कॅलिडोस्कोपमधील जीवनदर्शन: डॉ. हेमलता दत्तात्रय साने यांचे विज्ञान,साहित्य आणि शाश्वततेचे बहुरंगी विश्व
डॉ वर्षा निंबाळकर
डॉ. हेमलता दत्तात्रय साने (१९४०–२०२५) या वनस्पतीशास्त्रज्ञ, समर्पित शिक्षिका, लेखिका आणि पर्यावरणप्रेमी विदुषी होत्या. त्यांच्या कार्याचा आवाका कॅलिडोस्कोपप्रमाणे बहुरंगी असून विज्ञान, साहित्य आणि भारतीय ज्ञानपरंपरा यांचा सुरेख संगम त्यात दिसतो. चार दशके अध्यापन करत त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्राची गोडी लावली. संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्वामुळे त्यांनी विज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवले. शाश्वत जीवनशैली, निसर्गाशी तादात्म्य आणि माणूसपण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे केंद्र होते. त्यांच्या जीवनातून रुजलेले निसर्गसंवर्धनाचे बीज पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

डॉ. हेमलता दत्तात्रय साने (जन्म -१३ मार्च १९४० - १९ सप्टेंबर २०२५). आज १९ ऑक्टोबर २०२५. साने मॅडम गेल्यापासून गेल्या महिनाभरात त्यांच्या परिचयातील त्यांचे समविचारी मित्र, सहाध्यायी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकजणांनी विविध माध्यमांद्वारे त्याच्या कार्याला आणि आठवणींना उजाळा दिला आहे. विविध लेख, वनराई तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने आयोजित केलेली आदरांजली सभा, आकाशवाणी पुणे केंद्रावर मान्यवरांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली अशा सगळ्याच माध्यमांमधून त्यांचे स्मरण केले आहे. महिनाभर मी हे सगळे ऐकले, वाचले तेव्हा माझ्या लक्षात आले की साने मॅडमच्या एकंदरीत कार्याचा आलेख, शाश्वत जीवनशैली आणि त्यांच्या माणूसपणाकडे पाहणे हे कॅलिडिओस्कोप मध्ये पाहण्यासारखेच आहे. कॅलिडीओस्कोप मधील रंगबेरंगी कांचाचे तुकडे दर वेळी वेगळेच आकृतीबंध निर्माण करतात. त्यामुळे प्रत्येक माणसाला त्याची वेगळीच अनुभूती मिळते. ती प्रत्येकासाठी आपापली खरी आणि काही तरी मिळवून देणारी असते. कॅलिडीओस्कोपमधील सगळ्याच शक्य आकृतीबंधांसहित परिपूर्ण अनुभूती कोणा एकाला येणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. तद्वतच साने मॅडमच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचे, शिक्षक- संशोधक, लेखक आणि व्यक्ती म्हणून असलेल्या मोठेपणाचे आकलन होणे, त्यांचे सारे पैलू पूर्णपणे कोणा एकालाच उलगडणे म्हणजे क्षितिजच गाठल्यासारखे होईल. त्यामुळेच हा लेख त्यांच्यावरचे अनेक लेख, कार्यक्रम, आठवणी, चर्चा यावर बेतलेली माहिती सांधून केलेले कोलाज असणार आहे. आणि त्याउपरही अनेक गोष्टी बाजूला उरणारच आहेत.
डॉ. हेमा साने यांचे शालेय शिक्षण हुजुरपागेत तर महाविद्यालयीन शिक्षण एम. ई. एस. मधे झाले. त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात पुण्यातील प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ श्री. वा. द. वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी केली. अलिबाग जिल्ह्यातील कुणकेश्वर परिसरातील वनस्पतींचा अभ्यास हा त्यांचा पीच.डी. प्रबंधाचा विषय. जुन्या टंकलेखनातील छपाई केलेला त्यांचा भला थोरला कितीतरी वनस्पतींच्या बाह्य गुणधर्मांचे अचूक वर्णन करणारा प्रबंध ग्रंथ आघारकर संशोधन संस्थेच्या ग्रंथालयात पाहिल्याचे मला स्मरते. साने मॅडम यांनी भारतविद्या या विषयात एम. ए., एम. फिल. देखील केले होते. विज्ञान आणि कला या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाहीत. याउलट ज्या व्यक्तीच्या माथ्यावर त्याचा एकत्रित वरदहस्त असतो त्या व्यक्तीसाठी व्यासंगाच्या कक्षा अजून रुंदावतात. विज्ञान आणि साहित्याचा एकत्रित संगम एकमेकांना अधिक ठळक आणि सुसंगतरित्या प्रवाहात कसे ठेवतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे खुद्द साने मॅडम.

संस्कृत, मराठी आणि इंग्रजी या भाषांवरील प्रभुत्व आणि वनस्पतिशास्त्रासारखा निसर्गाशी जवळीक साधणारा विज्ञानविषय याची परस्परपूरक चतुःसूत्री जुळून आल्याने साने मॅडमची विषयावरची पकड अजूनच घट्ट होती. त्यामुळे त्यांनी संस्कृत आणि इंग्रजी तील विविध संदर्भांचा आधार घेत मराठीतून वनस्पतिशास्त्रावर पुस्तके, लेख आणि व्याख्यानांद्वारे विद्यार्थां पर्यंत आणि सामान्यांपर्यंत सहज कळेल अशा रितीने पोहोचवले. साने मॅडमची आजवर तीसाहून अधिक पाठ्यपुस्तके, वनस्पतींवरील सखोल आणि रंजक माहिती देणारी ललित पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यात बुद्ध परंपरा आणि बोधी वृक्ष, कमळ, यक्षपुष्पे ऑर्किड्स, पुणे परिसरातील दुर्मिळ वृक्ष, हवाईसुंदरी जास्वंदी, आपले हिरवे मित्र , परिचितांचा परिचय, सम्राट अशोक, शाश्वत विकास, वनस्पतींच्या दंतकथा यांचा समावेश आहे. त्यांनी WWF च्या फिल्ड गाईडचा मराठी अनुवाद केला आहे. तसेच मनेका गांधीच्या एका पुस्तकाचाही अनुवाद केला आहे.

एकूण ४० वर्ष त्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात अध्यापन करत होत्या. आणि महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख म्हणून त्या २००० साली कागदोपत्री निवृत्त झाल्या. पण त्यानंतर त्यांनी अनेक वर्ष पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात वनस्पतीशास्त्र शिकवले. शिकवणे हेच आपुले जिवीत मानणाऱ्या मॅडमची त्यामुळेच महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सच्या फेलो म्हणूनही निवड झाली. त्यांनी महाराष्ट्र वृक्ष संवर्धनीच्या उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यामध्ये ८ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या ४थ्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साने मॅडम यांनी भूषविले.

शिक्षकाला वर्गात आणि वर्गाबाहेरही त्याच्या शिक्षकी पेशाची झुल कायम पांघरून ठेवावी लागते. साने मॅडमला ही झुल सांभाळण्याचा कुठलाच अविर्भाव करावा लागला नाही कारण शिकणे आणि शिकवणे हा त्यांचा स्वभावधर्म होता. स्थायीभाव होता. समोर आलेल्या कुठल्याही वयातल्या विद्यार्थाला त्या रिक्तहस्त होऊन जाऊ देत नसत. कितीतरी विद्यार्थी त्यांच्याकडे विविध शंका, अडचणी घेऊन येत आणि त्या अखंडपणे त्यांच्या उत्तरे शोधण्याचा प्रवासात स्वतःच मग्न होऊन जात. कोणाचे प्रबंध, लेख, पुस्तकांच्या प्रती तपासून देणे, कोणाची दुर्मीळ झाड पाहण्याची हौस भागवणे, कोणाला एखादया वनस्पतीचा सखोल अभ्यास करायचा आहे त्यात मदत करणे; कोणाला आयुर्वेद शिकायचा आहे म्हणून त्यासाठी लागणारी ग्रंथसंपदा उपलब्ध करून देणे, कोणाला नर्सरी उभी करण्यासाठी मदत करणे यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध वेळेच्याही पुढे जावून वेळ काढणारे स्वच्छंदी मोकळे मन होते.
वनस्पतिशास्त्रातील सातत्याने फिल्डवर्कसाठीची भटकंती, यामुळे वर्गाबाहेर तर मॅडमचा खणखणीत आवाज, फळ्यावरचं संदरु टपोरं अक्षर, विषयातील सखोल संदर्भ वाचन आणि विषयरंजकता यामुळे वर्गात, असे थिअरी आणि प्रॅक्टिकलची सांगड घालत विषय तयारीने शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळेच साने मॅडम यांनी कितीतरी विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्राची गोडी लावली. गरवारे महाविद्यालयात तसेच बाहेरही कितीतरी विद्यार्थ्यांची मुळे वनस्पतीशास्त्रात रुजवली गेली आणि त्याचेच पुढे शिक्षण-संशोधन क्षेत्रातील मोठे वटवृक्ष झाले आणि त्यांनीही पुढे जावून अनेक विद्यार्थी घडवत ही परंपरा कायम ठेवली. याच गुरू-शिष्यपरंपरेची गरज सद्यस्थितीला वनस्पतीशास्त्राला आहे. संस्कृत विषयाच्या त्या अभ्यासक होत्या त्यामुळेच त्यांच्या वनस्पतींवरच्या लिखाणांमधे श्लोक, सुभाषितं यांचे असे जुने संदर्भ येतात की ते आताच्या नव्या काळातील कोणाला माहित असण्याची फारसी शक्यता नाही. त्यामुळे त्यांचे लिखाण हे वनस्पतीशास्त्राच्या शिक्षकांसाठी संदर्भासाठीचा भारतीय ज्ञान परंपरेशी (Indian knowledge system) जोडणारा दुवा आहे. माणूस म्हणून साने मॅडम ज्या माणसाला भेटत त्याच्यावर त्या स्वतःची अशी एक अविस्मरणीय छाप सोडूनच जात.
एकदंरीत अगदी साधासा पेहराव. अगदी नेहमीची साधी साडी नेसलेल्या साने मॅडम अस्खलित इंग्रजी त बोलायला लागल्यावरच समोरच्याचा त्यांच्याविषयीचा ग्रह दूर होत असे आणि नंतर त्यांच्या अगाध ज्ञानभांडाराच्या दर्शनाने समज आणि अहंकार लोप पावत असे. त्यांची विनोदबुद्धी हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अनोखा पैलू होता. त्यांची वाचन आणि कवितांची आवड सर्वश्रुत आहेच पण त्यांची पाककला, चित्रपट, चित्रपटगीते यांच्या आवडीविषयी त्यांचे विद्यार्थी त्यांचा जवळून सहवास लाभलेले अनेक सह्रदय आवर्जून आठवण आणि उल्लेख करायला विसरत नाहीत. साने मॅडमच्या गंभीर चेहऱ्या मागे एक नर्म विनोदी लहान मुल दडले होते हे त्यांच्याशी संपर्कात आलेला कोणी नाकारू शकणार नाही. सढळ हाताने त्यांनी अनेकांना काही ना काही दिले आहे.

माणसाच्या प्रत्यक्ष जगण्यासाठी लागणाऱ्या भौतिक गरजांपेक्षा कल्पनेतील गरजा ह्या फार मोठ्या आहेत. साने मॅडमच्या बाबतीतही अथ पासून इती पर्यंत, माणसाला समृद्ध आयुष्य जगण्यासाठीच्या प्रत्यक्ष आणि कल्पनेतल्या गरजा यात कधीच तफावत निर्माण झाली नाही. त्यामुळेच शाश्वत जीवनशैली ही त्यांच्या जाणीवांमध्ये जन्मतः रुजलेली होती. ती नैसर्गिक होती. कुठलीही बाहय उपरती होऊन ओढून ताणून अंगीकारलेली नव्हती. त्यामुळेच जगाला ती अचंबित करणारी वाटत असली तरी अजिबात अतर्क्य वाटण्यासारखी नव्हती. त्यामुळेच साने मडॅमच्या शोधनिबंधामधेही पर्यावरण संरक्षणासंदर्भात केलेला अभ्यास आणि नोंदी सापडतात. साने मॅडमचे घर हे पुण्याच्या मध्य वस्तीतील एक परीपूर्ण परिसंस्थेसारखेच आहे. पुण्यातील शनिवार पेठेतल्या संधिपाद प्राणी संग्रहालयात क्युरेटर म्हणून काम पाहणाऱ्या साने मॅडमचे समकालीन स्नेही असणारया श्री. अनंत जोशींनी एका आठवणीवजा लेखात या परिसंस्थेचे चपखल वर्णन केले आहे. ते म्हणतात, “ घराच्या दारातून आत गेल्यावर सर्वत्र गर्द झाडी, मोठाले वृक्ष, विविध प्रकारच्या डेरेदार वाढलेल्या वेली, विविध प्रकारची झुडुपं, हरळी तसेच गुलबक्षी,अबोली, कोरंटीच्या झुडुपांच दाट जंगल दिसायचं. सभोवतालच्या झुडुपातून रंगीबेरंगी फुलपाखरे, नाकतोडे, रातकिडे, गवती किडे, गोगलगायी, पैसा, कोळी, गोम, सरडे, पाली, बेडूक, खारी, गांडुळ, भुंगे, चतुर, गोचीड वगैरे प्राणी तसेच बुलबुल, कोकिळ, धोबी, भारद्वाज, वटवट्या, चिमण्या, खंड्या, कावळे, साळुंकी, पोपट, कोतवाल असे विविध प्रकारचे पक्षी स्वच्छंद उडताना, बागडताना दिसायचे. मध्यम आकाराचे एक मुंगूस आणि दोन जमिनीवरील कासवं (टॉरटॉइज) पाहिल्याचे आठवते. दुपारच्या शांत वेळी जागल्या (सिकाडा) आणि रातकिड्यांचे किरकिरण्याचे आवाज दुरूनही कानावर यायचे. खूप मजा वाटायची. क्षणभर आपण जंगलातच आलोत की काय असा भास होत असे”. हे वाचल्यावर साने मॅडमला हे विश्व बाहेरच्या झगमगत्या कचाकडी विश्वापेक्षा का प्रिय होते हे कोणाही निसर्ग जाणीवांनी शहाण्या असलेल्या माणसाला उमगेल. त्यांच्या घराचे स्मारक व्हावे ही जेष्ठ पर्यावरण शास्रज्ञ श्री. माधव गाडगीळ यांनी केलेली सूचना हेच शहाणपण दर्शविते.

साने मॅडमवर सकाळमध्ये पहिला लेख लिहिला तो सुधीर गाडगीळ यांनी. आणि तो त्यांच्या “मुद्रा” या पुस्तकात देखील समाविष्ट आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, कुत्रा आणि मांजरीच्या सानिध्यात वाचन करणाऱ्या मॅडमचे रेखाचित्र अतिशय बोलके आहे. साने मॅडमकडच्या मांजरी या त्यांच्याइतक्याच सर्वांना परिचित आहेत. अनंत जोशींच्याच एका आठवणीत त्यांच्याकडील एका मांजरीचे बाळंतपण साने मॅडमने किती मायेने आणि आपुलकीने केल्याचा उल्लेख आहे. आपल्या परिसरातील सर्व जीवांना जगण्याची साधने त्या उपलब्ध करून देत राहिल्या. म्हणूनच साने मॅडमचे कुटुंब इतर कोणाही पेक्षा खूप मोठे होते. पर्यावरण शास्रातील व्याख्येनुसार माणूस हा प्राणी पृथ्वीवरील परिसंस्थेमध्ये इतर सर्व वनस्पती, प्राणी, पक्षी आणि सूक्ष्मजी वांप्रमाणे एकाच रिंगणावर उभा असायला हवा. साने मॅडम स्वतः त्यांच्या घराभोवतीच्या परिसंस्थेचाच एक भाग होत्या. त्यांच्यापासून स्वतःला त्यांनी वेगळे मानले नाही. पण इतरांपेक्षा माणूस म्हणून आपणाकडे असलेल्या सरस जाणिवांचे भान ठेवत त्यांनी पुढे होत या सर्वांना इजा पोहोचेल असे न वागता, गरज पडेल तिथे हात दिला. अशा माणसांपेक्षा पृथ्वीला मग सध्या अजून कशाची जास्ती गरज आहे? साने मॅडम सारखी मातीत उगवून मातीतच जगणारी माणसे यापुढच्या जगात पाहायला मिळतील की नाही माहिती नाही पण निसर्गाशी तादात्म्य पावत साने मॅडमने स्वतःच्या जगण्यातूनच रूजवलेले निसर्गरक्षणाचे बीज यापुढेही फुलेल, बहरेल.
(लेखिका पुणेस्थित महाविद्यालयात वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.)

Comments