top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

कारंज्याचे रहस्य

श्री विठ्ठल रायगावकर

जीवन फुलवणं, टिकवण आणि वाढवण या प्रमुख गुणधर्मा बरोबर पाण्याचे इतर अनेक गुणधर्म आहेत. त्यापैकी बऱ्याच गुणधर्मांचा उपयोग मानवाने स्वतःच्या जीवनाशी संबंधित असलेल्या अनेक क्षेत्रात अगदी प्रयत्नपूर्वक करून घेतलेला आहे. उंच डोंगरावर असलेल्या जलाशयातून डोंगराच्या पायथ्याशी मोठमोठ्या पाईप मधून पाणी आणून विद्युत जनित्राची चक्र फिरवून विद्युत निर्मिती हा असाच मानवनिर्मित अविष्कार आहे. या आणि अशाच प्रकारच्या इतर अनेक उपयोगांबरोबर मनोरंजनासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग अगदी ऐतिहासिक काळापासून मानव करीत आला आहे. कारंज्याची निर्मिती हा असाच मनोरंजनाचा एक प्रकार आहे.


असा हा आजचा विषय अगदीच गमतीदार आहे. तुम्हा सर्वांना त्याबद्दल थोड्याफार प्रमाणात माहिती आहेच. कारंज हा शब्द ऐकला की आपल्या सर्वांनाच त्यातून उडणाऱ्या जलबिंदूंमध्ये न्हाऊन निघावसं वाटतं. पावसात भिजताना जसा एक वेगळाच अनुभव येतो. अगदी त्याप्रमाणेच कारंजाची तुषार अंगावर घेताना सगळं अंग शाहरुन जात. अनेक चित्रपटातही बरीचशी दृश्य अशा कारंजात चित्रित केलेली आपण पाहत असतो. राजे राजवाड्यांच्या काळात वैभवाची साक्ष म्हणून तर ही कारंजी विराजमान झालेली होती. त्याचप्रमाणे काही विशेष कार्यक्रमांमध्ये शाळेत तसेच अगदी घरी सुद्धा आपण कारंजी तयार करतो. कारंज तयार करण्याची एका अत्यंत सोप्या पद्धतीची आपण माहिती घेऊ.


वरच्या मजल्यावर किंवा घराच्या गच्चीवर एक पाण्याचा पिपं भरून ठेवायचा. त्याच्या तोटीला खालच्या मजल्यापर्यंत पोहोचून थोडीशी उरेल एवढी लांब रबरी नलिका जोडायची. त्या नळीच्या टोकाला एक नोजल जोडून ते जमिनीशी लंब राहील अशा बेताने ते एका लोखंडी सळईला बांधायच. पिंपाची तोटी सरूु केली की नोजल मधून पाणी सरळ उंच उडून त्याचे जलबिंदू चारी दिशेने फेकले जातात. त्यालाच आपण कारंज म्हणतो. यामध्ये एक अत्यंत साधा नियम आहे. पाणी नेहमी स्वतःची पातळी टिकवण्याचा प्रयत्न करत. पाण्याने भरलेले पिंप वरच्या मजल्यावर असल्याने त्यातील पाण्याची पातळी आणि पिंपाला जोडलेल्या नळीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याची पातळी ही एकच राहावी असा पाण्याचा प्रयत्न असतो. म्हणून रबरी नळीला लावलेल्या नोझल मधून पाणी वेगाने बाहेर पडून वरच्या पिंपातील पाण्याच्या पातळीपर्यंत उंच उडण्याचा प्रयत्न करत. म्हणूनच कारंज तयार होतं.


प्रत्येक कारंजामध्ये याच नियमाचा उपयोग केला जातो असे नाही. काही वेगळी शास्त्रीय तत्त्व आणि क्लुप्त्या वापरून सुद्धा कारंजी तयार केलेले आढळतात. अशाच आणखी काही सोप्या पद्धती पाहूया. एक टोक नोजल प्रमाणे निमुळत्या असणाऱ्या काचेच्या दोन नळ्या घ्या. त्यापैकी एक नळी तिचे निमुळते टोक पाण्याच्या बाहेर आणि पाण्याच्या पातळीशी लंब राहील अशा रीतीने ठेवा. आता दुसरी नळी घ्या तिचे निमुळते टोक आणि पाण्यात उभ्या केलेल्या नळीचे निमुळते टोक एकमेकांशी लंब राहतील अशा रीतीने पकडा. म्हणजेच या ठिकाणी इंग्रजीत उलटे एल अक्षर तयार झालेले दिसेल. आता दुसऱ्या नळीच्या नोजलच्या विरुद्ध बाजूस असलेल्या टोकातनू जोरात फुंकर मारा. त्याच वेळी पाण्यात उभ्या केलेल्या नळीतून पाणी वर चढताना दिसतं आणि फुंकलेल्या हवेबरोबर त्याचे तुषार बाहेर पडताना दिसतात.


वनस्पतीवर किंवा घरामध्ये कीटकनाशक औषध फवारण्याच्या हात पंपामध्ये याच तत्वाचा उपयोग केलेला दिसतो. हेअर कटिंग सलून मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा पंप वापरून पाण्याचे तुषार केसावर उडवून ते ओले करतात. काही समारंभामध्ये पाहुण्यांच्या अंगावर सुवासिक द्रव्यांचा छिडकावा करण्यासाठी वापरत असणाऱ्या पंपात ही अशाच प्रकारच्या तत्त्वाचा उपयोग केलेला असतो. यालाच बर्नोलीचे तत्व असे म्हणतात.


अमोनिया वायू पाण्यात झटकन विरघळतो. या तत्त्वाचा वापर करूनही आपणास कारंज तयार करता येतं. प्रथम अमोनि या एका गोल काचेच्या चबूत जमा करा. दोन छिद्राच बूच चंबूच्या तोंडाला घट्ट बसवा. बुचाच्या एका छिद्रातून काचेच्या नळीचे निमूळते टोक चंबूत घुसवा. आता चंबू उलटा करून नळीचे टोक पाण्यात बुडवा.


शाई भरण्याच्या छोट्याश्या पंपात पाणी भरून घ्या. त्या पंपाचं टोक बुचाच्या दुसऱ्या छिद्रातून चंबूत घुसवून पंपाचा फुगा दाबा. म्हणजे पाणी चंबूत शिरेल. चंबुतला काही अमोनिया वायू पाण्यात पटकन विरघळतो आणि चंबुत अंशतः पोकळी निर्माण होते. ही पोकळी भरून काढण्यासाठी काचेच्या नळीतून बाहेरच्या पात्रातील पाणी वेगाने वर चढतं आणि चंबुत छोटसं कारंज तयार झालेल दिसतं.


होळीच्या दिवशी आपण दिवसभर रंग खेळण्यात गर्क असतो. त्यादिवशी रंग उडवण्यासाठी आपण पिचकारी वापरतो. ती सुद्धा कारंजाचाच एक प्रकार आहे. दवाखान्यांमध्ये डॉक्टरांनी इंजेक्शनच्या सुई मधून औषधाचे कारंज उडवलेलं तुम्ही सर्वांनीच पाहिलं असेल. काही ठिकाणी जमिनीच्या पोटातील पाण्यामुळे नैसर्गिकरीत्या तयार झालेली कारंजी आहेत. रायगड जिल्ह्यात पाली जवळ अशा प्रकारचे कारंज पाहायला मिळत. विविध देशांमध्ये मानवनिर्मित पुष्कळ कारंजी पाहायला मिळतात.



आपल्या भारत देशात आग्रा येथे ताजमहालच्या परिसरातील कारंजी ताजमहालचे सौंदर्य वाढवतात. काश्मीर मधील शालिमार उद्यानातील कारंजी सुप्रसिद्ध आहेतच. पेशवे काळात पुण्याच्या शनिवार वाड्यात अत्यंत विलोभनीय असं कारंज असल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. अमेरिकेत काही ठिकाणी दहा ते पंधरा मजली इमारतीच्या उंचीपर्यंत उंच उडणारे कारंजी बांधण्यात आली आहेत. जायंट द ओल्ड फेथफुल इत्यादी फवारे अशा प्रकारचे आहेत. अशा उंच कारंजाच्या पाण्याचे तुषार दूर पर्यंत उडतात. ते जलबिंदू अंगावर आले की थकवा दूर पळाल्यासारखे वाटते. उडणाऱ्या जलबिंदूंचे या कर्णमधुर आवाजाने मन आनंदी होते. मुलांना ते तुषार अंगावर घेऊन ओलेचिंब होण्यास विशेष आवडते. आणि त्याचबरोबर इतर अनेकांचे मनोरंजन होते.


कारंजाच्या अस्तित्वामुळे संपूर्ण परिसरात आकर्षक शोभा येते. म्हणूनच ऐतिहासिक काळापासून वास्तु शिल्पज्ञ अशा कारंजाची रचना वेगवेगळ्या पद्धतीने करताना दिसतात. अलीकडे फळबागा तसेच मोठमोठ्या बागेतील गवताला पाणी देण्यासाठी सुद्धा पाण्याच्या दाबाचा उपयोग करून कृत्रिम फवारे तयार करतात. बऱ्याच ठिकाणी कारंजाची शोभा वाढविण्यासाठी कारंजाचा चौथरा आकर्षक तसेच मोठ्या कल्पकतेने बांधलेला दिसतो. वेगवेगळे भौमितिक आकार तसेच हत्ती सारख्या इतर मोठ्या प्राण्यांच्या प्रतिकृती सुद्धा कारंजाच्या परिसरात ठेवलेल्या आढळतात त्यामुळे परिसराची मोहकता अधिकच जाणवते कारण त्याच्या जलाशयात मासे बदक इत्यादी प्राणी पक्षी मुद्दाम ठेवून परिसराला जिवंतपणा आणला जातो शिवाय दूरवर उडणाऱ्या तुषारामुळे परिसरातल्या वनस्पतीनाही पाणी मिळून त्या हिरव्यागार दिसतात. त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात हवेतील आर्द्रता वाढवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.


आवर्तपणे तुषारांचे जलबिंदू जलाशयातील पाण्यावर पडून निर्माण होणारे जलतरंग आल्हाददायक वाटतात. बऱ्याच ठिकाणी उंच उडणाऱ्या कारंजाच्या पाण्यावर विविध रंगाचा प्रकाश आवर्तपणे पडेल अशी व्यवस्था केलेली असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी असे दृश्य मनमोहक दिसते. शेगावला अशा प्रकारची प्रकाशयोजना केलेली आहे. इतरही बऱ्याच ठिकाणी प्रकाश, रंग, कारंज , प्राणी, मूर्ती बगीचा यांचा समन्वय साधून आकर्षक निर्मिती केल्याचे दिसून येते.


 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page