top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

मंदिर स्थापत्यकला

  • 4 days ago
  • 13 min read

श्री अजय कुलकर्णी


मंदिर स्थापत्य विशेषतः भारतीय मंदिर शास्त्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन या अनुषंगाने मी माझी भूमिका, अनुभव तसेच माझ्या मंदिरे व ऐतिहासिक वास्तूसंवर्धन कार्यातील जवळपास चार दशकांचा निरीक्षणाचा सारांश इथे मांडत आहे. मुळात वास्तुशास्त्र हे शुद्ध विज्ञान आहे कि केवळ कलाविष्कार यात ठळक मते आहेत व ठळक मतांतरे सुद्धा. पण माझ्या मते आधुनिक शिक्षण पद्धती विशेष करून इंग्रजी राजवटीनंतर प्रचलीत असलेल्या शिक्षण पद्धतीनुसार विविध अभ्यासक्रमांची मर्यादा निश्चित केलेली आढळते. याउलट वास्तुकला ही आजही बऱ्याच प्रमाणात म्हणजे अभ्यासक्रमात तसेच व्यावहारीक जीवनातही आंतरशास्त्रीय आहे. त्यामुळे वास्तुकला भूतकाळात तसेच वर्तमानात वैज्ञानिक, शुद्ध शास्त्रीय कलाविष्कार आहे. यात ज्ञानासोबतच नृत्य, शिल्प, चित्रकलेप्रमाणेच निर्माणकर्त्याचे वैयक्तिक अंतर्ज्ञान व तात्कालिक निर्णयातून वास्तू निर्माण करावी लागते. विज्ञान किंवा वैज्ञानिक तत्वे सर्वमान्य व वैश्विक सारखेच असले तरी त्यांचा वापर वास्तुविशारदाच्या वैयक्तिक कलाशक्तीनुरूप निरनिराळे आकार घेत असतो. बऱ्याच अंशी संगीताप्रमाणेच कोणत्या ही रागाची मूळ रचना ही सारखीच असूनही त्याचा वापर प्रत्येक कलाकाराला आपल्या विशिष्ठ शैलीमध्ये करण्याची मुभा अथवा स्वातंत्र्य असते. कदाचित याच विशेष गुणधर्मामुळे वास्तुकलेला “THE FROZEN MUSIC” असं संबोधलं जातं.

अन्न वस्त्र निवारा या तिन्ही ही मूलभूत गरजा भौगोलिक आणि हवामानाला प्रतिसादातून निर्माण झालेल्या आहेत. या तीनही प्रकारात मूळ प्रतिसादासोबतच काळानुरूप बदल, परिपक्वता व कलात्मक विवितवतवधता निर्माण होत गेली. वास्तूचं मानवाच्या अस्तित्वातलं अस्तित्व जेवढं पुरातन आहे तेवढच अविभाज्य व मूलभूत आहे. वास्तु निसर्गापासून संरक्षण करण्यापासून आपल्या दिनचर्येतील प्रत्येक तासागणिक बदलणारं त्याचं आजचं स्वरूप आपण पाहतो आहोत. अगदी वैदिक काळापासून ते 19 व्या शतकापर्यंतचा हा प्रवास विस्मयकारक आहे. समाजात वावरताना आपण विविध चालीरीती, सवयी, नियमांवर आधारित जीवन जगत असतो. जगात विवितवतवध प्रदेशातल्या या प्रथा, सवयी विवितवतवधतेने रुजलेल्या आपल्याला माहिती आहेत. विविध धर्म, भौगोलिक परिस्थिती, हवामान यातून निर्माण झालेल्या व यांना प्रतिसाद देणाऱ्या केवळ वास्तू अथवा नगरेच नव्हे, तर वेशभूषा तसेच खाण्यापिण्याच्या मूलभूत गरजा सुद्धा विविधच आहेत. यातलं आणि या प्रत्येकाचे वैशिष्ट्य, हे एका विचारपूर्वक आणि कालजयी अथवा काळानुरूप स्वीकारलेले व तपासलेले रूप आहे. एखादी खानपानाची अथवा वेशभूषेची शैली जरी एक प्रथा म्हणून ओळखली जात असली, तरी ती एका गरजेच्या प्रतिसादातून स्वीकारलेली मूलभूत गरज असते. जसे कोणाच्या कपड्यावरून अथवा खाण्यापिण्याच्या शैलीवरून आपण लगेच त्या व्यक्तीचा ठिकाणाचा कयास अचूक बांधू शकतो, असेच स्वरूप निसर्गाचे आहे.

वृक्ष, वने, प्राणी अथवा हवामानावरून ठिकाणाची कल्पना करणे तसेच या नैसर्गिक परिस्थितीला प्रतिसादातून निर्माण झालेली अन्न, वस्त्र, अथवा निवारा या मूलभूत गरजांचे अमूर्त रूप यावरून जागेची ओळख पटवणं सहज शक्य आहे. यापुढे जाऊन सामाजिक जीवनात वावरताना विविध श्रद्धा, सामाजिक अथवा धार्मिक यानुसार या तिन्ही मूलभूत गरजांच्या प्रतिसादाचा अर्थ वेगवेगळा आपण अनुभवत असतो. जसे नैसर्गिक प्रतिसाद अनिवार्य आहे, तसाच सामाजिक आयुष्यात प्रथा व धार्मिक श्रद्धांचा प्रभाव आपल्या अस्तित्वावर, वागणुकीवर, आवडी- निवडीवर कळत आणि नकळत होणे स्वाभाविक आहे. यातून निर्माण होतात त्या आपल्या आवडी-निवडी. अर्थात जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अथवा “Perception”ची विभागणी Good and Bad मध्ये होते. जगाची विभागणी Preferred against not preferred यात होते. यातून निर्माण होतात त्या अन्न, वस्त्र, निवाऱ्यातल्या विवि ध शैली. वास्तुकलेच्या सौंदर्या चा आणि अनुभवाचा परस्पर संबंध आहे. वास्तूंचे सौंदर्य हे केवळ दिसण्याशी निगडित नसून वैयक्तिक स्मृती, ऐतिहासिक घटना, नैतिक बोध, सामाजिक व आर्थिक उपयुक्तता इत्यादींवर अवलंबून असते. या सर्व घटकातील सातत्य आणि कोणत्याही सर्वमान्य सुंदर आणि कार्यक्षम वास्तूंचा व्यक्तिनिष्ठ ते वस्तुनिष्ठ रसग्रहणाचा प्रवास हा फार जटिल असतो. तो अध्यात्मिक अथवा अनावधानाने होत नसून त्यात बहुआयामी विविध शास्त्रांचा वापर करून घडवणं, हे वास्तुविशारदाचं किंवा स्थपतीचं प्रमुख कार्य असतं.


वास्तुसौंदर्य निर्मितीमध्ये कार्यक्षमतेसोबतच वास्तूच्या सौंदर्य निर्मितीमध्ये प्रतीक / रूपकांनी अलंकृत करावी लागते. रूपकांची निवड करताना याची समर्पकता महत्त्वाची असते. जसे वेरूळच्या कैलास लेण्यात मंदिराचा मूळ वापर जरी गर्भगृहात असला तरी प्राकारापासून ते नंदीमंडप व तेथून सभामंडपातून गर्भगृहापर्यंत शिवपुराणातील विविध शिल्पांचा सहभाग आपण अनुभवतो. भारतीय सर्व मंदिरांमध्ये हा अनुभव अतिशय काळजीपूर्वक हाताळला असून, कैलास लेणं हे पाषाणातून एका हळुवार अनुभूतीमध्ये रूपांतरित होताना आपण अनुभवतो हाच अनुभव अजिंठा लेण्यातील शिल्पशास्त्र, चित्रकला व वास्तुकलेच्या अद्वितीय मिलाफातून झालेला आहे. या बहुआयामी विचारातून योजनाबद्ध वास्तुकलेचं शतकानूशतक अबाधित असणारं कधीही जुनं न वाटणारं अस्तित्व विविध शास्त्रांच्या शिस्तबद्ध वापरात दडलेलं आहे. आजच्या युगात जरी आपण वास्तुशास्त्र, स्थापत्यशास्त्र, यांत्रिकीशास्त्र, हवामानशास्त्र, शिल्पकला, चित्रकला विखुरलेल्या अवस्थेत अमलात आणत असलो, तरी प्राचीन मंदिरनिर्माण कार्या त या सर्व एकत्रित कार्यान्वित होत्या, Multidisciplinary होत्या. केवळ मूर्त स्वरूपातील शास्त्रच नव्हे तर याला आधार होता तो भक्कम अध्यात्म आणि मानसशास्त्राचा. विविध धार्मिक विचारधारेनुसार धार्मिक वास्तूंचे स्वरूपही वेगळे असते, हे आपण जाणतोच.


गिरीजाघरे, मशिदी, गुरुद्वारा आणि मंदिरे आपल्या आसपास समाजात वावरतात आपण अनुभवत असतो. धार्मिक वास्तू काळाच्या ओघात धर्मग्रंथाएवढ्याच प्रेरणादायी अथवा श्रद्धेचे स्त्रोत असतात. याला कारणीभूत असते ती दीर्घकाळापासून चालत आलेली परंपरा, श्रद्धा आणि त्याला प्रतिसाद देणाऱ्या वस्तूंची विशिष्ट रचना. जसे मंदिराच्या उत्क्रांतीमध्ये पंचतत्व, पंचेंद्रिय जागृत करण्याची क्षमता आहे. किंबहुना त्यांची रचना करतानाच पाचही ज्ञानेंद्रियांचा विचार केला जातो. भारतीय परंपरेनुसार मानवी जीवन तीर्थयात्रा आहे. जन्मापासून सुरू झालेली यात्रा मृत्यूपर्यंत विविध क्षेत्र, ठिकाणांहून जात संपूर्ण होते. एवढेच काय, तर मृत्यू सुद्धा याच यात्रेचे एक तीर्थस्थळ आहे. याचा शेवट नाही. शेवट हा मोक्षप्राप्ती आहे, अशी धारणा आणि विश्वास आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर या प्रवासातुन मुक्ती मिळते. या तीर्थयात्रेच्या वाटेवर असंख्य तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. तीर्थ याचा अर्थ समुद्र अथवा नदीकाठी असणारे धार्मिक स्थळ. पाण्याचे सानिध्य महत्वाचे आहे. कारण जल किंवा उदक हे पवित्र असून तीर्थयात्र्याला अंतर्बाह्य शुद्धीकरणात आवश्यक आहे. पाण्याच्या सानिध्यात साक्षात देवाचा वास असतो, असा विश्वास भारतीय परंपरा मानते. तीर्थस्थळांची रचना मूळतः वास्तुपुरुष मंडळावर आधारित असते. वास्तुपुरुष मंडळ चौरस आकाराचे असून त्यात समाविष्ट असलेली गोलाकार रचना पृथ्वीचे प्रतीक आहे. तरीही वास्तुपुरुष मंडळ हा मंदिराच्या निर्मितीचा आधार आहे, पण प्रत्यक्ष आराखडा नव्हे. मंदिरांचा अथवा वास्तूचा उपयोगकर्ता यजमान आहे आणि त्याने नियुक्त केलेला वास्तुकलेतील तज्ञ वास्तुविशारद. वास्तुविशारद आणि धर्मशास्त्र पारंगत धर्मोपदेशकासोबत वास्तू अस्तित्वात येते. तीर्थयात्रेतील विविध धार्मिक स्थळांवर मंदिरांमध्ये अधिष्ठित मूर्तीचे दर्शन घेणे, ही प्रक्रिया महत्त्वाची असते आणि यानुसारच सर्व मंदिरांची रचना केली आहे. प्राकारापासून ते गर्भगृहात सर्व रचना दर्शन साध्य करण्याच्या दृष्टीने रचलेले नियोजित केलेले असतात.


मालवा राजवटीतील धार प्रदेशाचे राजा भोज द्वितीय यांच्या समरांगण सूत्रधाराच्या व्याख्यानुसार वास्तुविशारदाला केवळ वास्तू निर्मितीचे इत्तंभूत ज्ञानच पुरेसे नसून तो खगोलशास्त्र, अध्यात्म, छंद, यमक, संगीत, गणित, विविध कला, विज्ञानासोबत साहित्य व चित्रकलेत उत्कृष्ट प्राविण्य मिळवलेला असणे गरजेचे आहे. पुढे जाऊन राजा भोज असेही म्हणतो की, जो वास्तुविशारद वास्तुशास्त्राच्या ज्ञानाविना सराव अथवा सेवा देतो, तो राजद्रोह मानला जावा व मृत्यूदंडास पात्र आहे. तसेच अर्धवट ज्ञानाच्या आधारावर सेवा देणारा वास्तुशास्त्रज्ञ हा भरकटलेल्या अथवा कोणाच्याही सांगण्याहून दिशाहीन झालेला असतो. वराहमिहिर लिखित बृहतसंहितेनुसार वास्तुशास्त्र हे प्रयुक्त अथवा उपयोजित ज्योतिष शास्त्र असून याचा वापर खगोलशास्त्र करतात. वास्तुशास्त्र साक्षात ब्रम्हाने ध्वनिक्षेपित केलेले अथवा प्रसारित केलेले शास्त्र आहे. भारतीय वैदिक परंपरेनुसार पंचमहाभूतांतील पृथ्वी अति महत्त्वाची असून वास्तुकलेच्या क्षेत्रातील अभिव्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नश्वर आणि चिरंतन / अमर्त्य पृथ्वीमध्ये वास करतात. प्राचीन वास्तुतज्ञांनुसार भूमी, प्रासाद (मंदिर / राजवाडा), यान (वाहन), सयान हे प्रमुख घटक आहेत. या अपार प्रकृतीत केंद्रस्थानी ब्रह्मस्वरूपी विश्वव्यापी वास्तुपुरुष विराजमान आहे. या आधी नमूद केल्यानुसार वास्तुपुरुष मंडळ अथवा त्यातून निर्माण झालेली नगरे अर्थात राजवाडे असोत वा मंदिरे, यांचे मूळ यज्ञवेदी असून, यज्ञवेदीच या साक्षात पृथ्वीचे प्रतीक होत.


अगदी वैदिक काळापासून मागोवा घेतल्यास असे दिसते की वैदिक विधी या निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाची आराधना करण्यासाठीच केल्या गेल्या. त्यासोबतच इष्ट दैवतांना प्रसन्न करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा विधी करण्याची प्रथा होतीच. यासाठी यज्ञांचे विशेष महत्त्व होतेच. ज्यात अग्नीच्या माध्यमातून आराधना केली जायची. या यज्ञांसाठी आवश्यक यज्ञवेदी तात्पुरत्या स्वरूपाच्या व कालांतराने कायमस्वरूपी निर्माण झाल्या. या यज्ञवेदी निर्माण करताना विशिष्ट भौमितिक आकार व गणिताचा आधार होता. कालांतराने अशा वापरांकरता विशिष्ट भौगोलिक जागा (सोयीची) निसर्गाची जोड (नदी, वृक्ष यांचं सानिध्य असणाऱ्या ) निश्चित होत गेल्या. वारंवार होणाऱ्या वापरामुळे या संपूर्ण परिसराचा समूह वृक्ष , नदी, यज्ञवेदी तसेच हवामानापासून संरक्षण इत्यादींपासून वास्तू, गृह, लेण्यांचा समावेश यात झाला.

अशीच सर्वप्रथम निर्माण झाली ती ऋषी लोमस यांची गुहा (इ. स. पूर्व ३ रे ते इ. स. ५ वे शतक). त्यानंतर बाराबर येथे धार्मिक विधी आणि लेण्या हे समीकरण प्रस्थापित झाले. हा काळ तसा गुप्त राजवटीचा सुवर्णकाळ होता. गुप्तकालीन शहरांमध्ये आर्थिक, वैचारिक, धार्मिक आणि राजकीय स्थैर्या मुळे कला, शिल्प, व्यापारासोबतच वास्तुकला ही खूप प्रगतीपथावर होती. नवनवीन प्रयोग, बांधकामाच्या शैली निर्माण झाल्या. यात प्रामुख्याने अतिप्रगत दगडकाम आणि लाकडी कामाचा समावेश होता. या उपलब्ध वास्तुकलेचा प्रभाव अर्थातच धार्मिक स्थळात केला गेला हे स्वाभाविकच होते. बाराबर ते लोमस ऋषींच्या लेण्यांपासून, या एका अर्थाने अति प्रभावी पण मूलभूत स्वरूपाच्या होत्या. यांची प्रेरणा घेऊन लेण्यांचा तसेच यज्ञवेदींसाठी कायमस्वरूपी वास्तू निर्माण होऊ लागल्या. काळाच्या ओघात ही बांधकाम शैली शास्त्रीय रूप धारण करत त्याचे रूपांतर आपण शिल्प दीपिका, राजवल्लभ, शिल्प संहिता यात झाल्याचे आपण पाहतो. शास्त्रशुद्ध वास्तु तसेच प्रामुख्याने नगरे व मंदिरे व प्रासादांचे काम या संहितेनुसार झाले. अगदी हिंदूकुश संस्कृती पासून व वैदिक काळापासून निसर्गातील मूलतत्त्वांच्या आराधनेतून उत्पन्न झालेल्या यज्ञवेदी असोत वा लेण्या असोत वा अगदी अलीकडचे अजिंठा अथवा वेरूळ अथवा हडप्पाकाल किंवा कांचीपुरमचे कैलास असो. या सर्वच ‘मंदिरनिर्माण कार्य’ अतिपरिपक्व झालेले दिसते. निसर्ग, शास्त्र, कला, धर्म, अध्यात्म यांचा अचूक संगम झालेला दिसतो. याचे कारण ही भवन निर्माण कार्य शिल्प संस्थेनुसार कृषिशास्त्र, खनिजशास्त्र, जलशास्त्र, नौकाशास्त्र, रथशास्त्र, विमानशास्त्र, वास्तुशास्त्र, प्राकारशास्त्र, नगर रचना आणि यंत्रशास्त्र या सर्वांनी समावेशून झालेलं होतं. मनुष्यास लागणाऱ्या सुख सोयी संपादन करण्याबद्दल माहिती देणारी संहिता म्हणजे शिल्प संहिता. या सर्वांचा मार्गदर्शक स्थपती किंवा स्थपनज्ञ सर्व विद्या पारंगत, शिल्पकाम जाणणारा, गणिताचे ज्ञान अवगत असणारा, खरं बोलणारा, इंद्रिय ताब्यात ठेवणारा, निर्व्यसनी, चुक न करणारा असावा असे सांगितले आहे. समरांगणसूत्रधार व मानसाराच्या वास्तुसंहितेनुसार स्थपती हा विविध कलांनी पारंगत असणे आवश्यक आहे. यात समाविष्ट होणाऱ्या कला अशा कांस्यकार, कुंभकार, माळकार, स्वर्णकार, चर्मकार, कंठकार, ताम्रकार आणि कुविंदक. मंदिरे, नगरे आणि प्रासाद निर्माण कार्य इ. स. पू. ३ रे शतक ते १२ व्या शतकाच्या कालावधीमध्ये सर्वसमावेशक, अचूक, गुंतागुंतीचे, कलात्मक तसचे समाजाला प्रेरणा देणारे असे रूपांतरित झाले.


नगर विकासामध्ये जलशास्त्राचा सहभाग व वाटा फारच मोलाचा आहे जलशास्त्र आणि मंदिराचा फार महत्त्वाचा संबंध आहे. मंदिरे कालाच्या आधारानुसार केवळ मंदिरेच न राहता त्यांचे स्वरूप फारच व्यापक झाल्याचे आपण पाहतो. अगदी यज्ञवेदी सारख्या मूलभूत भौमितिक आकारातून निर्माण झालेली ही प्रक्रिया लेणी, लेण्यांचा समूह, एक मंदिर, मंदिरांचा समूह तसेच याच सोबत चालणाऱ्या नगर विकास नगररचनेतही सहभागी झाल्या आपल्या देशाचे भूषण असणारी तसेच निरनिराळ्या भौगोलिक आणि हवामानाला प्रतिसाद देणारी नगरे म्हणजे मदुराई, विजयनगर, उज्जैन, अंगकोर, पुरी कांचीपुरम रामेश्वर ही होत ही शहरे इतकी प्रगत होती की या सर्व शहरात मंदिरे आणि नगर यांचा एकत्रित संकल्पना करण्यात आलेली आपण पाहतो. अशा प्रकारची गुंतागुंतीची व कठीण नगर रचना करण्यासाठी वर नमूद केलेल्या शास्त्रांच्या यादीत वास्तुशास्त्राची आवश्यकता असते. वास्तुपुरुषमंडळ हे मानवी शरीराला मूलप्रमाण मानून प्रामुख्याने ९ × ९ चौरस भौमितिक आकारात व्यक्त झालेलं यंत्र म्हणता येईल. यंत्र याचा अर्थ पृथ्वी, ब्रम्हांड, विवि ध देशांचा प्रभाव, मानवाचे सौख्य आणि अध्यात्मिक प्रगती तसेच योजनाबद्ध नगर तसेच मंदिर व प्रासाद निर्मिती असा होतो. या वास्तूरचनेला वास्तुशास्त्रात “वास्तुपुरुष मंडल” असे संबोधले आहे. (आकृती बघावी).

या शास्त्रानुसार मानवी हाताच्या व त्या प्रमाणात निर्माण झालेली मोजमाप पद्धती जसे, कायम मोजण्यात येणारी लांबी ही हाताच्या अंगुलीच्या वापरावर होती. त्यात संपूर्ण हाताचे म्हणजेच एका पेरापासून बोटापर्यंत, बोटापासून संपूर्ण हात, असे माप किंवा परिमाण वापरले गेले होते. अर्थातच कालानुसार यातही जास्तीत जास्त प्रमाणबद्धता येत गेली.

  • देश व पृथ्वी मोजण्यासाठी योजन.

  • गाव अथवा नगरांसाठी दंड.

  • शेत बागेसाठी रज्जू.

  • घरांसाठी हात.

  • वस्त्रपात्रांसाठी वीत.

  • यज्ञाचे सामान मोजायला मुठ.

  • बारीक जिनसा मोजायला अंगुल.

  • अतिसूक्ष्म जिनसा मोजण्यासाठी यव, केस, बिंब किंवा

  • व्यास मोजण्यासाठी ताल अशी त्या त्या जातीची व गुणांची मापे वापरली गेली.


जसे क्षेत्र मोजण्यासाठी उदाहरणार्थ, आसन मोजण्यासाठी एक हात लांब व एक हात रुंद अशी योजना होती. याचप्रमाणे घनमाप मोजणीसाठी म्हणजेच ज्याला लांबी, रुंदी व उंची आहे, यासाठी अगदी दोन बोटांची चिमटी या मात्रेपासून ते चार चमचा म्हणजे एक पंचगुळ, चार पंचगुळ म्हणजे एक मूठ, चार मुठी म्हणजे एक पसा, चार पसा म्हणजे एक प्रस्थ, ते द्रोण, कुंभ इत्यादी मोजमापाच्या परिमाणांचा वापर केला होता. याचप्रमाणे मानसार शास्त्रानुसार वास्तुवि शारद किंवा स्थपतीची गुणवत्ता कशी असावी? बांधकामासाठी जागेची योग्यता मृदेची गुणवत्ता यावर सखोल वर्णन केले असून इमारतींचे विविध प्रकार जसे भव्य प्रासाद, किल्ले बांधणी, शहर रचना यावर मार्गदर्शन केले असून याचे जिवंत उदाहरण म्हणजे विद्या धराने निर्माण केलेले विद्याधर नगर ज्याला आपण जयपूर या नावाने ओळखतो. इमारतीचे विविध मोजमाप, पाया बांधणी, खांब बांधकामाचे विविध प्रकार, लाकूड काम यावर सखोल वर्णन केलेले आहे. एवढेच नव्हे तर एक मजली इमारतींचे नियम, दोन मजली इमारती, तसेच बारा मजली इमारतींपर्यंत कोणती परिमाण व दक्षता घ्यावी हे पण नमूद केलेले आहे. याच सोबत इमारतींचे विविध घटक जसे दरवाजे, खिडक्या, दरवाजे व जोत्यावर अथवा इमारतीचा बाह्य व अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या तोराणातील विविध मुर्त्यांबद्दल खुलासेवार मार्गदर्शन केले आहे.


आता एक नजर मंदिरांच्या कालातीत अस्तित्वास कारणीभूत ठरणाऱ्या ‘यंत्र’ अथवा ‘वास्तुपुरुष मंडला’कडे टाकूयात. मंदिरांच्या अथवा नगरांच्या अथवा प्रासादांच्या आराखड्यांचा कणा वास्तुपुरुष मंडळ आहेत, असं म्हणता येईल. याच्या मार्गदर्शनाने दिशा, हवामानाचा वास्तूवर होणारा परिणाम, तसेच सूर्यप्रकाश व शुद्ध हवेचा जास्तीत जास्त फायदा होतो. वास्तुपुरुष मंडलाचा वापर जरी केवळ आराखड्यावर होत असला, तरी त्याचा खरा प्रभाव वास्तू निर्माण झाल्यावर उपयुक्त झाल्याचे आपण अनुभवतो. मुळात या यंत्राची निर्मिती, याचा वापर आणि त्याची प्रचिती ही संपूर्ण शास्त्रशुद्ध, खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र तसेच हवामान शास्त्रावर अवलंबून आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही समजूती अथवा गैरसमजुतींशी यांचा संबंध जोडणे चुकीचे ठरेल. उष्णकटिबंधातील वास्तु त्या कोणत्याही असोत, निर्माण करताना दक्षिणायन व उत्तरायणात वास्तू कशी प्रतिसाद देऊ शकेल, याचे सखोल अध्ययन व अभ्यासाअंती निर्माण झालेला संक्षिप्त शास्त्रशुद्ध सारांश अथवा नियमावली असं वास्तुशास्त्राकडे पाहणे आवश्यक आहे.


जरी आजकाल आपण वास्तुशास्त्राचा होणारा विपर्यास अनुभवत असलो, तरी एक बाब अतिशय महत्त्वाची अशी की, वास्तुशास्त्राची व्याप्ती ही केवळ दिशादर्शनाची नसून, त्यात वास्तू निर्मितीमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्वच सूक्ष्म ते दीर्घ अथवा व्यापक घटकांचा बारकाईने विचार केलेला आहे. खऱ्या अर्थाने प्रमाणबद्ध (Apparently Symmetric) सातत्यपूर्ण आकृती असली तरी, त्याच्या गर्भात परिपक्व झालेले वैदिक विचार पद्धती, पुराण, दंतकथा, दूरदृष्टी, नैतिकता व गणिताचे तत्त्वज्ञान दडलेले आहे. कदाचित याच मूलभूत काही अंशी अदृश्य असणाऱ्या किंवा वाटणाऱ्या रचनेमुळे आपल्याला ऐतिहासिक वास्तू, मंदिर आजतागायत शतकानुशतक चैतन्यपूर्ण व प्रेरणादायी असाव्यात. चार प्रमुख दिशांच्या आधारावर उभं केलेलं हे यंत्र विविध प्रकारच्या मंदिरांचे आराखडे निर्माण करण्यास कारणीभूत आहे. याचा मूळ आकार जरी चौरस असला तरी त्याचा वापर करताना मिळणारी मुभा तसेच विविध मांडणी करण्याच्या शक्यता अनंत आहेत. त्यामुळेच कोणार्क असो वा महाबलीपुरम असो वा अनवा असो की, मोढेरा असो, निरनिराळ्या प्रदेशात बांधलेल्या वैविध्य पूर्ण तसेच बंधनमुक्त आर्त शक्ति विश्वाने अनुभवली आहे. भारतीय वास्तुकला ही केवळ आदीभौतिक अथवा जडवादी सौंदर्य संपन्न नसून त्यात गंभीर स्वरूपाचे अध्यात्म आणि तत्त्वज्ञान दडलेले आहे. त्यामुळेच या वास्तू विशेष करून भारतीय किंवा हिंदू मंदिर भक्तांशी संवाद साधतात.



मानसशास्त्राचा विचार केल्यास मंदिराचे सानिध्य, मंदिरांचा परिसर, मंदिराच्या प्रकाराच्या अंतर्गत असो, अथवा गर्भगृह, क्रमाक्रमाने येणारा अनुभव व संवेदना भक्ताच्या पंचेंद्रियांना स्पर्श करतात. किंबहुना उत्तेजित करतात. जसे घंटानाद: ध्वनी, मंदिर परिसरातील सुगंध: वास, मंदिर प्रवेश: स्पर्श, तीर्थ-प्रसाद: चव, मंदिर निर्मिती व पुराणातील उपदेश: दृष्टी. याचा अनुभव आपण सगळे घेत असतो. यापुढे जाऊन, शिव मंदिरातील गर्भगृहात सहावी चेतना: संवेदना, ही मानवी मनाला आध्यात्मिक आनंद देणारी असते. या मंदिराच्या विज्ञानाची व्याप्ती जरी गुंतागुंतीची असली, तरी ती वापर करताना सहज, सुलभ व उत्साहवर्धक, आनंददायी असते हे खरे. या अनुभूतींचा अभाव आजच्या काळातील वास्तूंमध्ये लोप पावला आहे का?


वास्तुपुरुषमंडळाच्या आकृतीमध्ये चौरस आणि त्याच्या आत त्याची ९ x ९ अशी छोट्या चौरसांची विभागणी व वर्तुळ चारही भुजांना स्पर्श करताना दिसते. यातील वर्तुळ सूर्य, चंद्र, विश्ववृत्त व पाण्याचं प्रतीक आहे. तर चौरस ही एक दैवी प्रतिमा असून, त्याद्वारे ज्ञानाचे निखालस तसेच निष्णात स्वरूप दर्शविले आहे. दोन्ही आकार परस्परांना पूरक असून याचा उदगम आधी नमूद केलेल्या यज्ञवेदीपर्यंत जाऊन पोहोचतो. मंदिरांची रचना १, ४, ९, १६, २५, ३६, ४९, ६४ व ८१ ते १०२४ चौरसांपर्यंत व्यापली आहे. अगदी सुरुवातीला मंदिराचा आकार हा ९, ४९, ६४ चौरसांवर आधारित होता. या संरचनेतील प्रत्येक स्थानाला अथवा पदाला अथवा चौरसाला विशिष्ट कार्य अथवा महत्त्व निश्चित केलेले आहे. जसे सर्वात बाहेरचा भाग असूर, त्यानंतर मानव व सर्वात आतला देवाचे स्थान दर्शविणारा आहे. या वर्तुळ व चौरस आकृतीच्या केंद्रस्थानी कर्ण रेषेवर विराजमान वास्तुपुरुष दर्शवला आहे. यात शुद्ध चैतन्य, विश्वव्यापी परमात्मा असे प्रतीक आहे आणि यांचे मंदिरातील स्थान गर्भगृहात आहे. याच मंडलाच्या वरचा भाग शिखर असून, यालाच दक्षिण भारतात विमान असे संबोधले आहे.


मानवी शरीराच्या विविध अंगांची तुलना मंदिराच्या विशिष्ट घटकांसोबत जोडली आहे. शिखरांची रचना करताना वरच्या दिशेने निमुळता होत जाणारा आकार हा अतिशय योजनाबद्ध, अचूक, गणिताच्या सूत्रांवर आधारित असतो. या चौरस आकारावर विराजमान गर्भगृहाचे रूपांतर हळूहळू शिखरा मार्फत एका बिंदूंमध्येहोते, अर्थात विश्वव्यापी परब्रम्ह. हे शिखर निर्माण करण्यात फ्रॅक्टल भूमितीचा आधार असून, शिखर निर्मितीमध्ये वापरले गेलेले आकार जटिल असून, याला “अपूर्ण मितीय आकार” असं संबोधलं जातं. यात छोट्या-छोटा व सर्वात मोठा वापरला गेलेला आकार समान असतो. आतापर्यंतच्या माहिती व स्पष्टीकरणावरून एक बाब आपल्या लक्षात येईल ती अशी की, मंदिर निर्माण करण्यात अगदी पंचमहाभूतांपासून, निसर्गाचा प्रतिसाद, वेद, पुराण, जटील गणित, भूमिती विविध शास्त्रांचा आधार आहे. त्याच सोबत ही संपूर्ण प्रक्रियाच निर्मिती असो वा साक्षात वापराची, व खूप प्रतिकात्मक, अध्यात्मिक, वैज्ञानिक व कलात्मक आहे.


या योजनाबद्ध भवन निर्माण ची प्रक्रिया दुर्दैवाने आधुनिक वास्तुशास्त्र असो, वा स्थापत्यशास्त्र असो, त्यापासून दूर होत जाताना दिसते. वास्तूरचना व नगररचना या त्या काळातल्या वैचारिक अध्यात्मिक प्रगतिशील तसेच संस्कृतीच्या दर्जाचे द्योतक असतात, हे विश्वभर विविध संस्कृती तसेच वास्तुकलेतून प्रस्थापित झालेले आहे. वास्तुकला ही सर्व कलांची जननी आहे, असे गोएथे नावाच्या इटालि यन कलाकाराने सांगितले, हे तंतोतंत खरे आहे. मानवी संस्कार, आचार, विचार, वैचारिक व सांस्कृ तिक दर्जा वास्तुकलेतून आरशासारखा सुस्पष्ट दिसत असतो. मंदिर निर्मिती वास्तुविशारद, शिल्पकार व वर्धकी किंवा कारागिरांमार्फत वास्तवात आला. सुरुवातीला ही देवाण-घेवाण बोली भाषेतूनच झाली. कालांतराने याचे रूपांतर लिखित स्वरूपात झाले. अशा प्रकारची केळीच्या पानावर लिहिलेली हस्तलिखितं उपलब्ध आहेत. इतर व्यवसायांप्रमाणेच वास्तुकला सुद्धा कुटुंबांपर्यंत मर्यादित होती व पिढ्यानपिढ्या पुढे चालत गेली. मंदिराच्या इतिहासात मागे व मागे वळून पाहताना असे निदर्शनास येते की, जरी ही प्रक्रिया प्रदीर्घ काळ अर्थात इसवी सन पूर्व ३ ऱ्या शतकापासून सुरू झालेली असली, तरी शिल्पकार स्थपती, सूत्रधारांना ४ थ्या शतकापासून ते जवळपास १३ व्या शतकाच्या कालावधीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबतच बदलत्या व गतिमान राजवटींमुळे जास्तीत जास्त संधी मिळाल्या होत्या. या काळात इतिहासातील वाखाणण्यासारख्या असंख्य वास्तू, नगर व मंदिरे आजतागायत दिमाखात उभे आहेत.


बृहत संहितेनुसार हिंदू मंदिरांचे पाच प्रमुख प्रकार आहेत: नगर, द्रविड, वेसर, लंबगोल आणि आयताकृती. या सर्वच प्रकारात मंदिरांचे आराखडे चौरस, अष्टकोनी आणि अर्धवर्तुळाकार आहेत. प्रत्येक मंदिरांची स्वतःची एक परिभाषा अथवा ओळख आहे. सातव्या व आठव्या शतकापर्यंत निर्माण केलेली मंदिरे ही शास्त्रशुद्ध आहेत. त्यानंतर जवळपास पाच शतकांपर्यंतचा काळ मध्ययुगीन काळ मानला जातो. असे असले तरी, या दोन्हीही (अभिजात युग) मधला फरक फार ठळक दिसून येत नाही. आपल्या प्राचीन मंदिरांच्या अस्तित्वाचा गाभा धर्मशास्त्र व अध्यात्म सोबतच, निरनिराळ्या ठिकाणी असणारी नैसर्गिक बांधकाम सामग्री व कुशल कारागिरांमुळे विविधतेने अलंकृत आहे. दाक्षिणात्य मंदिरांच्या शैलीला प्रामुख्याने ‘द्रविड’ शैली असं ओळखलं जातं. याची सर्वात परिपक्व अवस्था पंधराव्या शतकापर्यंत समृद्ध होत गेली. दाक्षिणात्य मंदिरांमध्ये प्रभावी व उंच प्रवेशद्वाराचा वापर केला जातो, ज्याला गोपूर असं ओळखलं जातं व मुख्य गर्भगृहावर “विमान”चा वापर होतो.

या उलट उत्तर भारतीय शैलीत मुख्य गर्भगृह जास्त उंच, नक्षीदार तसेच भव्य व उंच असतात. उत्तर भारतीय शैली ‘नगर’ शैली अशी संबोधली जाते तर दक्षिणात्य मंदिरांना ‘द्रविड’ शैली असे म्हणतात. याच सोबत पट्टडक्कल व वेरूळ शैली ही चालुक्य शैली असून त्यांची स्वतःचीच एक अति प्रभावशाली ओळख आहे. ही मंदिरे सहाव्या ते नवव्या शतकात निर्माण झालेली आहेत. सर्वसाधारणपणे ऐतिहासिक वास्तू कोणत्याही धर्म, पंथ, जगातील कोणत्याही ठिकाणी असोत, भूतकाळाशी स्वाभाविकपणे जोडल्या जातात. ऐतिहासिक वास्तू काळाच्या ओघात कमजोर अथवा जीर्ण झाल्या तरी आकर्षक वाटतात, तसेच सुनियोजित वाटतात व असतातही. सर्वच जुन्या वास्तू लोकप्रिय होत नाहीत, पण सर्वमान्य व लोकप्रिय अथवा सुप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंची रचना, बांधकाम शैली, वास्तुशैली, वास्तु निर्माण झाली त्या काळातील ठळक वैशिष्ट्ये या कारणांमुळे त्या जनमानसात वाखाणण्याजोग्या होतात. याचं प्रमुख कारण त्यांची बांधकाम शैली, याउलट आजच्या काळात इमारतींच आयुष्य कमी झालेलं आपण पाहतो. अगदी ऐतिहासिक वास्तूंच्या तुलनेत, अगदी कमी कालावधी असणाऱ्या इमारती पाडून नव्या उभ्या होताना आपण वारंवार अनुभवतो आहोत. कोणत्याही वास्तूला वारसा मूल्य प्राप्त होण्यासाठी वास्तूंच्या सौंदर्या सोबतच ऐतिहासिक, सामाजिक, वैज्ञानिक, अध्यात्मिक मूल्य असणे गरजेचे असते. या सर्व विशेष गुणांचं जतन होण्यासाठी किंबहुना त्या कायमस्वरूपी अति दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी या सर्व वास्तूंची बांधणी विशेष असते. यात काळाच्या ओघात म्हणजेच ऊन, वारा, पाऊस अथवा नैसर्गिक आपत्तींच्या आघातांचा परिणाम पचवण्याची क्षमता या प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंमध्ये सर्वसाधारणपणे असावीच लागते. या बांधकामांमध्ये आधुनिक बांधकामाच्या तुलनेमुळे मुळातच कुजणारे अथवा क्षय होणारे बांधकाम घटक फारच कमी आहेत. जसे आधुनिक बांधकामात लोखंड, सांध्यात वापरले जाणारे साहित्य तसचे भिंतींची जाडी या कारणाने इमारती सहा ते सात दशकाहून जास्त टिकत नाहीत.

या उलट सांधे विरहित बांधकाम, नैसर्गिक साहित्याचा वापर, कोणतीही कृत्रिम प्रक्रिया विना वापरले जाणारे साहित्य यामुळे मंदिरे शतकानुशतके टिकतात. लेण्यांचा विचार केल्यास त्यात क्षय होणारा घटकच नसल्याने लेण्यांचं अस्तित्व अगदी २२ शतकांपासून टिकून असल्याचं आपण पाहतो. याचाच आधार किंबहुना प्रेरणा घेऊन मंदिर बांधणीमध्ये केवळ काळ्या पाषाणाला छोट्या आकारात घडवून दगडावर दगड रचून, कोणत्याही सांध्याविना बांधकाम केल्याने मंदिरे ही कित्येक शतकं टिकून आहेत. या बांधकाम शैलीची प्रथा सर्वप्रथम हेमाद्री पंडिताने सुरू केली व ही हेमाडपंती मंदिरे सुप्रसिद्ध नव्हे, तर काळाच्या ओघात सर्व आघातांवर मात करून दिमाखात उभी आहेत. इमारतींची मानवी शरीरानुसार काळजी घ्यावी लागते, त्यांची निगा राखावी लागते. जरी या हेमाडपंती मंदिरांची अथवा भव्य किल्ले अथवा प्रासादांची मूळ बांधणीच अति उत्कृष्ट असली, तरीही त्यांची नियमि त निगा राखावी लागते व त्यांचं वैभव टिकून ठेवण्यासाठी संवर्धन हे करावेच लागते. ऐतिहासिक वास्तू संवर्धनाविना राहिल्यास त्यांची दुरवस्था होणे स्वाभाविक आहे. वारसा संवर्धन करण्यासोबतच दीर्घकाळ टिकून राहण्याच्या चालीरीती, बांधकाम शैली त्याचसोबत या ऐतिहासिक इमारतींमधून नवीन पिढीला मिळणारा उपदेश, प्रेरणा व आत्मविश्वासही जतन होतो. यामुळेच ऐतिहासिक वारसा जतन करणे हे केवळ भूतकाळाशी संबंधित क्रिया नसून त्याचा वर्तमान व भविष्य काळाशी जास्त संबंध आहे, असे मला वाटते.


डोंगरातून कोरलेल्या लेण्या माझ्या मते नैसर्गिक अवस्थेतील डोंगरांचेच बदललेले रूप आहे. त्यामुळे त्या निसर्गाच्या अधिकारात सुरक्षित आहेत. वेरूळ येथील सर्वच लेण्या प्रामुख्याने लेणी क्र. २१: रामेश्वर, लेणी क्र. ३३: इंद्रसभा, लेणी क्र. २९: धुमर लेणे आणि अर्थातच कैलास म्हणजे क्र. १६, ही विविध राजाश्रयात कोरल्या गेल्या आहेत. त्यामुळे लक्षात घेण्यासारखी बाब अशी की कलाविष्काराची व्याप्ती व स्वातंत्र्य भारतीय शिल्पशास्त्रात कुठेही अबाधित अथवा प्रतिबंधित होत नाही. याच सोबत वेरूळ आणि परिसरात घृष्णेश्वर मंदिर, अष्टविनायक मंदिर तसचे होळकर कुंड ही उदाहरणे स्थानिक दगडातून हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहेत. यात जीर्ण होणारा कोणताही घटक नसल्याने माझ्या मते ही सर्व मंदिरे व घाट निसर्गाचाच अनुवाद आहे असे भासते. केवळ या काळानुरूप व गरजांनुसार प्रगत तंत्रज्ञानाने निर्माण केल्या आहेत.


आधुनिक जगात वास्तुकला व स्थापत्यकला व्यवस्थापन प्रगत, अतिप्रगत, कार्यक्षम झाले असले, तरी आपली मंदिरे व प्राचीन दृष्टिकोनाचा बोध घेणे आवश्यक आहे. कुशल व्यवस्थापनासोबत आपल्या समृद्ध वर्षातील सर्वसमावेशक अर्थपूर्ण परस्पर संवाद प्रस्थापित करण्याच्या वास्तूंपासून आपण फार दूर आलो आहोत. या विषयाचा केवळ पुनर्विचारच नव्हे तर, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून काळाने सिद्ध व स्थापित केलेली कालातीत मूल्य, नवीन जीवनशैली व निकषांना साजेशा कशा करता येतील याकडे तातडीने वाटचाल केली पाहिजे, अन्यथा ज्याप्रमाणे माणसाचे प्रत्यक्ष साक्षात्कारी जीवन नकळत आभासी झाले आहे, त्याप्रमाणे माणसाचा वास्तुंशी होणारा संवादही संपुष्टात येईल.


(लेखक श्री. अजय कुलकर्णी हे छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या ३५ वर्षांपासून वास्तुविशारद म्हणून कार्यरत आहेत. तसेच “वारसा स्थळे व ऐतिहासिक इमारतींचे संवर्धन” ह्या विष यामध्ये त्यांना मोठा अनुभव आहे व त्यांचे विशेष योगदान आहे.)

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page