एकदली वनस्पतींचे महत्व
- smsrushtidnyan
- Jun 4
- 3 min read
डॉ. पुरुषोत्तम काळे
एकदली वनस्पतींच्या सुमारे ७७ कुळांमध्ये पोएसी, पामी, लिलिएसी, म्युसेसी, सायपरेसी, ऑर्किडेसी व ब्रोमेलियासी ही प्रमुख कुळं आहेत. या वनस्पती अन्नधान्य, फळं, चारा, औषधी, धागे, लाकूड, इंधन, शोभा आणि बांधकामासाठी उपयुक्त आहेत. गहू, तांदूळ, ऊस, नारळ, केळ, कांदा, लसूण, अननस, बांबू, ऑर्किड्स यांसारख्या वनस्पतींचा उपयोग जीवनाच्या विविध पैलूंमध्ये होतो आणि त्यांचं आर्थिक महत्त्वही मोठं आहे. एकदली वनस्पतींच्या सुमारे ७७ कुळांमध्ये पोएसी, पामी, लिलिएसी, म्युसेसी, सायपरेसी, ऑर्कि डेसी व ब्रोमिलीएसी ही प्रमुख कुळं आहेत. या वनस्पती अन्नधान्य, फळं, चारा, औषधी, धागे, लाकूड, इंधन, शोभा आणि बांधकामासाठी उपयुक्त आहेत. गहू, तांदूळ, ऊस, नारळ, केळ, कांदा, लसूण, अननस, बांबू, ऑर्किड्स यांसारख्या वनस्पतींचा उपयोग जीवनाच्या विविध पैलूंमध्ये होतो आणि त्यांचं आर्थिक महत्त्वही मोठं आहे.

सपुष्पी वनस्पतींच्या एकदली (मोनोकॉट्स) उपवर्गात सुमारे ७७ कुळांचा समावेश होतो. या कुळांत काष्ठी (वूडी) व अकाष्ठी; वर्षायू (ऍन्युअल), द्विवर्षायू (बायन्युअल) तसेच दीर्घायू (पेरिन्यूअल) आणि विविध अधिवासात वाढणाऱ्या वनस्पतींचा समावेश होतो. त्यांतील मोठी व महत्वाची कुळे म्हणजे पोएसी (गवत-कूळ), पामी (ताड-कूळ), लिलिएसी (कमळ-कूळ), म्युसेसी (केळ-कूळ), सायपरेसी (तृणसम-कूळ), ऑर्किडेसी आणि ब्रोमेलियाडेंसी (अननस-कूळ). या वनस्पती अन्न-धान्य, चारा, फळं, धागे, बांधकामासाठी उपयुक्त लाकूड, औषधी आणि शोभेची-सुंदर झाडे पुरवतात.

पोएसी कुळांत प्रामुख्यानं धान्य, चारा व धागे देणाऱ्या 'तृण/ गवत’ प्रकारातल्या वनस्पती आहेत. वन्य आणि पाळीव प्राण्यांसाठी चारा या कुळातील बहुतेक सर्वच वनस्पती पुरवतात. जगभरातील विविध देश व प्रांत गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, बार्ली, ओट्स, राय, क्विनोवा, इत्यादी धान्ये आणि छद्म-धान्ये (सुडोसीरियल्स) पिकवतात. प्रत्येक धान्याची पोषण-मूल्ये व औषधी उपयोग भिन्न आहेत. किण्वनाने यातील बऱ्याच धान्यांपासून विविध देशांत मद्याचे विविध प्रकार बनवले जातात. ऊस देखील याच कुळातील असून त्याच्या पासून गूळ, साखर, जैविक-इंधन, कागद, अशी अनेक उत्पादने बनवता येतात. उसाचा रस औषधी गुणांचा, पौष्टिक व शरीरास थंडावा देणारा असतो. बांबू हे सर्वाधिक वेगानं वाढणारं गवत असून त्याच्या कोवळ्या पानांवर कोआला अस्वला सारखे वन्य प्राणी वाढतात. बांबू हा कोवळा असतांना खाण्यासाठी/ लोणची बनवण्यासाठी; इमारतींच्या बांधकामात 'पराती' (स्कॅफोल्डिंग्स) बांधण्यासाठी; टोपल्या, तट्टे, इरली, आकाशकंदील, शोभिवंत गोष्टी, इत्यादी बनवण्यासाठी; शिड्या, तिरड्या बनवण्यासाठी; पर्णकुट्या बांधण्यासाठी; विविध प्रकारचे कागद व कापड बनवण्यासाठी अशा नानाविध उपयोगांचा आहे. गवती-चहा, वेखंड, पामरोसा, सिट्रोनेला इत्यादी गवत कुळातील वनस्पतींपासून सुगंधी तेले बनवली जातात व त्यांचे औषधी उपयोगही आहेत. धान्यांपासून मिळणारं स्टार्च अनेक उद्योगांमध्ये विविध कारणांसाठी वापरलं जातं. शोभिवंत गवत मैदानांत, बागांमध्ये व इतर आवारांतून जोपासलं जातं.

पामी अथवा ऐरेसी (माड-कुळ) हे उष्ण-समशीतोष्ण प्रदेशांत आढळणारे वृक्ष त्यांच्या उंच वाढणाऱ्या काष्ठी खोडंसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक द्वीप व द्वीपकल्पीय देशांच्या अर्थव्यवस्थेत या कुळातील झाडांचा महत्वाचा वाट असतो. यातील माड/ नारळ हे बहू-उपयोगी झाड त्याच्या पौष्टिक शहाळ्यांसाठी, नारळांसाठी, खोबरेल तेलासाठी वाढवलं जातं. त्याच्या खोडापासून साकव/ छोटे पूल, झोपड्या, बांधल्या जातात. नारळाच्या झावळ्या (पाने) घरांचे छत साकारण्यासाठी, तट्टे/ चटया विणण्यासाठी, खराटे/ केरसुण्या बनवण्यासाठी वापरल्या जातात. नारळाच्या फळांमधील धाग्यांपासून काथ्या बनतो ज्याचा वापर दोर, गाद्या, ध्वनिरोधक पट्ट, पाय-पुसणी, ब्रश, अशा अनेकविध उत्पादनांत केला जातो. खोबरेल तेलाचा वापर पाककृतींमध्ये, केशतेलांमध्ये, व अनेक आयुर्वेदिक औषधी व मलम यांमध्ये केला जातो. नारळाच्या करवंट्या वापरून नानाविध शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. भारतातील पूजा, आदर-सत्कार, पारंपरिक समारंभ नारळाशिवाय होऊ शकत नाहीत. पोफळी/ सुपारी देखील भारतीय परंपरेत अतिशय महत्वाची आहे. पाहुण्यांचे स्वागत पान-सुपारीनेच होते. पोफळींचे खोड देखील बांधकामांत उपयुक्त असते. ताडाची फळे (ताड-गोळे), खजूर, जेली-पाम, अंकाई-पाम, रत्तन-पाम,इत्यादी नारळ कुळातील फळे जगभर खाल्ली जातात. साबुदाणा व इतर स्टार्ची पदार्थ पाम्स पासून बनवले जातात. नारळा खेरीज अनेक पाम खाद्यतेल उत्पादनासाठी वाढवले जातात. रत्तन-पाम पासून उच्य दर्जाच्या काठया व घरगुती वापराच्या वस्तू बनवल्या जातात. ताडी-माडी सारखी उत्तेजक मद्ये विविध पाम्स पासून बनवली जातात. अनेक प्रकारचे पाम्स बागांमधून व आवारांमधून शोभिवंत झाडे म्हणून वाढवले जातात.

लिलिएसी (कमळ-कूळ) देखील अन्न, औषधी व शोभिवंत फुले यांसाठी प्रसिद्ध आहे. कांदे, लसूण, आले, ऍस्परॅगस, इत्यादींचे पाककृतींतलं महत्व जगन्मान्य आहे. यांना औषधी महत्वही तितकेच आहे. कोरफड, स्मायलॅक्स, कोलचीकम अशा इतर औषधी वनस्पती देखील या कुळात आहेत. कमळ-काकडी पौष्टिक भाजी म्हणून तर कमळाच्या बिया सुद्धा भाजी म्हणून वा लाह्या करून खायला प्रिय आहेत. घायपात, युक्का यांसारख्या जातींपासून उत्तम प्रकारचे तंतू-धागे मिळतात. काही जातींपासून राळ (रेझीन) मिळते. ट्युलिप, कमळ, लिली यांसारखी फुले केवळ त्यांच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर पारंपरिक महत्वासाठी जगन्मान्य आहेत.

म्युसेसी (केळ-कूळ) हे कूळ त्याच्या जातींच्या पौष्टिक व स्वस्त फळांसाठी ओळखलं जातं. भारतीय संस्कृतीत केळ्याच्या झाडाचे पारंपरिक महत्व आहे. जगभरात मिळून सुमारे १० कोटी टन केळ्यांचं उत्पादन होतं. या कुळातील काही जाती त्यांच्या तंतू-धाग्यांसाठी (उदाहरणार्थ मनिला हेम्प) जोपासल्या जातात. अनेक जातींची कोवळी खोडं खाण्यासाठी व औषधी उपयोगांसाठी वापरली जातात. यांची पाने लांब-रुंद व मऊ असल्याने ती अन्न वाढण्यासाठी वापरात येतात. भारतात गर्भार (केळफूल असलेली) केळ शुंभ मनात असल्याने लग्न-समारंभात ती प्रवेशद्वाराशी आवर्जून उभी करतात. काही जाती शोभिवंत म्हणून बाग व इमारतींच्या आवारात जोपासतात. कॅनेसी व झिंजिबरेसी या संलग्न कुलांतील जाती सुद्धा त्यांच्या शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध आहेत.
कॅनेसी व झिंजिबरेसी या संलग्न कुलांतील जाती सुद्धा त्यांच्या शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध आहेत.
सायपरेसी कुळातील प्रजाती व जाती देखील अन्न, तंतू-धागे, औषधी, बुरूडकाम, इत्यादींसाठी कामाला येतात.
ऑर्किडेसी कूळ त्यातील अत्यंत लोभस फुलांसाठी ओळखलं जातं. युरोपात आजारी माणसांना हटकून ऑर्किडची फुले देतात. ऑर्किडच्या बहुतांश प्रजाती व जाती इतर झाडांच्या खोडांवर वाढतात (स्पेस पॅरासिटिसम).

ब्रोमेलियासी कुळातील अननस व तत्सम जाती त्यांच्या शोभिवंत झाडांसाठी, फळांसाठी व सुगंधासाठी जोपासतात.
(लेखक हे मुंबईतील रामणी रंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख आणि प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.)
Comentarios