top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

प्रतिबिंब पाहे बिंबातें

  • 3 days ago
  • 5 min read

विठ्ठल रायगावकर


संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी अध्यात्मातील विविध संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक अनेक दृष्टांत दिलेले आहेत. “प्रतिबिंब पाहे बिंबातें’’ हा असाच एक विज्ञान क्षेत्रातील दृष्टांत आहे. ह्याचा धागा पकडून आपण बिंब आणि प्रतिबिंब या शब्दांच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू या.

आम्हाला लहानपणी दुसरीच्या वर्गात “आरसा हसला आरसा रडला” अशा शीर्षष्घकाचा एक छान धडा होता बालभारतीच्या पुस्तकांमध्ये. तो एक कुणीतरी मुलगा सकाळी उशिरा उठतो आणि पटपट तसंच तोंड न धुता वगैरे कपडे अंगावर चढवतो. केस विस्कटलेले, नाकाला कुठेतरी काळ लागलेलं आणि अशा अवस्थेथिेमध्ये शाळेत निघता निघता आरशासमोर उभा राहतो. त्या वेळेला तो आरसा रडायला लागतो आणि मग त्या मुलाला म्हणतो. बघ, मी कित्ती स्वच्छ आहे आणि तुझ्या अस्वच्छ आणि गलिच्छ अवतारामुळे मला रडायला येतं. मग तो मुलगा अंघोळ करतो स्वच्छ भांग पाडतो. कपडे छान घालतो आणि मग पुन्हा आरशासमोर उभा राहतो. मग मात्र आरसा हसतो आणि त्या ला शाबासकी देतो वगैरे वगैरे.

तुमचे हे लक्षात आले असेलच की आता आपण विज्ञान क्षेत्रातील कोणत्या दालनामध्ये प्रवेश करणार आहोत.

परावर्तन.

बरोबर ना.

चला आपण आता या संदर्भा तली वेगवेगळी उदाहरण प्रथम पाहू आणि मग मुख्य विषयाकडे येऊ. कुठून सुरुवात करू या. आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तिला तसा ऐवतहासिक पुरावा आहेच असे नाही. परंतु पं. जवाहरलाल नेहरूंरूंच्या डिस्कवरी ऑफ इंत्डया या पुस्तकांमध्ये तिचा उल्लेख होता शिवाय एकेकाळी राजस्थान मधल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा ही गोष्ट छापलेली असायची. आजकाल ती अभ्यासक्रमांमधून काढून टाकलेली आहे.

मला तुम्हाला राणी पद्मिनीबद्दल सांगावयाचे आहे. अशी गोष्ट आहे की अल्लाउद्दीन खिलजीला राणी पद्मिनीच्या सौंदर्याबद्दल माहिती मिळाली आणि मग त्याने तिला पाहण्यासाठी म्हणून वेगवेगळे प्रयत्न केले. शेवटी नाईलाजास्तव राणी पद्मिनीचे प्रतिबिंब आरशामधे अल्लाउद्दीन खिलजीला दाखवण्यात आले. आता इथे इतिहासाचा भाग संपतो. ही गोष्ट अशी घडली होती किंवा नाही हा वेगळा अभ्यासाचा विषय होईल. आपल्याला त्या संदर्भात काही बोलायचे नाही. मला जे म्हणायचे आहे ते असे की अल्लाउद्दीनला पद्मिनीचे प्रतिबिंब दिसले. मग राणी पद्मिनीला अल्लाउद्दीनचे प्रतिबिंब दिसले असावे का ?

विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर याचे उत्तर “होय’’ असेच आहे . बरोबर ना.


अशाच आणखी काही गमतीदार गोष्टी आपण पाहणार आहोत. कदाचित तुम्ही “आर्किमिडीजचा मृत्यू किरण’’ ही संकल्पना ऐकली असेल. जवळजवळ 2100 वर्षां पूर्वी आर्किमिडीजने आपल्या सिरॅकोस नावाच्या शहराचे रोमन शत्रूंत्रूंच्या जहाजापासून संरक्षण करण्यासाठी आरशांचा उपयोग केला होता. त्याने अनेक आंतरवक्र आरशांना विशिष्ट पद्धतीने एका रांगेमध्ये जोडले व त्या आरशांच्या रांगेची रचना अशा पद्धतीने केली होती की सूर्यापासून येणारे प्रकाश किरण शत्रूंच्या जहाजावर एकंदरीत एकत्रित होतील. त्यामूळे एकत्रित होणाऱ्या प्रखर उष्णतेमुळे शत्रूंत्रूंचे जहाज पेट घेई. अशा पद्धतीने प्रत्यक्ष युद्ध न करताच त्याने त्याच्या शहराचे रोमन शत्रूत्रूपासून संरक्ष ण केले होते. ही गोष्ट सुद्धा कितपत सत्य आहे हे माहित नाही परंतु त्यातला विज्ञानाचा भाग आपल्या दृष्टीने विचार करण्या सारखा आहे.


बिंब आणि प्रतिबिंब म्हटले की पंचतंत्रातील सिंह आणि सशाची गोष्ट लगेच डोळ्या समोर येते. ती तुम्ही नक्की वाचली असेल. बुद्धीचा वापर करून क्रूर शक्तीचा पराभव करता येतो असा धडा या गोष्टीतून मि ळतो. वनराज सिंहाची भूक शमविण्यासाठी ज्या वेळी बुद्धिमान सशाची पाळी येते त्या दिवशी ससा एक छान युक्ती वापरतो. सिंहाकडे थोडा उशिरा पोहोचतो. त्यामुळे सिंहला राग येतो. पण मग तो ससा अत्यंत नम्रतेने वनराजाला सांगतो की, “महाराज, तुमच्यासारखा दुसरा एक सिंह या जंगलामध्ये आला आहे. चला, मी तुम्हाला दाखवतो’’ आणि मग तो त्या सिंहाला एका पडक्या विहिरीच्या तोंडाजवळ आणतो आणि त्याला सांगतो, पहा महाराज पहा. या गुहेमध्ये तो सिंह लपला आहे. वनराज भरून पाहतो तर त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये त्या वनराजाला आपले स्वतःचेच प्रतिबिंब दिसते. त्याला वाटते खरंच दुसरा सिंह आलेला आहे आणि म्हणून मग त्याला मारण्यासाठी वनराज विहिरीमध्ये उडी घेतो. पडक्या विहिरी मधून त्याला बाहेर येता येत नाही आणि अर्थात चिमुकल्या सशाचा विजय होतो. अशा पद्धतीची ही गोष्ट आहे. म्हणजे शक्ती आणि युक्ती यामध्ये श्रेष्ठ कोण हे सांगण्यासाठी पंचतंत्रामध्ये परावर्तनाच्या नियमाचा उपयोग करून घेतलेला आहे असे म्हणावयास हरकत नाही.



रामायणामध्ये बाल राम चंद्राची एक छान गोष्ट सांगितली जाते. एकदा पौर्णिमेच्या दिवशी बाळ रामचंद्र अयोध्येला त्यांच्या राजवाड्याच्या अंगणामध्ये हातामध्ये चेंडू घेऊन खेळत होता. खेळता खेळता त्याचे लक्ष आकाशातील पूर्ण चंद्राकडे गेले. थोडावेळ त्याला असे वाटले की हा मोठा चेंडू आपल्याला खेळायला मिळाला तर कि ती छान होईल. म्हणून त्याने जागेवरच उड्या मारून त्या चंद्राला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला ते जमेना. म्हणून मग कंटाळून आपल्या कौशल्या मातेकडे धावला. रडायला लागला आणि मातेला म्हणाला. “माते, माते, मला तो आकाशातला मोठा चेंडू खेळायला हवाय. घटकाभर मातेला काय करावे ते सूचेना. मग तिला एक छान युक्ती आठवली. ती घरामध्ये गेली आणि बाल रामचंद्राला त्याच्या चिमुकल्या हातामध्ये सहज पकडता येईल अशा पद्धतीचा हँडल असलेला एक छोटा आरसा घेऊन आली. तो आरसा तिने बाल राम चंद्राचा हातामध्ये दिला आणि त्या आरशामध्ये त्याला चंद्राचे प्रतिबिंब दाखवले. झाले. रामचंद्रला वाटले. तो चंद्र त्याच्या हातामध्ये आलेला आहे आणि मग तो आरसा हातात धरून चद्रांच्या प्रतिबिंबाकडे बघत बघत बाहेर अंगणात पळत गेला आणि खेळायला लागला. आहे की नाही गंमत... बिंब आणि प्रतिबिंबाची...


आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हैदराबादमधील सालारजंग म्युझियम नक्की पाहिला असेल. त्यामध्ये खूप सुंदर सुंदर प्रादर्श आहेत. एका प्रादर्शामध्ये बिंबाच्या पार्श्वभागाचे प्रतिबिंब आरशामध्ये दाखवले आहे. मूर्तिकाराच्या कलेचा हा एक अत्यंत उत्तम नमुना आहे. समोरून पाहिलं तर मान मागच्या बाजूला झुकलेली व छातीचा भाग थोडा पुढे आलेला अशा एका मग्रुर सरदाराची मूर्ती दिसते आणि त्या मूर्तीचा पार्श्वभाग मागच्या बाजूस भिंतीवर लावलेल्या आरशामध्ये दिसतो. गंमत अशी की त्या मूर्तीच्या पार्श्वभागावर त्यांनी एक शालिनीतेने मान झुकलेली, नम्र, अशी एक सुंदर नवयुवती कोरलेली आहे. तिचे प्रतिबिंब त्या आरशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बिंब आणि प्रतिबिंब या संदर्भा तली ती एक उत्तम कलाकृती आहे.


राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेच्या अनेक विज्ञान केंद्रामध्ये एक स्वतंत्र मिरर गॅलरी उभी केलेली आहे. आणि त्यामध्ये बिंब प्रतिबिंबाचे अनेक मजेदार विविध प्रादर्श आपल्याला पाहायला मिळतात. एका प्रादर्शामध्ये तर दर्शकाच्या देहाचा भाग दिसत नाही. फक्त त्याचे डोके प्रेक्षकाला दिसते. मुंबईचे नेहरू विज्ञान केंद्र किंवा तुमच्या जवळच्या विज्ञान केंद्राला जरूर भेट द्या आणि मिरर गॅलरीमधील तसेच इतरही गॅलरीमधील विज्ञान प्रादर्शांची माहिती घ्या.


संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेण्याबद्दल आपणा सर्वांना चांगली माहिती आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सनानंतर चौथ्या शतकापर्यंत इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत येथील दुर्गम कातळामध्ये 29 गुफांमध्ये लेणी कोरण्याचे काम सतत चालू होते.

लेणी कोरताना किंवा रंगकामाचे कार्य करताना अंधाऱ्या गुफांमधे पुरेसा प्रकाश येण्यासाठी परावर्तक पृष्ठभागाचा उपयोग करण्यात आला होता. सूर्याचा प्रकाश गुफेच्या आत मध्ये येण्यासाठी गुफेच्या तोंडावर आरसे किंवा परावर्तक पृष्ठभाग योग्य त्या कोनामध्ये बसवले जात असत. त्यामुळे सूर्याचा लख्ख प्रकाश गुफेच्या आतमध्ये येत असे आणि कारागिरांना मूर्ती काम करणे शक्य होत असे.


चला.

इतकी काही गमतीदार उदाहरण पाहिल्यानंतर आता आपण आरशातील प्रतिबिंबाकडे वळूया. बऱ्याच वेळा काही मंदिरामध्ये आपण पाहिले असेल की तेथील मूर्ती च्या दोन्ही बाजूस आरसे लावलेले असतात. ते एकमेकाला समांतर असतात आणि मग आपल्याला त्या मूर्ती च्या अनंत प्रतिमा दोन्ही आरशामध्ये पाहायला मिळतात. तसेच काही केश कर्तनालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारे दोन आरसे अगदी समोरासमोर एकमेकाला समांतर लावलेले असतात. त्या दोन आरशांच्यामध्ये आपण उभे राहतो त्यावेळी आपल्या अनंत प्रतिमा दिसतात.

असे कसे होते. काय नियम असेल ? आपणास कल्पना आहे का ? दोन आरसे यांच्यामध्ये किती अंशाचा कोन आहे यावरून हे ठरतं, की त्यामध्ये किती प्रतिमा दिसतील. त्याच एक सूत्र आहे

N = ( 360/θ ) - 1

N म्हणजे प्रतिमांची संख्या आणि θ म्हणजे दोन आरशांमधील कोन. म्हणजे समजा दोन आरशांमध्ये जर 90 अंशाचा कोन असेल तर वरील सुत्रा प्रमाणे (360 / 90) -1 = 3 म्हणजे दोन आरशांमध्ये जर 90 अंशाचा कोन असेल तर आपल्याला एकूण तीन प्रतिबिंब म्हणजे प्रतिमा मिळतील आणि ज्यावेळेला दोन आरसे एकमेकाला समांतर असतात त्यावेळेला त्या दोघांच्या मध्ये शून्य अंशाचा कोन असतो म्हणजे (360/0)-1=

त्यामुळे दोन समांतर आरशांच्यामध्ये एखादी वस्तू ठेवली तर तिच्या इन्फानाईट म्हणजे अनंत प्रतिमा मिळतात. ठीक आहे. आता आरसा किंवाआरशासारख्या गुळगुळीत पृष्ठभागावर आपल्याला आपले प्रतिबिंब दिसते. परंतु वर्तमानपत्र, भिंत किंवा अशाच खरबरीत आपणास आपले प्रतिबिंब दिसत नाही.

असे का होते ?

काय असावे याचे कारण. याचे कारण सोपे आणि सरळ आहे. गुळगुळीत पृष्ठभागावरून प्रकाश किरणांचे नियमित परावर्तन होते व खरबरीत पृष्ठभागावरून प्रकाश किरणांचे अनियमित (विसरित) परावर्तन होते. एखाद्या साधकाला स्वतःलाच पाहण्याची दिव्यदृष्टी प्राप्त होते तेव्हा तो स्वतःला विसरून परब्रह्मच होतो.अध्यात्मामधील हे प्रमेय समजावून सांगण्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 18 व्या अध्यायात प्रतिबिंब आणि बिंबाचा दृष्टांत दिला आहे.

हे असो परतोनी मागूते I

प्रतिबिंब पाहे बिंबातें I

तव पाहणे जाऊनी आयीते I

बिंबची होय II

(ओवी 399)

बिंब आणि प्रतिबिंब या संकल्पनांचा प्रकाशकीमध्ये फार मोठा अभ्यास आहे. परंतु सर्वसामान्य वाचकाला या शब्दांची थोडीशी ओळख व्हावी म्हणून हा शब्द प्रपंच उभा केला आहे. माऊलींनी अध्यात्मामधील विविध प्रमेय समजावून सांगण्यासाठी विज्ञानातील अनेक अनेक दृष्टांत सांगितलेले आहेत. आपणही ज्ञानेश्वरी वाचा व अशा प्रकारचे दृष्टांत शोधण्याचा प्रयत्न करा. तसेच इतिहासामध्ये, निसर्गा मध्ये आणि आपल्या आसपास प्रकाशाच्या परावर्तनाची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. ती शोधण्याचा प्रयत्न करा. आकाशामध्ये दिसणारे चंद्रबिंब हे प्रकाशाच्या परिवर्तनाचे एक अत्यंत चांगले उदाहरण आहे. बरोबर ना ? आपणास काय वाटते ? विचार करा आणि लिहा.


(लेखक नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथून शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत)

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page