top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

लांबलेला पर्जन्यकाळ

अनघा शिराळकर

नैऋत्य मोसमी पावसाचे परतणे वायव्य भारतापासून साधारणपणे १५ सप्टेंबर पासून सुरु होते आणि १५ आक्टोबर पर्यंत पूर्ण देशातून तो परत जातो. पण अलि कडच्या वर्षांमध्ये त्याचे परतणे काही दिवसांनी लांबत आहे. त्यातच मोसमी पावसानंतर (post monsoon) निर्माण होणाऱ्या चक्री वादळांमुळे पडणाऱ्या मुसळधार पावसाची भर पडत आहे. शिवाय नैऋत्य मोसमी पावसानंतर ईशान्य मोसमी पाऊस सुरू होतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने २०२५ या वर्षीच्या मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त (above normal) राहील आणि देशाच्या वायव्य भागात तो अतिप्रमाणात असेल असा अंदाज दिला होता. या वर्षी आक्टोबर पर्यंत पाऊस १०८ टक्के झाला आहे. एकूणच २०२५ या वर्षीचा पाऊस दर वर्षी पेक्षा जास्त काळ बरसत राहिला आहे. बऱ्याच ठिकाणी त्याने सरासरी पावसाची मर्यादा ओलांडली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतीची पिके वाया गेली, मातीची बरीच धूप झाली शिवाय आपत्ती व्यवस्थापनावरही ताण पडला. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांमध्ये अतिरिक्त पावसाने फार मोठे नुकसान झाले आहे. या मुळे सुगीचा कालावधी कमी झाला आहे. बऱ्याचशा खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले आहेच शिवाय रब्बीच्या पीकांची पेरणीही लांबणीवर पडत आहे.

मोसमी पाऊस परतण्याच्या तारखा

भारतातील मोसमी पावसाचे केरळमधील आगमन (onset) आणि त्याचे भारतभर पसरणे यांच्या वेळांवर शेती, जल व्यवस्थापन, विद्युत निर्मिती इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी पूर्णपणे जशा अवलंबून असतात तशाच त्याच्या वेळीच परतण्यावरही (withdrawal) त्या अवलंबून असतात.


भारतीय मोसमी पावसासाठी अनुकूल घटक

नैऋत्य मोसमी वारे (Southwest Monsoon) आणि ईशान्य मोसमी वारे (Northeast Monsoon) या दोन प्रकारच्या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. नैऋत्य आणि ईशान्य मोसमी पावसामध्ये हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतात येणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाच्या दोन शाखा आहेत. एक शाखा अरबी समुद्रावरील तर दुसरी बंगालच्या उपसागराची. या दोन शाखा भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पाडणारे आर्द्रतायुक्त वारे आणतात, दुसरीकडे, ईशान्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागराच्या प्रभावाखाली येतो, ज्यामुळे पूर्व किनाऱ्यावर, विशेषतः तामिळनाडू व आंध्र प्रदेशाच्या काही भागावर पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी पावसाची अरबी समुद्राची शाखा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर विशेषतः पश्चिम घाटाच्या बाजूने पाऊस आणते. बंगालच्या उपसागराची शाखा भारताचा पूर्व किनारा, निकोबार बेटे आणि ईशान्य भारत इथे पाऊस पाडते.


गंगा नदीच्या मैदानी (Indo-Gangetic Plain) भागाच्या वायव्येला अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांच्या शाखा एकत्र येतात आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पाडतात. समुद्रापेक्षा जमीन लवकर गरम होते. यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो आणि समुद्रावर जास्त असतो. हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे खेचली जाते. त्यामुळे बाष्पयुक्त वारे समुद्रावरून जमिनीकडे वाहतात आणि तिथे पाऊस पाडतात. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांचे तापमान वेगळ्या वेळी वाढते. त्यामुळे काही स्थानिक भागात या दोन्ही समुद्रावरील हवेच्या दाबात फरक पडतो. जिथे मान्सूनचे वारे तीव्र असून पाऊस जास्त असतो तिथे या हवेतील दाबाच्या फरकाचा प्रभाव जास्त पडतो. दक्षिण हिंदी महासागरात (मादागास्कर जवळ) निर्माण होणारा उच्च दाब नैऋतेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांना भारताकडे ढकलतो. भारतीय नैऋत्य आणि ईशान्य मोसमी पाऊस ही एक हवामानाची क्लिष्ट प्रक्रिया आहे. तिच्यावर अनेक वातावरणीय व सागरी घटकांचा प्रभाव असतो. पावसाचे आगमन, त्याचे प्रमाण, कालावधी आणि परतणे या क्रियांवर या घटकांचे नियंत्रण असते. यातील महत्त्वाच्या घटकांबद्दलची माहिती खाली दिली आहे.


एसएसटी (Sea Surface Temperature)

समुद्राच्या पृष्ठ भागावरील तापमान (sea surface temperature – एसएसटी) हा भारताच्या मोसमी पावसाची प्रबलता आणि त्याच्यात पडणारा फरक यासाठी कारणीभूत असणारा प्रमुख घटक आहे. एसएसटी जास्त (>२६.५ डिग्री सेल्सिअस) असेल तर बाष्पीभवन वाढून हवेतील आर्द्रता वाढते. आर्द्रता वाढल्याने ढग तयार होतात व संवहनामुळे (convection) पाऊस पडतो. त्या उलट कमी एसएसटी मुळे कमी बाष्पीभवन होऊन कमी पाऊस पडतो. पश्चिमेकडील एसएसटी आणि पूर्वेकडील एसएसटी यांच्यातील फरक जेव्हा बदलतो तेव्हा वाऱ्यांचा प्रकार, पर्जन्यमान आणि पावसाची स्थिती यांमध्ये फरक पडतो. बाष्पयुक्त वारे हे जमीन आणि समुद्र यांच्यामधील हवेच्या दाबातील फरकामुळे तयार होतात. उबदार समुद्र (अरबी समुद्र व बंगालचा उपसागर) त्याच्या पृष्ठ भागावरील हवेचा दाब कमी करतो त्यामुळे बाष्पयुक्त वारे भारतावर पाऊस पाडतात.


वेस्टर्लीज (Western Disturbances)

पृथ्वीच्या फिरण्यामुळे हवा सरळ न जाता ती उत्तर गोलार्धात उजवीकडे वळते आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे वळते त्यामुळे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. पृथ्वीवरील पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांच्या पट्ट्यांचा प्रभाव पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात ३०° ते ६०° अक्षांश या दरम्यान असतो. यांना वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजे वेस्ट्रर्लीज म्हणतात. वेस्टर्लीजची निर्मिती पृथ्वीच्या फिरण्यामुळे (Coriolis Force) आणि पृथ्वीवरील हवेच्या दाबातील फरक यांच्यामुळे होते. वेस्टर्लीजमुळे सतत जोराचे वारे वाहत असतात. विषुववृत्ताजवळ सूर्याची उष्णता जास्त असल्याने तिथे कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low Pressure Belt) असतो आणि ३०° अक्षांशांवर किंवा ध्रुव प्रदेशांजवळ सूर्याची उष्णता कमी असल्याने तिथे उच्च दाबाचा पट्टा (Subtropical High Pressure Belt) असतो. ६०° अक्षांशांवर पण कमी दाबाचा पट्टा (Subpolar Low Pressure Belt) असतो. या दोन पट्ट्यांमधील (३०° ते ६०°) हवा उच्च दाबाकडून कमी दाबाकडे खेचली जाते. म्हणून उष्णकटिबंधीय व उपोष्णकटिबंधीय क्षेत्रात ध्रुवीय प्रदेशापेक्षा चक्रीवादळे व पाऊस यांचे प्रमाण जास्त असते. थोडक्यात, हवेचे उच्च दाबाकडून कमी दाबाकडे सरकणे आणि पृथ्वीचे फिरणे (Coriolis Force) मिळून वेस्टर्लीज तयार होतात. दक्षिण गोलार्धात जमीनीचे क्षेत्र कमी आणि महासागराचे क्षेत्र अधिक असल्याने ते तिथे स्थिर आणि प्रबळ असतात. या वाऱ्यांचा हवामानातील बदल, चक्रीवादळे व पर्जन्य वितरण यावर मोठा प्रभाव असतो. दक्षिणेकडील क्षीण तापमान प्रवणता (Weakened Meridional Temperature Gradient), जागतिक, विशेषतः आर्क्टिक क्षेत्रातील तापमान वाढ ज्यामुळे ध्रुवीय आणि विषुववृत्तीय क्षेत्रां मधील तापमानातील फरक कमी होऊन वेस्टर्ली जचे प्राबल्य कमी होते. वर जाणारी गरम व दमट हवा थंड होऊन ढग तयार होतात. सततच्या उष्णतेमुळे आणि पृथ्वीच्या फिरण्यामुळे (Coriolis Force) हवा भोवऱ्या सारखी फिरू लागते आणि चक्रीवादळे (Cyclones) तयार होतात आणि जोराचा पाऊस पडतो.


जेट स्ट्रीम

पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात वरच्या थरातून (Tropical and Subtropical) पश्चि मेडून पूर्वेकडे वेगाने वाहणाऱ्या हवेच्या जोरदार प्रवाहांच्या लांब आणि अरुंद पट्ट्याला झोतवारा (जेट स्ट्रीम) म्हणतात. दोन भिन्न तापमानाच्या हवेच्या वस्तूमानांच्या (mass) संपर्का तून हे प्रवाह तयार होतात. भारतासाठी दोन प्रकारचे जेट स्ट्रीम महत्त्वाचे आहेत. एक मोसमी पावसासाठी उपयुक्त आहे तर दुसरा कमी पाऊस किंवा पावसाचे आगमन उशीरा होण्यास कारणीभूत ठरतो. वाढत्या तापमानामुळे वेस्टर्लीज आणि जेट स्ट्रीम यांची वातावरणातील उंची वाढते आणि ते नेहमीचा मार्ग बदलतात त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या क्षेत्रांवरील प्रभाव कमी होतो. भारतीय मोसमी पावसाचे आगमन आणि त्याचे परतणे यांमध्ये जेट स्ट्रीमची भूमिका फार महत्त्वाची आहे. उत्तर भारतात १२-१४ कि .मी. उंचीवर तयार होणारी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी उपोष्णकटि बंधीय वेस्टर्ली जेट स्ट्रीम (Subtropical Westerly Jet Stream - STWJ) ही थंडीसाठी महत्त्वाची असते. त्यावेळी पूर्ण भारतात कोरडी आणि थंड हवा राहते तसेच पावसाच्या वाऱ्यांना भारतात शिरण्यास अटकाव करते. जून – सप्टेंबर या महिन्यात १२-१४ कि .मी. उंचीवर दक्षिण भारत आणि हिंदी महासागर या भागात तयार होणारे पूर्वीय उष्णकटि बंधीय ईस्टर्ली जेट (Tropical Easterly Jet - TEJ) भारतीय मोसमी पावसासाठी उपयुक्त असते. याची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असून सुरुवात तिबेटच्या पठारावरून तिथे असलेल्या अति उष्ण हवेमुळे होते. ट्रॉपिकल इस्टर्ली जेट स्ट्रीम भारतात नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनाच्या वेळी सक्रिय असल्यास मोसमी पाऊस प्रबळ होण्यास आणि तो देशात सर्वदूर पसरण्यास उपयुक्त असते. पाऊस परतण्याचा वेळी ट्रॉपिकल इस्टर्ली जेट स्ट्रीमचे प्राबल्य कमी होते आणि सबट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीम प्रबळ होऊन ते दक्षिणेकडे सरकते आणि कोरडी स्थिर हवा वायव्येकडे आणते. साधारणपणे ही अवस्था सप्टेंबरच्या मध्यावर होते त्यावेळी नैऋत्य मोसमी पाऊस वेळेवर परततो. भारतातील पावसामध्ये तिबेटच्या पठाराचे मोठे योगदान आहे. त्याच्या उंचीमुळे बाष्पयुक्त वारे वर जाऊन हिमालय आणि त्याच्या जवळच्या परिसरात जोराचा पाऊस पाडतात. मोसमी पावसाची द्रोणी (Monsoon Trough) मोसमी पावसाची द्रोणी (मान्सून ट्रफ) म्हणजे पाकिस्तान पासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला कमी दाबाचा एक लांब पट्टा असतो. हा पट्टा भारताच्या मोसमी पावसाशी संबंधित असतो आणि तो कमी दाबाचे क्षेत्र तयार करतो. उच्च दाबाच्या क्षेत्रा तून बाष्पयुक्त वारे येऊन कमी दाबाच्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो. मान्सून ट्रफच्या परिसरामध्ये अनेकदा कमी दाबाच्या प्रणाली आणि उष्णकटि बंधीय चक्रीवादळे तयार होतात, ज्यामुळे भरपूर पाऊस पडतो. थोडक्यात, मान्सून ट्रफच्या स्थानामध्ये बदल झाला की भारतात मोसमी पावसाचे वितरण आणि तीव्रता बदलते. बऱ्याच वेळा मान्सून ट्रफ दक्षिण भारतात जास्त असतो.


जागतिक हवामानातील महासागर-वातावरणीय परस्परसंवाद प्रणाली (Ocean–Atmosphere Coupled Phenomena -Teleconnection)

वॉकर अभिसरण, एल निनो आणि दक्षिणी दोलन (ElNino Southern Oscillation - ENSO), ला निना (LaNina), हिंदी महासागर द्वि ध्रुव – आयओडी (Indian Ocean Dipole), उत्तर अटलांटिक दोलन (North Atlantic Oscillation - NAO), मेडन – ज्युलियन दोलन (Madden - Julian Oscillation – MJO) या महासागराच्या पाण्याच्या तापमानासंबंधी असणाऱ्या नैसर्गि क हवामान संरचनाचीही भूमिका मोसमी पावसाच्या स्थळ, काळ आणि प्रमाण यांमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये महत्त्वाची आहे.


वॉकर अभिसरण (Walker circulation)

पृथ्वीच्या रेखांशाप्रमाणे पूर्व-पश्चिम दिशेने होणारे वातावरणातील अभिसरण, जे मुख्यतः विषुववृत्ताजवळील भागावर (equatorial region) आढळते त्याला वॉकर अभिसरण (Walker Circulation) म्हणतात. हे अभिसरण प्रशांत महासागर आणि वातावरणातील हवेचा दाब व तापमानातील फरकांमुळे तयार होते. वॉकर अभिसरण हे जगातील हवामान संतुलन राखणारा प्रमुख घटक आहे. ते महासागरातील तापमान व वातावरणातील दाब यांचा समन्वय साधते. ते जरी प्रशांत महासागरावर कार्यरत असले तरी त्याचा परिणाम संपूर्ण उष्णकटि बंधीय हवामानावर, विशेषतः भारतीय मोसमी पावसावर होत असतो. हा परिणाम एल निनो आणि ला निना यांच्यामार्फत होतो. एल निनो असेल तेव्हा वॉकर अभिसरणामध्ये फरक पडतो आणि भारतात मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडतो.


एल निनो (El Nino) व ला नि ना (La Nina)

मध्यपूर्व विषुववृत्तीय (दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील) प्रशांत महासागराच्या (Pacific Ocean) पृष्ठ भागावरील पाण्याचे तापमान असामान्यपणे सरासरीपेक्षा जास्त वाढू लागणे याला एल निनो म्हणतात आणि हेच तापमान मोठ्या प्रमाणावर थंड होते तसेच त्या भागातील वारा, हवेचा दाब आणि आर्द्रता यांच्यातील बदलांमुळे वातावरणीय अभिसरणातही बदल होतो तेव्हा ला निनाची स्थिती तयार होते (एल निनोच्या विरूद्ध). एल निनो सक्रिय असताना भारतात मोसमी पाऊस कमी पडतो. ला निना जेव्हा सक्रिय असतो तेव्हा भारतात पाऊस भरपूर पडतो आणि पावसाचे परतणे लांबण्यास कारणीभूत ठरतो. कधी एल निनो मुळे मान्सून ट्रफचा मार्ग बदलतो व मोसमी पाऊस उशीरा दाखल होतो.


आयओडी (Indian Ocean Dipole)

मोसमी पावसासाठी आवश्यक असणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे हिंदी महासागर द्वि ध्रुव (Indian Ocean Dipole - आयओडी). सकारात्मक (positive) आयओडीमुळे भारतीय मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असते. अशा वेळी आफ्रिकेजवळील पश्चिम हिंदी महासागराच्या पाण्याचे तापमान जास्त असते आणि इंडोनेशियाजवळील पूर्व हिंदी महासागराच्या पाण्याचे तापमान कमी असते. नकारात्मक (negative) आयओडी असताना परिस्थिती उलट असते म्हणजे पश्चिम हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान कमी असते आणि पूर्वेकडील भागाचे जास्त असते. अशावेळी मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडतो.


एनएओ (North Atlantic Ocean Oscillation)

उत्तर अटलांटिक दोलन (North Atlantic Oscillation – एनएओ), जरी हे भारतापासून दूर असलेल्या अटलांटिक महासागरावर घडत असले तरी त्याचा अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणातील वातावरणाच्या अभिसरणामार्फत भारतीय मोसमी पावसावर परिणाम होत असतो. एनएओ हे आइसलँडिक लो (आइसलँड आणि ग्रीन लँड यांमध्ये असलेले दीर्घकाळ टिकणारे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र) आणि अझोअरस् हाय (पोर्तुगाल जवळील उत्तर अटलांटिक महासागरातील हवेचा जास्त दाब असणारे क्षेत्र) यांच्यातील हवेच्या दाबाच्या फरकावर आधारित पृथ्वीच्या वातावरणात घडणारी घटना आहे. सकारात्मक आणि नकारात्मक अशा एनएओच्या दोन अवस्था असतात. सकारात्मक अवस्थेमध्ये अझोअर्स हाय प्रबळ असतो आणि आइसलँडजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते त्याला ‘डीप आईसलँडिक लो’ म्हणतात. यावेळी उत्तर अटलांटिक महासागरावरील पश्चिमेकडील वारे (वेस्टर्लीज) प्रबळ होतात. त्यामुळे हिवाळ्यात युरेशिया व तिबेट इथे प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. तिबेटच्या पठारावरील बर्फवृष्टीमुळे तिथे उन्हाळ्यात कमी उष्णता असल्याने भारतातील मोसमी पावसाचे अभिसरणाचे प्राबल्य कमी होऊन तो सरासरीपेक्षा कमी पडतो. याउलट म्हणजे जेव्हा नकारात्मक एनएओ असतो, तेव्हा अझोअर्स हाय आणि आइसलँडिक लो निर्बल असतो. त्यामुळे पश्चिमेकडील वारे पण निर्बल असतात आणि युरेशिया व हिमालय येथील हिवाळ्यात कमी बर्फवृष्टी होते. म्हणजेच तिबेटच्या पठारावर उन्हाळ्यात जास्त तापमान असते. याचा उपयोग मोसमी वाऱ्याचे अभिसरण प्रबळ होऊन भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो. थोडक्यात जेव्हा सकारात्मक एनएओ असतो तेव्हा भारतीय मोसमी पाऊस कमी पडतो आणि जेव्हा तो नकारात्मक असतो तेव्हा पाऊस भरपूर पडतो. जेव्हा एल निनो आणि सकारात्मक एनएओ एकत्र येतात तेव्हा भारतातील मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी होतो व दुष्काळ पडतो. २००२ आणि २०१५ साली अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जेव्हा ला निना आणि नकारात्मक एनएओ एकत्र येतात तेव्हा भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून महापूर येतात. १९८८ आणि २०१० साली अशी परिस्थिती निर्माण झाली होती.


मेडन ज्युलियन दोलन (Madden Julian Oscillation)

रोनाल्ड मेडन आणि पॉल ज्युलियन या दोन शास्त्रज्ञांनी १९७१ साली एक मोठ्या प्रमाणावर असणारा उष्णकटि बंधातील हवामानाचा प्रकार शोधला. यामध्ये साधारणपणे दर ३० ते ६० दिवसांनी ढग, पाऊस, वारे आणि हवेचा दाब हे सर्व विषुववृत्ताजवळ पूर्वेकडे प्रवास करतात. याला मेडन ज्युलियन दोलन (Madden Julian Oscillation) म्हणतात. हे दोलन स्पंदनाप्रमाणे कमी जास्त होत पूर्वेकडे सरकते. त्याचा उगम हिंदी महासागरात होऊन, सागरी खंडांना पार करून, प्रशांत महासागर आणि काही वेळेला अटलांटिक महासागरापर्यंत पोहचते. हे दोलन उष्णकटिबंधीय संवहनावर (tropical convection) परिणाम करून संपूर्ण जगावरील वाऱ्याच्या स्थितीवर परिणाम करते आणि चक्रीवादळाला पोषक वातावरण निर्माण करते. हे मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला हिंदी महासागरावरील सकारात्मक एमजेओ वातावरणातील संवहन क्रिया वाढवून भारतीय मोसमी पावसाचे आगमन वेळेवर किंवा आधी येण्यास कारणीभूत ठरतो तसेच पावसाचे प्रमाणही वाढवतो. त्याउलट जेव्हा एमजेओ निष्क्रिय असतो तेव्हा पावसाचे आगमन उशीरा होते, विश्रांतीचा काळ वाढतो आणि पाऊस कमी पडतो. एमजेओचे स्थान आणि प्राबल्य मोसमी पावसाचे आगमन, वितरण, विश्रांती आणि परतणे यांच्या वेळा ठरवते. तसेच एमजेओ मोसमी पावसाची स्थिती बदलण्यास (Monsoon Variability) कारणीभूत असते.


सोमाली प्रवाह (Somali Current)

सोमाली प्रवाह हा विशिष्ट ऋतूमध्ये निर्माण होतो. तो पश्चिम अरबी समुद्रातील आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरून (सोमालिया इथून) वाहतो. हा प्रवाह जगातील अशा अनेक प्रवाहांपैकी एक आहे जे मोसमी पावसाच्या वाऱ्याबरोबर उलटे फिरतात. सोमाली प्रवाह उन्हाळ्यात वाऱ्यांची शक्ति , तापमानाची प्रवणता (Gradient) आणि भारताच्या नैऋत्य मोसमी पावसासाठी पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात हवेच्या दाबाची क्षेत्रे (monsoon depressions) वाढवतात. यामुळे नैऋत्य मोसमी पाऊस प्रबळ बनतो. हिवाळ्यात (डिसेंबर – फेब्रुवारी) ईशान्येकडील थंड वारे सोमाली प्रवाहाला दक्षिणेकडे नेतात आणि उन्हाळ्यात ( जून – सप्टेंबर) या काळात नैऋत्य मोसमी उबदार पाण्याच्या प्रवाहाला उत्तरेकडे घेऊन जातात. थोडक्यात, सोमाली प्रवाह नैऋत्य मोसमी पावसाच्या वाऱ्यांना बळकटी देतो आणि अरबी समुद्राच्या पृष्ठ भागाच्या तापमानाची आणि हवेच्या दाबाची प्रवणता (gradient) वाढवतो. त्यामुळे पश्चिम अरबी समुद्राच्या पश्चिमेला गरम पाण्याचा डोह (pool) तयार होतो. उबदार अरबी समुद्र आणि थंड हिंदी महासागर यांच्यातील तापमानातील फरकामुळे प्रवणता वाढते. ही तापमानातील आणि हवेच्या दाबाची प्रवणता मौसमी पावसासाठी अनुकूल असते. शिवाय समुद्राच्या पृष्ठ भागावरील गरम पाणी खाली जाऊन खोल समुद्रातील पाणी वर येते. हे पाणी थंड, दाट आणि पोषक द्रव्यांनी समृद्ध असते.


भारतातील पावसाचा कालावधी वाढण्याची कारणे

पृथ्वीचे हवामान ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे. जगातील एका भागात घडणाऱ्या घटनेचा परिणाम नजिकच्या तसेच दूरवरच्या भागातील हवामानावर होतो. त्यामुळे भारतातील या वर्षी च्या पावसाचा मुक्काम का वाढला याची अनेक गुंतागुंतीची कारणे आहेत. भारतातील पाऊस वेळेवर येणे, योग्य प्रमाणात सर्वत्र बरसणे, योग्य वेळी परतणे किंवा यामध्ये बदल होणे यासाठी हवामानाचे वर उल्लेख केलेले सर्व घटक कारणीभूत असतातच असे नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या घटकांचा आणि काही घटकांच्या एकत्र येण्याचा पावसावर परिणाम होत असतो. २०२५ साली पावसाचे प्रमाण आणि कार्यकाल वाढण्याच्या महत्त्वाच्या कारणांचा आपण विचार करु.

महाराष्ट्रातील मुसळधार पावसानंतर २९ सप्टेंबरला बंगालच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन आक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ‘शक्ती’ (भारताने सुचवलेले नाव) हे या वर्षीचे आशियातील पहिले तीव्र चक्रीवादळ तयार झाले. त्याचा परिणाम महाराष्ट्र, गुजरात, दक्षिण किनारपट्टी व पाकिस्तानच्या किनाऱ्यालगतच्या भागांवर झाला. ‘मोंथा’ (थायलंड देशाने सुचवलेले नाव, मोंथा म्हणजे थाई भाषेत सुगंधी फूल) हे दुसरे चक्रीवादळ झाले ते २९ आक्टोबर २०२५ रोजी आंध्र प्रदेशात काकीनाडाच्या किनारपट्टीवर. महाराष्ट्रातील काही भाग, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कोलकाता, ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांवर याचा विपरीत परिणाम झाला. नैऋत्य मोसमी पाऊस परतल्यानंतर ईशान्य मोसमी पाऊस ऑक्टोबर–डिसेंबर या काळात पडतो. याला परतीचा मोसमी पाऊस असेही संबोधतात. या काळात भारताच्या उत्तर व ईशान्य भागातील तापमान कमी होते आणि त्या ठिकाणी हवेच्या उच्च दाबाचे क्षेत्र तयार होते. या पावसाचे वारे ईशान्य दिशेकडून जमिनीवरून बंगालच्या उपसागराकडे वाहतात. बंगालच्या उपसागरातील बाष्प घेऊन हे वारे ईशान्येकडून आग्नेय दिशेला (दक्षिण - पूर्व) वाहू लागतात. या बाष्पयुक्त हवेमुळे तामिळनाडू, पुडुचेरी, दक्षिण आंध्रप्रदेश, दक्षिण कर्नाटक यांच्या किनाऱ्यांवर भरपूर पाऊस पाडतात. बंगालच्या उपसागरात भरपूर बाष्प असल्याने चक्रीवादळांची निर्मिती जास्त होते. दक्षिण भारताच्या आग्नेय प्रदेशात नैऋत्य मोसमी पाऊस कमी पडतो. त्यामुळे ईशान्य मोसमी पाऊस तिथे दिलासा देतो. आक्टोबर २०२५ मध्ये मोसमी पाऊस परतीनंतर अरबी समुद्रात परत पावसाची प्रणाली सक्रिय झाल्यामुळे गोवा व महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला. आग्नेय भारताच्या किनारपट्टीवर ईशान्य मोसमी पाऊस पडला. सप्टेंबर–ऑक्टोबर २०२५ या काळात बंगालचा उपसागर व अरबी समुद्र यांच्या पृष्ठ भागाच्या तापमानाचे (SST) विश्लेषण असे दर्शविते की नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ मध्ये मोसमी पावसानंतरची (post monsoon) चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. ही चक्रीवादळे भारताच्या पश्चिम व वायव्य भागांवर परिणाम करतील. या भाकिताप्रमाणे सध्या ‘सेनयार’ नावाचे शक्तीशाली चक्रीवादळ (संयुक्त अरब अमिराती या देशाने नाव दिले आहे) बंगालच्या उपसागरात तयार झाले. २४ नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हे चक्रीवादळ तयार झाले. २७ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे चक्रीवादळ जमिनीवर धडकून तामिळनाडू, अंदमान, निकोबार, तेलंगणा, आंध्रप्रदेश इत्यादी प्रदेशात अति मुसळधार पाऊस पडला.


२०२५ या वर्षी ट्रॉपिकल इस्टरली जेट स्ट्रीम बराच काळ प्रबळ राहिल्याने हवेतील आर्द्र हवा आणि संवहन यांना बळकटी आल्याने नैऋत्य मोसमी पावसाचे परतणे काही दिवस लांबले. त्याच वेळी कोरडी थंड हवा मध्यम उंचीच्या ठि काणाहून उत्तरेकडे जाण्यास सबट्रॉपिकल वेस्ट्रर्ली जेट स्ट्रीम रोखत होते. उंचावरील वातावरणात कमी दाबाचे आणि उच्च दाबाचे पट्टे अडकून अस्वाभाविक (abnomal) जेट स्ट्रीम फिरत राहिले ज्यांच्यामुळे कमी दाबाची स्थिती कायम राहून मध्य आणि पूर्व भारतात वाढीव पाऊस पडला. नोव्हेंबर २०२५ च्या अखेरीस नैऋत्य बंगालच्या उपसागरात ‘दि तवाह’ (येमेन देशाने सुचवलेले नाव) हे शक्तीशाली वादळ निर्माण होऊन त्याचा जास्त परिणाम श्रीलंकेवर झाला. भारताच्या दक्षिणेकडील राज्यांवर त्याचा प्रभाव दिसून आला.


२०२५ या वर्षी अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील उष्णता सप्टेंबरनंतरही उपलब्ध असल्यामुळे हवेत आर्द्रता टिकून राहिली. यामुळे कमी दाबाचे क्षेत्र वारंवार तयार होऊन पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले. तसेच पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचे (वेस्टर्लिज) प्राबल्य कमी झाले. याचे कारण म्हणजे दीर्घकालीन हवामान बदलांमुळे वाढलेली हवामानाची क्लिष्टता. या वर्षी ट्रॉपिकल इस्टरली जेट स्ट्रीम बराच काळ प्रबळ राहिल्यामुळे हवेतील आर्द्र हवा आणि संवहन यांना बळकटी आली. त्याच वेळी कोरडी थंड हवा मध्यम उंचीच्या ठिकाणाहून उत्तरेकडे जाण्यास सबट्रॉपिकल वेस्ट्रर्ली जेट स्ट्रीम रोखत होते. त्यामुळे पाऊस पडतच राहिला. सबट्रॉपिकल वेस्टर्ली जेट हिमालयाच्या उत्तरेला नेहमीपेक्षा जास्त काळ राहिल्याने बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाब निर्माण होत राहिला. तसेच सकारात्मक (positive) आयओडी सक्रिय असल्यानेही पाऊस पडत राहिला. आक्टोबर - नोव्हेंबर या महिन्यात बंगालच्या उपसागराचे तापमान जास्त असल्याने तिथे कमी दाब निर्माण होऊन चक्री वादळाची निर्मिती झाली आणि पाऊस पडला. ही स्थिती भारताच्या पूर्व, दक्षिण आणि मध्य भागात जास्त होती. बऱ्याच वेळा मान्सून ट्रफ दक्षिणेला जास्त काळ असल्यानेही अशी स्थिती निर्माण होते.


कमी दाबाचे पट्टे वारंवार निर्माण होत आहेत. सक्रिय आयओडी किंवा ला निना हे भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्यास कारणीभूत ठरत आहेत. दक्षिण आशियातील मानवी क्रियाकलापांमुळे हवेतील सूक्ष्म धुळीचे कण (aerosols) आणि जमिनीची धूप यांच्यातील बदलांमुळे स्थानिक भागात तापमान आणि हवेचा दाब यातील कमी जास्त चढ उतार, विशेषतः दक्षिण आशियात सूक्ष्म कणांमुळे वातावरणातील तापमान कमी झाले आणि अरबी द्वीपकल्प (Arabian Peninsula) गरम झाल्याने स्थानिक समुद्रावरील हवेच्या दाबाची प्रवणतेमुळे (pressure gradient) तपांबराच्या खालच्या स्तरातील (lower troposhere) ट्रॉपिकल वेस्टर्लिजचे प्राबल्य कमी झाले.


हवामान बदलामुळेही पावसाचे स्वरूप बदलत आहे. जिथे पूर्वी मध्यम पाऊस पडायचा, तिथे आता जोरदार आणि अति जोरदार पावसाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा धोकाही वाढतो आहे. या बदलांकडे लक्ष देणे आणि त्यानुसार उपाययोजना करणे आवश्यक आहे.


भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदी व अभ्यासाप्रमाणे १९७१-२०२० या ५० वर्षांत नैऋत्य मोसमी पावसाच्या परतण्याचा काळ सरासरी दर दहा वर्षांनी १.६ दिवसांनी पुढे सरकलेला आहे. पावसाचे परतणे जेवढे लांबेल तेवढे त्याचे प्रमाणही वाढते. मागील दहा वर्षां पैकी सात वर्षां मध्ये सप्टेंबरचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे. यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाला पावसाच्या परतण्याच्या बदललेल्या तारखा त्यांच्या कारणांसह नव्यान े जाहीर कराव्या लागतात.


संदर्भ:

  • Hundred years of weather services (1875-1975), New Delhi, India Meteorological Department, 1976

  • 125 Years of Service to the Nation (1875-2001): A retrospective and futuristic overview, India Meteorological Department, New Delhi, 2001

  • Satyaprakash, Giri R.K. and Bhan S.C., On the increasing length of the southwest monsoon over India, Mausam, 76, 3, July 2025, 745 - 754

  • Sikka D.R., Fifty Golden Years of IITM, Indian Institute of Tropical Meteorology, Pune, 2011

  • https://mausam.imd.gov.in/

  • https://www.vedantu.com/geography/weatherforecasting

  • देशपांडे मेधा, हवामान अंदाजात भारताचे नवे शिखर, लोकसत्ता, १९ जून २०२५

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page