वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
विठ्ठल रायगावकर
“मै समय हूं “ या वाक्याची एक भारदस्त ओळख आहे. आठवल का तुम्हाला. मागच्या शतकातील नव्या दशकाच्या शेवटी शेवटी टीव्हीवर महाभारत सिरीयल असायची आणि प्रत्येक सिरीयलची सुरुवात या तीन शब्दाने होत असे. आणि मग नंतर महाभारतातील सुंदर सुंदर कथा प्रेक्षकांना दाखवल्या जायच्या. त्यातीलच एका कथेने आज आपण लेखाची सुरुवात करणार आहोत.


श्रीकृष्ण व सत्यभामा नरकासुराचा वध करून स्वर्गातून परत येत असताना इंद्राने सत्यभामेला पारिजातकाचे एक रोप भेट दिले. द्वारकेला आल्यानंतर तिने आपल्या घराच्या समोर ते रोप लावले. थोड्या दिवसांमध्ये पारिजातक बहरला. छान फुले यायला लागली. पण गंमत अशी की ती सगळी फुलं वाऱ्याने पुढे रुक्मिणीच्या दारात पडायला लागली. अर्थात त्यामुळे सत्यभामेला राग आला. पारिजातक मी आणला. मी वाढवला आणि फुल मात्र तिकडे रुक्मिणीच्या दारात पडतात. हे कस काय ? झालं. दोघींच्या मध्ये वाद सुरू झाला. अर्थात शेवटी हा वाद कृष्णापर्यंत पोहोचला. श्रीकृष्णाला कळेना काय करावे. आता सामान्य माणसाच्या पुढे जर काही प्रश्न निर्माण झाले तर तो देवाकडे धाव घेतो. पण देवाकडेच काही प्रश्न निर्माण झाले तर मग तो कुणाकडे जातो माहितीये ? संताकडे.
त्यांनी नारदाचा धावा केला. नारद प्रगट झाले. मग थोड्या वेळाने श्रीकृष्णानी आपला प्रश्न नारदासमोर मांडला. नारद विचारात पडले. पण मग त्यांनी विचार करून एक मार्ग शोधून काढला. काय केलं त्यांनी. सत्यभामा मातेच्या महालात गेले. मातेला नमस्कार केला. थोड्याच वेळात सत्यभामाने सर्व परिस्थिती नारद मुनींना कथन केली. आणि उपाय विचारला. नारद म्हणाले असं करा, तुम्ही मला श्रीकृष्ण दान करा. तुम्ही मला श्रीकृष्णाच दान करा. सत्यभामा थोडा वेळ विचारात पडले पण मग तिला वाटले चला ऐकून तर बघूया पुढे काय होते ते आणि त्याप्रमाणे त्यांनी श्रीकृष्ण नारदाला दान देऊन टाकला. नारद श्रीकृष्णाला घेऊन निघाले. लांब निघून गेले मग सत्यभामाच्या लक्षात आले की काहीतरी चूक झाली आहे. लगेच त्या नारदमुनींच्या मागे गेल्या आणि नारद मुनींना विनंती केली. अहो, असे काय करता. तुम्ही जर श्रीकृष्णाला घेऊन गेला तर आम्ही काय करायचं. तेव्हा तुम्ही श्रीकृष्ण आता मला परत करा. नारद मुनींना हेच हवे होते. ते म्हणाले, तुम्हाला श्रीकृष्ण परत हवाय का तर मग एक काम करा. श्रीकृष्णाची तुला करा आणि श्रीकृष्णाच्या वजनाचे दागिने सोने मोती मला द्या. सत्यभामेला वाटले एवढेच ना ती म्हणाली ठीक आहे. मी लगेच तयारी करते झाले. त्यांनी एका छान तराजूची व्यवस्था केली.

श्रीकृष्णाला एका पारड्यात बसवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं टाकायला सुरुवात केली. सगळे दागिने त्या पारड्यात भरले गेले. परंतु कृष्णाचं पारड काही वर जायला तयार नाही. आता काय करायची. सत्यभामेला वाटले आता मात्र रुक्मिणी मातेची मदत घेतली पाहिजे आणि मग तिने रूक्मिणी मातेच्या महालात जाऊन रुक्मिणी मातेला सर्व हकीकत कथन केली. घडलेला सर्व प्रकार रुक्मिणी मातेच्या लक्षात आला. ती गालातल्या गालात हसली. बरोबर तुळशीचे पान घेतले आणि मग सत्यभामेला घेऊन ती ज्या ठिकाणी श्रीकृष्णाची तुला सुरू होती त्या ठिकाणी पोहोचली. श्रीकृष्णाला मनोभावे नमस्कार केला. पारड्यात ठेवलेलं सोनं काढून टाकलं आणि बरोबर आणलेलं तुळशीचे पान भक्ती भावाने त्या पारड्यामध्ये ठेवलं. त्याक्षणी श्रीकृष्णाचे पारडे वर गेले. तुळशीचे पानाचे पारडे खाली आलं.

मित्रांनो समजतंय का, आपण कुठे चाललोय. वनस्पतीच्या पानांमध्ये... एका साध्या तुळशीच्या पानांमध्ये इतकी क्षमता आहे की त्याचं वजन हे श्रीकृष्णाच्या वजनापेक्षा सुद्धा जास्त आहे. हे झाले वनस्पतीच्या पानाचे पण वनस्पतीच्या प्रत्येक अंगाचे महत्त्व असेच अनमोल आहे खोड फांद्या मूळ फुलं फळ अशा प्रत्येक अंगामध्ये फार मोठी शक्ती लपलेली आहे.
वनस्पतींना भावना सुद्धा असतात बरं. हे मी नाही जगप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक जगदीश चंद्र बोस यांनी म्हटलेल आहे. मानवाप्रमाणेच वनस्पतींना सुद्धा भावना आणि संवेदना असतात. त्यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीस वनस्पतीच्या वेदना, भावना, संवेदना मोजण्यासाठी क्रेस्कोग्राफ नावाचे अत्यंत संवेदनशील उपकरण तयार केले.
संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी निसर्गातील वनस्पती, पशुपक्षी प्राणी या सर्वांना आपले सगे सोयरे मानले आहे. एका अभंगामध्ये ते म्हणतात “वक्षृवल्ली आम्हा सोयरे वनचरे”. भारतीय सनातन संस्कृतीमध्ये पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपणाचे महत्त्व सांगणारा एक सुंदर श्लोक आहे.
अश्वत्थमेकं पिचुमन्दमेकं न्यग्रोधमेकं दश चिञ्चिणीकान्। कपित्थबिल्वामलकत्रयञ्च पञ्चाम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत् ।।
याचा अर्थ असा एक पिंपळाचे झाड, एक लिंबाचे झाड, एक वटवृक्ष, दहा चिंचेची झाडं, तीन कवठाची झाडं, तीन बेलाची झाडं, तीन आवळ्याची झाडं, पाच आंब्याची झाडं यांचे रोपण करतो त्यांचे संगोपन करतो त्या माणसाला निश्चितपणे नरकाचा दरवाजा दृष्टीस पडत नाही म्हणजेच त्याला स्वर्ग प्राप्त होतो. शेकडो वर्षापूर्वी आपल्या ऋषीने पर्यावरण संरक्षणासाठी अतिशय उपयुक्त असा उपदेश करून ठेवलेला आहे. श्लोकामध्ये सांगितलेली सर्व झाडं पर्यावरणासाठी खूप महत्त्वाची आहेत पिंपळ आणि वटवक्षृ सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे आणि सावली देणारे वक्षृ आहेत त्याचप्रमाणे लिंबाचे झाड हे नैसर्गिकरित्या हवा शुद्ध करणारा वृक्ष आहे बेल, आवळा, आंबा, आणि कवठ ह्या सर्व वृक्षांमध्ये भरपूर औषधीय गुण आहेत. आपल्याकडे विविध सणांच्या वेळी वेगवेगळ्या व वृक्षांची पूजा करण्याची परंपरा आहे. वटपौर्णिमेला वडाची पूजा केली जाते. महादेवाला बेलाचे पान अर्पण करण्याची परंपरा आहे.

पांडुरंगाला तुळशीचे महत्त्व आहे. गणपतीला आपण दुर्वा वाहतो. दसऱ्याच्या सणाच्या दिवशी आपण एकमेकाला आपट्याची पाने देऊन सोनं वाटल्याचा आनंद उपभोगतो. घरामध्ये कोणत्याही मंगल कार्याच्या प्रसंगी घराच्या दरवाजावर आंब्याच्या झाडाच्या पानांचे तोरण बांधले जाते सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी चौरंगाच्या चारी पायांना केळीच्या रोपाचे खुंट बांधले जातात प्रत्येक पूजेला नारळाचे महत्त्व तर आहेच आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्रीफळ फोडूनच केली जाते. हरितालिकेच्या पूजेच्या वेळी सोळा वेगवेगळ्या झाडांची पाने मांडण्याची परंपरा आहे.
अनेक देवळामध्ये तसेच घरामध्ये सुद्धा देवाचा नैवेद्य हा केळीच्या पानावरच वाढला जातो. चैत्र प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी लिंबाचा मोहोर, पाने त्याचबरोबर ओवा, गुळ, जिरे, चिंच इत्यादी पदार्थ घालून त्याचे वाटण तयार करतात. आणि ते प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे षड्रस गोड, कडू, तिखट, आंबट, खारट व तुरट प्राप्त होतात.
प्रत्येक वनस्पतीमध्ये काही ना काही विशेष प्रकारचा गुणधर्म असतोच असतो. तुम्हाला माहितीये का आपल्या पृथ्वीवर वनस्पतींच्या एकूण किती प्रजाती आहेत ? ही संख्या आहे जवळजवळ चार लाख आणि अजूनही पृथ्वीच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये निरनिराळ्या प्रजातींचा शोध लागत आहे. पृथ्वीवरील वनस्पती जगत् व प्राणी जगत् हे परस्परावलंबी आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचे जीवन जवळजवळ अशक्य आहे. आणि म्हणूनच आपल्या पर्यावरणातील वनस्पती व प्राणी यांची काळजी घ्यायला पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन जवळजवळ सर्वच परकीय राजकर्त्यांनी असीमित वृक्षतोड करून, उभ्या पिकांची नासधूस करून पर्यावरणाची अमर्याद हानी केलेली होती. त्या सर्व विपरीत व धामधूमीच्या परिस्थितीमध्येसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला उद्देशून पर्यावरणाच्या संगोपन व संवर्धनासाठी एक विशेष आज्ञापत्र जारी केले होते.
त्यामध्ये त्यांनी सैन्याला स्पष्ट आज्ञा केली होती की फक्त आणि फक्त वाळलेल्या वृक्षाचेच खोड रयतेच्या परवानगीने व योग्य मूल्य देऊन खरेदी करावे. पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणासाठी जमिनीवर दिमाखात उभ्या असलेल्या हिरव्यागार वृक्षांची तोड मुळीच करू नये. त्यांनी अनेक ठिकाणी आमराई तसेच इतर फळबागांची निर्मिती सुद्धा केलेली आहे. रयतेच्या कल्याणाबरोबरच पर्यावरणाची हानी होणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेत असत. ह्या व अशा प्रकारच्या त्यांच्या अनेक सदगुणांमुळेच त्यांना “जाणता राजा” म्हणून संबोधले जाते.

कोणत्याही झाडाचे पान ही एक फार मोठी नैसर्गिक प्रयोगशाळा आहे. सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेचा उपयोग करून वनस्पतीच्या पानामध्ये अशी एक विशिष्ट रासायनिक प्रक्रिया सतत सुरू असते ज्यामध्ये हवेतील कार्बन-डाय-ऑक्साइडचे विघटन होऊन त्यातील ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू हवेमध्ये सोडला जातो आणि कार्बनचे स्टार्चमध्ये रूपांतर केले जाते. या प्रक्रियेलाच आपण प्रकाशसंश्लेषणची प्रक्रिया असे म्हणतो. याचा किती अभ्यास करावा तेवढा थोडाच आहे. कमीत कमी इतके लक्षात ठेवावयास हवे की वनस्पतीचे पान हे वनस्पतीचे नाक आहे. पानाच्या खालच्या बाजूस जी पर्णरंध्र असतात त्यामधूनच ते श्वासोच्छ्वास करतात. आणि म्हणून आपण सर्वांनी कारण नसताना उगाचच कोणत्याही वनस्पतीची पाने तोडून निसर्गाच्या या पर्यावरण पूरक किमयेमध्ये बाधा निर्माण करू नये. निसर्गाची ही किमया मानवी क्षमतेचा बाहेरची आहे.
“वनस्पतींना भावना असतात’’ हे सुप्रसिद्ध वैज्ञानिक जगदीश चंद्र बोस यांचे वाक्य असणारा एक धडा आमच्या लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात होता आणि त्यावेळी माझ्या बालसुलभ मनामध्ये याबद्दल शंका निर्माण झाली होती. मी म्हणायचो असे कसे शक्य आहे. झाडांना कुठे मेंदू असतो. त्यांना कुठे बोलता येते आणि ते कसे आपल्या भावना व्यक्त करू शकतात. काय हे कधी कधी वैज्ञानिक सुद्धा काही विक्षिप्त प्रकारची विधान करतात असे मला वाटायचं. पण त्यांचे हे विधान सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे, हे समजायला मला जवळजवळ 30 वर्ष थांबावे लागले. माझे शिक्षण संपून मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रात नोकरी लागली त्यानंतर यथावकाश नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रात बदली झाली आणि तिथे मात्र मी हे जगलो. मी हे अनुभवले की झाडांना भावना असतात.
काय झाले. कसा घडला हा प्रसंग. तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल. ज्यावेळी माझी नागपूरला रमण विज्ञान केंद्रात बदली झाली त्यावेळी तिथे विज्ञान केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. शैक्षणिक कार्यक्रमा बरोबरच मला गार्डन डेव्हलपमेंटच्या कामाची जबाबदारी दिली गेली. आमचे त्यावेळचे संचालक स्व. आर एम चक्रवर्ती यांनी मला सर्व कामं समजावून सांगितले. त्यांचे एक तत्व असे होते की विज्ञान केंद्राच्या इमारतीचे काम सुरू झाले की त्याबरोबरच विज्ञान बागेमध्ये नवीन वृक्षारोपण करावयाचे. म्हणजे इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत जी काही दोन-तीन वर्ष लागतात तेवढ्या काळात हे वृक्ष मोठे होतात. अर्थात गार्डनची शोभा वाढते आणि त्याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी मदत होते. फार छान आहे हे तत्व. याला अनुसरूनच त्यांनी मला नागपूरवरून मुंबईला दोन दिवसासाठी बोलावले. आणि त्यांनी स्वतः लक्ष घालून तयार केलेली बॉटल पामच्या वृक्षांची साधारण 40 छोटी रोप मला एका टोकरी मध्ये घालून दिली. ती घेऊन मी नागपूरला आलो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट पद्धतीने गार्डनमध्ये रोपण केली. हळूहळू ते वृक्ष आता इतके वाढलेत की मी ज्या ज्या वेळी तिकडे जातो त्यावेळी मला खरंच असे जाणवते की मला पाहून त्या वृक्षांची पाने जास्त सळसळतात. जणू ते माझे हात हलवून प्रेमाने स्वागत करतात.
त्याचबरोबर दुसरे असे की संचालक साहेबांनी मला साधारण शंभर जास्वंदाची नवीन रोप तयार करण्यासाठी सांगितले. सर्व पद्धत समजावून सांगितली. त्याप्रमाणे मी नागपूरच्या निरी मधून जास्वंदाचे कटिंग घेऊन आलो आणि मजुरांच्या सहाय्याने ते कटिंग प्लास्टिकच्या पिशवीत लावले. सर्व पिशव्या चार ओळीत ठेवल्या. रोज येऊन पाहत होतो पाणी दिले का वगैरे आणि मग पाचव्या दिवशी जेव्हा मी पाहिले तेव्हा मला एका जास्वंदाच्या काडीवरती एक छोटासा हिरवागार कोंब फुटलेला दिसला. माझा आनंद गगनात मावत नव्हता. क्षणभर मला असे वाटले की मीच एका बालकाला जन्म दिला आहे.
आणखी पुढे पाहिले तर अनेक काड्यांवरती असा कोंब फुटलेला होता. खूप छान वाटले. हळूहळू दिवस जात होते. आणि ती रोपे मोठी होत होती. काही दिवसांनी मुख्य इमारतीच्या समोरच्या रस्त्याच्या कडेला त्यांचे रोपण केले. थोड्याच कालावधीमध्ये त्यांची अतिशय चांगली वाढ झाली. ती डोक्याच्या वर वाढली. ते सर्व दृश्य खूप छान दिसत होत. पण पुढे त्यांच्या त्या दाट गर्दीमुळे काही समाजकंटकांना लपण्यासाठी जागा मिळते आहे असे लक्षात आल्यावरून नाविलाजास्तव इतक्या छान पद्धतीने डेरेदार वाढलेल्या जास्वंदाचे हेज मध्ये रूपांतर करावे लागले. हे होत असताना मला अक्षरशः बघवत नव्हते. जणू पानाफुला रहित उभी असलेली ती खोडं मला ओरडून सांगत होती की, बघ, रायगावकर अरे काय झालं. आमचे हात पार कापून टाकले गेले. त्यांच्या ह्या ध्वनीरहित आक्रंदनामुळे मी घायाळ होऊन गेलो आणि अक्षरशः दोन-तीन दिवस पर्यंत माझी झोप उडाली होती.
आता माझ्या पूर्ण लक्षात आले होते की खरंच झाडांना भावना असतात. एक झाड आपण स्वतः लावले की आपोआपच हे लक्षात येते. आणि म्हणूनच आपल्याकडे तुळशी वृंदावनाचे महत्त्व आहे. तुळशी वृंदावनाची ही परंपरा आपल्या सर्वांना वृक्ष प्रेम शिकवते. आणि त्याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण सुद्धा.

(लेखक नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथून सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आहेत)

Comments