top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

बारीपाडा ..आशेचे बेट

  • Jun 5, 2025
  • 6 min read
डॉ. अमृता जोगळेकर

नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले श्री. चैत्राम पवार यांचे बारीपाडा गावातील कार्य पाहताना मन ११ वर्षांपूर्वीच्या त्या गावभेटीकडे वळले. हा लेख म्हणजे माझ्या त्या अनुभवांचा, शास्त्रीय अभ्यासातून सामाजिक परिवर्तनाकडे झालेल्या प्रवासाचा आणि निसर्ग संवर्धनाच्या एका आत्मीय उदाहरणाचा साक्षात्कार आहे. बारीपाडा केवळ एक जंगल पुनरुज्जीव न प्रकल्प नसून ‘जन-जंगल-जमीन-जल-जनावर’ या पंचसूत्री विकास दृष्टिकोनाचे मूर्त स्वरूप आहे.

नुकताच श्री चैत्रामजी पवार यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. सह्याद्री वाहिनीवर पुरस्कार सोहळा बघताना साध्या पोशाखातील, चप्पल देखील न घातलेल्या चैत्रामजी यांना अत्यंत शांतपणे आपले नम्र स्मित हास्य करत पुरस्कार स्विकारताना बघून एकदम मन आनंदाने भारावून गेले आणि सरसर ११ वर्षापूर्वी मागे धावले. माझा बारीपाडा प्रवास मनाने पुन्हा एकदा करून झाला... मी पाहिलेले बारीपाडा समजून घेण्याच्या आधी मी बारीपाडा का बघायला गेले हे समजणे, विशेषतः ज्यांना भारतात निसर्गपूरक विकास करायचा आहे त्यांना सांगणे खूप जरुरीचे वाटते.


माझी निसर्ग अभ्यासाची सुरुवात २००४ साली ‘रानवा’ संस्थेद्वारे झाली. पहिलीच संधी देवराई विषयावर अभ्यास करण्याची मिळाली. मग सूक्ष्मजीवशास्त्र, जैवविविधता या विषयातील शैक्षणिक पदव्या घेताना महाराष्ट्रातील पूर्ण पश्चिम घाट बघण्याची संधी मिळाली. त्यात भीमाशंकर, कोयना, राधानगरी, कोकणातील फणसाड अशा विविध अभयारण्यांचा जवळून अभ्यास करता आला. अनेक जेष्ठ पर्यावरण तज्ञांकडून शिकण्याची संधी मिळाली. एखादी वनस्पती मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी का असते, वनस्पतीचे चमू कसे तयार होतात, त्यांचा भौगोलिक विस्तार का आणि कोठे होतो, वनस्पतींची जंगलातील एकूण वाढ कशी होत आहे तसेच काही प्रमाणात पक्षी, कीटक यांचा त्याच्याशी कसा संबंध असतो असे बरेच काही शिकणे चालू होते. एकदम शास्त्रीय संशोधन...! पण कधीतरी काही घडते आणि आयुष्यात एकदम वेगळेच काहीतरी करायला मिळते.

तशी संधी मला मिळाली आणि माझी निवड प्रोफेसर माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने स्थापन केलेल्या पश्चिम घाट समिती मध्ये प्रकल्प सहाय्यक म्हणून झाली. त्यामध्ये बऱ्याच जबाबदाऱ्या मला देण्यात आल्या. त्यातील एक जबाबदारी म्हणजे पर्यावरणामध्ये काही बदल घडवून आणणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याची केस स्टडी बनविणे. या प्रकल्पामुळे मी केवळ जंगलांचा अभ्यास सोडून त्या जंगलाबरोबर राहणाऱ्या लोकांना देखील भेटले. आम्हाला जंगल हवे आहे, आम्हाला प्रदूषणकारी प्रकल्प नको अशा मतापासून आमच्या मुलांना नोकऱ्या मिळणार असतील तर आम्हाला प्रकल्प द्या,अशी सगळी मते स्थानिकांनीच मांडलेली अनुभवायला मिळाली. या सगळ्या चर्चेमध्ये कोणते झाड कुठे वाढते वगैरेच्या पलीकडे जाऊन पोटा-पाण्याच्या चर्चा चालू होताना बघून एक लक्षात येऊ लागले की आपण करत असलेल्या संशोधनाला लोकोपयोगी केले नाही तर त्याचा फारसा उपयोग जंगल वाचविण्यासाठी होणार नाही. कोण-कोणत्या माशाच्या प्रजाती कोकणातील खाडीत मिळतात हे समजणे जसे वैज्ञानिक शास्त्रज्ञ म्हणून गरजेचे आहे, त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त कोणत्या प्रजाती वर कोकणातील सामान्य माणसांचे पोट चालू आहे याचा अभ्यास देखील गरजेचा आहे हे लक्षात येऊ लागले. आणि त्याच प्रजातींचा लाखोंच्या संख्येने झालेला मृत्यू अनेक कारणांनी जसे की कारखान्यातील प्रक्रिया न करता सोडले जाणारे विषारी पाणी इ. नी झाला आहे असे प्रॅक्टिकल सह – संबंध लक्षात येऊ लागले. अशा परिस्थितीत विशिष्ट प्रजातीचे मासे कमी होत आहेतच, पण त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना मासेमारीच बंद करणे यापेक्षा वेगळा काही पर्याय आपण देऊ शकणार आहोत का? कोणता पर्याय हा दीर्घकालीन असेल? माणूस आणि निसर्ग संवर्धन असे एकत्र साधता येईल का? आणि या प्रक्रियेत माणूस वेगळा ठेऊन कसे चालेल तो सुद्धा निसर्गाचाच भाग आहे ना? सगळ्या गोष्टींकरिता त्याला दोषी ठरवले तर काहीच साध्य होणार नाही अशी एक समग्र संशोधनाची बाजू यानिमित्ताने प्रकाशात आली. त्यामुळे या अहवालामध्ये माणसाला पण एक महत्वाचा भाग समजून व्यवस्थापनाचे छान पर्याय दिले गेले. परंतु दुर्दैवाने कुठेच त्याची चांगली अंमलबजावणी झालेली अजून तरी दिसत नाही. या अहवालाने माझा निसर्गाकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टीकोन हा केवळ एका विज्ञान शाखेपुरता न राहता त्याला आर्थिक आणि सामाजिक शास्त्राची स्थालानुरूप जोड दिली नाही तर कामाला त्याची व्यवहारातील उपयोजिता मर्यादित राहील आणि लोकांपर्यंत ते काम पोहोचणारच नाही याची जाणीव झाली.

योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात ह्याचा अनुभव मला त्यानंतर लवकरच आला. जनजाती समाजाबरोबर काम करणाऱ्या संस्थांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांचे नैसगिक संसाधन, त्याची माहिती कशी गोळा करावी, त्यातून परिसर आधारित अर्थार्जनाचे पर्याय शोधणे असे समग्र दृष्टीने काम चालू झाले. जल, जंगल, जमीन, जनावर आणि जन अशा पाचही ‘ज’ चा अभ्यास चालू झाला. अनेक सामजिक संस्था ह्या प्रामुख्याने समाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या असतात त्यांना निसर्ग, मग त्याचे संवर्धन व नियोजन शिकविणे हे थोडे आव्हानात्मक काम असते. माझ्यासाठी देखील हा अनुभव थोडा नवीन होता. अशा पद्धतीने जमिनीवर केलेले काम पाहण्याचा माझा अनुभव तसा कमीच होता. याकरिता  प्रवास गरजेचा होता. आणि त्यानिमित्ताने मला धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा ह्या गावात भेट द्यायची सुवर्ण संधी मिळाली. थोडा पूर्व अभ्यास करून मी बसने प्रवास करत धुळे स्थानकावर उतरले. तिकडून साक्रीची बस मग थोडे रिक्षा दोनचाकी असा प्रवास करत बारीपाडा गावात पोहोचले.


बारीपाडा परिसराच्या आसपासच्या भागातून जात असताना मला उघडे पडलेले डोंगरे व झुडूपी रान दिसत होते. मधूनच पानझड होत असलेलली काही सागाची झाडे रस्त्याच्या कडेला दिसली. एखाद्या वड कुलातील झाडाच्या खाली काही दगडांवर चित्रे काढली होती. त्या चित्रांमध्ये डावी-उजवीकडे चंद्र सूर्य वरच्या बाजूला होते आणि मग ती व्यक्ती कशी गेली हे दाखवलेले असायचे. बऱ्याच दगडांवर नागाचा दंश होऊन व्यक्ती गेली हे दाखवले होते. असे सगळे बघत मी बारीपाडाला पोहोचले. जेव्हा बारीपाडा गावात प्रवेश करत होते तेव्हा शेतात काही महिला-पुरुष शेतकरी कांद्याच्या मोळ्या बांधत होते. तिथल्या ओढ्यावरच्या पुलावर थांबून चक्क डिसेंबर महिन्यात वाहते पाणी बघितले. वस्तीवर आल्यावर नुकतेच बांधत असलेले सभागृह बघितले. एका घरी निवासाची सोय केली होती. तिथे जाऊन थोडे चहा वगैरे  पिऊन गाव फिरायला मी बाहेर पडले.


उत्तर महाराष्ट्रात कोपऱ्यात असलेल्या ह्या जनजाती गावात रब्बी पेरणीची तयारी चालू होती. डावीकडे उजवीकडे शेती हिरवी होती. कुठे भाजीपाला होता तर काही ठिकाणी छोट्या पट्ट्यात ऊस देखील होता. नगदी पिक तसेच खाद्य पिके, काही फळे अशाने शेत मस्त हिरवी-पिवळी दिसत होती. माझ्याबरोबर गावातील एक चुणचुणीत मुलगी देखील होती. तिला जंगलाची, शेताची उत्तम माहिती होती. ती मला जंगलात देखील घेऊन गेली. मी वाचलेल्या वर्णनानुसार १९९१ साली ह्या गावातला परिसर एकदम वेगळा होता. अन्नाची कमतरता, पाण्याचा दुष्काळ आणि दारू गाळण्याच्या व्यवसाय हा पैसे मिळवण्याचा प्रमुख स्रोत बऱ्याच घरांसाठी होता. यातून अगदीच थोडे पैसे मिळवायचे. चुलीला जाळण घालायला लाकूड फाटा पण नीट मिळायचा नाही. अशा बेताच्या परिस्थितीपासून सुरुवात करून श्री चैत्रामजीनी लोक सहभागाने आज जवळपास ५०-७० फुट उंचीचे ४५० हेक्टर जंगल वाचवले आहे. त्याचे पुनर्जीवन केले आहे. आपल्या येथील जंगलात जसे टप्पे असतात तसे २-३ टप्प्यात झाडे,झुडुपे,वेल आणि गवताने जंगले छान बहरले होते. गावातील शिकायला बाहेर गेलेली मुले जेंव्हा दिवाळी-उन्हाळी सुट्टीत घरी येतात तेंव्हा त्या मुलांच्या सहभागाने ह्याच जंगलात मृद-जल संधारणाची कामे केली जातात. शहरातील कॉलेजमधील मुले देखील इथे येऊन श्रमदान करतात. मोह,नाणा, ऐन कुळातील झाडे, साग,  अशी पानझड वनातील चांगली ५० -६० फुट उंच झाडे बघून डोळे आणि मन तृप्त झाले. येताना बांधलेले पाझर तलाव बघितले, त्यातले पाणी चाखले देखील. मग शेताच्या बांधावर लावलेली रताळी बघितली. कलिंगड शेतीचा प्रयोग बघितला आणि चैत्रामजीना भेटायला परत गावात गेले.


बारीपाड्याचा हा प्रयोग प्रेरणादायी बनविण्यामध्ये तिथल्या महिलांचा सहभाग देखील विशेष उल्लेखनीय आहे. दर वर्षी ह्या महिला एकत्र येऊन रानभाजी महोत्सव साजरा करतात. जवळपास ९० पेक्षा अधिक रानभाज्या बघण्यासाठी आणि चाखण्यासाठी त्या उत्सवात ठेवलेल्या असतात.

चैत्रामजीनी मला एक वही देखील दाखविली, त्यात गावातील लोक जंगलामध्ये काही क्षेत्रफळाचा दर ३ वर्षांनी अभ्यास करतात त्याची नोंद होती. विज्ञानाच्या परिभाषेत सांगायचे झाले तर एक प्रकारचा तो Long term ecology monitoring plot होता. त्या निश्चित केलेल्या क्षेत्रफळामध्ये किती झाडे आहेत, त्यांची वाढ कशी होत आहे या सगळ्या नोंदी छान तक्ते करून ठेवल्या होत्या.


चैत्रामजी नंतर मला अनेक घरांमध्ये घेऊन गेले. काही घरात धान्याची जुन्या पद्धतीने साठवण करण्याची व्यवस्था पाहायला मिळाली तर काही ठिकाणी शिलाईकामाचे प्रशिक्षण घेतलेला एक तरुण शिलाई करत होता. एका घरी एक अत्यंत वयस्कर असे जोडपे होते. त्या जोडप्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते कधी एकमेकांशी भांडलेच नव्हते इतक्या वर्षात! आता त्यांच्याच पुढाकाराने चैत्रामजी आणि कार्यकर्ते गावातील काही तंटे सोडवतात. त्याच घरात बसून आम्ही गावातील अनेक उत्सवांबाबत चर्चा केली.

दुसऱ्या दिवशी गटचर्चा होती, ज्यानंतर माझा विकास या संकल्पनेकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला. तिथले एक कार्यकर्ते त्यांचा अनुभव सांगत होते. गावातील आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करायला काही अभ्यासक एकदा आले होते. अभ्यासकांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमचे अर्थार्जन कागदोपात्री तरी फारच कमी वाटते, त्यामानाने शहरामध्ये खूप पैसा मिळतो;  मग तुम्हाला शहरात किंवा अन्य ठिकाणी जाऊन पैसे मिळवावे असे वाटत नाही का? त्यावर गावातील व्यक्तीने उत्तर दिले माझी मालमत्ता मोजायची का? तुम्हीच आकडेमोड करा असे त्या अभ्यासकांना सांगितले.  मग आकडेमोड सुरु झाली.. किती कोंबड्या, किती बोकड,किती गुरे,किती जमीन, घर असे सगळे मोजून आकडेमोड चांगलीच मोठी आली. आणि ह्या चर्चेतून माझे देखील डोळे उघडले आणि मनात अनेक विचार पिंगा घालू लागले.  

या गावातील लोकांना एकत्र करून सर्वांच्या सहकार्याने चैत्रामजीनी नुसते जंगल पुर्नजीवन नाही केले तर एक विकासाचा नवीन दृष्टीकोन देखील विकसित केला आहे. जंगल वाचविण्यासाठी नियमावली तयार केली गेली. त्याचे उल्लंघन करण्यावर दंड ठोठावण्यात आला. तर ज्या कुटुंबाकडे जमीन नाही अशा कुटुंबाला पर्याय म्हणून मासेमारी करण्याची परवानगी दिली. जेमतेम एक पीक घेणारे बारीपाडा आज किमान दोन पिके आणि काही ठिकाणी तर तीन वेळा पिक घेत आहे. पाण्याकरता दाही दिशा फिरणारे हे गाव आज आसपासच्या ५-६ गावांची तहान देखील भागवू शकत आहे. तळास जाणाऱ्या विहिरी, डोंगर उतारावरील मृद -जल संसाधारण कामामुळे काही फुटावर पाणी देत आहेत. जंगलातील खाली पडलेल्या काड्यांचा वापर करून बायोमास पेलेट बनविणे , निर्धूर चुली घराघरात पोचविणे, गूळ तयार करणे, मोहाची फुले एकत्र करून विकणे असे अनेक जोड व्यवसाय हे गाव करत आहे. या रूप बदलण्याच्या प्रयत्नांच्या पहिल्या दिवसापासून वनवासी कल्याण आश्रमासारख्या संस्था बरोबर होत्या. जिथे अडचण येईल तिथे साथ दिली गेली. गावातील लोक देखील एकजुटीने उभे राहिले. कुणीतरी आपल्याला मोठ्ठा निधी आणून देईल आणि मग आपला उत्कर्ष होईल याची वाट बघत बारीपाड्यातील लोक बसले नाहीत; तर स्वत:च्या खिशातून पैसे काढून एकत्र येऊन अनेक कामे करण्यात आली. त्यामुळे बदलाचे चक्र हे स्वयंपूर्ण झाले. आणि नुसता आर्थिक स्तर नाही तर गावकऱ्यांचा स्वाभिमान आणि आत्मबल वाढले.


जन, जंगल, जमीन,जल आणि जनावर अशा पंचसूत्री मध्ये हे बारीपाडा नावाचे गाव छान गुंफले गेले आहे. त्याने ठरवलेल्या विकासाच्या वाटेवर हे गाव पुढे जात आहे. चैत्रामजी यांच्या  सारखा एखादा कार्यकर्ता, जो स्वत: उच्चशिक्षित आहे परंतु आपल्या गावाला आपली गरज आहे, सर्व बाजूने विदारक परिस्थिती झालेल्या आपल्या गावाला स्वयंपूर्ण बनवायचे आहे या एकाच ध्यासाने आहोरात्र काम करणारा माणूस क्वचितच अशा प्रवासात मिळतो. माझे भाग्य असे की मला त्यांच्यासोबत थोडेफार का होईना पण काम करण्याची संधी मिळाली. वेगवेगळे आयाम स्थानिक समाजाच्या दृष्टीकोनातून शिकायला मिळाले. सतत सगळीकडे जंगलतोड नसते चाललेली, सतत सगळीकडे पाणी संपलेले नसते; बारीपाडा सारखी काही गावे तुमच्या आमच्याकरता आशेचे बेट होऊन ठामपणे अनेक वादळांना तोंड देत उभी असतात. माझ्याकरता बारीपाडा प्रवास अविस्मरणीय ठरला. माझ्या पुढच्या वाटचालीकरता  त्यातून मी बरेच काही गोष्टी मिळवल्या आहेत.


चैत्रामजी...आम्ही तुमचे खूप ऋणी आहोत! आमच्याकरता हे आशेचे बेट तयार केल्याबद्दल!


 
 
 

1 Comment


Ashwini Khaire
Ashwini Khaire
Jun 16, 2025

वाह अमृता मॅडम, या लेखाबद्दल खूप खूप धन्यवाद ! यातून बारीपाडा गावाचे आणि तेथील पर्यावरणाचे चित्र समोर उभे राहिले. चैत्रामजींच्या या प्रयत्नांतून गावाकडे बघण्याचा एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.

Like

मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page