top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

केंद्रीय चर्म अनुसंधान संस्था, चेन्नई

  • 9 hours ago
  • 8 min read

नारायण वाडदेकर


सीएसआयआर म्हणजे ‘कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’, ही भारतातील एक फार मोठी शासकीय विज्ञान, तंत्रज्ञान संशोधन संस्था आहे. तिच्या अधिपत्याखाली ‘केंद्रीय चर्म अनुसंधान संस्था, संक्षिप्त रूप ‘सीएलआरआय’, ही घटकसंस्था काम करते. सीएलआरआयचे मुख्य कार्यालय तामिळनाडू राज्यातील चेन्नई, पूर्वीचे मद्रास येथे आहे. सीएलआरआय, चामडे आणि चामडी वस्तू निर्मितीसंबंधी संशोधन करते. उत्तम प्रतीच्या चामड्याच्या उत्पादनात मार्गदर्शन आणि मदत करते. सीएलआरआयचे प्रयत्न चर्मोद्योगात भारताचे नाव संपूर्ण जगात सदैव अग्रेसर राहील या दृष्टीने असतात.

भारतात प्राचीन कालापासून प्रचंड संख्येत पशुधन आहे. पशुपालनाची परंपराही पुरातन आहे. गाईगुरांखेरीज, शेळ्या-मेंढ्या, घोडे, हत्ती, उंट, डुकरे अशा पशूंच्या पालनावर मुबलक ग्रंथसंपदा आहे. भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होण्यापूर्वी गुराखी, मेंढपाळ, धनगर, माहूत, वराहपालक अशा व्यावसायिकांकडून मृत प्राण्यांची कातडी घेऊन निर्यात केली जाई. त्यातून आपल्या देशाला दरसाल नऊ कोटी रुपयांची प्राप्ती होत असे. या मालापासून बूट, बॅगा, पट्टे अशा चामडी वस्तू परदेशात बनत. मग ती उत्पादने आपण आयात करत असू. या व्यवहारात भारताला आर्थिक तोटा होत असे. शिवाय जो रोजगार भारतीयांना मिळू शकला असता तो परदेशीयांना मिळत असे. भारताची केवळ कच्चा माल पुरवठादार ही प्रतिमा बदलावी आणि गुणवत्तापूर्ण सुबक चामडी वस्तू विकणारा विकसित देश अशी नवी ओळख निर्माण व्हावी यासाठी २४ एप्रिल १९४८ या दिवशी सीएलआरआयची स्थापना केली. संस्थेच्या कामाचा विस्तार पुढे दहा वर्षांनी म्हणजे १९५८ मध्ये सीएलआरआयची चेन्नईतील वास्तू साकारली. सीएलआरआय या संस्थेने पुढाकार घेऊन एका आंतरराष्ट्रीय चर्मप्रदर्शनाद्वारे जगाला १९६४ मध्ये स्वत:च्या कामाची ओळख करून दिली.


ज्या प्राण्यांच्या त्वचेत कोलॅजेन प्रथिनाचे चिवट, मजबूत, लवचीक रेणू जास्त प्रमाणात असतात त्यांची कातडी कमावता, टिकाऊ बनवता येते. तिचा बुटासारख्या चामडी वस्तू बनवायला उपयोग होतो. मद्रास विद्यापीठातील गोपालसमुद्रम् नारायण रामचंद्रन (जीएनआर) या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञाने सीएलआरआयच्या सहकार्याने कोलॅजेन प्रथिनरेणूची रचना उलगडून दाखवली. कोलॅजेनचा रेणू हा त्रिसर्पिल – तिपेडी (ट्रिपल हेलि कल) असतो. हा शोध ‘जीएनआर’नी लावला. सीएलआरआय अनेक प्रकारची कामी करते. त्या सर्वांचे वर्णन करीत बसल्यास लेख फार मोठा होईल. म्हणून येथे थोडक्यात परिचय करून दिला आहे. सुरुवातीच्या काही वर्षात सीएलआरआयने सांडपाणी प्रक्रियेवर उपाय म्हणून कातडी कमावणाऱ्या कारखान्यांसाठी एक संयंत्र (प्लांट) निर्माण केले. चर्मोद्योगातील कारखानदारांचा, कामगारांचा विश्वास मिळवून थोड्याच वर्षात सीएलआरआय ही संस्था चर्मोद्योग क्षेत्रातील संशोधन आणि विकासातील मापदंड ठरली. १९७८ मध्ये नेदरलँड्सच्या बाल्मर लॉरी कंपनीशी सीएलआरआयने सहकार्य केले. सीएलआरआयने कातडी कमावण्यासाठी लागणारी रसायने भारतातच बनवायला सुरुवात केली. नवी उत्पादनेही अल्प प्रमाणात सीएलआरआय बनवते आणि पुढे व्यापारी तत्वावर मोठ्या प्रमाणात बाल्मर लॉरी कंपनी ती निर्माण करते. नजीकच्या भविष्यात २०१० सालापर्यंत भारतीय चर्म उद्योग क्षेत्र किती आणि कसे प्रगत झाले असेल हा विषय केंद्रस्थानी ठेवून सीएलआरआयने अभ्यास केला. त्यातून १९९५ मध्ये भारतीय चर्म तंत्रज्ञान मोहीम कार्यान्वित झाली. १९९६ मध्ये सीएलआरआयने तामिळनाडूत चामडे कमावण्यासाठीच्या जास्त प्रगत प्रक्रिया स्वीकारायला प्रोत्साहन दिले. त्यामुळे चामड्याच्या ५७० उद्योगांत प्रदूषण घटले. प्रदूषण घटले नसते तर न्यायालयाने ते कारखाने प्रदूषणकारक म्हणून घोषित केले असते आणि ते बंद पडू शकले असते. सीएलआरआयने १९९९ मध्ये इंटरनॅशनल यूनियन ऑफ लेदर टेक्नॉलॉजिस्टस् अँड केमिस्टस् सोसायटी (IULTCS, आययूटीसीएस) कॉग्रेस चेन्नई येथे भारतात आयोजित केली. आययूटीसीएस या संस्थेची युरोपबाहेर आयोजित झालेली ही पहिलीच सभा होती.


सध्या भारतीय चर्म उद्योग चामडे वापरून विविध वस्तू बनवते. चामड्याच्या जोडीला कापूस, लोकर, ताग, रबर, प्लास्टिक आणि इतर धागे आणि पदार्थ वापरून नव्या प्रकारच्या वस्तूंच्या निर्मितीत सीएलआरआय मदत करते. चामड्याच्या वस्तूंची गुणवत्ता वाढ सीएलआरआयचे प्रशिक्षण, उद्योगस्नेही प्रयोग, चामडी वस्तूंचा दर्जा सतत वाढता रहावा, भारताला अधिकाधिक परकीय चलन मिळावे यासाठीचे काम वाढले. याचा परिणाम म्हणजे नवी कार्यालये आणि प्रयोगशाळा अन्य राज्यांत, शहरांत स्थापन कराव्या लागल्या. चेन्नईतील मुख्यालयाखेरीज जालंधर, अहमदाबाद, कानपूर, कोलकातामध्ये सीएलआरआयच्या प्रादेशिक शाखा आहेत. सीएलआरआयच्या कामांचा पट खूप विस्तृत आहे. परंतु जागेच्या मर्यादेमुळे येथे थोडक्यात मांडला आहे. सीएलआरआय चर्म उद्योग विषयात संशोधन, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात विकासकार्य करते. चामडी वस्तूंचे उत्पादन उच्च दर्जाचे व्हावे म्हणून उद्योजकांना मार्गदर्शन आणि मदत देते. चामड्यावर सूक्ष्मजीवांची रासायनिक क्रिया होऊन ते खराब होणार नाही अशी काळजी घेते. पाण्याची कमतरता वा अभाव असणाऱ्या प्रदेशांत देखील चामडे कमावता येईल, प्रदूषण घटेल असे पाहते. पाणी मुबलक मिळत असो वा कमी चर्मोद्योगात, पाण्याचा आणि रसायनांचा वापर कसा किमान राहील यासाठी सीएलआरआय उपाय शोधून काढत असते. कातडी टिकाऊ बनवण्यासाठी तिला चिकटलेले रक्त, केस, आणि चरबी काढून टाकतात. त्यासाठी विविध प्रकारची रसायने विशिष्ट प्रमाणात वापरतात. उदा. प्रोटिएझ, अमायलेझ आणि लायपेझ अशी विकरे कातडी स्वच्छ करण्यासाठी सीएलआरआय सुचवते. ही तीन प्रकारची विकरे मानवी शरीरात अनुक्रमे प्रथिने, कार्बोहायड्रेटस् आणि मेद पदार्थ पचवतात. हेप्टेन, पॉलिएथिलिन ग्लायकॉल-200, इ. मधील प्रोटिएझ, अल्फा अमायलेज या सक्रिय विकरांच्या क्रियेने कोलॅजेनच्या धाग्यांची वीण सैल होते. अशा या विकरप्रेरित रासायनिक प्रक्रियेमुळे साधारण पन्नास टक्के पाण्याची बचत होते. कातडीवरचे केस, नखे, खरू, शिंगे यातनू मिळवलेले केरॅटिन हे प्रथिन, रासायनिक क्रियांनी विघटित केले जाते. सीएलआरआयने केलेल्या संशोधनानुसार विघटित केरॅटिनपासून केरॅटिन हायड्रोलायसेट म्हणजे जलविद्राव्य केरॅटिन कण मिळतात. ते केसाना चमक आणण्यासाठी, केस सुळसुळीत व्हावे आणि स्पर्शाला मऊ वाटावे यासाठी वापरता येतात. आता खाटिकखान्यात कचरा म्हणून अलग केलेल्या कोंबड्यांच्या पिसांपासूनही केरॅटिन विघटित करून अल्पखर्चात केरॅटिन हायड्रोलायसेट निर्माण केले जाते.


मासे, पक्षी, कोलंबी यापासून चामडी

तिलापिया, बास, शिंगाळासारख्या माशांच्या कातडीतही मोठ्या प्रमाणात कोलॅजेनचे धागे असतात. त्यामुळे अशा माशांची कातडी गुरे, बकऱ्या अशा स्तनी प्राण्यांच्या कातडीप्रमाणे चामडी वस्तू बनवायला उपयोगी पडते. इमू आणि शहामृग या पक्ष्यांची आणि काही प्रकारचे मासे यांच्या कातडीचा चामडी उत्पादनासाठी उपयोग सीएलआरआयने नव्यानेच भारतात सुरू केला आहे. आतापर्यंत कचऱ्यात फेकून दिल्या जाणाऱ्या या मालाचा छोट्या शेततळी-धारकांना, मासेमारी क्षेत्रातल्या लोकाना विशेष गुंतवणूक न करता होऊ शकेल. कचऱ्यात टाकल्या जाणाऱ्या झिग्यांच्या कवचापासनू चिटोसान हे केरॅटिनसारखे प्रथिन सीएलआरआय मिळवते.

त्याचा दाताच्या रोपणासाठी जबड्याच्या हाडाचे दृढीकरण करण्यासाठी होतो. शल्यक्रिया झाल्यावर हाडात भर घालण्याची गरज असेल तर चिटोसानला पर्याय नाही. विविध विषाणुरोधी रसायने किती प्रभावी आहेत हे ही सीएलआरआयमध्ये तपासले जाते. त्यानंतरच विषाणुरोधी उत्पादनांना सीएलआरआय मान्यता देते. मेलेल्या प्राण्यांच्या कातडीला चिकटलेल्या आणि अलग करून फेकण्याजोग्या कचऱ्याचा जैविक इंधन-तेल बनवण्यास उपयोग करता येईल का याचाही सीएलआरआय अभ्यास करत आहे. चर्मोद्योग विषयात संशोधन करण्यासाठी सीएलआरआयमध्ये स्वतःच्या संकुलात उभारलेली प्राणीशाळा वापरली जाते. तेथे पांढरे उंदीर, ससे असे प्राणी, निर्जंतुक वातावरणात वाढवलेले असतात. स्वच्छ निवास, वेळच्या वेळी पुरेसे सकस अन्न, सुरक्षा यामुळे तेथील प्राणी निरोगी आणि प्रयोगासाठी विश्वासार्ह असतात.


परदेशीय सहभाग

जर्मनीतील बर्लिन येथे एप्रिल २०२२ आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय ‘मॉड यूरोप कलर क्लब सिलेक्शन’मध्ये सीएलआरआय सहभागी झाली. तेथे सीएलआरआयच्या कर्तबगारीची चुणूक पाश्चात्य जगाला पहायला मिळाली. विविध रंगांच्या, पोतांच्या चामड्यांचे जवळजवळ पाचशे नमुने भारतीय चर्म-निर्यातदारांनी निवडीसाठी सादर केले. त्यामुळे खरेदीदारांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरली. परदेशी तज्ज्ञ, व्यापारी, उद्योजकांना भेटल्यामुळे चांगले संबंध निर्माण होऊन सीएलआरआयच्या काही प्रकल्पांना जर्मनी, मलेशिया, इथिओपिया कडून विविध रूपात सहाय्य मिळाले.


चर्मोद्योगातील मूल्यवर्धन

चर्मोद्योगातील उद्योजकांची उद्यमशीलता वाढवण्यासाठी सीएलआरआय कर्मचाऱ्यांना तांत्रिक बाबींचे प्रशिक्ष ण देते. सीएलआरआय कडे कातडीच्या वरच्या, मधल्या, आतील सर्वा त खालच्या थरांचे नि रीक्षण, परीक्षण करण्यासाठी खास टेबले, मापक यंत्रे, भिंगे, कवकनाशक द्रव्ये, उत्पादने टिकवनू ठेवणारी रक्षक द्रव्ये, सीएलआरआय वापरते. सोडियम सल्फाईडसारखी विषारी पण प्राण्यांच्या कातडीवरील केस काढून टाकण्यास उपयुक्त द्रव्ये कामगारांना आणि पर्यावरणाला धोकादायक ठरणार नाहीत, निदान त्यांच्यापासूनच्या धोक्याचे प्रमाण किमान राहील असे पाहिले जाते. सोडियम सल्फाईडऐवजी सोडियम क्लोराईड, म्हणजे मीठ वापरले तर कातडीवरील केस काढून टाकणे कमी खर्चात होते. शिवाय पर्यावरणात विषारी पदार्थ मिसळण्याचा धोकाही टाळता येतो. अशी नवी, स्वस्त, तुलनेने निर्धोक पद्धत वापरायला सीएलआरआयने सुरुवात केली. सीएलआरआय ही संस्था केवळ सुखातील साथीदार नाही. कोविडच्या संकटकाळात सीएलआरआयमधील संशोधक, अभियंते, तंत्रज्ञ यांनी आरटीपीसीआर प्रशिक्षण घेतले. कोरोना परीक्षणात मदत केली. अगदी कमी खर्चात, जलदगतीने, कोविडरोधी तीन थरांचा मास्क बनवण्यासंबंधी संशोधन केले. लहान उद्योजकांना, शिवणकाम जाणणाऱ्या लोकांना मुखपट्ट्या बनवणे, विकणे याचे मार्गदर्शन केले. अजूनही या संबंधातल्या चित्रफिती यूट्यूबवर पाहता येतात. कपडे, चामडी वस्तू यांच्या पृष्ठभागांवर करोना विषाणू आहेत का, त्यांच्या घड्यांमध्ये करोना विषाणू दडले आहेत का याचे परीक्षण सीएलआरआयने उद्योजक, संचायक, दुकानदार याना प्रत्यक्ष भेटीत करून दिले. शिकण्यास उत्सुक, पण प्रवास जमणार नसेल त्यांना यासंबंधी दूरस्थ आंतरजालावरून मार्गदर्शन ही दिले.


सीएलआरआयची विद्यार्थी संपदा

२०२१ मध्ये सीएलआरआयतील सेंटर फॉर अकॅडेमिक रिसर्च एक्सलन्स - मद्रास आणि अण्णा विश्ववि द्यालयाच्या चर्मोद्योग संबंधित पीएचडी अभ्यासक्रमात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १८१ होती. सीएलआरआयचे संशोधक, तंत्रज्ञ आणि विद्यार्थी ही प्रख्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत आपले शोधनिबंध नियमितपणे विपुल प्रमाणात प्रकाशित करतात. अशी काही प्रकाशने म्हणजे – जर्नल ऑफ इनऑरगॅनिक बायोकेमिस्ट्री, इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायॉलॉजिकल मॅक्रोमॉलेक्यूल्स, जर्नल ऑफ अमेरिकन लेदर केमिस्टस् असोसिएशन, जर्नल ऑफ मॉलेक्यूलर लिक्विडस्, क्लीन टेक्नॉलॉजीज अँड एन्व्हायर्नमेंटल पॉलिसीज, जर्नल ऑफ क्लीनर प्रॉडक्शन, रॅपिड प्रोटोटायपिंग जर्नल, कोलॉइड्स अँड सर्फेसिस बायोइंटरफेसिस. उत्तम गुणवत्तेचे अनेक शोधनिबंध सीएलआरआय मधील संशोधक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित करत असतात. बौद्धिकसंपदा हक्क आणि नवसंशोधनांवर स्वामित्व हक्क यातूनही सीएलआरआय उत्पन्न मिळवते. देश, विदेशात चामडी वस्तूंची वाढती विक्री होऊन आर्थिक फायदा होऊन देश समृद्ध व्हावा असा प्रयत्न सीएलआरआय करते.

सीएलआरआयचा ‘सेंटर फॉर अकॅडेमिक रिसर्च एक्सलन्स’ (CARE) हा शिक्षणक्षेत्राशी संलग्न विभाग आहे. त्यातील शिक्षक, प्राध्यापक मद्रास विश्वविद्यालय आणि अण्णा विश्वविद्यालयाचे चर्मोद्योग संबंधित बी. टेक, एम. टेक, आणि पीएचडी सारखे अभ्यासक्रम आयोजित करतात. असा अभ्यासक्रम घेऊन तयार झालेले विद्यार्थी स्वतःचे लहानमोठे उद्योग उभारतात. अशा कर्तबगार, आर्थिकदृष्ट्या समृद्ध विद्यार्थ्यांमुळे रोजगार निर्माण होतात. पुढे तेच उच्चशिक्षित अनुभव असलेले विद्यार्थी नवे कालसुसंगत अभ्यासक्रम रचतात. उत्साहाने नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांना तयार करतात. संस्था म्हणून सीएलआरआय सरकार दरबारी आणि चर्मोद्योगात फार विश्वासार्ह मानली जाते. तसेच चर्मोद्योग विषयक सैद्धांतिक ज्ञान, तंत्रज्ञानातील सीएलआरआय, शिखर संस्था समजली जाते.


सीएलआरआयची ‘भा’ (Bha) पायाच्या मापासाठीची ‘फिट’ प्रणाली

चार ते पंचावन्न वयाच्या सुमारे एक लाख भारतीय लोकांच्या पायांची मापे सीएलआरआयने घेतली आहेत. आणखी ही घेतली जाणार आहेत. साधारणपणे चार वर्षे ते अकरा वर्षे दरम्यान मुलगे आणि मुली यांत पायाच्या वाढीचा दर समान असतो. पण बारा ते अठरा वर्षे दरम्यान मुलगे आणि मुली यांच्या पायाच्या वाढीचा दर भिन्न असतो. असे मुद्दे विदा (data) अभ्यासल्यावर लक्षात आले. या विदेच्या बळावर आंतरराष्ट्रीय बाजारात बुटांच्या खरेदीसाठी आवश्यक अशा भारतीयांच्या पायाच्या मापासाठी एक स्वतंत्र मानक मिळवण्याची सीएलआरआयची योजना आहे. सध्या अमेरिकन, ब्रिटिश आणि फ्रेंच मानके उपलब्ध आहेत. जवळजवळ दीडशे कोटी लोकसंख्या असूनही अमेरिकन, ब्रिटिश मानकांच्या मदतीने भारतात बूट खरेदी चालते. सीएलआरआयने विकसित केलेला ‘भा’ (Bha) ही भारतातील बुटांसाठी पायाच्या मापासाठी ची एक नवीन आणि प्रमाणित पदवेश आकारमान प्रणाली आहे. या प्रणालीमुळे भारतीयांच्या पायांच्या मापांचे पायताणांसाठी अचूक फिटिंग मिळेल, उत्पादन सुधारतील आणि ग्राहकांना चांगला अनुभव मिळेल; या प्रणालीत आठ आकारांवर लक्ष केंद्रित केले आहे, जे सध्याच्या अमेरिकन, युके आणि युरोपियन प्रणालींपेक्षा सोयीस्कर आहे आणि लवकरच भारतीय बाजारपेठेत लवकरच लागू होईल अशी अपेक्षा आहे.


खास गरजा असणाऱ्या गिऱ्हाइकांसाठीचे बूट

सामान्यतः तिरप्या फळीवर एक पाय ठेऊन पायाची लांबी मापली जाते. रुंदीचा, दुसऱ्या पायाचा विचार केला जात नाही. सामान्य लोकांच्या चामडी चप्पल, बुटांखेरीज विशेष गरजा असणारी दिव्यांग मुले माणसे ही, खास प्रकारची पादत्राणे वापरतात. काहींचे पाय एका पातळीपर्यंत काही दुर्दैवी परिस्थितीत शल्यकर्म करून कापावे लागलेले असतात. त्यांच्या एका वा दोन्ही गुढघ्यांवर चामडी टोपणवजा संरक्षक आवरण चढवले जाते. अशा खास गरजा असणारे लोकसमूह शोधून त्यांच्यासाठी पादत्राणे बनवणे सीएलआरआयचे संशोधक, व्यवस्थापक यांना आव्हान वाटते. ते स्वीकारण्यात लोकांची सेवा होते. त्यातून नवी तंत्रेही विकसित होतात. उदा. थर वाळवंटातील मिठागारांत काम करणाऱ्या कामगारांचे बूट, खारे पाणी वाळले की मिठाच्या थरामुळे कडक, त्रासदायक बनतात. मधुमेहाच्या वयस्कर रोग्यांसाठी, आजाराने नाजूक झालेल्या त्वचेला सांभाळून घेत

आधार देतील असे बूट आवश्यक असतात.

सीएलआरआयने संशोधन करून अशा विशेष गरजा असणाऱ्यांसाठी उत्पादने निर्माण केली. तीव्र मधुमेही रुग्णांसाठी, मोजे आणि मोज्यांच्या तळाशी रबरी सोल जोडून अशी आव्हाने स्वीकारली. भारतात दरवर्षी एक कोटी मोटारसायकलींची विक्री होते. त्या चालवणाऱ्यांना लवचीक, हवेशीर, आरामदायक, घामाने चिकटणार नाहीत अशा विजारी, घट्ट पकड घेतील असे हातमोजे, चामडे आणि अन्य पदार्थ वापरून सीएलआरआयने बनवून दिल्या आहेत.


सीएलआरआयची भविष्यातील वाटचाल

सीएलआरआय भारत सरकारच्यावतीने चर्मोद्योगासंबधी आणि तत्संबंधित अन्य उद्योगांबाबत राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील धोरणे ठरवते. चामड्याच्या कारखान्यांतील उत्पादन विषयक समस्या सोडवणे लघु, मध्यम उद्योजकाना मार्गदर्शन करणे ही जबाबदारी ही भारत सरकारने सीएलआरआय वर सोपवली आहे. सीएलआरआय संस्थेसाठी निरंतर शिक्षण ही आव्हानात्मक आणि आनंददायी प्रक्रिया आहे.


सीएलआरआय मधील नवसंशोधन

सीएलआरआय आता ‘हरित द्रावक’ म्हणून ओळखले जाणारे प्रोपिलीन कार्बोनेट हे द्रव्य चामडे कमावण्यासाठी, निर्जन्तुकीकरणासाठी वापरू लागली आहे. पाण्याचा वापर घटविण्यासाठी, कोलॅजेन स्थिरीकरणासाठीही प्रोपिलीन कार्बोनेट उपयुक्त ठरते. चर्म संस्करणात मोठ्या प्रमाणात नत्रयुक्त पदार्थ पाण्यात मिसळतात. ते वाया जाते. द्रावक म्हणून प्रोपिलीन कार्बोनेटचा उपयोग केल्यास नत्रयुक्त पदार्थ पाण्यात मिसळण्याचे प्रमाण खूप घटते आणि अर्थातच टाकाऊ पदार्थ म्हणून फारसे पाणी वाया जात नाही. रासायनिक प्रदूषण घटते आणि कारखान्याचा खर्च ही कमी होतो. असेच प्रयत्न प्राण्यांच्या त्वचेवरील केस काढून टाकण्यासाठी सोडियम सल्फाईड सारखी विषारी रसायने वापरण्याऐवजी जस्त (Zn) युक्त विकरे (एन्झा इम्स) वापरावी. म्हणजे प्रदूषण घटेल. या दृष्टीने चालू आहेत. चामडे अग्निरोधक बनवता येईल का हे विशिष्ट इपॉक्सी रेक्झिनचे लेपन करून तपासले जात आहे. अशा साऱ्या प्रयोगातून चामड्याची गुणवत्ता आणि उपयोगिता वाढवणे साधले जात आहे.

सीएलआरआय चामड्यासारखे गुणधर्म दाखवणाऱ्या, काम करू शकणाऱ्या पदार्थांचा अभ्यास करत आहे. अलोवेरा म्हणजे कोरफड, पाईनॅपल म्हणजे अननस आणि कॅक्टस म्हणजे निवडुंग अशा वनस्पतींतून चिवट आच्छादक मिळवता येईल का हे तपासत आहे. तसे जमल्यास स्वस्तात, पर्यावरण-स्नेही वनस्पतीजन्य ‘कातडी’ उपलब्ध होईल. कुजलेल्या, अतिपिकलेल्या कचरा म्हणून फेकून देण्याच्या लायकीच्या फळांपासून सीएलआरआय सेल्युलोज धागे मिळवते. मग चामड्याच्या जोडीला वा चामड्याऐवजी अशा धाग्यांच्या वस्तू उपयोगात आणते. अशा साऱ्या नवनव्या वस्तू वापरून चामड्याचे मूल्यवर्धन केले जाते. किंवा चामड्याऐवजी त्या वस्तू वापरल्या जातात. सीएलआरआयने मे २०२३ मध्ये खराब झालेल्या आंब्यांच्या गरापासून मिळवलेल्या धाग्याचे चामडे बनवले. त्याच्यापासून बनवलेली पर्स फोटोत दिसत आहे. केळ्याच्या बुंध्यापासून विनॉक्सीश्वसन करणाऱ्या जिवाणूंपासून किफायतशीरपणे मिथेन वायू बनविणे शक्य आहे का असा प्रयोगही सीएलआरआय मध्ये होत आहे. प्लास्टिक बाटल्यांपासून जोडकाम करण्यात उपयुक्त असा एक चिकट द्रव बनवता येईल का याचेही संशोधन सीएलआरआय करत आहे.


सीएलआरआयमुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल

तुमच्या घरातील आणि कामाच्या ठि काणी कोणत्या वस्तू चामड्याच्या वा विविध धागे वापरून बनलेल्या आहेत पहा. पिशव्या, बॅगा, घरी घालण्याच्या, कामावर जाण्याच्या, खेळाडूंच्या, दिव्यांगांच्या, अग्निदल सैनिकांच्या, डॉक्टर-परिचारिकांच्या चपला आणि बूट, तसेच पट्टे, खुर्च्या-पलंग, बाकडे, स्टेचर्स..... खूप मोठी यादी होईल. शिवाय अशा वस्तूंच्या गरजा सतत वाढत राहतात. त्या अधिकाधिक चांगल्या, स्वस्त, वजनाला कमी, अग्निरोधक, जलरोधक, बरु शीरोधक, बहुउपयोगी, विविध ऋतूंत वापरण्याजोग्या बनवणे याचा ध्यास सीएलआरआयने घेतला आहे. शक्य होईल आणि आवश्यक वाटेल त्या नवसंशोधनांसाठी सीएलआरआय स्वामित्व हक्क मिळवत असते. त्यामुळे सीएलआरआयच्या नेतृत्वाखाली मुख्यतः चर्मोद्योगात आपल्या देशाला झपाट्याने भरपूर परकीय चलन मिळवून देऊन अत्यंत उज्ज्वल भवितव्य घडविता येईल हे नक्की.


 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page