top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

खेळांत विज्ञान असते का?: एक परिचय

  • 5 hours ago
  • 5 min read

रिद्धी गिरीश जोशी


भारतीय पारंपरिक पटाव रील खेळ (बोर्ड गेम्स- Board Games) ही केवळ मनोरंजनाची साधने नसून त्यांच्यामागे विज्ञान, गणित, रणनीती आणि तार्किक विचारांचा समृद्ध वारसा दडलेला आहे. या लेखात भारतातील बोर्ड गेम्सचा इतिहास, त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व तसेच त्यांच्यामधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिचय करून देण्यात आला आहे. या लेखमालेतील पुढील लेखांमध्ये विविध पारंपरिक खेळांमधील विज्ञानाचा सविस्तर वेध घेण्यात येणार आहे.

भारत ही प्राचीन संस्कृती, समृद्ध परंपरा, दंतकथा, आख्यायिका आणि अशा कितीतरी गोष्टींनी नटलेली भूमी आहे. एका व्यक्तीला एका आयुष्यात या देशात दडलेले सर्व काही जाणून घेणे कधीच शक्य नाही. प्रत्येकाला त्यातील केवळ एक छोटासा भागच माहीत असतो. परिणामी, अनेक पैलू दुर्लक्षित राहतात किंवा मागे पडतात. मात्र, हे सर्व पैलू, मग ते परिचित असोत वा अपरिचित, भारताच्या खोलवर रुजलेल्या तत्त्वज्ञानाचचे प्रतिबिंब आहेत. त्यांच्यापैकीच एक म्हणजे पटावरील खेळ (बोर्ड गेम्स- Board Games). भारतात बोर्ड गेम्स कांस्ययुगापासून खेळले जात आहेत. सिंधू संस्कृतीच्या विविध पुरातत्वीय उत्खननांत फासे, सोंगट्या आणि खेळांचे पट यांचे पुरावे सापडले आहेत. भारतीय साहित्यातील सर्वात प्राचीन ग्रंथ असलेल्या ऋग्वेदापासून ते महाभारत, चरित्रग्रंथ , प्रवासवर्णने इत्यादींमध्ये खेळांचा उल्लेख आढळतो. समाजातील विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरांतील लोक वेगवेगळे खेळ खेळत असत. अशा खेळांची भारताला समृद्ध आणि प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. काही सोंगट्यांचे खेळ भारतात उदयास आले, तर काही इतर देशांतून भारतात आले आणि सर्वच खेळ येथे तितक्याच उत्साहाने खेळले गेले. परंतु, आज आपण ज्या दृष्टीने खेळांकडे पाहतो, त्या दृष्टीने भूतकाळात त्यांच्याकडे पाहिले जात नव्हते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात हे खेळ वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपात खेळले जात असले, तरी ते केवळ विरंगुळ्याचे साधन नव्हते. समाजजीवनात त्यांचे अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. हे खेळ रणनीती आखणे, बौद्धिक विकास, संसाधनांचे व्यवस्थापन आणि हालचालींशी संबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरत होते.



अनादिकालापासून समाजातील विविध स्तरांतील लोकांनी हे खेळ तयार केले, खेळले आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवले. भारताला खेळांची समृद्ध आणि प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. जरी पुरोहित वर्गाला खेळ खेळण्यास परवानगी नव्हती, तरी इतर वर्ण आणि समाजघटकांतील लोक हे खेळ मुक्तपणे खेळत असत. राजघराण्यातील लोकांसाठी मौल्यवान साहित्य वापरून सुबक पटांवर खेळ तयार केले जात, तर सामान्य लोकांसाठी दगड, गोटे, कवड्या, बिया यांसारख्या स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून सोंगट्या बनवल्या जात आणि खेळाचे पट जमिनीवर रेखाटले जात. अनेक पुरातत्त्वीय स्थळांवरील जमिनीवर कोरलेले खेळांचे पट याचा पुरावा देतात. प्रत्येक खेळाला स्वतःचे एक विशेष महत्त्व आणि त्यामागे एक गहन तत्त्वज्ञान होते. प्रत्येक खेळ एखादे विशिष्ट कौशल्य विकसित करण्यास मदत करत असे, जे समाजातील एखाद्या विशिष्ट घटकासाठी उपयुक्त असे आणि म्हणून तो घटक तो खेळ खेळत असे. एखादी व्यक्ती कोणता खेळ खेळेल हे तिचा सामाजिक आणि आर्थिक स्तर ठरवत असे. पटावरील खेळ हे समाजातील बदलांचे द्योतक राहिले आहेत, कारण ते नेहमीच सांस्कृतिक देवाण घेवाणीचा आणि प्रभावी शिक्षणाचा भाग राहिले आहेत. काळानुसार या खेळांचा उद्देश आणि स्वरूप बदलत गेले, तरी आजही त्यांपैकी अनेक खेळ जगभर मोठ्या

प्रमाणावर खेळले जातात.


भारतातील प्रसिद्ध पटावरील खेळांमध्ये चतुरंग, पचीसी, चौपड, मोक्षपट, गंजिफा, मंकळा, नवकंकरी आणि अष्टपद यांचा समावेश होतो. यांपैकी काही नावे अपरिचित वाटू शकतात, परंतु त्यांची आधुनिक रूपे मात्र तुम्हाला निश्चितच परिचित असतील, जसे की बुद्धिबळ (Chess), लूडो (Ludo) आणि सापशिडी (Snakes and Ladders). हे खेळ जीवनपद्धतीचाच एक भाग होते आणि त्यांना सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच वैज्ञानिक असे अनेक पैलू होते. प्रत्येक खेळाचे नियम आणि खेळण्याची पद्धत वेगळी असली, तरी प्रत्येक खेळ इतिहास, संस्कृती आणि वैज्ञानिक विचार यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण संगम दर्शवतो.


पण या पारंपरिक पटावरील खेळांमागे नेमके विज्ञान काय आहे?

आज “विज्ञान” हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर प्रयोगशाळा, प्रयोग, समीकरणे किंवा तंत्रज्ञान उभे राहते. परंतु, विज्ञान यापेक्षा खूप व्यापक आहे. मुळात विज्ञान म्हणजे निरीक्षण करणे, समजून घेणे आणि समस्यांचे निराकरण करण्याची एक पद्धत होय. विज्ञान ही एक पद्धतशीर, तर्कशुद्ध आणि विवेकनिष्ठ विचारप्रक्रिया आहे. तार्किक विचार करणे, विविध आकृतिबंध ओळखणे, निर्णय घेणे, परिणा मांचा अंदाज बांधणे आणि अनुभवातून शिकणे ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. आपल्या पूर्वजांनी खेळलेल्या पारंपरिक खेळांमधून ही सर्व गुणवैशिष्ट्ये नकळत जोपासली जात होती. पहिल्या दृष्टीक्षेपात पटावरील एखादा खेळ म्हणजे केवळ चौकटी, सोंगट्या आणि नियम यांचा संग्रह वाटू शकतो. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक खेळ ही अत्यंत काळजीपूर्वक रचलेली एक प्रणाली असते. तो खेळाडूला विशिष्ट मर्यादांमध्ये राहून खेळायला, आकृतिबंध ओळखायला, विविध कृतींमुळे वेगवेगळे परिणाम कसे घडतात हे समजून घ्यायला आणि योग्य निर्णय घ्यायला शिकवतो. विज्ञान ज्या पद्धतीने कार्य करते, त्याच्याशी हे अत्यंत साधर्म्य दर्शवते. प्रत्येक पारंपरिक पटावरील खेळ अत्यंत विचारपूर्वक तयार करण्यात आला होता. सोंगट्यांची हालचाल ठरावीक नियमांवर आधारित होती. खेळाडूंना निरीक्षण करावे लागे, लक्षात ठेवावे लागे, गणित मांडावे लागे, प्रति स्पर्ध्याच्या पुढील चालीचा अंदाज घ्यावा लागे आणि योग्य चाल कोणती हे ठरवावे लागे. काही वेळा त्यांना स्वतःच्या कौशल्यावर अवलंबून राहावे लागे, तर काही वेळा अनिश्चितता आणि नशिबाचा स्वीकार करावा लागे. नियोजन आणि संभाव्यता यांतील हा समतोल या खेळांना केवळ मनोरंजकच नव्हे, तर बौद्धिकदृष्ट्याही समृद्ध करणारा ठरवत असे.


वेगवेगळ्या खेळांमुळे वेगवेगळी कौशल्ये विकसित होतात. काही खेळ रणनीती आखण्याची क्षमता आणि दीर्घकालीन नियोजनाला प्रोत्साहन देतात, तर काही मोजणी, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतात. काही खेळांमधून मर्यादित साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करण्याचे प्रशिक्षण मिळत असते, तर काही संयम, सहकार्य आणि निर्णयक्षमता विकसित करतात. मुले खेळताना नकळत ही अनेक कौशल्ये आत्मसात करत असत. त्यांना हे जाणवतही नाही की ते गणित, तर्कशास्त्र आणि समस्या सोडविण्याची कला देखील शिकत आहेत. प्रौढांसाठीही हे खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते, तर बुद्धीला चालना देणारे आणि सामाजिक नाती अधिक दृढ करणारे माध्यम होते.


पारंपरिक खेळ त्या खेळणा ऱ्या समाजघटकांच्या व्यवसायांचेआणि जीवनशैलीचेही प्रतिबिंब होते. व्यापारी वर्गामध्ये लोकप्रिय असलेल्या खेळांमध्ये गणित आणि नियोजन यांना महत्त्व असे. योद्ध्यांशी संबंधित खेळ रणनीती आणि डावपेचात्मक विचारांना चालना देणारे होते. कृषिप्रधान समाजात बिया किंवा कवड्या मोजण्यावर आधारित खेळ विकसित झाले. त्यामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या स्थानिक वस्तूंचा वापर केला जात असे. अगदी खेळांचे पटदेखील माणूस आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरातील निकटचा संबंध दर्शवतात. अनेक ठिकाणी मंदिरांच्या फरशीवर, अंगणात, दगडी पृष्ठभागावर किंवा घरांच्या ओट्यांवर हे पट कोरलेले आढळतात, ज्यामुळे लोक जेव्हा एकत्र जमत तेव्हा सहजपणे खेळ खेळू शकत. या खेळांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हण जे ते दैनंदिन जीवनापासून वेगळे नव्हते. सण, कौटुंबिक समारंभ, गावसभा आणि धार्मिक प्रसंगी हे खेळ खेळले जात. त्यामुळे विविध पिढ्यांतील लोक एकत्र येत आणि त्यांना विचार, मूल्ये आणि अनुभव यांची देवाण घेवाण करण्याची संधी मिळत असे. लहान मुले मोठ्यांना खेळताना पाहून शिकत आणि कोणत्याही औपचारिक शिक्षणा शिवाय ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचत असे. अशा प्रकारे, वर्गखोल्या आणि पाठ्यपुस्तके सर्वसामान्य होण्याच्या कितीतरी आधी खेळ हे शिक्षणाचे एक प्रभावी माध्यम बनले होते. आधुनिक वैज्ञानिक संशोधनाने देखील हे सिद्ध केले आहे की बोर्ड गेम्समुळे स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, तार्किक विचारशक्ती, अवकाशीय आकलन आणि भावनिक बुद्धिमत्ता विकसित होते. हे खेळ खेळणाऱ्यांना पुढील विचार करण्यास, विविध शक्यतांचे विश्लेषण करण्यास आणि बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्यास प्रोत्साहित करतात. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात हीच कौशल्ये अत्यंत आवश्यक मानली जातात. विशेष म्हणजे, आपल्या पारंपरिक खेळांनी ही कौशल्ये शतकानुशतके विकसित केली आहेत. दुर्दैवाने, यांपैकी अनेक खेळ हळूहळू दैनंदिन जीवनातून लुप्त होत आहेत. मोबाईल फोन, दूरदर्शन आणि डिजिटल मनोरंजनामुळे एकेकाळी कुटुंबे एकत्र येऊन खेळत असलेले पारंपरिक अंगण आता मागे पडले आहे. परिणामी, आपण केवळ हे खेळच गमावत नाही आहोत, तर त्यांच्यामध्ये जपलेली ज्ञानपरंपरा, मूल्यव्यवस्था आणि वैज्ञानिक विचारसरणी देखील हरवत चालली आहे. या लेखमालेत आपण भारतातील काही अत्यंत रंजक पारंपरिक बोर्ड गेम्समध्ये दडलेली वैज्ञानिक तत्त्वे जाणून घेणार आहोत. प्रत्येक लेखात एका खेळाचा सविस्तर अभ्यास करून तो गणित, रणनीती, स्मरणशक्ती, संभाव्यता, निरीक्षण आणि तार्किक विचार यांसारखी कौशल्ये कशी विकसित करतो हे पाहणार आहोत. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या खेळांकडे पाहिल्यास ते केवळ मनोरंजनाची साधने नसून भारताच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक वारशाची उत्कृष्ट उदाहरणे आहेत, हे लक्षात येते. आजही त्यांचे महत्त्व तेवढेच कायम आहे.


(लेखिका या क. जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इतिहास विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका आहेत. भारतीय सांस्कृतिक वारसा, पुरातत्त्व, खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक भारतीय खेळांचा इतिहास हा त्यांच्या अभ्यासाचा प्रमुख विषय असून त्या या विषयांवर नियमित संशोधन, लेखन आणि व्याख्याने देतात.)

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page