क्लोन
- smsrushtidnyan
- 1 day ago
- 9 min read
डॉ. रंजन गर्गे

गेल्या महिन्या भरापसून ‘बर्थ पॉड हॉस्पिटल’ मध्ये कामाचा ताण चांगलाच वाढला होता. जवळ जवळ १५० बर्थ पॉड्स वेगवेगळ्या वेळी बालकांना जन्म देणार होते. गेली सहा महिने अंतराळवीर अपर्णा श्रेष्ठी या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ‘फ्रेंडशिप’ मध्ये मोहिमेवरच होत्या. अत्यंत साहसी अशा या अंतराळ वीरांगनेने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत हे आगळं वेगळं असं क्षेत्र निवडलं होतं. श्रेष्ठी यांनी त्यांची मैत्रीण आणि गायनाकॉलॉजिस्ट डॉ. आर्या यांना आपल्या ‘स्तन पेशी’आणि ‘कातडीच्या पेशी’ फ्रेंडशिप मोहिमेवर निघण्यापूर्वीच देऊन ठेवल्या होत्या. क्लोनिंग प्रोसीजर पूर्ण झाली होती. एका प्लॅस्टिकवजा लवचिक काचेच्या नलिकेत द्रवरूप पोषण द्रव्यांच्या मिश्रणात गर्भ चांगलाच आकार घेत होता. हाच तो बर्थ पॉड. एका स्टँड वरती पाच फुट उंचीवर तो गर्भाशयासारखा भासत होता. कृत्रिम गर्भाशयच ते !

अगदी गर्भाशयासारख्याच लवचिक आणि मांसल असलेल्या त्याच्या भिंती गर्भाच्या वाढीमुळे फुगलेल्या दिसत होत्या. पारदर्शक काचेमुळे आत काय चाललं आहे हे बाहेरून दिसत असलं तरी गर्भाला मात्र आपण गर्भाशयातील नैसर्गिक वातावरणासारखे एखाद्या अंधाऱ्या गुहेत आहोत असंच वाटावं अशी ‘एक मार्गी काचेची’ व्यवस्था केली होती. प्रत्येक पॉड हा एकेका हयुमेनोईडच्या देखरेखीखाली होता. हे मानवसदृश अँडरॉईड्स होते. श्रेष्ठींच्या कातडीच्या पेशींपासूनच या अँडरॉईड्सला कातडीचं आवरण चढवण्यात आलं होतं. या अँड्रॉइडसच नाव होतं ‘सोफिया’. ‘मानव अँड्रॉइडस प्रशिक्षण केंद्रात’ सहा महिन्यांचं रुग्णसेवेचं प्रशिक्षण घेऊन ती नुकतीच ‘बर्थ पॉड 'हॉस्पिटल’मध्ये रुजू झाली होती. हुबेहूब एखादी परिचारिका शोभावी, बघितल्यावर डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. दिसायला, वागायला, चालायला, केशभूषा अगदी अपर्णा सारखी.

जणू ‘सोफिया’ च्या रूपात प्रत्यक्ष 'अपर्णा' च अवतरली होती. हीच बाळाची देखभाल करणार होती. कॅमेरा ‘BP008’ या पॉड वरती केन्द्रित करून ठेवला होता जेणे करून अपर्णा स्पेस स्टेशन मधून बाळाची प्रगती बघू शकेल. पॉडच्या या नावाचा अर्थ होता ‘बेबी पॉड आठ क्रमांकाचे आहे .सातवा महिना चालू होता. नेहमीप्रमाणे पॉडची पहाणी करत असतांना ‘सोफिया’चं लक्ष संगणकाच्या पडद्यावर गेलं आणि एकच गोंधळ उडाला. लाल दिवा लुकलुकत होता. काहीतरी गडबड झाली होती. संगणकाने गर्भातली विकृती ओळखली होती. डॉ. आर्या यांना स्वयंचलित निरोप मिळताच त्या तिथे हजर झाल्या होत्या. ‘ओह ! समथिंग वॉज ऍबनॉर्मल! फिजिकल विकृती तर दिसत नाहीये.’ डॉक्टर आर्या अस्वस्थ होत्या. रात्र वैऱ्याची होती !
डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं. ‘रात्रीच्या अंधारात मी आकाशाकडे डोळे लाऊन बसले होते. ते स्पेस स्टेशन मला सतत खुणावत होतं. बालपणापासूनची मैत्रीण म्हणून मोठ्या विश्वासाने अपर्णाने क्लोनिंग तंत्राने बाळ होणं शक्य आहे का म्हणून मला विचारणा केली होती. मीच तिला पॉड बेबीचा पर्याय सुचवला होता. गेल्या १० वर्षांच्या तुलनेत अलीकडे जोखीमेची कामं करणाऱ्या महिला पॉड बेबीचा पर्याय प्राथमिकतेने निवडायला लागल्या होत्या. अंतराळवीर, हेरगिरी, शोध प्रवासी या क्षेत्रात कारकीर्द करणाऱ्या महिला या पर्यायाकडे मोठ्या प्रमाणात वळू लागल्या होत्या. अपर्णाचीतर गोष्टच वेगळी होती. एका कार अपघातात तिचं गर्भाशय काढून टाकावं लागलं होतं. परंतु आई होण्याच्या दुर्दम्य इच्छेपोटी तिने क्लोनिंगचा पर्याय नि वडला होता. या गर्भाला अस्वाभाविक अशी विचित्र लक्षणे दिसताहेत! कुठून आली असेल ही विकृती ? क्लोनिंग तंत्रातली त्रुटी म्हणायचं की अपर्णाचं वय ? अपर्णाचं वय सुद्धा बरंच झालं होतं. ४५ वर्षांची होती ती. .......वयामुळे तर ही विकृती निर्माण झाली नसावी?...... कसं सांगू मी अपर्णाला हे सगळं...... नकोच सांगायला, ती तिच्या फ्रेंडशिप मध्ये चाललेल्या संशोधन कार्यापासून विचलित होईल...... पण मेडिकल आचार संहिते नुसार आईला असं अंधारात ठेऊन तरी कसं चालेल ?...... अशा या दोलायमन परिस्थितीत रात्रभर माझा डोळ्याला डोळा लागला नव्हता. मी चांगलीच अस्वस्थ झाले होते...... फ्रेंडशिपमध्ये मोठ्या पडद्यावर अपर्णा नेहमीच पॉड बेबीला भेट देत असते. गर्भाची वाढ उत्तम प्रकारे होते आहे म्हटल्यावर तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्या अर्भकाचे शंभरेक फोटो तरी तिने समाज माध्यमांवर टाकले होते. क्लोनिंगच्या यशाने माझं देखील उर भरून आलं होतं...... पण आता या विकृतीचा सामना मी कसा करू ?’
नकारात्मक विचारांच्या वादळाने आर्याच्या मनात थैमान घातलं होतं.
***
डॉक्टर आर्याला अपर्णाशी झालेली पहिली भेट आठवली. ‘हॅलो ,मी अपर्णा श्रेष्ठी बोलते आहे. मला डॉक्टर आर्या यांच्याशी बोलता येईल का ?’ ‘यस, मी आर्या बोलतेय, अगं अपर्णा, तब्बल ३० वर्षांनंतर मी तुझा आवाज ऐकते आहे. आपण मॉडर्न स्कूलच्या मैत्रिणी होतो. तुझ्या वडिलांची बदली झाली आणि नंतर करीयरच्या धामधुमीत ३० वर्षं कशी निघून गेली समजालं सुद्धा नाही. ये अगं, संध्याकाळी ये. गप्पा मारू. आणि नंतर जेवूनच जा.’ ‘छान वाटलं तुझाशी बोलून. संध्याकाळी भेटू.’
[दोघीजणी संध्याकाळी क्लिनिकमध्ये भेटतात]
‘अपर्णा , सध्या तू काय करतेस?’ ‘मी एक अंतराळशास्त्रज्ञ आहे. 'ऍस्ट्रोबायोलॉजिस्ट’ . फ्रेंडशिप या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर मी वेळोवेळी जात असते. गेले म्हणजे दीड वर्ष तेथेच असते. आता १५ दिवसात मोहिमेवर निघायचंच आहे.’ ‘ग्रेट, चांगलीच धाडसी आहेस !
बरं मला सांग कशी आठवण केलीस आज ?’
‘हे बघ आर्या , मी अविवाहित आहे. दोन वर्षांपूर्वी एका कार अपघातात मला माझे गर्भाशय गमवावे लागले. पण मला आई व्हायची खूप इच्छा आहे. मला एक छानसं बाळ हवं आहे. अगदी माझ्या हाडा मांसाचं.’
‘तुमच्या सारख्या अंतराळवीर, उत्खनन संशोधक, गिर्या रोहक, दर्यावर्दी अशा महिलांना व्यवसाय आणि कुटुंब यांची सांगड घालणं नेहमीच जड जातं. तुझ्या बाबतीत तर तू गर्भाशय सुद्धा गमाऊन बसली आहेस. अशा परिस्थितीत मला असं वाटतं की ‘बर्थ पॉड’ हा उत्तम पर्याय आहे. माझ्याकडे ‘आर्टीफिशीयल वूम्ब फॅसीलिटी’ आहे. यालाच ‘वूम्ब आऊटसाईड वूमन’ असंही म्हणतात.’
‘म्हणजे नेमकं काय ?’
‘म्हणजे असं की स्त्री बीज किंवा पुरुष बीज हे एखाद्या अनोळखी व्यक्ती कडून दान न घेता तुझ्याच पेशींपासून क्लोनिंग पद्धतीने एका कृत्रिम गर्भाशयात तुझा गर्भ वाढवला जाईल. या कृत्रिम गर्भाशयाला ‘पॉड’ असं म्हणतात.’
‘पण, हे सगळं सुरक्षित असतं ना ?’
‘हे बघ अपर्णा , हे सगळं सुरक्षित असलं तरी गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची एखादा टक्का शक्यता ही तर नैसर्गिक गर्भधारणेत सुद्धा असतेच. पण सध्या हे मानवी क्लोन तंत्रज्ञान प्रमाणित पद्धतीने विकसित करण्यात आलं आहे.’
‘आर्या , पण हे नेमकं तुम्ही कसं करता ते सांगू शकशील का ?’
‘हे बघ, याच्या साठी तुला तुझ्या स्तन पेशी आणि कातडीच्या पेशी दान कराव्या लागतील. अर्थात तुझी परवानगी असल्यास ! यात प्रथम तुझ्या कातडीच्या पेशीतून त्याचं केंद्रक काढून टकलं जातं आणि ती पेशी रिकामी केली जाते. नंतर तुझ्या स्तन पेशीतलं केंद्रक स्तनपेशीतून वेगळे केलं जातं. हे केंद्रक रिकाम्या कातडीच्या पेशीत प्रस्थापित केलं जातं. म्हणजे आता एक हायब्रीड पेशी तयार होते. या हायब्रिड पेशीला एक हलकासा विद्युत धक्का देऊन एका काचेच्या बशीतल्या द्रवात सम्मिलीत करण्यात येतं. आता ही नव्याने तयार झालेली पेशी मूळ गर्भपेशी म्हणून कार्य करते, ज्याला ब्लास्टोसिस्ट असं म्हणतात. हा १० पेशींचा अत्यंत वेगाने वाढत जाणारा गोळा असतो. एका प्लॅस्टिकवजा लवचिक काचेच्या नलि केत द्रवरूप पोषण द्रव्यांच्या मिश्रणात हा गर्भ प्रस्थापित करण्यात येतो. हाच तो बर्थ पॉड, म्हणजे कृत्रिम गर्भाशय.’
‘यस डॉक्टर, हे सगळंच अद्भुत आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी तयार आहे. माझ्याकडे फक्त १५ दिवस आहेत डॉक्टर. कधी सुरू करायची प्रोसीजर ?’
‘ठीक आहे, उद्या तुझ्या काही तपासण्या करून घेऊ. सगळं ठीक असेल तर जेनेटिक्स विभागात जाऊन तुला स्तन पेशी आणि कातडीच्या पेशी दान कराव्या लागतील. काही सम्मती दर्शक कागदपत्रांवर स्वाक्षरी कराव्या लागतील.’
‘आर्या , मी तुझी खूप आभारी आहे. निघते आता.’
‘अग ! नि घतेस कुठे ? चल जेवण करून जा .’
***
आजची सकाळ फारच लगबगीची होती. अनुभवानुसार माझा असा अंदाज होता की गर्भाच्या पेशींची वाढ होत असतांना क्लोनमध्ये काहीतरी जनुकीय विकृती उत्पन्न होऊ शकते. आणि म्हणून मला आता डीएनए तंत्रज्ञ डॉक्टर राधा यांच्याशी चर्चा करायला हवी.
‘हॅलो राधा, मी डॉक्टर आर्या बोलते आहे. पॉड क्र. ८ मध्ये काहीतरी विकृती निर्माण झाल्याचे संकेत संगणकाने दिले आहेत. ११ वाजेपर्यंत आलात तर चर्चा करता येईल.’ – आर्याला आता लवकरात लवकर विकृती काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा झाली होती. ‘डॉक्टर आर्या, मी दुपारी ३ वाजता भेटते. मला प्रत्यक्ष बघावं लागेल आणि मायक्रोस्कोप खाली काही निरीक्षणे ही करावी लागतील.’ - राधा उत्तरली.
[डॉक्टर राधा आणि त्यांचे तंत्रज्ञ सूक्ष्मदर्शकाखाली काही चाचण्या करतात.]

‘ही ‘डाउन सिण्ड्रोम’ नावाची जनुकीय विकृती आहे. सामान्य परिस्थितीत प्रामुख्याने पेशींची वाढ होत असतांना प्रत्येक पेशीत क्रोमोसोमच्या २३ जोड्या निर्माण होतात. म्हणजे एकूण डीएनएचे ४६ धागे. परंतु या असामान्य परिस्थितीत क्रोमोसोम नंबर २१ मध्ये बाधा निर्माण होते. म्हणजे हा क्रोमोसोम २ धाग्यांच्या ऐवजी तीन धाग्यांचा बनतो. याचाच अर्थ असा की प्रत्येक पेशीत डीएनएचे ४७ धागे आढळून येतात. हा तिसरा धागा क्रोमोसोम नंबर २१ ला चिटकू नये म्हणून ‘क्रिस्पर’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही विकृती बरी करता येऊ शकते.’
आर्याला हे ऐकून खूप हलकं वाटलं.
डॉक्टर राधा यांनी त्वरित बाळाची गर्भजल परीक्षा क्रयो-इलेक्ट्रॉन मायक्रो स्कोपच्या सहाय्याने करून क्रोमोसोम – २१ चा नेमका कुठला भाग बाधित आहे हे स्कॅनर च्या सहाय्याने निश्चित केलं. ‘यस......, लोकेशन मिळाली आहे. क्रोमोसोम क्र. २१ वरच्या १७ जनुकांची एक मालिका बाधित झाली आहे. क्रोमोसोम क्र. २१ च्या सिक्वेन्स नकाशात लोकेशन स्पष्ट दिसते आहे. या साठी आपल्याला ‘बायोब्रिक्स बँक’चे संचालक डॉक्टर निहार यांच्याशी बोलावं लागेल. ते बायोइन्फोर्मेटीशीयन आहेत. डेटा स्कॅन करून डाउन सिंड्रोम दरूुस्ती साठी लागणारी ‘बायोब्रिक्स’ उपलब्ध आहे की नाही हे ते सांगू शकतील !’- राधाने विकृती नेमकी शोधून काढली होती.
‘हे ‘बायोब्रिक्स’ तंत्रज्ञान म्हणजे काय ?’ आर्या ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. ‘बाधित झालेल्या जिनोम सिक्वेन्सची प्रमाणित केलेली सशक्त प्रत म्हणजे बायोब्रिक्स. विविध रोगांनी उदा. कॅन्सर, स्नायू शिथिलीकरण, स्मृतिभ्रौंश, मधुमेह यांनी बाधित झालेल्या जिनोम सिक्वेन्स च्या सशक्त प्रती या बँकेत जतन करून ठेवलेल्या असतात. बाधित भाग काढून टाकून बायोब्रिक्सचं आपल्याला क्रोमोसोम क्र. २१ वरती रोपण करावं लागेल.’- राधाने नेमक्या शब्दात आर्याची शंका दूर केली.
‘ओ के, मी आता डॉक्टर निहार यांच्याशी बोलते.’ असं म्हणून राधाने निहारला फोन लावला.
‘हॅलो, मी डॉक्टर राधा बोलते आहे.’ ‘यस , डॉ. निहार बोलतोय ‘बायोब्रिक्स बँक’मधून. ‘डाउन सिण्ड्रोम’ ची केस आहे. क्रोमोसोम क्र. २१ वरती १७ जनुकांची मालिका बाधित झाली आहे. मी डीएनए सिक्वेन्स नकाशा पाठवते. हा बाधित तुकडा बदलण्यासाठी ‘बायोब्रिक्स’उपलब्ध आहे का ?’
‘मी डेटा बघून सांगतो.’- असं म्हणून डॉक्टर निहार पाठवलेला डीएनए सिक्वेन्स नकाशा बारकाईने तपासतात. ३० मिनिटांनी राधला फोन करतात. ‘यस मॅडम , या जिनोम सिक्वेन्सचा तंतोतंत ‘बायोब्रिक्स’ तयार करायला कमीतकमी ७ दिवस लागतील. साचा तयार आहे, सिक्वेन्स तयार करावा लागेल. ‘क्रिस्पर’ तंत्रज्ञानाने तो बाधित सिक्वेन्स बदलावा लागेल. परंतु यात फक्त ५०% यशाची खात्री देता येते.’ ‘ठीक आहे, तुम्ही प्रोसीजर सुरू करा.’ ‘यस मॅडम , आय नो दि इमर्जन्सी, मी दोन तासात काही इतर चाचण्यांसाठी ‘बर्थ पॉड हॉस्पिटल’मध्ये पोहोचतोच.’
डॉक्टर निहार त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. ‘डॉक्टर, आपण नेमकं काय करणार आहात ?’ – आर्या यांचा जेनेटिक्स हा विषय नसल्यामुळे यांनी डॉक्टर निहार यांना विचारलं. ‘आता असं बघा. बायोब्रिक्स म्हणजे विशिष्ट सशक्त जणूकांचा तयार सिक्वेन्स. या जनुकांच्या सशक्त अशा तयार सिक्वेन्सचं बाधित भागावर रोपण करावं लागणार आहे. हे रोपण करत असतांना तीन जनुकीय तुकडे नाळेच्या मार्फत गर्भात सोडावे लागतात. एक तुकडा बाधित भाग शोधून काढण्याचं काम करतो. याला जनुकीय शोधणी किंवा जेनेटिक प्रोब असं म्हणतात. दुसरा तुकडा विशिष्ट प्रथिनाचा असतो. याला Cas-9 म्हणतात. हेच क्रिस्पर विकर आहे. हे विकर म्हणजे एकप्रकारची रासायनिक कात्री असते. या कात्रीच्या सहाय्याने तो बाधित तुकडा कापून काढला जातो. आणि तिसरा तुकडा हा सशक्त जनूकांचा म्हणजे बायोब्रिक्स असून तो बाधित तुकड्याच्या जागी बसवला जातो. या संपूर्ण प्रक्रियेला 'जीन एडिटिंग' तंत्र असंही म्हणतात.’ – डॉक्टर निहार यांनी डॉक्टर आर्या यांना समजून संगितलं.
[आठ दिवसात बायोब्रिक्स तयार झाला होता.]
‘बायोब्रिक्स तयार आहे. आज आपण ही सात इंजेक्शन्सची जणूकोपचार पद्धती सुरू करूया. थोड्या थोड्या अंतराने महिनाभर सलाईनच्या माध्यमाने हा जणूकोपचार द्यावा लागेल.’ - डॉ. निहार यांनी उपचारला सुरुवात केली होती.
***
......आणि जे घडू नये म्हणून आर्याला वाटत होतं तेच नेमकं आज घडलं!
स्पेस स्टेशनमध्ये संध्याकाळी अंथरुणावर पडल्या पडल्या अपर्णा पडद्यावर आपल्या बाळाची वाढ कशी होते आहे हे रोज आवर्जून बघत असे. आज मात्र अपर्णा अस्वस्थ झाली होती. डॉक्टरांची चमू पॉड बेबीच्या अवतीभवती उभी राहून बेबीला काहीतरी इंजेक्ट करत होते! ते दृष्य अपर्णाला बघवेना. काहीतरी गडबड नक्कीच झाली होती. अपर्णा ने त्वरित आर्याशी संपर्क साधला.
‘बेबीला काही प्रॉब्लेम झाला आहे का गं ?’
‘नाही गं , नेहमी प्रमाणे न्यूट्रियंट्स दिली जाताहेत!’ [परंतु हे बोलत असतांना आर्याच्या काळजात चर्र झालं. चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव स्पष्ट दिसत होता.] ‘‘नक्की ना ! तसं काही असेल तर मोकळेपणाने सांग बर का !’ आता मात्र आर्याच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. मेडिकल एथिक्सनुसार अपर्णाला हे सगळं सांगावं लागणारच होतं. ‘‘हे बघ अपर्णा , मी काय सांगते ते नीट ऐक. बाळाला डाउन सिण्ड्रोमची लक्षणे दिसताहेत. जनुकोपचाराने हा गर्भ नक्की बरा होईल. तुला धीराने घ्यावं लागेल. मी तुला रोज अपडेत करत जाईनच.’- आर्या ने एका दमात सगळं सांगून टाकलं आणि तिला एका मोठ्या दडपणातून मुक्त झाल्याची अनुभूती झाली.
एका साहसी अंतराळ वीरांगनेच्या डोळ्यात अश्रु तरारले होते. ‘ठीक आहे तर !’ अपर्णाने मन घट्ट करून कॅमेरा बंद केला. २८ दिवसांचा जणूकोपचार पार पडला होता. अजून एका आठवड्यानंतर स्कॅनिंग केल्यावर त्याच्या परिणामांची खात्री करता येणार होती. आज बेबीच्या बॉडी फ्लूइडची सूक्ष्मदर्शकाखाली बारकाईने चाचणी करण्यात आली.
‘मी डॉक्टर आर्याशी बोलू शकतो का ?’- निहारचा फोन वाजला. ‘बोला डॉक्टर. मी रोपोर्ट्सची अतुरतेने वाट पाहाते आहे. सगळं ठीक आहे ना ?’ - आर्या बोलतांना थरथरत होती.
‘आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. आता बेबी नॉर्मल आहे. धोका टळला आहे.’ - निहारच्या शब्दांवर आर्याचा विश्वास बसत नव्हता.
‘डॉक्टर, बेबी नॉर्मल आहे ना ?’ -
हो मॅडम मी म्हणालो ना !
‘डॉक्टर , माझा आनंद खरोखर गगनात मावत नाहीये सध्या. तुमचे किती आभार मानू. याहीपेक्षा बाळाच्या आईला जो आनंद होणार आहे ना तो तर या आकाशगंगेत सुद्धा मावणार नाही. माझ्या आनंदाला खरोखर सीमा उरलेल्या नाहीत.’ - आर्या आनंदाने भारावून गेल्या होत्या.
‘बाळाची खूप काळजी घ्यायला हवी. बाळाला ३० दिवस पोषण द्रव्याबरोबर मी लिहून दिलेली औषधं देत राहा.’ - निहारने सल्ला दिला.
***
फ्रेंडशिपवर मध्यरात्रीच्या सुमारास पडद्यावर बीप... बीप... बीप... आवाजाने अपर्णा जागी झाली. स्क्रीन सुरू केला आणि समोर चक्क डॉक्टर आर्या आणि त्याच्या पाठीमागे बेबी पॉड बघून ती चक्रावलीच. ‘अपर्णा , अगं तुझं बाळ आता धोक्याच्या बाहेर आहे. तुझ अभिनंदन करण्यासाठी मुद्दाम फोन केला!’ - अपर्णाला ही बातमी द्यायला आर्या अधीर झाली होती. हे ऐकून मात्र अंतराळवीरांगनेने आनंदाश्रुंना वाट मोकळी करून दिली होती. शब्द फुटत नव्हते. पॉडकडे ती भावनाविवश होऊन एकटक बघत होती.
‘आर्या , तू मोठ्या जिद्दीने, चिकाटीने आणि धैर्याने ही लढाई जिंकलेली आहेस. किती दिवस राहिले आहेत गं या बाळाच्या जन्माला ?’
‘फक्त काही दिवस’ आर्या आत्मविश्वासाने म्हणाली.
***
अपर्णाने आता आपला कॅमेरा पॉडवरती झुम केला होता. ३९ आठवड्याचं ते बाळ मोठं गोंडस दिसत होतं. हात आणि पाय दुमडलेले, डोळे बंद आणि ते हळू हळू त्या पॉडच्या भिंतीला ढुशा मारत होतं, त्याचा तो विशिष्ठ आवाज आणि हालचाली जणू प्रत्यक्ष गर्भाशयाची आठवण करून देत होत्या. स्टॉप वॉच ००.०० दर्शवत होतं आणि पॉड फुटून त्यातलं पाणी वाहून गेलं होतं. अपर्णा या सगळ्या प्रक्रियेकडे श्वास रोखून बघत होती. तिकडे एक दीर्घ श्वास सोडून तिने सुटकेचा निश्वास टाकला होता तर इकडे बाळाने आपला पहिला श्वास घेतला होता. ‘सोफिया’ने त्या गोंडस बाळाला आपल्या हातात कॅमेऱ्यासमोर उंच धरून अपर्णाला दाखवलं. मुलगी झाली होती! दिवस होता ५ जानेवारी २०७०.
‘किती गोड आहेस ग माझी छकुली! या छ्कुलीमुळेच तर मी पृथ्वीशी जोडले गेले आहे. मग ही आहे माझी गोडशी अविका !’ अपर्णा उद्गारली अपर्णा आणि अविका यांच्यात हजारो किलोमीटरचं अंतर असून सुद्धा त्यांच्यात आगळेवेगळे अनुबंध निर्माण झाले होते. आणि ‘सोफिया’ने बाळाला घेण्यासाठी आपले मऊ मऊ हात पुढे केले होते. अपर्णाच्याच कातडीच्या पेशींचं ‘सोफिया’च्या हातांवर रोपण केलेलं असल्यामुळे बाळाला हवाहवासा आईच्या कातडीचा गंध देखील सुखावह वाटत होता. बाळाच्या रडण्याने फ्रेंडशिपवरील संशोधन केंद्र भाराऊन गेलं होतं. अपर्णाच्या भोवती उभ्या असलेल्या ३ साथीदार अंतराळवीरांनी अपर्णाचं अभिनंदन केलं. ‘सोफिया’ कडे बारकाईने बघून अपर्णा आश्चर्य चकित झाली होती. हुबेहूब तिच्यासारखाच आवाज, शब्दफेक, केशरचना, पेहराव, चालण्या- वागण्याची ढब. इतक्या बारकाईने ‘सोफिया’ कडे तिने यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं. आता मात्र पुढचे ७ महिने ‘सोफिया’ हीच अविकाच्या आईची भूमिका बजावणार होती. ऑगस्ट २०७० मध्ये अपर्णा पृथ्वीवर परतणार होती. एका आईला हे फार जड जाणार होतं.




Comments