top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र संस्था

  • 5 hours ago
  • 7 min read

अनघा शिराळकर

जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र संस्था ही आपल्या देशातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. मुलभूत जनुकीय जीवशास्त्राचा अभ्यास करून देशातील सार्वजनिक आरोग्य उत्तम कसे राहील या दृष्टीने ही संस्था कार्य करत आहे. मानवी गुणसूत्रांचा झालेला अभ्यास लक्षात घेता वेगवेगळ्या दुर्मिळ व्याधी दूर करण्यासाठी जनुकीय उपचार पध्दती विकसित करणे, वेळोवेळी येणाऱ्या साथीच्या रोगांसाठी कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंचा जनुकीय अभ्यास करून त्यावर प्रभावी औषधोपचार कसे करता येईल या बाबींचा अभ्यास करणे तसेच वेगवेगळे प्राणी आणि दुर्मिळ आजारांच्या जनुकीय बाबी अभ्यासून त्यांची माहिती ठेवणे अशा महत्त्वाच्या बाबी या संस्थेतर्फे करण्यात येतात. कोविड-१९ या आजाराच्या निदानासाठी प्रभावी साधनांची निर्मिती या संस्थेने केलेली होती ज्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करून कोविडचे निदान करणे शक्य झाले होते.


स्थापना

जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटेग्रेटीव्ह बायालॉजी – आयजीआयबी) ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च - सीएसआयआर) अखत्यारीतील जीवशास्त्रात संशोधन करणारी दिल्ली स्थित संस्था आहे. या संस्थेची सुरूवात ११ ऑगस्ट १९७७ रोजी जैवरासायनिक तंत्रज्ञान केंद्र (सेंटर फॉर बायोकेमिकल टेक्नॉलॉजी) या नावाने झाली. डॉ. समीर कुमार ब्रह्मचारी हे या केंद्राचे संस्थापक संचालक होते. या केंद्रात १९९८ साली जनुकीय माहितीचा विशेष विभाग सुरू करून जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र या विषयावरील संशोधनावर भर देण्यात येऊ लागला. अशा प्रकारच्या संशोधनाची नितांत गरज लक्षात घेऊन डॉ. ब्रह्मचारी यांच्या प्रयत्नातून २००२ सा ली या केंद्राचे नाव ‘जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र संस्था (आयजीआयबी)’ असे करण्यात आले. या संस्थेचे कार्य दिल्ली विद्यापीठ परिसर व मथुरा मार्गावरील सुखदेव विहार परिसर अशा दोन ठिकाणांमधून चालू आहे.


उद्दिष्ट

मूलभूत जनुकीय जीवशास्त्राच्या संशोधनातून आरोग्यसेवेसा ठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करून ते सर्वसा मान्य जनता, आरोग्यसेवा व औषधनिर् मिती व्यावसायि क यांच्यापर्यंत पोहोचवणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसा र या संस्थेनी भारताच्या आरोग्यविषयक विशेषतः सार्व जनि क आरोग्य, संसर्ग जन्य आजार, अनुवंशि क विकार इत्यादी महत्त्वाच्या समस्यांवर संशोधन करण्याला प्राधान्य दिले.


नियमित कार्य

आयजीआयबीमधील संशोधन:

  1. जनुकीय व आण्विक औषधे (Genomics and Molecular Medicine

  2. हृदय व श्वसन प्रणालीसंबंधीच्या आजाराचे जीवशास्त्र (Cardiorespiratory Disease Biology)

  3. रासायनिक व प्रणाली जीवशास्त्र (Chemical and Systems Biology)

  4. माहितीशास्त्र व बृहत् विदा (Informatics and Big Data)

  5. एकात्मिक व कार्य शील जीवशास्त्र (Integrative and Functional Biology)

  6. रोगप्रति कारशास्त्र व संसर्ग जन्य आजार जीवशास्त्र (Immunology and Infectious Disease Biology)


या सहा विभागांत चालते. या विभागांमध्ये जिनोमिक्स आणि जिनोम माहितीशास्त्र, लोकसंख्या जिनोमिक्स, सार्वजनिक आरोग्य जिनोमिक्स, जिनोम अनुक्रम, आण्विक औषधे, संसर्गजन्य आजार, जीवशास्त्राचे माहितीशास्त्र व संगणकीय जीवशास्त्र, संरचनात्मक जीवशास्त्र, रासायनिक व प्रणाली जीवशास्त्र या महत्त्वाच्या विषयांवर संशोधन व तंत्रज्ञान विकसित होते.


जिनोम (genome) म्हणजे एखाद्या सजीवाच्या जनुकीय माहितीचा संपूर्ण संच. हा संच सर्व गुणसूत्रांवरील (chromosomes) डीऑक्सिरायबोन्यूक्लिकऍसिडच्या (DNA) किंवा विषाणूंमध्ये रिबोन्यूक्लिक ॲसिडच्या (RNA) स्वरूपात साठवलेला असतो. ही माहिती सजीवांच्या शरीराची रचना, विकास आणि कार्य यांसाठी आवश्यक असते. जिनोमचा सर्वांगानी केलेला अभ्यास म्हणजे जिनोमिक्स (genomics).


जिनोमिक्स हे जीवशास्त्राचे एक विशिष्ट क्षेत्र आहे यामध्ये जनुकांची रचना, त्यांचे स्थान, क्रम, कार्य, प्रकार, विकृती इत्यादींचा सखोल अभ्यास केला जातो. जिनोमिक्समुळे आधुनिक जीवशास्त्रात सजीवांच्या अनेक रोगांची विशेषतः अनुवंशिक रोगांची कारणे शोधणे, जनुकीय विकृती समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे शक्य झाले आहे. आयजीआयबीने भारतातील दुर्मिळ अनुवंशिक आजारांचा सर्वांगीण अभ्यास व संशोधन करण्यासाठी जिनोमिक्सचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग जनुकीय आजारांवरील औषधांच्या निर्मितीसाठी आणि संसर्ग जन्य आजारांसाठी नाविन्यपूर्ण औषधे शोधून काढण्यात ही संस्था अग्रगण्य ठरली आहे.

विशेष कार्य

आयजीआयबीनी ‘जिनोमिक्स फॉर अडं रस्टॅंडिगंरेअर डिसिझेस, इंडिया अलायन्स नेटवर्क (GUaRDIAN)’ हा भारत व शेजारील देशात दुर्मिळ अनुवंशिक जनुकीय आजारांबद्दलच्या माहितीची देवाण घेवाण करणाऱ्या सहकारी वैद्यकीय चिकित्सालयांचा गट (consortium) तयार केला आहे. जिनोमिक्सचा वापर नेहमीपेक्षा वेगळे जनुकीय आजार शोधण्यासाठी व्हावा या उद्देशाने हा गट तयार केला आहे. हा गट अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अनुवंशिक आजारांमधील जनुकीय बदल शोधून आजारांचे अचूक निदान करतो. जनुकीय विविधता समजल्यावर रोग किंवा आजारावर नेमके उपाय करणे सुलभ होते.


अनुवंशिक दुर्मिळ आजारांबद्दलच्या उच्च दर्जाच्या माहितीच्या आदानप्रदानाबरोबरच या गटाच्या चिकित्सालय सदस्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, जागरूकता आणि प्रसार केला जातो. सार्वजनिक आरोग्यसेवे-अंतर्गत रूग्णांना शिफारस करण्यासाठी ‘इंडिजेन (IndiGen)’ हा सर्वसमावेशक कार्यक्रमही राबवला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत विविध वांशिक समुहातील १००० भारतीयांचे संपूर्ण जनुकीय अनुक्रम (genome sequencing) तयार केले आहेत. इंडिजेन कार्यक्रमामध्ये निर्माण झालेला विदा (डेटा) एखाद्या लोकसंख्येमध्ये विशिष्ट एलील (Allele) म्हणजे जनुकांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या किती वेळा आढळतात याच्या संशोधनासाठीचा पाया आहे. एलील हा जनुकाचा एक प्रकार आहे. एखाद्या जनुकाच्या उपलब्ध एलीलपैकी एक विशिष्ट एलील किती टक्के आहे, हे एलीलच्या वारंवारतेमध्ये (फ्रिक्वेन्सी) समजते. ही वारंवारता टक्केवारीमध्ये किंवा दशांश अंकात दर्शविली जाते. या विदांचा उपयोग अनुवंशिक आजारांच्या महामारीसदृश साथींमध्ये होणाऱ्या अनुवंशिक बदलांसंबंधीचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी होतो. अनुवंशिक बदलांच्या वारंवारतेचा अभ्यास त्या त्या काळातील आजारांच्या निदानासाठी व त्यानुसार औषधनिर्मितीसाठी होतो. हा विदा इंडिजेन कार्यक्रमाअंतर्गत संशोधकांना उपलब्ध करून दिला जातो.

श्रीलंका व मलेशिया येथील व्यक्तींचाही जिनोम म्हणजे सर्व अनुवंशिक माहिती याच संस्थेमध्ये शोधण्यात आली. समन्वयाचा अभाव (Ataxia), मेंदू व यकृतामध्ये तांबे जमा होणारा अनुवंशिक विकार (Wilson Disease), अपस्मार (Epilepsy), बौद्धिक अपंगत्व (Intelligence Disability) यासारखे मज्जासंस्थेचे आजार; लाल रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होणारा (Sickle Cell Anaemia) अनुवंशिक रक्तविकार आणि हृदयाच्या ठोक्यातील अनियमितता (cardiac arrhythmias) या आजारांचा ही अभ्यास या संस्थेत केला जातो.

तंत्रज्ञानातील नवकल्पना

सीएसआयआर आणि टाटा ग्रुपच्या शास्त्रज्ञांनी निर्माण केलेली कोविड-१९ या आजाराची चाचणी कागदी पट्टीने करण्याची जलद आणि कमी खर्चाची पध्दत (FELUDA - CRISPR-Cas9 based paper-strip test) आयजीआयबीनी पुढे विकसित केली. फेलुदा हे नाव सत्यजित राय या प्रसिद्ध लेखक व सिनेनिर्मात्याच्या पश्चिम बंगालमधील काल्पनिक गुप्तहेराच्या नावावरुन घेतले आहे. आयजीआयबीने CRISPR/Cas (Clustered Regularly Interspaced Short Palindromic Repeats and CRISPR-associated proteins) यांवर आधारित एक आधुनिक जनुक-संपादन तंत्रज्ञान वापरून पेशींमध्ये सहज विघटन होणारे म्हणजे जैवअपघटनीय (Biodegradable) बहुलके (पॉलिमर्स) आणि विशेष आयनिक द्रव्ये तयार केली आहेत.


आयजीआयबीच्या शास्त्रज्ञांनी पेशींचा एकमेकांशी संवाद आणि अणूंचे मार्ग (molecular pathways) यांचा एकत्र अभ्यास करून कर्करोग, मज्जातंतूंचा क्षय, पेशींचे भवितव्य आणि जखमा भरून येणे यांसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियांबद्दल संशोधन केले आहे. याचा उपयोग वैद्यकीय व औषधनिर्मितीक्षेत्राला झाला. आयजीबीआयने गोड्या पाण्यात आढळणारा हिमालय भागातील स्थानिक झेब्रा फिश (Danio rerio) याचा जनुकीय अनुक्रम शोधून काढला आहे. ही भारतीय वैज्ञानि कांसा ठी अभिमानाची बाब आहे. कारण भारतातील शास्त्रज्ञांनी आत्तापर्यंत फक्त जिवाणू आणि वनस्पती यांचेच जनुकीय अनुक्रम शोधले आहेत.


आयजीआयबीनी प्रणाली जीवशास्त्राच्या अभ्यासासाठी (understanding Systems Biology) संगणकीय साधनांचा विकास केला आहे. यामध्ये जीवशास्त्र, गणित, संगणकीय विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रांना एकत्र आणले आहे, तसेच क्लिष्ट जैविक प्रणालींचे प्रारूप (model) तयार करण्यासाठी आणि त्यांचे विश्लेषण करण्यासा ठी संगणक आणि गणितीय तंत्रांचा वापर केला आहे. याचा उपयोग एखाद्या पेशीचे संपूर्ण जाळे कसे कार्य करते किंवा सजीवाच्या शरीरात विविध अवयव एकमेकांशी कसे संवाद सा धतात याचा अभ्यास करण्यासाठी होतो. तसेच कृत् रिम बुद्धिमत्ता व यंत्र शिक्षण (artificial intelligence and machine learning) यांचा वा पर करून जीवशास्त्राच्या विदांचे विश्लेषण करण्यात मोठे योगदा न दिले जात आहे.

कोविड-१९ च्या संक्रमण काळातील विशेष कामगिरी

कोविड-१९ (Corona Virus -19) या विषाणूच्या जनुकांचा अनुक्रम (SARS-CoV-2 genome sequencing) शोधणारे आयजीआयबी हे भारतातील प्रमुख मध्यवर्ती केंद्र ठरले आहे. कोविड विषाणूंच्या नवीन रूपांचा किंवा प्रकारांचा शोध घेण्यासाठी भारतीय कोविड जनुकीय गटाचे जाळे (Indian SARS-CoV-2 Genomic Consortium – INSACOG network) तयार करण्यामध्ये आयजीआयबी या संस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. या संस्थेतील शास्त्रज्ञांनी कोविड-१९ आजाराच्या निदानासाठी ‘COVIDSure’ या साधनाची निर्मिती केली आहे. या साधनाची भारतात सर्वत्र विक्री होऊन ते मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. यामध्ये आरएनए (RNA) मधून डीएनए (DNA) बनवण्याची प्रक्रिया (Reverse transcription polymerase chain reaction) विकसित केली आहे. सामान्यपणे डीएनए मधून आरएनए बनत असतो ज्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. पण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनच्या प्रक्रियेत हे उलटं होतं म्हणजे यात आरएनएला नमुना (template) म्हणून वापरून डीएनए तयार केला जातो. यामध्ये विषाणूच्या आरएनए जीनोमपासून डीएनए बनवून त्याला यजमान पेशीमध्ये समाविष्ट केला जातो.


कोविड-१९ या साथीच्या आजाराच्या निदानासाठी व जनुकीय बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी महाप्रयोगशाळा (MegaLab) निर्मितीमध्ये आयजीआयबीची महत्त्वाची भूमिका आहे. याचा उपयोग केरळ, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील साथीच्या आजारांचे विज्ञान तसेच जनुकीय अनुवंशिकतेचा अभ्यास करण्यासाठी झाला. आयजीआयबीच्या शास्त्रज्ञांनी भारतात कोविड-१९ या आजाराची परत लागण (Break through infection) झालेल्या रूग्णांची माहिती प्रथम दिली. अशा घटनांमध्ये लसीकरण केलेल्या व्यक्तीला आजाराची लागण होते. यामध्ये लस रोगजनकांविरुद्ध म्हणजचे विषाणूंविरूद्ध पूर्ण प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात अयशस्वी ठरलेली असते. भारतात कोविड-१९ या आजारास कारणीभूत असलेल्या SARS-CoV-2 (I/A3i) या विषाणूचे पूर्वज आणि वंशज (Clade) यांचाही शोध लावण्यात ही संस्था अग्रेसर ठरली आहे. SARSCoV- 2 या विषाणूच्या पुढील संभावित आवृत्त्या शोधण्याची माहितीही आयजीआयबीने जतन करून ठेवली आहे.


कार्य व सेवा यांचा विस्तार

जैवतंत्रज्ञान आणि औषध उद्योग यांच्या सहयोगाने आयजीआयबीने आपल्या संशोधन व तंत्रज्ञान सेवासुविधा पुरवण्यासाठी दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्ली इथे दोन विस्तार केंद्रे चालू केली आहेत. आंतरराष्ट्रीय मानवी जिनोम प्रकल्पात भारताच्या सहभागाचे आयजीआयबीनी नेतृत्व केले. भारतीयांमधील विशिष्ट गटांनुसार जनुकांमधील भिन्नता आणि जनुकीय चिन्हक (genetic marker) यांच्यावर आयजीआयबी सखोल अभ्यास व संशोधन करते. जनुकीय चिन्हकांचा उपयोग विशिष्ट गटांच्या लोकसंख्येच्या उत्क्रांतीचा (evolution) आणि स्थलांतराचा (migration) अभ्यास करण्यासाठी होतो. जनुकांचा सखोल अभ्यास करून दुर्मिळ अनुवंशिक विकृतींवर वैयक्तिक स्तरावरील आवश्यक त्या औषधांच्या निर्मितीमध्ये ही संस्था अग्रगणी ठरली आहे. आयजीआयबीने क्षयरोग (tuberculosis) या आजारात पोषि ता आणि परजीवी त्यांच्यामधील संबंध आणि औषध प्रतिरोधकता (drug resistance) यांच्यावरील संशोधनात भरघोस योगदान दिले आहे.


आयजीआयबीमध्ये आण्विक औषधी अंतर्गत (molecular medicines) दुभंगलेली मनस्थिती म्हणजेच छिन्नमनस्कता (Schezophrenia), मधुमेह यांसारख्या दीर्घकालीन आजारांवर संशोधन कार्य चालू आहे. टाईप २ मधुमेह या आजारामध्ये मज्जापेशी मृत होण्याच्या प्रक्रियेच्या संशोधनात असे दिसून आले की रूग्णांच्या मेंदूत सायक्लिनवर अवलंबून असणाऱ्या कायनेज (Cycling dependent Kinase - Cdk) आणि इतर प्रथिन कायनेज या विकरांची (enzymes) अनियमितता कारणीभूत असते सायक्लिन हा पेशी विभाजनाच्या आवर्तनाला नियंत्रित करणारा प्रथिनांचा समूह असतो. क्षय, दमा, अतिसंवेदनशीलता (allergy), दीर्घकालिक अवरोधी फुप्फुस रोग (Chronic Obstructive Pulmonary Disorder - COPD) असे श्वसनसंस्थेचे आजार, हृदय व रक्तवाहिन्यां मधील समस्या, चेतापेशी हळूहळू मृत झाल्याने होणारे मज्जासंस्थेचे आजार इत्यादींवरही संशोधन केले जाते.


अण्वीय औषधांबरोबरच जैवमाहितीशास्त्र (Bioinformatics) आणि प्रथिनांचा विस्तृत अभ्यास (Proteomics) या विषयांवरही संशोधन चालू आहे. मानवाच्या शरीरात मायक्रो आरएनए, लॉगनॉन कोडींग आरएनए आणि एपिजेनेटिक बदल यांच्या नियामक भूमिका यावर महत्त्वाचे संशोधन आयजीआयबीने केले आहे. नॉन - कोडींग आरएनए हा एक कार्यात्मक आरएनए रेणू असून त्याचे प्रथिनामध्ये रूपांतर केले जात नाही. एपि जेनेटिक बदल (Epigenetic modifications) म्हणजे जनुकांच्या डीएनए क्रमामध्ये कोणताही बदल न करता, जनुकांच्या कार्यप्रणालीत होणारे बदल. या बदलांमुळे जनुके सक्रिय किंवा निष्क्रिय होऊ शकतात. हे बदल डीएनएच्या मूळ अनुक्रमाचा भाग नसले तरी पिढ्यानपिढ्या टिकतात. हे बदल पेशी विभाजनाद्वारे टिकू शकतात. आयुर्वेदिक विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या संस्थेची ओळख करून दिली जाते आणि प्रकृतीनुसार वर्गीकरणाचे विज्ञान याविषयी माहिती दिली जाते.


आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहयोग आणि सेवा

जनुकीय माहिती, जैविक माहिती तंत्रज्ञान, संगणकीय जीवशास्त्र आणि आरोग्य विज्ञान या क्षेत्रात आयजीआयबीनी आंतरराष्ट्रीय सहयोग स्थापन केले आहेत. तसेच या क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती यांच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. ही संस्था जनुकीय माहिती क्षेत्रातील आशियातील प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाते. ही संस्था मुक्त वैयक्तिक जिनोम संघाची (open personal genomics consortium) पण सदस्य आहे. संस्थेतील संशोधनाचा लाभ आरोग्यसेवा, रोग निदान, औषधोपचार, सार्वजनिक आरोग्य इत्यादी क्षेत्रातील उद्योगांबरोबर भागीदा रीच्या स्वरूपात दिला जातो.


सन्मान

आयजीआयबीमधील अनेक शास्त्रज्ञांना भारत सरकारद्वारे दिला जाणारा शांती स्वरूप भटनागर या सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधनासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) याद्वारे दिला जातो. हा पुरस्कार CSIR चे शिल्पकार व पहिले संस्थापक महासंचालक डॉ. शांती स्वरूप भटनागर यांच्या नावाने ओळखला जातो. या संस्थेतील अभूतपूर्व संशोधन व आरोग्यसेवा कार्यासाठी शास्त्रज्ञांना इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. कोविड-१९ या जगभर पसरलेल्या साथीच्या महासंक्रमणाच्या काळात आयजीआयबीनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित केलेल्या संशोधन, तंत्रज्ञान व सेवा यामधील अभूतपूर्व योगदानाची भारत सरकारने दखल घेऊन उचित सन्मान केला आहे.


क्लोनिंगचा यशस्वी प्रयोग

दूध उत्पादनासाठी मुरा जातीच्या म्हशी सर्वोत्तम असतात. आयजीआयबी व आयसीएआर या दोन संस्थांच्या सहकार्याने मुरा जातीच्या म्हशीची अनुवांशिकदृष्ट्या तंतोतंत प्रतिकृती केली. या प्रतिकृतीला क्लोन म्हणतात. एका जीवाची किंवा पेशी, उती या जनुकीय घटकांची हुबेहूब प्रतिकृती करण्याच्या प्रक्रियेला क्लोनिंग म्हणतात. ही प्रक्रिया नसैर्गिकरीत्या अलगिैंक प्रजननात घडते किंवा वैज्ञानिक पद्धत वापरून प्रयोगशाळेत केली जाते. शास्त्रज्ञांनी या म्हशीच्या त्वचा पेशी व शुक्रपेशीपासून भ्रूण तयार केले होते. म्हशीच्या गर्भा शयात हे भ्रूण वाढवले गेले. यातून जन्मलेला रेडा (क्लोन) चाळीस महिने वयाचा झाल्यानंतर त्याच्या शुक्रपेशींची तपासणी केल्यावर असे आढळले की त्याच्या मूळ (आधीच्या) पिढी प्रमाणेच यांच्यातही गुण आढळले. अशा प्रकारे आयजीआयबी भारतीय जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र या क्षेत्रातील संशोधन व ज्ञान यांचा लाभ सर्वसामान्य जनता, रुग्ण, संशोधक, अभ्यासक, औषधनिर्मिती व्यावसायिक इत्यादींपर्यंत पोहोचवण्यामध्ये अग्रेसर ठरली आहे.


(लेखिका निवृत्त वैज्ञानिक अधिकारी - भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था, पुणे )

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page