यायचे असेल तर उद्योगाची साथ हवी. जगातील अग्रगण्य कंपन्या महसुलाचा मोठा भाग संशोधनावर खर्च करतात. भारतात मात्र हा टक्का फार कमी आहे. त्यामुळे प्रयोगशाळांतील उत्तम कल्पना कागदावरच राहतात, बाजारात उतरत नाहीत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हि सेस (TCS) ने हजारो पेटंट्स दाखल करून दाखवले की भारतीय उद्योगही संशोधनात स्पर्धा करू शकतो. पण फक्त एक TCS पुरेसा नाही. जर्मनीतील Fraunhofer Institutes सारख्या उद्योग– संशोधन दुवा साधणाऱ्या संस्था भारतातही हव्यात.


पीएचडींचा पूर आणि ब्रेन ड्रेन

भारत दरवर्षी हजारो पीएचडी तयार करतो. पण त्यांना स्थिर नोकऱ्या कमी मिळतात. अनेक तरुण परदेशात स्थिरावतात, जिथे त्यांना उत्तम सुविधा आणि मान्यता मिळते. त्यामुळे भारताने केलेली गुंतवणूक इतर देशांच्या प्रगतीला हातभार लावते. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षण–संशोधन–उद्योग यांच्यात साखळी मजबूत करणे आवश्यक आहे. फक्त नोकऱ्या नव्हे, तर संशोधनाला धाडसी प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य, चुका करून पुन्हा उभे राहण्याची संधी मिळायला हवी. तेव्हा च “ब्रेन ड्रेन” चे “ब्रेन गेन” मध्ये रूपांतर होईल.


टीमवर्क संस्था निर्मिती आणि समाजाशी संवाद

मोठ्या शोधांसाठी आज मोठ्या टीम्स आवश्यक आहेत. पण श्रेयवाटपात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. युरोप- अमेरिकेत “contributorship” ही पद्धत लोकप्रिय होत आहे. जिथे प्रत्येक लेखकाचे योगदान स्पष्ट लिहिले जाते. भारतातही ही पद्धत आणणे आवश्यक आहे. भाभा, साराभाई, स्वामिनाथन यांची ताकद त्यांच्या लेखसंख्येत नव्हती, तर त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांमध्ये होती. संस्था पिढ्यानपिढ्या टिकतात; ही शक्ती कोणत्याही citation count मध्ये दिसत नाही. तसेच विज्ञान मातृभाषेत मांडल्यास त्याचा प्रभाव समाजावर अधिक होतो. ग्रामीण भागात कमी किमतीचे पाणी फि ल्टर, सौरऊर्जेवरील पंप अशा उदाहरणांचा परिणाम कोणत्याही citations पेक्षा बोलका ठरतो.


आंतरराष्ट्रीय उपाय

Leiden Manifesto (२०१५), DORA (२०१२), UK REF यांसारख्या उपक्रमांनी आकड्यांच्या मोहाला मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील ANRF ला ही संधी आहे की ते मूल्यमापनासाठी परिणाम, समाजाशी नाते आणि भारतीय संदर्भ या निकषांना महत्त्व देतील.


तत्वज्ञानिक बाजू

विज्ञानाचे अंतिम ध्येय काय आहे? फक्त शोधनिबंधांची संख्या वाढवणे की सत्याचा शोध घेऊन समाजाला समृद्ध करणे? थॉमस कुहनने The Structure of Scientific Revolutions मध्ये सांगितल्याप्रमाणे, विज्ञानाची प्रगती ही “normal science” मधील आकडेवारीतून होत नाही; ती वेळोवेळी घडणाऱ्या पॅराडाइम शिफ्ट्स मधून घडते. आणि अशा शिफ्ट्स अनेकदा एका लेखामुळे होतात, हजार लेखांमुळे नाही. डोनाल्ड स्टोक्सने Pasteur’s Quadrant मध्ये दाखवले की संशोधनाचे मूल्य हे “use-inspired basic research” मध्ये आहे म्हणजे मूलभूत आणि उपयुक्त या दोन्ही टोकांना जोडणारे काम. भारतालाही अशीच संशोधनसंस्कृती जोपासणे गरजेचे आहे.


पर्यायी निकष

संशोधनाचे मूल्यमापन करताना आकड्यांपलीकडे काही नवे नि कष वापरता येतात.

  • Impact Case Studies: प्रत्यक्ष परिणाम दाखवणारी उदाहरणे.

  • Openness and Reproducibility: डेटा व पद्धती खुले करून इतरांना पुनरुत्पादनाची संधी.

  • Mentorship and Institution Building: पुढील पि ढी तयार करणे, संस्था उभारणे.

  • Interdisciplinary Work: विविध विष य जोडणे.

  • Societal Communication: मातृभाषेत विज्ञान पोहोचवणे, समाजाशी थेट संवाद साधणे.

हे निकष संख्यांना नाकारत नाहीत, पण त्यांना एकमेव मानदंड ठरवत नाहीत. संशोधकाचे काम किती परिणामकारक ठरले, समाजाशी किती जवळीक साधली आणि पुढील पिढी घडवण्यात किती योगदान दिले याचा विचार करणे अधिक आवश्यक आहे.


वाचकासाठी थेट प्रश्न

मग प्रश्न असा- उद्याच्या भारताला काय हवे?

  • citations च्या शर्यतीत धावणारे शास्त्रज्ञ, की समाजाच्या जीवनमानात फरक घडवणारे संशोधक?

  • Impact Factor च्या चमकदार शिक्क्यांमध्ये रमणारी विद्यापीठे, की विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या संस्था?

  • “Top 2%” यादीत नाव पाहून समाधान मानणारे शास्त्रज्ञ, की गावात स्वच्छ पाणी, शाळेत चांगले शिक्षण, रुग्णालयात परवडणारे उपचार उपलब्ध करून देणारे संशोधक?


समारोप

शास्त्रज्ञांचे मूल्यमापन केवळ आकड्यांच्या जाळ्यात अडकवले, तर विज्ञानाचा आत्मा हरवेल. आकडे उपयुक्त आहेत, पण ते अपूर्ण आहेत. खरी कसोटी म्हणजे मौलिक कल्पना, काटेकोर प्रयोग, धाडसी दृष्टिकोन, संस्था-निर्मिती, पुढील पिढी घडवणे आणि समाजाच्या जीवनमानात झालेला बदल. भारतासाठी हाच योग्य मार्ग आहे. Nobel सारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे स्वप्न आकर्षक आहे, पण त्याहून मोठे यश तेव्हा मिळेल जेव्हा भारतातील प्रत्येक गावातील मूल विज्ञानामुळे अधिक सुरक्षित, निरोगी आणि आनंदी होईल. इतिहास नेहमी परिणामांनी लिहिला जातो, आकड्यांनी नाही, आणि भविष्यातही तसाच लिहिला जाईल.


(लेखक आघारकर संशोधन संस्था, पुणे चे माजी संचालक व आयआयटी मुंबई येथे अभ्यागत प्राध्यापक आहेत.)

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page