top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

न चालता सूर्याचे चालणे

  • Dec 23, 2025
  • 6 min read

श्री विठ्ठल रायगावकर


आपल्या सूर्यमालिकेमध्ये एक ग्रह असा आहे की जिथे सूर्य पश्चिमेला उगवतो. शुक्र ग्रह. हो. शुक्र ग्रहावर सूर्य पश्चिमेला उगवतो. पण पृथ्वीवर मात्र पूर्वेलाच उगवतो. हळूहळू वर येतो आणि पश्चिमेला मावळतो. आपण रेल्वेमधून प्रवास करतो त्यावेळेला खिडकीतून बाहेर पाहिले की झाडी मागच्या दिशेने पळताना दिसतात म्हणजे आपण पुढे जात असतो तेव्हा झाडी मागे जातात. अगदी तसंच आहे पृथ्वीच आणि सूर्याच. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. म्हणजेच झाडं जशी एका ठिकाणी स्थिर असतात परंतु आपण गतीमध्ये असल्यामुळे ती आपल्या विरुद्ध दिशेने पळत असल्याचा आपणास भास होतो. त्याचप्रमाणे सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वे कडे फिरते आणि म्हणून आपणास सूर्य पूर्वे कडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. सूर्याच्या समोर पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे क्रमशः पृथ्वीचा पृष्ठभाग सूर्या समोर येतो. परिणामस्वरूप पृथ्वीवर दिवस रात्र होतात. हा झाला पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा गतीमुळे होणारा दृश्य परिणाम. आता आपण थोडा वेगळा विचार करू.

पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. म्हणजे पृथ्वीवरच्या कोणत्याही शहरांमध्ये सकाळी आठ वाजता आपली सावली पश्चिमेला पडते आणि संध्याकाळी पाच वाजता पूर्वी ला पडते. हो ना ? असंच असायला हवं ना ? म्हणजे आपण जम्मू मध्ये असलो तर सकाळी आठ वाजता आपली सावली पश्चिमेला पडेल. तसंच पुण्यामध्ये असलो तरीही सकाळी आठ वाजता सावली पश्चिमेला पडेल आणि सिडनीमध्ये असलो तरीही सकाळी आठ वाजता सावली पश्चिमेला पडेल. हो ना ? पण असं प्रत्यक्षात असत का ?

तर त्याच उत्तर नाही अस आहे.


जी शहर कर्कवृत्त आणि मकर वृत्ताच्या मध्ये आहेत, तिथेच फक्त सावली सकाळी आठ वाजता पश्चिमेला पडेल आणि संध्याकाळी पाच वाजता पूर्वेला पडेल. परंतु जी शहर कर्करेषेच्या पलीकडे उत्तरेकडे असतील त्या शहरांमध्ये सावली नेहमी उत्तरेकडेच पडेल व जी शहर मकररेषेच्या पलीकडे दक्षिण दिशेला असतील त्या शहरांमध्ये सावली दक्षिणेलाच पडेल. म्हणजे जम्मूला तुमची सावली सकाळी आठ वाजता उत्तरेकडे पडते. पुण्यामध्ये ती पश्चिमेकडे पडते. तर सिडनीमध्ये ती दक्षिणेकडे पडते. हे असे का घडते त्याचे कारण असे आहे की पृथ्वी सूर्याभोवती ज्या प्रतलात फिरते त्या प्रतलाशी पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशाचा कोन करतो. परिणाम स्वरूप त्याचे वरचे टोक नेहमी ध्रुव ताऱ्याच्या दिशेकडेच कललेले राहते व त्यामुळे एकाच वेळी पृथ्वीच्या सर्व पृष्ठ भागावर सूर्याची किरणे लंबरूप पडत नाहीत तर ती काही भागावर लंबरुप तर काही भागावर तिरकी पडतात.



पृथ्वीच्या घुर्णन गतीमुळे सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना भासतो. तर सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे सूर्याची एक वेगळीच भ्रामकगती अनुभवास येते. तो कर्कवृत्त व मकरवृत्त या दोन वृत्तामध्ये दोलन करताना भासतो. त्याच्या ह्या आंदोलनास एक वर्षाचा कालावधी लागतो. उत्तरेकडे महत्तम तो कर्कवृत्तापर्यंत जातो आणि दक्षिणेकडे महत्तम तो मकरवृत्तापर्यंत जातो. कर्कवृत्ताकडून मकरवृत्ताकडे घडणाऱ्या त्याच्या प्रवासाला दक्षिणायन तर मकरवृत्ताकडून कर्कवृत्ताकडे घडणाऱ्या त्याच्या प्रवासाला उत्तरायण असे म्हणतात. (उत्तरायण हा शब्द ऐकला की महाभारतातील द्रोणाचार्याची नक्कीच आठवण येते. पहा. हजारो वर्षां पूर्वी घडलेल्या महाभारत काळामध्ये भारतीयाना दक्षिणायन व उत्तरायण या संकल्पनेची माहिती होती.)


कर्कवृत्त ही सूर्याची उत्तरेकडची लक्ष्मण रेषा होते. त्यामुळे दिल्लीमध्ये, जम्मू मध्ये किंवा कर्क रेषेच्या पलीकडे असणाऱ्या शहरांमध्ये तो कधीही डोक्यावर येत नाही. तसेच मकरवृत्ताच्या पलीकडे दक्षिणेच्या बाजूला जी शहर आहेत त्या शहरांमध्ये सुद्धा तो कधी ही डोक्यावर येत नाही म्हणजे मकरवृत्ताच्या पलीकडील शहरांमध्ये आपली सावली नेहमी दक्षिणेकडे पडते. तर कर्कवृत्ताच्या पलीकडील शहरांमध्ये आपली सावली नेहमी उत्तरेकडे पडते. फक्त कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दोन वृत्ताच्या मध्ये असलेल्या शहरांमध्ये आपली सावली सकाळी पश्चिमेला तर संध्याकाळी पूर्वेला पडते. कारण सूर्य नेहमी या दोन वृत्तांच्या मध्येच असतो.


मकरवृत्त व कर्कवृत्त या दोन वृत्तांमधील त्याचे दोलन समजण्यासाठी आपल्याला वर्ष भर त्याचे अप्रत्यक्ष निरीक्षण करावे लागेल. हे कसे करायचे, हे समजण्यासाठी एक उपक्रम मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण एक वर्षा चे होमवर्क आहे. उपक्रम सोपा आहे. पण पूर्ण करण्यास एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो चिकाटीने केला पाहिजे. इतकेच. हा उपक्रम नक्की पूर्ण करा. आणि वेळोवेळी छायाचित्र घेऊन संग्रहण करा. चला. आता काय उपक्रम करावयाचा आहे, ते मी तुम्हाला सांगतो. आपल्या घराच्या पूर्व दिशेला असणाऱ्या खिडकीतून सूर्यप्रकाश आपल्या घरात प्रवेश करतो. आता त्या खिडकीचा जो उभा गज असतो त्याची सावली समोरच्या भिंतीवर पडते. पुढे प्रयोग सोपा आहे. पण प्रयोगाची सरुुवात तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या 22 तारखेपासून करावी लागेल. (कारण 22 सप्टेंबरला सूर्य विषुववृत्तावर असतो म्हणजे पृथ्वीच्या मध्यभागी असतो) सकाळची एक वेळ निश्चित करू. समजा सकाळी नऊ वाजता. खिडकीच्या त्या उभ्या गजाची सावली समोरच्या भिंतीवर ज्या ठिकाणी पडते तेथे खूण करा (पेनाने उभी रेषा त्या ठिकाणी ओढा) आणि तारीख लिहा. त्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसानी ती सावली कुठल्या बाजूला सरकते ते पहा. आणि तिथे खूण करत जा. समजा, सावली दक्षिणेच्या दिशेने सरकत जात आहे. आणि नंतर 22 डिसेंबरला ती जिथे दिसते तिथे खूण करा (या दिवशी सूर्य मकरवृत्तावर असतो) व पुढे निरीक्षण चालू ठेवा. आता आपणास असे दिसेल की ती पुन्हा उत्तरेच्या दिशेने सरकू लागते आणि 22 मार्चला कुठे येते पहा. तर आपणास असे दिसते की 22 मार्चला ती 22 सप्टेंबरला जिथे होते तिथेच येते. म्हणजे पुन्हा सूर्य विषुववृत्तावर येतो, आणि नंतर पुन्हा हळूहळू उत्तरेकडे सरकू लागते. 21 जूनला महत्तम उत्तरेकडे जाते, म्हणजे या दिवशी सूर्य कर्कवृत्तावर असतो, नंतर मात्र ती पुन्हा दक्षिणेकडे सरकू लागते. आणि मग 22 सप्टेंबरला बरोबर एक वर्षांनी पुन्हा ती आरंभ बिंदूवर येते.


आता तुमच्या हे लक्षात आले असेल की सूर्य कर्कवृत्ताच्या पलीकडे उत्तरेकडे अजिबात जात नाही याचाच अर्थ कर्करेषा ही सूर्यासाठी लक्ष्मण रेषा आहे. म्हणजे आपण हा निष्कर्ष काढू शकतो की सूर्य साधारण एका जागी स्थिर वाटला तरी तो एका जागी स्थिर नसतो. आणि गंमत म्हणजे हे त्याचे सरकणे सुद्धा भासमान आहे.


आणखी एक उपक्रम. तुम्ही ज्या शहरात राहता ते शहर कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन वृत्तांच्या मध्ये असेल तर वर्षातून दोनदा सूर्य तुमच्या डोक्यावर येतो. एकदा त्याचे उत्तरायण होते त्यावेळी आणि एकदा त्याचे दक्षिणायन होते त्यावेळी. तेव्हा प्रथमतः तुम्ही तुमच्या शहराचे अक्षांश किती आहेत ते जीपीएस वरून पहा. म्हणजे तुम्हाला तुमचे शहर विषुववृत्तापासून किती दूर आहे हे समजेल. आता विषुववृत्त ते कर्करेषा हे साडे 23 अंशाचे अंतर पार करण्यासाठी सूर्याला तीन महिन्याचा म्हणजे 90 दिवसाचा कालावधी लागतो (22 मार्च ते 21 जून). यावरून व्यवस्थित गणित करा व तुमच्या शहरांमध्ये कोणत्या तारखेला सूर्य डोक्यावर येईल ते शोधून काढा व ती तारीख लक्षात ठेवून त्या दिवशी तुमची सावली तुमच्या दोन पायाच्या मध्ये येते किंवा नाही हे पडताळून पहा.



आता आपण थोडी सूर्याची माहिती घेऊ. किती असतो मोठा आपला सूर्य ? तर बघा. सूर्य एक मोठा डबा समजायचा आणि त्या डब्यामध्ये पृथ्वीरूपी लाडू भरायला सुरुवात करायचे. किती बसतील असे लाडू सूर्यामध्ये ? तर ज्या लाडूचा (म्हणजे पृथ्वीचा) व्यास 12,756 म्हणजे जवळजवळ 13000 किलोमीटर आहे असे 13 लाख लाडू सूर्यरूपी डब्यात बसतील एवढा तो मोठा आहे. त्याच्या व्यासावरती 108 पृथ्वी बसू शकतात. असा हा सूर्य आपणापासून आठ प्रकाश मिनिटाचा अंतरावर आहे म्हणजे सूर्यप्रकाशाला सूर्यापासून निघून पृथ्वीवर यायला तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने प्रवास करून सुद्धा आठ मिनिटांचा कालावधी लागतो.


अन्नालेमा
अन्नालेमा

चला. सूर्याच्या संदर्भातला आणखी एक उपक्रम मी तुम्हाला सांगतो. मुलांनो तुम्हाला कल्पना आहे का, की मधमाशा एकमेकांशी कसा संवाद करतात ? समजा एका मधमाशीला तिच्या इतर मैत्रिणींना हे सांगावयाचे आहे की एका विशिष्ट दिशेला छान सुवासिक फूलं आहेत. तर हा संदेश तिच्या इतर मैत्रिणींना देताना ती एक विशेष प्रकारचे नृत्य करते. आणि त्या नृत्याचा आकार चक्क इंग्रजी आठ या अंकासारखा असतो. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, तर कर्करेषा ते मकर रेषा व परत ह्या सूर्याच्या आभासी मार्गाचा आकार इंग्रजी आठ या अंका सारखाच असतो. (ह्या दोन्ही नैसर्गिक परिदृश्यांचा काही संबंध असेल का ? पहा. शोधण्याचा प्रयत्न करा.) कशी घ्याल याची प्रचिती ? त्यासाठी तुम्हाला वर्षभर पंधरा दिवसातून एकदा सूर्याचे फोटो घ्यावे लागतील. कसे करावे हे? तुमच्याकडे मोबाईल कॅमेरा आहे. काय करायचे? सकाळी साधारण नऊ वाजता पंधरा दिवसातून एकदा प्रत्येक वेळी एका विशिष्ट ठिकाणीच उभे राहून सूर्याचे छायाचित्र घ्यावयाचे. म्हणजे वर्ष भरात साधारणता 24 छायाचित्रं होतील. मग हे सर्व फोटोग्राफ कॉम्प्युटरमध्ये एकाच फ्रेम मध्ये बसवा. पहा तुम्हाला काय दिसतंय. चक्क इंग्रजी आठचा अंक दिसतो. या आकृतीलाच इंग्रजीमध्ये अन्नालेमा असे नाव आहे. पहा आवडेल तुम्हाला. करा हा उपक्रम. पूर्ण वर्षाचा होमवर्क आहे, पण तरीही नक्की करा.


डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर
डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर

मित्रांनो वरील विवेचनामध्ये आपण कर्करेषेचे अक्षांश साडे तेवीस असे सांगितले परंतु वस्तुतः ते 23 अंश 26 मिनिट आणि 43 सेकंद असे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक पद्मश्री डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांनी कर्करेषा आणि शन्यू रेषा यांचा संयोग बिंदू हा उज्जैन जवळ डोगला नावाच्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. हे गणित आणि शंकू यंत्राने सिद्ध केले. आता या गावांमध्ये पद्मश्री डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांच्या नावाची वेधशाळा आहे. ती प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरणावर लक्ष केंद्रित करते. मी स्वतः अनेक वेळा या ठिकाणी गेलो आहे. तेथे असणारे भास्कर यंत्र हे अत्यंत अचूक ठिकाणी स्थापित केले आहे. दरवर्षी 21 जूनला सूर्य बरोबर या यंत्राच्या माथ्यावरती येतो आणि या यंत्राच्या मध्यामध्ये बसवलेल्या पाईप मधून सूर्य किरणे दुपारी बारा वाजता जमिनीवर पडतात. या ठिकाणचे अक्षांश हे 23° 26 मिनिट व 43 सेकंद इतके आहेत. इथूनच कर्करेषा जाते. आपण ज्यावेळी उज्जैनला जाल त्यावेळी नक्की या ठिकाणी भेट द्या.



इयत्ता पाचवी किंवा सहावी मध्ये होतो त्यावेळी भूगोल विषयाचा अभ्यास करताना आम्हाला आमच्या गुरुजींनी कर्करेषेची माहिती सांगितली. तेव्हा पासून मला कर्करेषेबद्दल अत्यंत उत्सुकता व जिज्ञासा होती. नेहमी असे वाटायचे की मला आयुष्यात कधी जमेल का कर्करेषेवर जायला. नेहरू विज्ञान केंद्रातल्या नोकरीमुळे माझे हे काम सोपे झाले. पुढे यथावकाश माझी रिजनल सायन्स सेंटर भोपाळ येथे बदली झाली. भोपाळ पासून कर्करेषा जवळ आहे, हे मला माहीत होते आणि त्यावेळी मग मी असे ठरवले की कर्करेषा कुठे आहे हे शोधून काढायचे आणि त्या ठिकाणी मार्किंग करायचं. त्याप्रमाणे काम सुरू केले. महत्प्रयासाने जीपीएस मिळवला आणि त्याच्या साहाय्याने 21 जून 2002 मध्ये भोपाळापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर भोपाळ ते साची रस्त्यावर 23 अंश 26 मिनिट आणि 43 सेकंद ह्या अक्षांशावर कर्करेषेचे मार्किंग केले आणि आणि छोटा बोर्ड लावला. आता त्या ठिकाणी मध्यप्रदेश सरकारने छान मोनुमेंट तयार केले आहे. अनेक विद्यार्थी , पर्यटक जाता येता कर्करेषेवर थांबतात. आपणासही कधी संधी मिळाली तर आपण जरूर त्या ठिकाणी भेट द्या.


संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनी परब्रम्ह व कर्म करणारा व्यक्ती यांचा संबंध स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरी मध्ये चौथ्या अध्यायातल्या 99व्या ओवी मध्ये “न चालता सूर्याचे चालणे “ या दृष्टांताचा अत्यंत चातुर्याने उपयोग केला आहे. एखादे दृश्य जसे दिसते तसे असतेच तसे नाही, हे त्यांना सांगावयाचे आहे. अनेक वैज्ञानिक गोष्टींचे निरीक्षण करून अध्यात्मिक सिद्धांताचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांचा उपयोग माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये केला आहे.

मित्रांनो, आपण जरूर ज्ञानेश्वरी तसेच इतर संत वांग्मयाचा अभ्यास करा आणि त्यातून अशा पद्धतीचे दृष्टांत शोधून काढा. त्याचबरोबर मी वर लेखात सांगितलेले उपक्रम नक्की करून पहा.

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page