top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

मंदिर: ऊर्जा,वास्तू आणि विज्ञान - दगडात साकारलेली ज्ञानपरंपरा

  • Apr 14
  • 5 min read

डॉ. उज्ज्वला खोत


भारतीय मंदिर बांधकामात विज्ञान आणि खगोलशास्त्र यांचा अद्भुत संगम दिसून येतो. प्राचीन काळातील वास्तुकारांनी मंदिरांची रचना करताना सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांच्या हालचालींचा सूक्ष्म अभ्यास केला होता. अनेक मंदिरांची दिशा अशी ठरवली जाते की विशिष्ट दिवसांमध्ये, जसे संक्रांती, सूर्यकिरणे थेट गर्भगृहातील मूर्तीवर पडतात. उदाहरणार्थ, कोणार्क सूर्यमंदिर हे सूर्याच्या गतीनुसार उभारलेले असून त्याची रचना एक भव्य रथासारखी आहे. तसेच, मंदिरातील शिखरे, मंडप आणि स्तंभ यांचे प्रमाण व मांडणी ही गणित आणि भौतिकशास्त्राच्या तत्त्वांवर आधारित असते, ज्यामुळे ध्वनी प्रतिध्वनी आणि प्रकाश व्यवस्थापन प्रभावी होते. त्यामुळे मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून प्राचीन विज्ञान, गणित आणि खगोलशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे. यावर प्रकाश टाकणारी ही नवीन लेखमाला...


मंदिरात प्रवेश करणे म्हणजे केवळ एका इमारतीत जाणे नाही- तो एक अनुभव असतो. बाहेरचा गोंगाट हळूहळू मागे पडतो आणि आपण एका वेगळ्याच शांत लयीत प्रवेश करतो. प्रकाश कमी होत जातो, आवाज विरळ होतो, आणि आपल्या पावलांचा वेग आपोआप मंदावतो. काही क्षणांनी आपण गर्भगृहासमोर उभे राहतो. डोळे बंद करताच मन शांत होते, एकाग्र होते. ही फक्त जागा बदलल्यामुळे होत नाही, ही आपल्या मनाच्या अवस्थेत होणारी एक सूक्ष्म बदलाची सुरुवात असते. हा अनुभव आपण सगळ्यांनी कधी ना कधी घेतलेलाच असतो. पण हा फक्त श्रद्धेचा परिणाम आहे का?...की हा एक विचारपूर्वक रचलेला, शतकानुशतकांच्या अनुभवातून तयार झालेला मानवी अनुभव आहे? याच प्रश्नातून मंदिरांकडे पाहण्याची एक नवी दृष्टी तयार होते. आपण अनेकदा मंदिरांकडे फक्त धार्मिक स्थळ म्हणून पाहतो. पण या मर्यादित दृष्टीकोनामुळे मंदिराच्या अनके महत्त्वाच्या पैलूंकडे दुर्लक्ष होते. खरं तर मंदिर ही एक “ज्ञानसंरचना” आहे. जिथे वास्तुशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, ध्वनिशास्त्र, मानसशास्त्र आणि पर्यावरण यांचा एकत्रित विचार दिसतो. म्हणूनच मंदिर ही केवळ एक वास्तू नसून, दगडात घडवलेली एक विचारप्रणाली आहे. इथे काहीही योगायोगाने घडत नाही, सगळं काही विचारपूर्वक घडवलेलं असतं. प्रत्येक घटकाचा एक उद्देश असतो, प्रत्येक प्रमाणा मागे गणित असतं आणि प्रत्येक अनुभवा मागे विज्ञान दडलेलं असतं.


मंदिराचा आराखडा: विश्वाचे प्रतिरूप भारतीय मंदिररचना ही साधी योजना नसून, ती विश्वरचनेची भौतिक अभिव्यक्ती आहे. वास्तुपुरुष मंडळ ही केवळ एक चौकट नाही; ती एक ब्रह्मांडाचा नकाशा आहे. चौकोनी आराखडा- चार दिशा, चार कोपरे आणि एक केंद्र- हे स्थैर्य आणि संतुलनाचे प्रतीक आहे. या मंडळाच्या मध्यभागी असलेले ब्रह्मस्थान म्हणजेच मंदिराचे गर्भगृह. म्हणून मंदिरात प्रवेश करणे म्हणजे जणू बाहेरील परिघातून हळूहळू केंद्राकडे जाणे. हा प्रवास फक्त चालण्याचा नसतो, तो अनुभवाचा असतो. गोपुरमपासून गर्भगृहापर्यंतचा प्रवास म्हणजे बाह्य जगापासून अंतर्मनापर्यंत जाण्याचा प्रवास, अस्थिरतेपासून स्थैर्याकडे आणि विविधतेपासून एकत्वाकडे.


गर्भगृह: अंधारातील एकाग्रता

गर्भगृह लहान का असते? आणि अंधारमय का असते? हे प्रश्न सहज पडतात, पण त्यामागे खूप विचार आहे. आपला मेंदू सतत बाहेरील गोष्टींना प्रतिसाद देत असतो. प्रकाश, रंग, आवाज, हालचाल इ. मंदिरात या सर्व अनुभवांना हळूहळू नियंत्रित केले जाते. मंदिराच्या बाहेरून आत जाताना आपल्याला नकळत हा बदल जाणवतो. गर्भगृहातील अंधार, शांतता आणि मर्यादित जागा, हे सगळं मिळून मनाला स्थिर करतं. यामुळे एक अशी अवस्था तयार होते जिथे बाहेरील विचलन कमी होते आणि मन एकाग्र होतं. हीच अवस्था ध्यानासाठी सर्वात योग्य असते. म्हणूनच गर्भगृह ही केवळ धार्मिक जागा नसून, ती मानवी मन समजून तयार केलेली एक विचारपूर्वक रचना आहे.


सूर्य, दिशा आणि काल
कोणार्कचे सूर्यमंदिर
कोणार्कचे सूर्यमंदिर

भारतीय मंदिररचना ही स्थिर नसते, ती काळाशी सतत संवाद साधणारी असते. आपल्याला मंदिर एक जागी उभे दिसते, पण प्रत्यक्षात ते सूर्य, दिशा आणि वेळ यांच्याशी जोडलेले असते. बहुतेक मंदिरे पूर्वाभिमुख बांधलेली असतात. पण हा केवळ परंपरेचा भाग नाही. उगवत्या सूर्याचे किरण मंदिराच्या मुख्य अक्षावरून थेट गर्भगृहात पोहोचतील अशी अत्यंत अचूक रचना केली जाते. काही मंदिरांमध्ये वर्षातील विशिष्ट दिवसांवर उदा. संक्रांती, विषुव, सूर्यकिरण थेट देवतेवर पडतात. हे साधण्यासाठी पृथ्वीची अक्ष, सूर्याची हालचाल, ऋतूंचे बदल, आणि त्या ठिकाणाचा भूगोल या सगळ्यांचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. उदाहरणार्थ कोणार्कचे सूर्यमंदिर. हे केवळ सूर्यदेवतेला अर्पण केलेले मंदिर नाही; ते एक भव्य खगोलशास्त्रीय संकल्पना आहे, जिथे संपूर्ण रचना सूर्याच्या गतीशी जोडलेली आहे. त्यातील रथाचे चाक, त्याची दिशा, त्याचे प्रमाण हे सर्व वेळ आणि सूर्याच्या प्रवासाचे प्रतीक आहेत. दक्षिण भारतातील अनेक मंदिरांमध्येही विशिष्ट दिवसांवर सूर्यकिरण मूर्तीवर पडतात हे योगायोग नाही, तर अचूक नियोजन आहे. म्हणूनच मंदिर ही केवळ एक स्थिर इमारत नाही ते काळ, दिशा आणि प्रकाश यांच्यातील एक जिवंत संवाद आहे आणि हा संवाद आपण आजही अनुभवू शकतो- जर आपण थोडा वेळ थांबून पाहिले, तर!


उंची, प्रमाण आणि गणित
बृहदीश्वर मंदिर
बृहदीश्वर मंदिर

तंजावूरचे बृहदीश्वर मंदिर पाहताना एक प्रश्न हमखास पडतो; इतकी भव्य आणि उंच रचना हजार वर्षांपूर्वी कशी उभारली गेली असेल? याचे उत्तर केवळ श्रद्धेमध्ये नाही, तर त्या काळातील गणित, भूमिती, बांधकाम तंत्र आणि अभियांत्रिकीच्या सखोल ज्ञानात आहे.

हो, श्रद्धा ही प्रेरणा होती, पण त्या प्रेरणेला आकार देण्यासाठी अत्यंत अचूक गणिती आणि तांत्रिक विचार वापरले गेले. मंदिरातील प्रत्येक घटक हा प्रमाण बद्ध असतो. तलमान, आयाम, अंगुल, हस्त या मोजमापांच्या पद्धती केवळ तांत्रिक नाहीत; त्या सौंदर्य आणि स्थैर्य यांचा समतोल राखतात. शिखराची उंची, मंडपांची मांडणी, स्तंभांमधील अंतर हे सर्व गणिती अचूकतेने ठरवलेले असते. यामुळे मंदिर फक्त सुंदर दिसत नाही, तर शेकडो वर्षे टिकूनही राहते. यातून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, आपल्या पूर्वजांनी सौंदर्य आणि विज्ञान यांना वेगळे न मानता, एकत्रितपणे वापरले.


ध्वनी: स्पंदनांचे विज्ञान

मंदिरातील अनुभव हा केव ळ पाहण्याचा नसतो, तो ऐकण्याचाही असतो. घंटानाद, मंत्रोच्चार, शंखध्वनी, हे सर्व मिळून मंदिरात एक विशिष्ट ध्वनीविश्व तयार करतात. हे ध्वनी फक्त विधीचा भाग नसतात; ते विचारपूर्वक रचलेले असतात. सभामंडपाची रचना अशी केली जाते की ध्वनीलहरी परावर्तित होऊन एक संतुलित नाद निर्माण होतो. यामुळे मंत्र स्पष्ट ऐकू येतात आणि त्यांचा प्रभाव अधिक जाणवतो. गर्भगृहावर असलेले शिखर देखील ध्वनी वाढविण्यास मदत करते, ज्यामुळे मंत्रोच्चार अधिक गुंजतात.

काही मंदिरांमध्ये “संगीत स्तंभ” आढळतात ज्यांना हलकेच स्पर्श केला तरी वेगवेगळे स्वर ऐकू येतात. यावरून ध्वनी आणि दगड यांचा अभ्यास किती सूक्ष्मपणे केला गेला होता, हे दिसते. आज विज्ञान सांगते की लयबद्ध ध्वनी मेंदूवर परिणा म करतात, ते मन शांत करतात, एकाग्रता वाढवतात. आपल्या पूर्वजांनी हे अनुभवातून आधीच ओळखले होते.


पर्यावरणाशी सुसंवाद

प्राचीन मंदिरांची जागा निवड ही केवळ सोयीसाठी नसते, ती पर्यावरणाशी सुसंगत असते. मंदिरे अनेकदा नदीकाठी, टेकडीवर किंवा विशिष्ट ऊर्जा असलेल्या जागांवर बांधलेली दिसतात. या ठिकाणांची निवड ही विचारपूर्वक केलेली असते. मंदिराच्या आवारात पुष्करणी, कुंड किंवा तलाव असतो, हे केवळ धार्मिक घटक नाहीत, तर जलसंचय आणि पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे साधन आहेत. दगडाचा वापर, जाड भिंती, आणि उंच छत- हे सगळे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात थंडावा आणि हिवा ळ्यात उबदारपणा टिकवून ठेवला जातो. मंदिरातील मोकळी जागा, प्राकार, आणि दिशानुसार केलेली रचना- हे सर्व मिळून एक नैसर्गिक “microclimate” तयार करतात. आज आपण ज्याला “climate responsive architecture” म्हणतो, ते आपल्या प्राचीन मंदिरांमध्ये सहज दिसते.


मंदिर: एक सजीव सांस्कृतिक प्रणाली
कंबोडियातील अंकोरवाट
कंबोडियातील अंकोरवाट

मंदिर हे केवळ पूजा करण्याचे ठिकाण कधीच नव्हते, ते एक संपूर्ण जीवनपद्धतीचे केंद्र होते. मंदिरात शिक्षण दिले जात असे. संगीत आणि नृत्याचे ते केंद्र होते. शास्त्रचर्चा, सभा, आणि सामाजिक संवाद घडत असे. अनेक ठिकाणी मंदिर हे प्रशासकीय केंद्रही होते. म्हणजेच मंदिर हे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र होते. पूर्वी गावे मंदिराभोवती वसत असत. गावाची अर्थव्यवस्था, संस्कृती आणि जीवनपद्धती, हे सर्व मंदिराशी जोडलेले होते. मंदिर म्हणजे समाजाचा धागा होता, जो सगळ्यांना जोडून ठेवत होता. विशेष म्हणजे, ही मंदिरसंस्कृती भारतापुरती मर्यादित राहिली नाही. कंबोडियातील अंकोरवाट, जावातील प्रम्बानन या ठिकाणीही भारतीय विचारसरणी आणि वास्तुरचनेची स्पष्ट छाप दिसते. यावरून मंदिर ही केवळ एक वास्तू नसून ती एक अशी सांस्कृतिक भाषा आहे, जी सीमांच्या पलीकडेही पोहोचली.


श्रद्धा आणि विज्ञान

आजच्या काळात विज्ञान आणि श्रद्धा या दोन वेगळ्या, अगदी विरुद्ध टोकांच्या गोष्टी मानल्या जातात. पण मंदिरांच्या रचनेकडे नीट लक्ष देऊन पाहिले तर असे जाणवते की हा फरक नैसर्गिक नाही, तो नंतर तयार झालेला आहे. आपल्या पूर्वजांसाठी श्रद्धा आणि विज्ञान वेगळे नव्हते. श्रद्धा ही त्यांच्या विचारांची आणि निर्मितीची प्रेरणा होती, तर विज्ञान हे त्या विचारांना प्रत्यक्ष रूप देण्याचे साधन होते. म्हणूनच मंदिर म्हणजे केवळ धार्मिक स्थळ नाही. ते श्रद्धा आणि विज्ञान यांचा सुंदर समन्वय आहे, जिथे आध्यात्मिकता आणि तर्क एकत्र येतात आणि एक सुसंवादी अनुभव निर्माण करतात.


शेवटी…

पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या जुन्या मंदिरात जाल, तेव्हा फक्त दर्शन करून लगेच बाहेर पडू नका. थोडा वेळ थांबा. शांतपणे त्या जागेकडे पाहा. प्रकाश मंदिरात कसा प्रवेश करतो आहे ते पहा. मंत्रांचे आणि घंटानादाचे प्रतिध्वनी कसे घुमत आहेत ते ऐका. त्या जागेचा तुमच्या मनावर काय परिणाम होतो आहे, ते समजण्याचा प्रयत्न करा. कदाचित त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, मंदिर हे केवळ देवाचे घर नाही. ते मानवी बुद्धिमत्ता, सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि समृद्ध ज्ञानपरंपरेचे एक जिवंत रूप आहे. पण आजच्या काळात, आपण गोष्टी समजून घेण्याची पद्धत बदलली आहे. पाश्चिमात्य विश्लेषणाच्या प्रभावामुळे आपण प्रत्येक गोष्ट तुकड्यांत विभागून पाहायला शिकलो आहोत. शास्त्रांचे उपविभाग, वेगवेगळे दृष्टिकोन आणि तुकड्यांत केलेला अभ्यास यामुळे एक संपूर्ण आणि सर्वसमावेशक असलेली मंदिरसंरचना आपल्याला गुंतागुंतीची वाटू लागते. म्हणूनच, मंदिर समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा त्याकडे नव्या दृष्टीने पाहावे लागेल, तुकड्यांत नाही, तर एकसंधपणे. पुढील भागांमध्ये आपण मंदिराच्या वेगवेगळ्या वैज्ञानिक आयामांचा शोध घेण्याचा प्रयत्न करू.


(लेखिका संरचना- हेरीटेज रिसर्च स्टुडीओ, पुणे या संस्थेच्या संस्थापक आहेत.)

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page