top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

विज्ञान शाप की वरदान -भारतीय चिंतन

सुरेश गजानन भागवत

भारतीय चिंतनात विज्ञानाच्या विधायक आणि विघातक या दोन्ही बाजूंचा साकल्याने विचार झालेला दिसतो. विज्ञान व त्यावर आधारित स्थानिक आवश्यकतेनुसार तंत्रज्ञान आपल्या देशातही त्या-त्या काळात विकसित होत होते. निसर्गाचे शोषण आणि दोहन यातला संयम त्यात स्पष्ट दिसून येतो. भारतीय चिंतनात आढळून येणाऱ्या या संयमी मार्गावर प्रकाश टाकणारा हा लेख.

शालेय जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान शाप की वरदान या विषयावर बोलण्याचा किंवा लिहिण्याचा प्रसंग येतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान जीवनास विघातक आणि विधायक अशा दोन्ही रुपात योजलेले आपल्याला वारंवार आढळते. त्यामुळे अशी चर्चा होणे हे स्वाभाविकच आहे. तसेच असे विषय वेळोवेळी पुन्हा-पुन्हा चर्चीले जाणेही आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्ष जीवनात गंभीरपणे अशी चर्चा झालेली फारशी आढळत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान विधायक सिद्ध होते तेव्हा त्यास काही हितसंबंध कारण असतात. त्याखेरीज दोन दर्शनी कारणेही असतात. व्यक्तिगत जीवनाचे व संघटीत समाज जीवनाचे उद्दिष्ट काय असावे; या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विज्ञान तंत्रज्ञानाचे महत्त्व काय आणि मर्यादा कोणत्या हे स्पष्ट नसल्याने घात होतो. भारतीय चिंतन सुखाची प्राप्ती हे जीवनाचे उद्दिष्ट मानत नाही. ही तात्विक भूमिका बाजूला ठेवून सुखांची प्राप्ती हेच उद्दिष्ट मानले तरी व्यापक समाजहिताच्या चौकटीत व्यक्तिगत सुख-समृद्धी साधावी आणि एकूण सृष्टीच्या सुस्थितीच्या मर्यादेमध्ये मनुष्य समाजाची सुख-समृद्धी साधावी असा मर्यादशील जीवनविचार दुर्लक्षित होतो तेव्हा विज्ञान-तंत्रज्ञान विघातक सिद्ध होते.


ज्ञानाचे वर्गीकरण मानवी संस्कृतीची विज्ञान-तंत्रज्ञान ही एकमेव उपलब्धी नसून तुलनेने दुर्लक्ष केले गेलेले अन्य क्षेत्र ज्ञान-विज्ञान तंत्रज्ञानाच्या बरोबरीला आणले पाहिजे. ज्ञानाच्या विविध प्रकारांचे संतुलन साधून त्याच्या कार्यकक्षा स्पष्ट झाल्यावर त्यामध्ये विरोधा ऐवजी सामंजस्य प्रस्थापित होईल. मनुष्याने प्राप्त केलेले ज्ञान चार प्रकारांमध्ये विभागणी करणे शक्य आहे.

  1. विज्ञानाच्या विविध शाखा - मूलभूत विज्ञान हा ज्ञानाचा एक प्रकार आहे. विविध भौतिक तत्वे आणि पदार्थांच्या स्वभाव धर्मांचे, गुणधर्मांचे ज्ञान यात मोडते. हे ज्ञान तौलनिक अंगासह असते.

  2. मनुष्याच्या जीवनाच्या आवश्यकतांची पूर्तता करणारे ज्ञान हा ज्ञानाचा दुसरा प्रकार आहे. यामध्ये विज्ञान थेट किंवा तंत्र रूपाने योजलेले असते. विज्ञानाचा उपयोजित भाग (Applied Science)

  3. विश्वात भौतिकदृष्टीने जी विविधता अनुभवास येते त्या अंतर्गत काही एकत्व सुद्धा आहे अशी जाणीव होणे हा ज्ञानाचा तिसरा प्रकार आहे. देश, संस्कृ ती, उपासना, पंथ, भाषा इत्यादी कारणांनी विभागलेला मानव एक आहे असे मानणे एकत्वाच्या विचाराचे समाजशास्त्रीय रूप आहे. विज्ञानानेही एकत्वाच्या विचाराचा मर्यादित स्वीकार केला आहे. तृणपात्यापासून विशाल वटवृक्षापर्यंत विविध प्रजातींमध्ये एकत्व मानल्यावर वनस्पतीशास्त्र रचले जाते. कृमी-कीटकांपासून विविध प्रजातींमध्ये एकत्व कल्पीले गेले तरच प्राणिशास्त्र रचले जाते. एकत्वाची कल्पना केली नाही तर विविध प्रजातींची समावेशक अशी वनस्पती, प्राणी, सजीव ही सामान्य नामेही निर्माण होऊ शकणार नाहीत, एकत्वाचे हे विज्ञानीय रूप आहे. भारतीय विचारवंतांनी प्राचीन काळापासून याहून व्यापक एकत्वाचा सिद्धांत मांडला आहे चराचर सृष्टीमध्ये सर्व तत्वांना आणि पदार्थांना व्यापणारे व त्यापैकी प्रत्येकामध्ये निवास करणारे एकमात्र तत्व असून ते नित्य म्हणजेच अविनाशी, सत चैतन्यमान म्हणजे चित अमर्याद देशकाल व्यापणारे आनंदमय अर्था त सत आनंद आहे. असा सिद्धांत मांडला आहे. रामकृष्ण परमहंसांसारख्या साक्षात्कारी महात्म्यांनी प्राचीन काळापासून वर्तमानापर्यंत त्याची यथार्थता मानव जातीच्या ध्यानी आणून दिली आहे. या सिद्धांतामुळे मनुष्याचा निसर्गातील सर्व तत्त्वांची आणि सजीव निर्जीवांची आत्मीयतेचा संबंध जुळतो.

  4. मनुष्याने प्राप्त केलेले चौथ्या प्रकारचे ज्ञान त्याच्या स्वतःच्या अंतरावकाशाविषयी आहे. अंतरावकाशात वसणारे एकत्व सच्चिदानंदरूप तत्व हाच खरा मी असून तशी अनुभूती साधनेद्वारे प्राप्त करणे हेच जीवनाचे उद्दिष्ट आहे. देह, मन, बुद्धी, अहंकार हे खरा मी नाही. देह, मन, बुद्धीद्वारे होणाऱ्या जगाविष यींच्या अनुभूतींचा अवलंब देह धर्म भागविण्या पुरता करावा. त्या अनुभूती या सुख नसून अंतराळवकाशाची तरंगहीन जलायशाप्रमाणे पूर्ण शांत अवस्था हे खरे सुख होय. या अनुभूतींना सुख मानून त्यामध्ये गुंतल्यास निरंतर वद्धिंृ गत होणारी तषृ ा निर्माण होऊन अंतराळवकाश नित्य अशांत राहते. मनातील इच्छांचे शमन, इंद्रियांचे दमन, खरे सुख कोणते हा (नित्यनित्य) यांच्या विवेक बळावर तृष्णेपासून मुक्ती मिळविणे ही सच्चिदानंदाची अनुभूती मिळविण्याची पहिली पायरी होय. एकूण ज्ञानानिधीचे चार प्रकारातील हे वर्गीकरण ज्ञानाच्या ध्येयतत्त्वांच्या/ ज्ञेयाच्या अनुरोधाने आहे. जगामधील विविधता व विविधतेचे स्वरूप विज्ञानाचे ज्ञेय आहे. वरील दुसरा प्रकार देह धर्माच्या पूर्ततेचे ध्येय बाळगतो. तिसऱ्या प्रकारचे ज्ञेय जगातील एकत्व आहे. चौथ्या प्रकारचे ज्ञेय-ध्येय, आपल्या अंतराळातील सचिदानंदाचा शोध व सुखतृष्णे पासून मुक्ती आहे. ज्ञानाचे चारही प्रकार सर्वसाधारण जीवनामध्ये अनिवार्य व आवश्यक आहेत. त्यामुळे हे परमतुल्य व समान महत्त्वाचे आहेत. ते समृद्धी, संतोष, शांती मिळवून देतात. मनुष्य सध्या सुखाकांक्षा व त्याच्या पूर्ती साठी विज्ञान-तंत्रज्ञान एवढीच जाणीव बाळगत असल्याने मन, बुद्धी आणि प्रत्यक्ष व्यवहार एकांगी बनला आहे. ज्ञानाच्या चारही प्रकारांची नित्य जागती जाणीव बाळगली तर मनुष्याचा मन, बुध्दी व व्यवहार संतुलित होईल.


जीवन विचार

प्रारंभी म्हटल्याप्रमाणे समाजाच्या सुखदुःख, समृद्धीच्या चौकटीत व्यक्ति गत सुखदुःख, समृद्धी आणि एकूण सृष्टीच्या सुस्थितीच्या चौकटीत मनुष्यजातीची सुखसमृद्धी हे जीवनाचे उद्दिष्ट बाळगून, एका बाजूला अंतरावकाशातील शांती प्राप्त करणे व दुसऱ्या बाजूला बाह्य अवकाशातील समाज व निसर्गाशी असलेले एकत्वाचे, दायित्वाचे नाते सांभाळणे हे धोरण अंगीकारून, विज्ञान तंत्रज्ञान हे उद्दिष्ट आणि धोरण यांच्या मर्यादेत योजने हा योग्य जीवन विचार होय. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची योजना करण्यापूर्वी / केल्यानंतर त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय इत्यादी परिणाम तपासणे आवश्यक आहे. या जीवन विचाराद्वारे चारही प्रकारच्या जाणिवांचे संतुलन साधल्यावर दोन व्यक्तींमधील संबंध, दोन समाजांमधील संबंध, समाज व व्यक्तींमधील संबंध तसेच मनुष्य जाती व निसर्गामधील संबंध शोषण मुक्त तर होईलच परंतु ते परस्पर कल्याण कारक होतील. हा आदर्श वाद असाध्य नाही.

जीवनविचार x विज्ञान-तंत्रज्ञान

जीवनविचार आणि विज्ञान तंत्रज्ञानाची निवड यामधील संबंध स्पष्ट होण्याकरीता महात्मा गांधींच्या जीवनातील उदाहरण प्रथम पाहू. महात्माजींच्या स्वप्नातील भारतीय समाज प्रमुख्यतः गावागावांचा बनलेला होता आणि भारतीय समाज अध्यात्मिक मूल्यांना अंगीकारून शक्य तेवढ्या कमी सामग्रीनिशी संतोषाने, साधेपणाने जगणारा होता. स्थानिक उत्पादने व स्थानिक सेवा यावर सर्वांनी शक्य तेवढा निर्वाह करावा अशी त्याची अपेक्षा होती. त्याद्वारे ग्रामीण रोजगार निर्माण व्हावा व त्याचबरोबर परस्पर सहकार्य सहजीवनाचा भावही निर्माण व्हावा असे त्यांना वाटे. ब्रिटिशांच्या आगमनाच्या काळात भारतात सुमारे शंभर उद्योग व कला-कौशल्य सुस्थितीत होती. ब्रिटिशांनी ही अर्थौद्योगिक रचना उद्ध्वस्त केली ती पुन्हा उभी राहावी यासाठी १९३४ साली ठराव करून महात्माजींनी ग्रामोद्योग संघाची स्थापना केली. गांधी सेवा संघाच्या संमेलनाला जोडून १९३६ व १९३९ साली त्यांनी पोलाद निर्मितीचे प्रात्यक्षिक योजले होते. भारताचे पोलाद निर्मितीचे कौशल्य प्राचीन काळापासून जगद्विख्यात आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी एका राजाने सिकंदरास उत्तम पोलादाचा नजराणा दिला होता. जगप्रसिद्ध दमास्कस स्वर्ड्स भारतीय पोलादापासून बनत होत्या. अशा उच्च दर्जाच्या ग्रामीण स्तरावर असलेल्या (१८ /१९ व्या शतकातील स्थिती- १०० जि ल्ह्यांमध्ये १०,००० भट्ट्या होत्या. त्यांची वार्षिक क्षमता सरासरी २० टन प्रत्येकी होती.) या तंत्राच्या पुनरुजीवनाचा महात्माजींचा हा प्रयत्न आंग्ल विद्वान व पश्चिमी भांडवलदारी अर्थौद्योजक रचनेने, संस्कृतीने प्रभावित राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना पसंत पडला नाही. त्यांच्या विरोधामुळे स्वातंत्र्याचा आंदोलकांमधील अंतर्विरोध टाळण्यासाठी महात्माजींनी हे प्रयत्न स्थगित केले. (श्रीधर्मपाल वाङ्मय खंड २ व १०).


नैसर्गिक जीवनशैली, निसर्गाशी एकरूप तंत्रज्ञान

संपूर्ण सृष्टी एकजीव आहे असे भारतीय तत्त्वज्ञान मानते. भारतीय व्यक्ती वृक्षवल्ली, वनचरांकडे समत्व भावाने पहाते व शक्य तेवढी निसर्गानुकूल जीवनशैली अंगीकारत आली आहे. वन्यसमाज नागरीसमाजापेक्षा निसर्गाशी अधिक एकरूपतेने जगत आला आहे. त्यामुळे त्यांनी विकसित केलेली तंत्रे ही निसर्गाशी पूर्णतः एकरूप होती. काही अजूनही आहेत. त्याची काही उदाहरणे पाहू. आधुनिक विज्ञानानुसार उतारावरून वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या झोताच्या सहाय्याने वीज निर्मिती होते हे आपण जाणतो. अशा झोताच्या सहाय्याने धान्य दळण्याची गिरणी फिरविण्याचे तंत्र भारतीयांनी विकसि त केलेले होते. उत्तराखंड राज्यामधील कुमाऊँ जिल्ह्यातील लिपू खिंडीच्या वाटेवरील एका गावात या लेखाच्या लेखकाने अशी गिरणी पाहिली होती. मेघालयातील ‘खासी जयंति या’ जमातीच्या क्षेत्रात जंगलातील रबराच्या वृक्षाच्या हवाई मूळांच्या (ऐरीयल रुट्स), साह्याने नद्यांवर पूल बांधण्याचे तंत्र शेकडो वर्षांपूर्वी पासून चालत आले आहे. याला आता जैव अभियांत्रिकी (बायो इंजीनियरिंग) असे नाव प्राप्त झाले असून पर्यटकांचे आकर्षण (टुरिस्ट अट्रॅक्शन) बनल्याने आजही तेथील समाज असे पूल बांधतो आहे. नदीच्या दोन्ही बाजूंच्या किंवा एकाच बाजूच्या वृक्षांच्या पारंब्यांची पोफळीच्या पोकळ केलेल्या खांबांमधनू व बांबूभोवती गुंडाळून जोपासना केली जाते. आवश्यक तेवढी लांबी झाल्यावर त्यानं गुंफण पूल तयार होतो. गुंफलेल्या मुळांमधील रिकाम्या जागते दगड गोटे भरून चालण्यासाठी वाट केली जाते. काळ जातो तशी मुळे अधिक मजबूत होतात. झाड सुस्थितीत असेपर्यंत मुळे व पूलही टिकतो. १५ ते २० वर्षात हा पूल वजन घेण्यास सक्षम होतो. असे अधिकाधिक ५० मीटर लांबीचा पूल बांधले गेले असून काही पूल दुमजलीही आहेत. ही माहिती माहिती-जालावरही उपलब्ध आहे. श्री वाल्मिकी रामायणातील वानर समाज नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब करणारा होता. त्यांनी बांधलेला रामसेतू युद्धकांडातील २२व्या सर्गा तील वर्णनानुसार आहे. हा सेतू जणू त्यांनी वृक्षांचे ओडके टाकून तयार केलेला लांबलचक तराफा होता. होडी नांगर टाकून स्थिर करतात त्याप्रमाणे हे ओंडके, लता- वेलींनी, गवताच्या दोऱ्या वळून, शिळांना बांधून स्थिर केले होते. सेतूच्या वर्णनात कुठेही वीट अथवा चुना बांधकामाचा उल्लेख नाही.


अठराव्या शतकात अनेक ब्रिटिश अधिकारी/ अभ्यासक भारतीय जीवनाचा अभ्यास करण्यासाठी हिंडले. रॉबर्ट बार्करने १७७५च्या सुमारास कलकत्ता परिसरात बर्फ बनविण्याची पद्धती नोंदवलेली आहे. सुमारे एक मीटर खोलीच्या खड्यात तळाशी उसाच्या, मक्याच्या ताटांची २५ ते ३० सेंटीमीटर जाडीची गादी अंथरून त्यावर ६ मिलि मीटर जाड मातीच्या ३५ ते ४० सेंटीमीटर खोल कढया पाणी भरून मांडल्या होत्या. त्यावरील झाकणांसाठीही अशीच सामग्री वापरलेली होती. आकाश निरभ्र असल्यास ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याच्या काळात तापमान विशेष थंडीचे दिवस नसूनही रात्रभरात पाण्यावर बर्फाचा पातळ पापुद्रा तयार झाला होता. दुसऱ्या दिवशी चार मीटर खोल खड्यात या कढया मांडल्या गेल्या. बर्फाच्या पातळ पापुद्रांच्या अनेक कढया एकत्र आल्यावर निर्माण झालेल्या गारव्याने घट्ट बर्फ निर्माण झाला. सर्वसाधारण बर्फाप्रमाणे हा बर्फ वापरण्या जोगा होता. गोठण बिंदूच्या जवळपासही तापमान नसनूही निरभ्र आकाशा खाली बर्फ तयार होतो याचे कोणतेही स्पष्टीकरण तो देवू शकला नाही. (श्रीधर्मपाल साहित्य वाङ्मय खंड २) याप्रमाणे एक उदाहरण लेखकाने सातारा परिसरात ऐकले होते. सात आठ दशकांपूर्वी संध्याकाळी धारा काढलेले दूध घागरींमध्ये रात्रभर ६० ते ७० फूट खोल विहिरीत सोडून ठेवले जाई व दुसऱ्या दिवशी सकाळी ते शहरात वितरित होत असे. दुध टिकत असे असा गारवा त्याला मिळे.

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी दिल्लीमधील एका प्रदर्शनाचे वृत्त प्रसारित झाले होते त्या प्रदर्शनात सामान्यांनी निर्माण केलेले तंत्रज्ञान व उपकरणे मांडली होती. एका व्यक्तीने चालताना होणाऱ्या हालचालींचा उपयोग करून त्या पेडलींगच्या बळावर चालणारा फवारणीचा पंप बनवला होता. जगात सर्वत्र एका हाताने पंप चालवणे व दुसऱ्या हाताने फवारणी करणे अशी उपकरणे असताना या उपकरणात दोन्ही हातांनी फवारणीची सोय होती. अमेरिकेतील कोणा व्यक्तीने हे उपकरण तंत्रज्ञानासह खरेदी केल्याचेही वृत्तात नमूद केले होते.


तंत्रज्ञान म्हणजे ऊर्जा, इंधन, संगणक, यंत्रमानव, ड्रोन अशा आजच्या वातावरणात कोणतेही यंत्र, इंधन, ऊर्जा न वापरता केलेल्या कार्याची ही वरील उदाहरणे अविश्वासनीय भासतात. या तंत्रांच्या अनेक मर्यादाही आहेत. आजच्या समस्या व आवश्यकतांना ती तंत्र पुरक असतील त्यांचा पुरस्कार करण्यासाठी हा उल्लेख नाही. तरीही ग्रामीण आवश्यकता त्या मार्गाने भागू शकते का, हे तपासणे हा आहे. त्यांच्या उल्लेखाचा प्रमुख हेतू असा की पर्यावरणीय ठसा शून्यवत असणारे निसर्गाशी एकरूप तंत्रज्ञान म्हणजे काय हे स्पष्ट व्हावे आणि जीवनविचार, जीवनशैली आणि विज्ञान तंत्रज्ञान याची निकड यामधील संबंधही ध्यानात यावा.


(लेखक गेले दीड वर्ष अन्ननलिकेच्या कर्करोगाने आजारी होते. २० सप्टेंबर २०२५ला त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांनी देहदान केले होते.)

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page