भारतीय ज्ञान परंपरा : ‘स्व’ भावनेची पुनर्स्थापना
- May 20
- 14 min read
स्व. जयंतराव सहस्रबुद्धे स्मृती व्याख्यान - २०२६
व्याख्याते – श्री. प्रमोद जी बापट

माननीय श्री. प्रवीण जी रामदास, प्राचार्य डॉ. माधवराव राजवाडे, सभागृहात उपस्थित अन्य श्रेष्ठ माता-भगिनी आणि सज्जन बंधुंनो,
सुरुवातीच्या दोन प्रस्तुतींनी सभागृहातले वातावरण एकदम भावपूर्ण झालेले आहे. माननीय जयंतरावांच्या आठवणी श्री. प्रविणजींनी आपल्यासमोर सर्वांसमोर मांडल्या. मला याबाबत पूर्णखात्री आहे की येथे उपस्थित असलेली जी जी व्यक्ती जयंतरवांना पहिल्यांदा भेटली असेल, त्यांच्या मनात एक चित्रपट सुरू झाला असेल. त्यांना जयंतराव कधी भेटले? कुठे भेटले? किती आत्मियता होती, किती शुद्धता होती? कामाची प्रेरणा होती. आणि ती प्रेरणा अक्षुन्न होती. जेव्हा जेव्हा जयंतरावांची आठवण होते तेव्हा त्यांनी दिलेल्या दिक्षेतील कोणतातरी एक शब्द आपल्या मनाला पुन्हा संजीवनी देतो. काम करायला बाध्य करतो. आत्ताच आपण सुयोगजींनी गायलेले पद्य ऐकले. विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे. मला सावरकरांच्या कवितेच्या ओळी आठवतात.
परि जे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्रीहरीसाठी मेले, कमलफूल ते अमर ठेले, मोक्षदायी पावन
त्याचा भावार्थ असा आहे, या ओळींमधून सावरकरांनी भक्ती चे आणि समर्पणाचे महत्त्व सांगितले आहे. पौराणिक कथेनुसार, गजेंद्राने (हत्ती) श्रीहरी (महाविष्णू ) साठी जे कमलफूल सोंडेने (शुंडेने) उपटून वाहिले, ते फूल अमर झाले आणि मोक्षदायी ठरले, असे हे वर्णन आहे. जगामध्ये कितीतरी फुले फुलतात आणि सुकून जातात, त्याची कोणी गिनती ठेवते का? परंतु एखादेच फुल जे सरोवरातून गजराजाच्या, गजेंद्राच्या सोंडेने जे खुडले गेले आणि भगवान महाविष्णूंच्या चरणी वाहिले गेले. असे भाग्य फार थोड्या फुलांना लाभते. सावरकर कवितेत म्हणतात असे फुल अमर होते. आपले कार्यही असेच आहे. त्या विशेष फुलासारखे एखाद्या कामासाठी, समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी स्वतःला समर्पित करायचे. अशा एका समर्पित व्यक्तिमत्वाचे स्मरण करताना, आज जयंतजींची षष्ठब्दीपूर्ती आहे. जयंतराव आज असते तर साठ वर्षांचे झाले असते. त्यांचे स्मरण आपल्याला पुन्हा काम करायला प्रेरित करते. आज ज्या विषयावर बोलण्याचा मला आदेश मिळाला आहे, तो विषय आहे - भारतीय ज्ञान प्रणाली - 'स्व'भावनेची पुनर्स्थापना.
ज्ञानाशी संबंधित आहे. सामान्यतः आहार, भय ज्याला आपण अगदी प्राथमिक म्हणतो, अशा ज्या भावना, संवेदना असतात त्या सर्वांमध्येच असतात. त्या उपजत असतात, त्या नैसर्गिक असतात. प्राणी जगात आणि वनस्पती जगतात ही असतात. प्राणी त्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतात. भूक लागते म्हणून आहार शोधतात. आहारासाठी ते तडफतात, रडतात. झाडझुडपे त्यांची मुळे पसरवतात, त्यांच्या फांद्या सूर्यप्रकाशाकडे ओढावल्या जातात, वळतात. परंतु मला नेमके काय पाहि जे आहे? भूक लागली म्हणून नाही, मला हे हवं आहे, आणि मला हे नको आहे. हा जो विचार प्रथम मनामध्ये येतो तो आपल्याला ज्ञानाकडे आकृष्ट करतो, ज्ञानाच्या दिशेने टाकलेले ते पहिले पाऊल. कारण, ती मागणी नेमकी कुणाची आहे? मला काय पाहिजे याचा विचार सजीव करतो, हे नेमके कुणाला पाहिजे आहे? तो मागणारा किंवा इच्छा करणारा कोणी तरी वेगळा आहे. आणि तो वेगळा म्हणजे कोण तर त्याच्या अंतस्थ असलेला जो 'स्व' आहे. आणि या 'स्व' पासूनच ज्ञानाची प्रक्रिया सुरू होते. आरंभच इथून होतो. 'स्व' भावनेची पुनर्स्थापना म्हणजेच ज्ञानाचा शोध. 'स्व' असतो परंतु ज्ञानाचे काम काय? 'स्व' ला प्रतिष्ठित करणे, त्या 'स्व' ला बलवान करणे. 'स्व' ला नित्य संजीवित ठेवायचे. जिवंत ठेवायचे. विस्मरणापासून, भीतीपासून, भ्रमापासून दूर ठेवायचे. आणि हेच ज्ञानाचे मुख्य कार्य आहे. आणि हे भारतात सुरुवातीपासून ज्ञानाची प्रतिष्ठापना एक व्यवस्थेच्या रूपाने, एक प्रक्रियेच्या रूपाने, एका प्रणालीच्या रूपाने प्रतिष्ठापित केली आहे. त्याचा मुख्य उद्देश हाच होता. 'स्व' ला ओळखायचे, 'स्व' ला प्रतिष्ठित करायचे, 'स्व' चा विसर, विस्मरण होऊ द्यायचे नाही. कारण 'स्व' चे विस्मरण झाले तर अनेक अनर्थ घडतात. कारण 'स्व' चा जन्मच त्यासाठी असतो. त्या शिवाय सगळे विस्मृत होतात, दिशाहीन होतात, पथभ्रष्ट होतात.

भगवद्गीतेचा सातवा अध्याय आहे, त्याचे नावच ज्ञान- विज्ञान योग असे आहे. ज्ञानश्वेर माऊलींनी त्याचे फार सुंदर वर्णन केलेले आहे. भगवद्गीतेत तर एक श्लोक येतो. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यासाठी विस-विस ओव्या लिहिलेल्या आहेत. कारण ते समजावतात, ते शिकवतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मी तुला ज्ञान अवश्य देईल परंतु त्याआधी थोडे विज्ञान सांगतो. अर्जुन म्हणतो मला ज्ञान पाहिजे आणि तुम्ही विज्ञान कशाला देताय? योगेश्वर म्हणतात विज्ञान ते ज्ञान आहे, जे भवतालाशी जोडलेले आहे. माझा आणि परिसराचा संदर्भ काय? असे का आहे? कसे आहे? केव्हापर्यंत आहे? या व अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम विज्ञान करते. हे सर्व विज्ञान सुरुवातीला मी तुला देईन. आणि काही प्रश्नांची उत्तरे तुझ्या मनात आज आहेतच. परंतु त्यांनी अपूर्णता कशी निर्माण होते, तेही तुला सांगेल. कारण अर्जुनाच्या मनात प्रश्नांची उत्तर आहेत. मी कोण आहे? आसपास कोण आहे? काका आहेत, कुणी मामा आहेत, कुणी आचार्य आहे, कुणी भाऊ आहे, त्या संबंधांप्रमाणे अर्जुन त्या त्या नात्याची 'स्व' ची प्रतिष्ठापना करत आहे. त्यामुळे तो 'स्व' कोण आहे त्याचे त्याला विस्मरण झाले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सगळे विज्ञान तुला आधी सांगतो आणि त्यानंतर ज्ञान सांगतो. ज्ञानाच्या आकलनाने काय होते? ज्ञानेश्वर महाराजांनी फार चांगले उदाहरण दिलेले आहे. एखादी नौका आहे आणि ती नौका जर बंदराला लागली तर ती हलत नाही, इकडे तिकडे जात नाही. तिला किनारा मिळाला, तिला तिचे गंतव्य स्थान मिळाले, लक्ष मिळाले, तिचे प्रयोजन मिळाले. म्हणून ती स्थिर झाली. म्हणजेच ज्ञान जे स्थैर्य प्राप्त करून देते.

येथे रामायणातली एक गोष्ट सांगण्याचा मोह मला होतो आहे. युवा, तरुण रामचंद्रांची कथा आहे. तरुण रामचंद्र आपल्या प्रासादातून आपल्या आचार्य महर्षी वशिष्ठांच्या कुटीकडे जात होते. कुटी जवळ ते पोहोचले. कुटीचे कवाड बंद होते. त्यांनी ते कवाड ठोठावले. परंतु काही हालचाल झाली नाही. कवाड कोणी उघडले नाही. त्यांनी कवाड पुन्हा एकदा ठोठावले, मुनीवर कदाचित ध्यानाला बसलेले असतील, काही वाचत असतील, काही लिहीत असतील. म्हणून मुनीवरांनी जागेवर बसल्याबसल्याच मोठ्याने विचारले, कोण आहे? खरे तर याचे उत्तर अगदी सरळ होते, मी राम. परंतु तरुण रामचंद्रांनी हे उत्तर दिले नाही. कदाचित आपल्यालाही वाटेल की किती सोपे उत्तर होते? आपल्यापैकी किती तरी जणांनी यापूर्वी अनेकदा अशी उत्तरे दिलेली असतील. आपल्यापैकी अनेकांनी हा प्रश्न ही विचारलेला असेल आणि उत्तर देखील दिलेले असेल. युवा रामचंद्रांचे उत्तर आपल्या सर्वांना विचार करायला लावणारे आहे. युवा रामचंद्र म्हणतात - हेच समजून घ्यायला आलो आहे. कोण आहे? हेच समजून घ्यायला आलो आहे. युवा रामचंद्राने ते जाणले आणि म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम झाले. कारण ‘स्व’ चे ज्ञान झाले. मी कोण आहे? हे लक्षात आल्यावर मी कशासाठी आहे हेही लक्षात येते. माझे प्रयोजन काय? माझ्या ज्ञानाचे, माझ्या कृतीचे, माझे कर्तव्य काय आहे? त्यामुळे ‘स्व’चा बोध परम आवश्यक आहे.

आणि मला असे वाटते की जयंत जी अशा ‘स्व’बोधाचे ज्ञाता होते. चांगले शिक्षण झालेले होते. बी. टेक. पूर्ण केले. प्रचारक म्हणनू बाहेर पडले. काही काळ मुंबईत, नंतर नाशिकला विभाग प्रचारक, गोवा विभाग प्रचारक नंतर कोकण प्रांत प्रचारक. त्यानंतर विज्ञान भारतीकडे गेले. परंतु त्यांच्यासाठी हे काही फार नाविन्याचे नव्हते. कारण गीता रहस्याच्या प्रस्तावनेत लोकमान्य टिळकांचे एक वाक्य आहे. ज्ञान विज्ञानाला आपल्या खांद्यावर घेऊन पुढे जाते. म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचे नाते बघा कसे आहे. जयंतरावांना ज्ञानाचे पुरेसे ज्ञान झाल्यामुळे त्यांच्याबद्दलच्या दोन-तीन आठवणी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. अतिशय निराशा जनक परिस्थितीत कुणी तरी एक कार्यकर्ता बसलेला होता. एवढे प्रयत्न करून सुद्धा काही पुढे जातच नाही, काही होतच नाही. जयंत जी एक उदाहरण द्यायचे, पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे? १०० अशं डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे १०० अंश डिग्री सेंटीग्रेडला पाणी उकळते, बाष्पीभवन सुरू होते. जयंतजी विचारायचे ते तापमान एकदम १०० अंश डिग्री सेंटीग्रेडला जाते का? म्हणजे त्याची उत्कलनाची तयारी १० मध्ये असते, २० मध्ये असते, ५० मध्ये असते, ६० मध्ये असते ७० मध्ये असते, ती तयारी सुरू असते. तसे काही होत नाही, हा विचार मनातनूच काढून टाका. उत्कलन बिंदू आलेला नाही परंतु त्याच्या जवळ आपण टप्प्याटप्प्याने पोहोचतो आहे. मधे कुठेतरी आहे ४०वर, ६०वर असताना, औदासिन्य कशासाठी? उत्कलन बिंदू पर्यंत पोहोचायचे आहे, हे आपले ध्येय आहे. असे अगदी विज्ञानाधारित उदाहरण ते देत असत. असाच एखादा कार्यकर्ता उदास झाला आहे. तरुण कार्यकर्ता आहे. नुकताच प्रचारक निघालाय. त्याला जयंतजी म्हणायचे चार दिवस घरी जाऊन ये. हे काय उत्तर झाले? परंतु याच्यात पण मानसशास्त्र आहे. ज्या वातावरणात तो काम करतो आहे, ज्या परिस्थितीत तो काम करतोय त्याच्यापासून दूर जाऊन थोडे तो परीक्षण करू शकेल. वेगळा विचार करू शकेल. काय अडचण आहे? कोणत्या बाधा आहेत? कोणत्या द्विधा आहेत? आणि स्वतःलाही जरा स्थिर-स्थावर करेल. जसे म्हणतात ना, की बादलीत उभे राहून तुम्ही बादली उचलू नाही शकत. बादली उचलायची असेल तर तुम्हाला बादलीच्या बाहेर उभे राहावे लागेल.

जयंतरावांच्या अशा अनेक साध्या साध्या उदाहरणांमध्ये विज्ञान दृष्टी अगदी सहज सामावलेली तुमच्या लक्षात येईल. ते काही फार मोठे विज्ञानाचे तत्त्वज्ञान सांगत नव्हते. पण लोकमान्यांनी म्हटले तसे ज्ञान विज्ञानाला खांद्यावर घेऊन पुढे जाते. आपण सुरुवातीला जी प्रार्थना म्हणालो, विज्ञान भारतीची प्रार्थना. तिच्यात ईशावास्य उपनिषदातला एक श्लोक आहे. प्रार्थनेतील श्लोक विचारांना दिशा देणारे श्लोक आहेत. ते म्हणतात विद्या आणि अविद्या दोन्हीही अंधकाराकडे घेऊन जातात. अविद्येमुळे अंधकाराकडे, तमाकडे वाटचाल होते. तसेच केवळ विद्या घेऊन मार्गक्रमण करणाऱ्यांचा देखील शेवट अंधकाराकडे, तमाकडेच होतो. तर त्याचे कारण काय? आम्ही ज्या भारतीय ज्ञान प्रणालीबद्दल बोलत आहोत, त्या ज्ञान प्रणालीत कर्मविहीन विज्ञानाला स्थान नाही. ज्ञान आहे तर ज्ञानाबरोबर कर्म ही आहे. ज्ञान आहे म्हणूनच प्रयोजन कळले. ज्ञान प्राप्त केले म्हणून मला आता काही करण्याची आवश्यकता नाही असा समजणारा अंधकारात तमाकडे जाणार यात काही शंका नाही. कर्म संन्यास घेऊन ज्ञानाला प्रतिष्ठापना प्राप्त होत नाही. भारतीय ज्ञान प्रणाली आपल्याला कृती प्रणव करते. कृतीमार्गावर प्रकाश देते. आणि या ज्ञानमार्गावर पदक्रमण करताना व्यक्तीतील एक एक एक हीन विकार, अहंकार गळून पडतात. मी ज्ञानमार्गावरचा उपासक आहे, मी ज्ञानाच्याच गोष्टी करीन. ज्ञानच वाटील. पण हे पुरेसे नाही. तुझे काही कर्तव्य आहे, कर्म आहे ते तुला करावेच लागेल. कधी कधी अहंकार जागा होतो. मी मोठा ज्ञानी आहे. माझ्याकडे ज्ञानाचा प्रकाश आहे. त्या ज्ञानप्रकाशाने मी तुमची पडछाया, सावली किती मोठी / छोटी आहे ते तुम्हाला दाखवीन. तुमचे काळे रूपही मी दाखवीन. माझ्या ज्ञानाने तुम्हीदेखील उजळून निघावे हा ज्ञानाचा स्वाभाविक धर्म आहे. परंतु अहंता आल्यामुळे, मनामध्ये स्पर्धा निर्माण झाल्यामुळे, कुणाला कमी लेखण्यासाठी, कुणाचे न्यूनत्व दाखवण्यासाठी, स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, माझे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मी ज्ञानाचा वापर करेल तर अशा ज्ञानाला भारतीय ज्ञान प्रणालीत स्थान नाही. संत ज्ञानेश्वर, नावच ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख करताना मराठीतील एक महान कवी ग. दि. माडगूळकर म्हणतात. मराठी जणांची बहुतेक मुखद्गत असते. त्यांनी ज्ञान माणसाला कुठे घेऊन जाते? माणसांमध्ये काय परिवर्तन घडवून आणते? हे सांगण्यासाठी ती रचना केलेली आहे. त्या ओळी अशा आहेत –
मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड.....
केवळ पुढे नाही, मागे देखील. ज्ञानाचा प्रकाश असा केवळ एका दिशेने जात नाही. संपूर्ण आसमंताला प्रकाश देत प्रकाशित करत, उजळून टाकते. पुढच्या एका ओळीत ते म्हणतात ज्ञानदेव कसे आहेत?
उजेडी राहिले उजेड होऊन....
ते स्वतःच ज्ञानाचा प्रकाश होतात. कोणतेही हीन, न्यूनता तेथे राहतच नाही. भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये अशा प्रकारचे ज्ञानाची उपासना सांगितलेली आहे. कधीकधी भारतीय ज्ञान प्रणालीचे मराठीततून इंग्रजी भाषांतर करताना इंडियन नॉलेज सिस्टम असे केले जाते. यातील भारतीय हा शब्द भौगोलिक स्थानदर्शक, प्रदेश प्रार्थनेतील नाही. त्या भारत शब्दात एक दिशा आहे. ते एक विशेषण आहे. कुठली ज्ञान प्रणाली या अर्थाने भारतीय ज्ञान प्रणाली असे नाही. तर कशी ज्ञानप्रणाली याचे उत्तर म्हणून भारतीय ज्ञान प्रणाली हे आहे. म्हणून इंग्रजीत जाताना सुद्धा ते भारतीय नॉलेज सिस्टम असेच जायला पाहि जे. इंडियन या शब्दात तो भाव नाही. 'भा' म्हणजे प्रकाश आणि 'रत' म्हणजे रममाण होणारा. प्रकाशात रममाण असणारा म्हणजे भारत. अशा भारतात आमच्या पूर्वजांनी एक ज्ञान प्रणाली निर्माण केली. प्रतिष्ठित केली. ही एक मोठी वि शेषता आहे. स्वतः वैयक्तिक स्तरावर ज्ञानी असणे ही एक श्रेष्ठ गोष्ट आहे. परंतु आमच्या पूर्वजांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी त्याची एक प्रणाली बनवली, व्यवस्था निर्माण केली, पद्धती निर्माण केली. आमच्या ऋषीमुनींनी जे लिहिले ते त्यांनी लिहिले असे नाही, सांगितले. माझ्या मनात आले आणि मी लिहिले, असेही नाही सांगितले. त्यांनी असे सांगितले, मला स्फुरले.
ऋग्वेदातील कुठल्याही ऋचे संदर्भात ते ऋषीमुनी असा दावा करत नाही. महर्षी वेद व्यासांनी त्याची रचना केली, संहिता बनवली. ज्ञानाचे भांडार बनवले परंतु तेवढे पुरेसे नाही. जो तिथे जाईल तो ज्ञानी होईल. त्यांनी त्याची एक प्रणाली तयार केली. आपल्या परंपरेची श्रेष्ठता याच्यात आहे की त्यांनी ज्ञानाचा एक मार्ग तयार केला. हे ज्ञान कसे मिळेल तर ज्ञान ध्यानातून मिळेल. जो कुणी एकाग्रचित्ताने त्याचा विचार करेल तो ज्ञान मार्गावर चालेल. क्षेत्र कोणतेही असो, आपण बघतो संगीताचे क्षेत्र असेल. त्यात ध्यान मग्न होण्याची काय आवश्यकता आहे. समोर एखादे गीत लिहिलेले आहे, कदाचित ते पाठ झालेले असेल. तंबोरा काढा आणि सुरू करा परंतु तसे होत नाही. तो सुरुवातीला ध्यान मग्न होतो. ध्यानस्थ बसतो. ते कसे होईल तर एखाद्या गुरु बरोबर. आमची उपनिषदांची एक परंपरा आहे. उपनिषद या शब्दाचा अर्थच आहे की ज्ञानाच्या बरोबर बैठक, बसायचे. गुरु बरोबर बसायचे. काही प्रमाणं निश्चित करण्यात आली. प्रत्यक्ष प्रमाण, ग्रंथ प्रमाण, शब्द प्रमाण. अशा काही प्रमाणांची व्यवस्था, प्रणाली आमच्याकडे तयार झाली. कारण या विश्वातील प्रत्येक घटनेचा इंद्रियसाक्षी होणे असंभव आहे. जर मी बघितले तरच मी मान्य करेल, असे शक्य नाही. केवळ अशक्य. तू काय काय बघू शकशील? तुझ्या स्वतःच्याही काही मर्यादा आहेत. या मर्यादांमुळे प्रमाणांची व्यवस्था आपल्याकडे करण्यात आली. ही सशास्त्र पद्धती आहे. जो या पद्धतीने या ज्ञानमार्गावर पुढे जाईल तो ज्ञानी होईल. ज्ञान कुणासाठी? तर ज्ञान सर्वांसाठी. ज्ञानाचा एक प्रकाश आहे. दिवा तेवतो आहे. तो असे म्हणत नाही, कुणाला प्रकाश पाहिजे? त्यालाच मी देतो. ज्यांना नको आहे त्यांच्यासाठी अंधाराची व्यवस्था केलेली आहे. प्रकाश असे म्हणत नाही. ज्ञान असे म्हणत नाही. भारतीयांनी ज्ञानाची महानता फार उंचावर नेऊन ठेवली. म्हणून संपूर्ण विश्वाचा जो वारसा वेद आहे. विदेशात पश्चिमी देशांमध्ये असे ग्रंथ झाले परंतु त्यांना विश्वाचा वारसा म्हणून ओळखले जात नाही. वेदांना विश्वाचा वारसा म्हणून ओळखले जाते कारण ते सर्वांसाठी आहेत.

आज कार्यक्रमाच्या सुरवातीला दैनंदिनीचे प्रकाशन झाले. त्या दैनंदिनीच्या मलपृष्ठावर एक प्रार्थना आहे - पसायदान. त्याच्या पहिल्याच ओळीत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात - आता विश्वात्मके देवे. कल्पना करा, १२वे शतक, नेवासे नावाच्या महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात, गाव कसले खेडेच, १२- १४ वर्षांचा एक मुलगा एका छोट्याशा मंदिरात बसून काही कथन करतोय, प्रवचन देत आहे. ज्ञानेश्वरी - भावार्थ दीपिका, त्याचे वय, त्यावेळची दळणवळणाची साधने, या सगळ्यांचा विचार करता त्याचे विश्व केवढे असेल? कि ती मोठे असेल? परंतु तो म्हणतो - आता विश्वात्मके देवे. कारण चिंतनातून आलेले विचार आहे. हा प्रकाश त्याही परिस्थितीत त्यांना मिळाला. हे जे काय आहे ते संपूर्ण विश्वासाठी आहे. माझी कृती, माझी निर्मिती ही केवळ माझ्यासाठी नाही, तिथे बसलेल्या श्रोत्यांसाठी नाही. फक्त मराठी जणांसाठी नाही, केवळ भारतीयांसाठी नाही तर संपूर्ण विश्वासाठी आहे. विश्वात्मक देव या ज्ञान यज्ञातून संतुष्ट होवो.
जेव्हा आम्ही भारतीय ज्ञान प्रणाली म्हणतो, जयंतरावांचा उल्लेख देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने झाला. विज्ञान हा स्वातंत्र्यसंग्रामाचा एक पैलू कसा होता? महेंद्रलाल सरकार, प्रफुल्लचंद्र रॉय, जगदीशचंद्र बसु यांनी जे काम केले, ते केवळ विज्ञानाचे काम नव्हते. हे भौतिकशास्त्रात काम करतात, ते प्राणी शास्त्रात काम करतात असे नव्हते. ते संपूर्ण विश्वासाठी काम करत होते. त्याची एक ज्ञान शाखा होती. म्हणून भारताची ज्ञान परंपरा भारताला एक लक्ष देते आणि ते लक्ष कोणते, तर विश्व कल्याणाचे. भारतीय ज्ञान परंपरा आपल्या कक्षा विस्तारित करते, विस्तृत करते. आपला एक मंत्र आहे- सा विद्या, या विमुक्तये. विद्या काय करते? तर जी मुक्त करते ती विद्या. विद्या म्हणजे मुक्त करणे. या विद्येचे जे ग्रंथ आहेत, प्राचीन ग्रंथ आहेत, तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत. त्यांचे काळ आणि कालाच्या कसोटीवर परीक्षण झालेला आहे. परिशिलन झालेले आहे. त्यांच्यावरती टीका, भाष्यग्रंथ लिहिले गेलेले आहेत. भारताने कधीही म्हंटले नाही की हे अंतिम वाक्य आहे. हे देखील एक ज्ञानाचे लक्षण आहे. ज्ञान कधीही हे अंतिम आहे असे म्हणत नाही. ज्ञान ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजेच ज्ञानार्थीच्या मनामध्ये देखील असे कधीही येता कामा नये, की मी ध्येय गाठले, लक्ष गाठले, अंतिम किनारा गाठला. त्याच्यातून अहंकार निर्माण होईल यापेक्षा वेगळे काही होणार नाही. ज्ञानाचा मार्ग अखंड असतो. निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेचे नाव आहे ज्ञान. या ज्ञानाच्या प्रकाशाची ही निरंतरता आता देखील आवश्यक आहे. मी आता भरपूर ज्ञान संपादन केले, आता माझे काम संपले असे होत नाही, असे होऊ नये. ज्ञानाचे प्रयोजन आहे त्यातून मला माझ्या कर्तव्याची जाण निर्माण होणे, कर्तव्याची प्रेरणा निर्माण होणे आहे. ज्ञान हे संतुष्टी देणारे, तृप्ती देणारे अशी बाब नाही.
ज्ञान ही एक ऊर्जा आहे, ज्ञान हे एक तप आहे, ज्ञान हे एक तेज आहे. भारतीय परंपरेत आशीर्वाद देण्याची देखील एक पद्धत आहे. मला आठवण होते, शांतिनिकेतन मधील आचार्य नंदलाल बासू यांची. ते एक चित्रकलेचे शिक्षक होते. चित्रकला शिकण्यासाठी गुजरात मधून निघालेला एक युवक, किशोर त्याचे नाव अमृतलाल बेगड शांतिनकेतन मध्ये पोहोचला, चित्रकलेचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाले. आता दीक्षा दिली जाणार. आचार्य नंदलाल बासू एका डेरेदार वृक्षाखाली बसले आहेत, एक एक विद्यार्थी येतो आहे. हा अमृतलाल नेगला आचार्यांना नमस्कार करतो, वंदना करतो. आणि तो वाट बघतोय की आचार्य आता आपल्याला आशीर्वाद देतील. साधारणतः विजयी भव, यशस्वी भव असे आशीर्वाद दिले जातात. आचार्य काहीच बोललेले त्याला ऐकायला आले नाही म्हणून त्याने पुन्हा एकदा वाकून नमस्कार केला. आचार्य नंदलाल बासूंनी स्मित करत त्याला सांगितले, की यशस्वी हो, असा आशीर्वाद मी तुला देणार नाही. तो थोडा घाबरला. याचा अर्थ माझे शिक्षण पूर्ण झाले नाही, अपूर्ण राहिले, काहीतरी कमी राहिले, काहीतरी न्यूनता राहि ली. आता अजून काही दिवस येथे विद्यार्थी म्हणून राहावे लागणार, सगळा अभ्यास पुन्हा करावा लागणार असे विचार त्याच्यात डोक्यात डोकावत होते. मी तर माझे पूर्ण प्रयत्न केले. तितक्यात आचार्य म्हणाले तुझी ही प्राप्त केलेली विद्या सार्थकी लागेल. आमच्याकडे ज्ञानाचे गंतव्यस्थान सार्थकता आहे. यश, विजय प्राप्त करणे हे नाही. कारण हे युद्ध नाही. त्यामुळे कुणावर विजय मिळवायचाच नाही. सगळ्यांना प्रज्वलित करायचे आहे. सगळ्यांमध्ये ऊर्जा भरायची आहे. सर्वांना ज्ञानप्रकाश देऊन बलवान करायचे आहे. 'स्व' मध्ये येणाऱ्या प्रत्येक विकाराचा, ज्ञानाचा सरळ संबंध 'स्व' जागरणात आहे. अन्यथा ज्या काही विद्या आपण शिकतो त्यांना आपण वरवरच बघू. भौतिकशास्त्र शिकलो म्हणजे केवळ तो भौतिकशास्त्राचा अभ्यास नाही, प्राणी शास्त्र शिकलो म्हणजे तो केवळ प्राणी शास्त्राचा अभ्यास नाही. संगीत शिकलो म्हणजे केवळ संगीताचा अभ्यास नाही. म्हणजे हे जे काही ज्ञान संपादन केले आहे, ते ज्ञानाचे ध्येय आहे, लक्ष आहे, आणि त्याच्यातूनच सार्थकता येणार आहे. म्हणूनच हे 'स्व' जागरणासाठी आहे. म्हणजे तो 'स्व' निरंतर जागृत ठेवणे, आपले ध्येय काय? लक्ष काय? याचे स्मरण करणे, पुन्हा पुन्हा स्मरण करणे. अशा प्रकारची एक जागृती, अशा प्रकारची एक संवेदना मनात कायम तेवत ठेवणे, जिवंत ठेवणे हेच ज्ञानाचे मुख्य काम.

तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी संगीत सभेत संगीताचा आस्वाद कधीतरी घेतलेला असेल. तो कलाकार किंवा ती कलावती आपल्या कलेची, राग, रागिनी, बंदिशींची प्रस्तुती करत असते. त्यांना कुणीतरी तबल्यावर, कुणीतरी संवादिनीवर, कुणीतरी सारंगीवर साथ देत असते. कुणीतरी ताल देते. तुम्हा आम्हाला सर्वांना ही सर्व वाद्य ऐकायला येतात परंतु तो जो गायक असतो तो मात्र वेगळेच काहीतरी ऐकत असतो. त्याचे कान दुसरेच काहीतरी ऐकण्यासाठी एकवटलेले असतात. मागे दोन तानपुरे असतात ते कोणतही गाणे वाजवत नाही, कुठलाही राग वाजवत नाही. तानपुऱ्यावर राग वाजवला जात नाही. मग ते काय वाजवत असतात? तर तो आधार स्वर वाजवतो. तो षड्ज वाजवत असतो. कधी षड्ज पंचम कधी षड्ज निषाद, जसा राग असेल त्याप्रमाणे. आणि त्या गायकाचे ध्यान अवधान पूर्णतः त्या तानपुराच्या स्वराकडे असते. भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये ज्ञानाचे स्थान त्या तानपुऱ्या प्रमाणे आहे. तो सारखा सांगत असतो, तू हा राग गातोय, ही बंदिश गातोय, तराणा गातोय परंतु तुझे याच्याकडचे लक्ष विचलित झाले, विस्मरण झाले तर हे बाकी सर्व व्यर्थ आहे, विफल आहे. त्या रागाचा, त्या संगीताचा 'स्व' काय आहे? तर तो 'स्व' त्या तानपुऱ्यावर वाजत असतो. म्हणून 'स्व' जागरणाची परंपरा अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून बाकीची जी काय आवरणे आहेत, बाह्य प्रलोभने आहेत यापासून दूर राहायचे साहस देखील हे ज्ञानच देते.

स्वामी विवेकानंदांच्या जीवनांवरील वेगवेगळ्या कथांमध्ये आपण ऐकलेले आहे. त्यांना गुरुदेव रामकृष्ण परमहंसांनी कालीमातेकडे मागणी मागण्यासाठी पाठवले. मागणी काय होती? आणि त्यांनी मागितले काय? ज्ञान दे, वैराग्य दे. ज्ञान आणि वैराग्य याची काय आवश्यकता आहे? ज्ञान देणाऱ्याच्या व्यवस्था आहेत, पाठ्यपुस्तक, क्रमिक अभ्यासक्रम याला पण तर ज्ञानच म्हणतात ना, पण त्यांचे गंतव्य काय आहे? वैराग्य आहे? वैराग्य बिलकुल नाही. उत्तमोत्तम उपभोगांसाठी मला ज्ञान पाहिजे. याच्यात मी कुठे आहे? मी टीका किंवा प्रतारणा करत नाही. सामान्य व्यवहार हेच सांगतो, ज्ञान का प्राप्त करायचे?, उत्तमोत्तम उपभोग्य बाबी मिळवण्यासाठी. तुला इथे राहायचेच नाही, आम्हाला सांगितले जाते की तुला हे सर्व सोडायचे आहे. इथून जायचे आहे. ज्ञान घ्यायचे आहे आणि भारत सोडायचा आहे. ज्ञानाच्या मुळाशी, भाशीरत राहायचे हे नाही. ज्ञानाचा साक्षात्कार किंवा स्वाभाविक ज्ञान कुठे मिळेल? भारतात मिळेल. कारण तसे संस्कार आहेत, तशी पद्धती आहे, तशी प्रणाली आहे. हाच परिपाठ आहे. स्वाभाविक वारशात हे मिळते. स्वामीजींनी सांगितले मला वैराग्य पाहि जे. कारण ज्ञानामुळे येणारे हे जे विकार आहेत, मोह आहे, अहंकार आहे. कुणाला कमी लेखायचे आहे, कुणाला मागे टाकून मला पुढे जायचे आहे. कुणाला कायमस्वरूपी अप्रतिष्ठित करायचे आहे. कारण कुणाची तरी अप्रतिष्ठा केल्याशिवाय मला प्रतिष्ठा मिळणार नाही. हे शिक्षण देखील आधुनिक विशेषतः, पश्चिमी शिक्षणाने आपल्याला दिले. खेळामध्ये बघा दुसऱ्याला मागे टाका आणि तुम्ही पुढे जा. त्याला हरवा. कोणीतरी या मानसिकतेचा मानसशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणजे खेळामध्ये विजेता तोच होईल. आपण सगळे मिळून विजेता होवू असे नाही. आपल्याकडे याला मान्यता नाही. तू सगळ्यांना मागे टाक. मग तू विजेता होणार. ती उर्मी इथेच जागी करायची, ती आकांक्षा इथेच जागी करायची, मनुष्याचा मूळ कंद, अंतस्थ कंद सगळ्यांना दूर करा. सर्वांना म्हणजे सर्वांनाच. त्यात समाज आला, आपले साथीदार आले. देशाला, राष्ट्राला सगळ्यांना दूर करा. अशी ही व्यक्ती केंद्रित मानसिकता शिकवणारी पश्चिमी शिक्षण पद्धती आहे. म्हणून भारतीय ज्ञान प्रक्रियेचे अनुबोधत्व यातच आहे. हे ज्ञान ते नाही शिकवणार. हे सगळ्यांसाठी आहे, मग तू शिकला कशासाठी? सगळ्यांसाठी शिकलाय तर सगळ्यांना वाटून टाक. वाटण्यात आनंद आहे. हा जो वैराग्य भाव आहे, वैराग्य म्हणजे अंगाला राख फासणे आणि विजनवासात जाणे असे नाही. ती मनाची स्थिती आहे या सगळ्या विकारांपासून मनाला दूर ठेवायचे. साधी गोष्ट आहे, आपण एकमेकाला कुशल मंगल विचारतो, तर काय विचारतो? कसा आहेस? उत्तर मिळते स्वस्थ आहे. स्वस्थ म्हणजे काय? माझा जो 'स्व' आहे त्याच्यावर मी स्थिर आहे. ती काही शरीराची स्थिती नाही. ती माझी स्थिती आहे. मी जो आहे, तो कसा आहे? तर स्वस्थ आहे.

मला माझा 'स्व' काय आहे ते माहीत आहे. त्यामुळे माझे गंतव्यस्थान मला माहित आहे. माझ्यातल्या 'स्व' ला स्वस्थ करण्याचे साधन ज्ञान आहे. ज्ञान सर्वांना 'स्व' वर स्थिर करते. अशी जी 'स्व' ला स्थिर करणारी भारतीय परंपरा वर्षानुवर्षे चालत आली. असे सांगितले जाते की भारताच्या पारतंत्र्याचे कारण काय? तर जेव्हा जेव्हा आम्ही स्वस्थ नव्हतो तेव्हा तेव्हा आम्ही पारतंत्र्यात गेलो. आम्ही 'स्व' विसरलो. माहित होते मी कोण आहे? कशासाठी आहे? ध्यानात यायचे मी सगळे करायचो. जेव्हा याचे विस्मरण झाले, मी कोण आहे? कशासाठी आहे? तेव्हा मोह झाला. आकर्षण निर्माण झाले. त्यातून द्रोह करण्याची इच्छा निर्माण झाली. द्रोह केला, कारण मनात विचारच नाही. विवेकच राहिला नाही. तोपर्यंत आम्ही पारतंत्र्यात गेलो. भारताच्या स्वातंत्र्याची एकदृष्टीने शाश्वती कशात आहे? आपल्या स्वस्थ राहण्यात आहे. आणि आपला स्वस्थ राहण्याचा मार्ग जातो कुठून? तर तो ज्ञान प्रणालीतून जातो. भारतीय ज्ञान प्रणाली ही काही नवीन गोष्ट नाही. लोक बोलता बोलता असे बोलतात की आता ते नवीन शैक्षणिक धोरण आलेय ना! सुरुवातीला काही दिवस नवीन म्हणत होते, आता राष्ट्रीय म्हणायला लागले. तर ते राष्ट्रीय शिक्षण धोरण आले आणि त्याच्यात एक नवीन बाब आली. ती कोणती तर आय. के. एस. ही काही नवीन गोष्ट नाही. भारतीय ज्ञान प्रणाली नवीन कशी काय असू शकते?
माझे गुरुजी होते संगीताचार्य डॉ. अशोक रानडे. ते म्हणायचे की भारतात असे कुणी तरी म्हणायचे की मी हे पहिल्यांदा सांगतोय. तर हे मोठे दुःसाहस होईल. जगातले कुणी ही काहीही म्हणेल परंतु भारतीय व्यक्तीने असे म्हणता कामा नये. कारण भारताला एक प्रदीर्घ परंपरा आहे. थोडे मागे जाऊन अवलोकन केले तर मुक्ती ला समानार्थी शब्द ज्ञान आहे. ‘साविद्य या वि मुक्तये’ हे जसे व्यक्ती जीवनासाठी आहे तसेच ते समाज जीवनासाठी आहे, राष्ट्र जीवनासाठी पण आहे. भारतात पुन्हा एकदा त्या 'स्व'ची पुनर्स्थापना दृढतम करणे, या मार्गावर चालणारे अनेक आचार्य, शिक्षक या सभागृहात उपस्थित आहेत. याच ज्ञान परंपरेचा दिवा, दीपक, कंदील त्यांच्या हातात आहे. आणि तो घेऊन ते मार्गक्रमण करीत आहेत. बऱ्याचदा त्याची मौलिकता कुणी तरी सांगणे आवश्यक असते. आपल्याला माहित असते, आपण कामही करत असतो. परंतु अशा कुठल्यातरी पर्वाचे किंवा प्रसंगाचे निमित्य करून माझ्यासारख्या एखाद्या सामान्य व्यक्तीला सांगितले जाते की हे सर्वांच्याच मनात आहे. परंतु सर्वांच्या मनात जे आहे ते तू एकदा व्यक्त तर कर. मी तोच एक प्रयत्न केला. ज्ञानाच्या क्षेत्रात वाटचाल करणारे सगळे लोक इथे बसलेले आहेत. अधिक ऊर्जावान आहेत. अधिक ध्यान देऊन या मार्गावर चालत आहेत. कुणी तरी पुढे येऊन हे सांगितले पाहिजे, ते काम माझ्यावर आले मला सांगितले गेले. ते मी माझ्या क्षमतेप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना जयंतजींचे पुन्हा एकदा स्मरण झाले. या स्मरणाच्या निमित्ताने माझ्या स्वतःचाही जो अंतस्थ 'स्व' आहे त्यालाही पुन्हा जागेवर बसवण्याचा मी प्रयत्न केला.
मला आठवते एकदा एक बैठक आयोजित केलेली होती. नेमके काय झाले आठवत नाही परंतु बैठकीला जे अपेक्षित होते त्यापैकी कोणीच आले नाही. स्वाभाविकच होते थोडे नैराश्य आले होते. थोडी फार चिड चिड पण झाली होती. जयंतराव तिथे होते. जयंतराव म्हणाले काय बैठक सुरु नाही झाली? मी म्हटले कुणी आलेलेच नाही. जयंतराव म्हणाले तुम्ही तर आलेले आहात ना! बैठक तुमच्या सह सर्वांची होती. ती बैठक कुणालातरी शिकवायला, शिकायला यासाठी नाही. बैठक सर्वांची आहे म्हणजे तुमची पण आहे. मीही आज जयंतरावांचे स्मरण करीत असताना माझ्यातल्या 'स्व'ला स्थापित करण्याचा प्रयास केला. आणि त्यातूनच तुमच्यासमोर येण्याचे साहस केले. धन्यवाद.
जयंतरावांच्या स्मृतीला मी पुन्हा एकदा वंदन करतो.
धन्यवाद!


Comments