top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

कचरा…नव्हे सोनं

  • Jun 4, 2025
  • 10 min read
सौ. नमिता खटावकर

‘पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन’ ही संस्था कचऱ्याकडे संसाधन म्हणून पाहते. ओला, सुका, कापडी, ई-कचरा अशा सर्व प्रकारच्या कचऱ्यापासून पर्यावरणपूरक उत्पादने निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. त्यांनी प्लास्टिकपासून बाक, जुन्या कपड्यांपासून वस्तू व सेंद्रिय खत निर्मितीप्रमाणे अनेक उपक्रम राबवले आहेत. २०२४ मध्ये त्यांनी हजारो किलो कचरा पुनर्वा परात आणून पर्यावरण संवर्धनास हातभार लावला. ही चळवळ शाश्वत विकासाकडे नेणारी प्रेरणादायक दि शा आहे.


कचरा...

आपण त्याच्याकडे नेहमीच उपेक्षेच्या नजरेने पाहिले आहे. जणू तो आपल्या जीवनाचा एक टाकाऊ, नकोसा झालेला भागच आहे. त्याला दिलेली जागाही तात्पुरती असते. एका घराच्या कोपऱ्यात, फक्त एक दिवसापुरती. दुसऱ्या दिवशी मात्र आपण त्याला घराबाहेर फेकून देतो — जणू तो आता कायमचाच परका झाला आहे. जसे काही वेळा व्यसनाधीन, चुकीच्या वाटेवर गेलेली मुले पालकांना नकोशी वाटतात आणि अखेरीस त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवला जातो — “आता तुझं तू पाहा,” असा शेवटचा निरोप देत. अगदी तसाच व्यवहार आपण कचऱ्याशी करतो. पण जर आपण क्षणभर थांबून विचार केला, तर कदाचित कळेल की, जसा एखादा बिघडलेला मुलगा योग्य मार्गदर्शनाने सुधारू शकतो आणि देशाच्या विकासात एक संसाधन म्हणून मोलाची भूमिका बजावू शकतो, त्याचप्रमाणे कचऱ्यालाही योग्य प्रक्रियेच्या साहाय्याने संसाधनात रूपांतरित करता येऊ शकते. त्याच्यापासून नवउत्पादने तयार होऊ शकतात, जे केवळ पर्यावरणपूरकच नसून तरुणांसाठी उद्योजकीय संधींचाही मार्ग मोकळा करू शकतात.


हेच कार्य गेली १४-१५ वर्षे ‘पूर्णम इकोव्हीजन फाऊंडेशन’ करत आहे. जीचे मुख्य कार्य क्षेत्र जरी पुणे असले तरी दिवसेंदिवस नाशिक, संभाजीनगर, गोवा व बंगळूर पर्यंत क्षेत्राचा विस्तार वाढत आहे. ही संस्था कोणत्याही प्रकारच्या कचऱ्याकडे (ओला, सुका, ई-कचरा, कापड, प्लास्टिक इत्यादी) केवळ कचरा म्हणून न पाहता त्याकडे एक मौल्यवान संसाधन म्हणून पाहते. ती या कचऱ्यापासून नवकल्पनांद्वारे विविध उपयोगी वस्तू, उत्पादने व तंत्र विकसित करते. या उत्पादनांचा उपयोग समाजासाठी उपयुक्त ठरेल अशा रीतीने केला जातो आणि त्यांची विक्रीही सामाजिक उद्दिष्ट लक्षात घेऊन केली जाते. या प्रक्रियेतून मिळणारा निधी समाजाच्या शाश्वत विकासासाठीच खर्च केला जातो.


पूर्णम इकोव्हीजन फाऊंडेशनची स्थापना नोव्हेंबर २०११ मध्ये डॉ. राजेश मणेरीकर, डॉ. अक्षया मणेरीकर, प्रशांत दुराफे, सचीन कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्ट स्पष्ट करायचं झालं तर, आपण नेहमीच ऐकत असतो की औद्योगिकीकरण, शहरीकरण, लोकसंख्या वाढ आणि नैसर्गिक संसाधनांचा अतीव वापर यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा समस्यांवर उपाय म्हणून आपण आंदोलनं करतो, उपोषण करतो. पण काही काळ गेल्यावर लक्षात येतं की ज्यासाठी एवढं केलं, ती समस्या अद्यापही सुटलेली नाही; उलट ती अधिक गंभीर झालेली आहे. त्यामुळे संस्थेने ठरवलं की या सगळ्याच्या एक पाऊल पुढे जाऊन या समस्यांमधूनच संधी शोधायची आणि त्या संधींच्या आधारे पर्यावरणाचं रक्षण करणारी शाश्वत उपाययोजना करायची. उदाहरणार्थ, प्लॅस्टिक कचरा हा आज जगासमोरचा मोठा प्रश्न आहे. प्लॅस्टिकचा गैरवापर, त्याची विल्हेवाट लावण्याची योग्य व्यवस्था नसणे, आणि त्यामुळे होणारे प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. पण संस्थेने याच समस्येकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं. संस्थेने अधिकृत प्लास्टिकचा पुनर्वापर करणाऱ्या संस्थेच्या मदतीने प्लास्टिक कचऱ्याचा उपयोग करून त्यातून ‘बाक’ बनवायला सुरुवात केली. या बाकड्यांचा उपयोग उद्यानांमध्ये बैठकीसाठी केला जाऊ शकतो. यामुळे केवळ कचऱ्याचाच पुनर्वापर झाला नाही, तर स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या.


निर्माण होणाऱ्या कचऱ्याला संसाधनामध्ये रूपांतरकरण्याची हि पूर्णम इकोवीजन फॉउंडेशनची पद्धत ही केवळ तांत्रिक नव्हे तर पर्यावरणविषयक समस्यांकडे शाश्वत दृष्टिकोनातून पाहणारी एक सामाजिक चळवळ आहे. ही पद्धत समाजाच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवत आहे.


खरच, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनचं काम पाहून मला खूपच नवल वाटलं! पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे, आपण वापरत नसलेले कपडे दुसऱ्याला वापरण्यासाठी दिले पाहिजेत असं आपण आतापर्यंत हजारो वेळा ऐकलं किंवा वाचलं असेल, पणं यां सर्वाची प्रत्यक्षात अंमलबजावणी फारच तूरळक...पण पूर्णमने अल्पावधीतच केलेली परिणामकारक व दूरदृष्टीपूर्ण कामगिरी निश्चितच उल्लेखनीय ठरते. जसं एखादा रहस्यपट पाहताना एकेक गुंतागुंत उलगडत जाते, अगदी तसाच अनुभव पूर्णमबाबत माहिती घेताना येत होता. आता जास्त वेळ न दवडता तुम्हाला पूर्णमच्या काही यशस्वी पाऊलखुणांची माहिती देतो. यां पाऊल खुणा नक्कीच आपल्याला ‘फक्त कचरा ‘ या पारंपारिक दृष्टिकोनातून ‘मूल्यवान संसाधन’ यां नवदृष्टिकोनापर्यंत घेऊन जाण्याची प्रेरणा देतील. खरंतर याच हेतूने हा लेख लिहिला आहे. तसेच या पाऊल खुणा युवकांना नवीन दिशा दाखवतील अशी आशा व अपेक्षा बाळगतो.


परिपूर्णम... कपडे तुमचे कौशल्य आमचे!

आपल्यातल्या काही जणांना ‘बोहारीण’ नक्कीच आठवत असेल. त्या गावोगावी फिरत, प्रत्येक घरात जाऊन वापरात नसलेले जुने कपडे गोळा करायच्या. त्या बदल्यात भांडी द्यायच्या — कधी ताटं, वाट्या, डबे, तर कधी चमचे. त्यामुळे घरातील नकोसे झालेले कपडे उपयोगात यायचे आणि कचऱ्याचे प्रमाणही कमी व्हायचे.


पण आता बोहारीण येणं बंद झालंय. त्यांचं कामही हळूहळू विस्मरणात गेलं. आता तर कोणीतरी वापरलेले कपडे पुन्हा वापरणं म्हणजे प्रतिष्ठेला धक्का, असे मानले जाते. त्यात आता दिवसेंदिवस येणाऱ्या नवं-नवीन -ट्रेंडी कपड्यांच्या खरेदीचा ओघ वाढला आहे. याचा परिणाम असा की, वापरात नसलेले कपडे साठतच चालले आहेत. यावर उपाय म्हणून पूर्णमने फॅब्रिक कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेऊन थोड वेगळ्या पद्धतीने यावर उपाय शोधण्यास सुरुवात केली. बोहारीण घेतलेल्या कपड्यांना धुऊन व थोड दुरुस्त करून पुन्हा जुन्या बाजारात जाऊन तेच कपडे विकत असे.  पूर्णमने मात्र यां कापडी कचऱ्याला आपला कच्चा माल समजून त्या पासून अध्ययावत, दर्जेदार, आकर्षक व ट्रेंडी कापडी वस्तू बनवायला सुरुवात केली. म्हणजे एखादा ग्राहक जेव्हा ती कापडी वस्तू विकत घेईल तेव्हा तो संस्थेवर किंवा पर्यावरणावर उपकार म्हणून विकत घेणार नाही तर, एखाद्या मोठ्या कंपनीत तयार होणाऱ्या दर्जेदार वस्तूप्रमाणेच उत्तम डिझाईन, ट्रेंडी आकर्षक वस्तू असल्यामुळे तो पसंती देईल.

संस्थेची पुण्यात गोखलेनगर, हडपसर आणि कोंढवा येथे तीन केंद्रे असून, त्या ठिकाणी महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात येते आणि प्रशिक्षणानंतर त्यांना संस्थेमध्येच रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.

२०२४ मध्ये पूर्णमने समाजप्रबोधन आणि कचरा व्यवस्थापनासाठी विविध उपक्रम राबवले. यामध्ये सोसायटी ड्राइव्ह, डोअर टू डोअर कलेक्शन आणि इतर ९२ ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतून १८ हजार किलोग्रॅम फॅब्रिक कचरा गोळा केला गेला, ज्यापैकी १२ हजार किलोग्रॅम कापड गरजू व्यक्तींना दान करण्यात आले. या जमा केलेल्या कपड्यापासून ९० पेक्षा जास्त प्रकारच्या बॅग, पाऊच, पर्स अशा वस्तू तयार केल्या जात आहेत. या उपक्रमामुळे थेट १०० पेक्षा जास्त महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे. उत्कृष्ट डिझाईन, ट्रेंडी आणि पर्यावरणपूरक वस्तूंच्या वाढत्या मागणीमुळे सुमारे ६० हून अधिक ठिकाणी स्टॉलही लावण्यात आले आहेत. या प्रकल्पातून स्पष्ट होते की, पूर्णमने वापरात नसलेल्या कपड्याला संसाधन म्हणून पाहून त्याचा प्रभावी व शाश्वत उपयोग करत आहे.

 

ग्रीन कॅन्सल्टन्सी

यां उपक्रमाचे तीन महत्वाचे घटक आहेत. प्रथम, घरगुती ओल्या कचऱ्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करणे. यामध्ये पूर्णमची टीम स्थानिकांच्या घरोघरी जाऊन ओल्या कचऱ्यावर कशी प्रक्रिया करायला पाहिजे यासाठी मार्गदर्शन करते. शिवाय प्रक्रिया करण्यासाठी अल्प दरात ‘किट’ देखील पुरविते. ज्यामुळे घरगुती ओल्या कचऱ्याचे घरच्या घरी निदान होते व त्या खताचा उपयोग आपल्या घरच्या झाडांना पौष्टिक व स्वस्त खाद्य देण्यास देखील मदत होते. अनेक निवासी सोसायट्या संस्थेला जोडलेल्या आहेत ज्या ठिकाणी पूर्णम स्वतः लक्ष देऊन खत निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देते. या सर्वाचा सामाजिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम म्हणजे पर्यावरण प्रदूषण रोखले जाते, आजू-बाजूचा परिसर स्वच्छ राहतो व महानगर पालिकेच्या डोक्यावरील भार देखील कमी होतो. या प्रकल्पातील दुसरा घटक म्हणजे, जैविक कचऱ्याच्या साहाय्याने बायोगॅस निर्मिती करून घरातील स्वयंपाक घरात इंधन म्हणून त्याचा उपयोग करणे. हा प्रयोग ग्रामीण भागात उत्तम पद्धतीने राबवीला जाऊ शकतो आणि त्यासाठी पूर्णमच्यावतीने प्रयत्न चालू आहेत. तिसरा घटक, पर्जन्य जलसंधारण होय. आज पुण्यापासून काही किलोमीटर अंतरावर टँकरने पाणी पोहचवावे लागत आहे. कितीतरी क्षेत्रे दुष्काळाच्या छायेत आहेत. अशावेळी पावसाचे पाणी वाया न जाऊ देता, ते जमिनीत मुरविणे किंवा सोसायटीच्या ठिकाणी साठण्यासाठी फाउंडेशन आधुनिक तत्त्वांवर आधारित, कमी खर्चिक आणि सहज वापरता येतील अशी जलसंधारण पद्धती वापरते. पूर्णमच्यावतीने काही सोसायट्यामध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पुणे व बीड सारख्या दुष्काळी भागात पर्जन्य जल व्यवस्थापनसाठी मदत झाली आहे.

२०२४ दरम्यान पूर्णमने साधारण ३ लाख किलोग्रॅम ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले. तसेच वैयक्तिक स्तरावर ५१ पेक्षा जास्त घरांमध्ये खत निर्मिती करण्याचे ‘किट ‘ देण्यात आले. पुण्यातील बऱ्याच निवासी सोसायटी सेंद्रिय खत निर्मितीसाठी पूर्णमला जोडल्या आहेत. पर्जन्य जलसंधारणाबाबत उल्लेखनीय बाब म्हणजे पूर्णमने ३० लाख लिटर पावसाच्या पाण्याचे साठवणूक करण्यासाठी प्रयत्न केला.

 

ई-यंत्रण


ई वेस्ट – ई.वेस्ट म्हणजे विजेवर चालणारे असे उपकरण जे आता वापरात नाही आहे. उदा. टीव्ही, मोबाईल, फ्रीझ, हेडफोन अशी असंख्य उदाहरणे देतां येतील. बदलत्या परिस्थितीनुसार बाजारात अध्ययावत नव-नवीन उपकरणे येतात परिणामी जुनी उपकरणे तशीच धूळ खात घराच्या एखाद्या कोपऱ्यात पडून राहतात. अन्य कचऱ्यापेक्षा ई-कचऱ्याबाबत तशी फारशी जनजागृती झालेली नाही आहे. त्यामुळे नागरिक कचरा देत असताना ई-कचरा वेगळा करत नाहीत. सध्याच्या शासकीय नियोजन यंत्रणेला न झेपणाऱ्या गोष्टी म्हणजे प्लास्टिक आणि ई कचरा होय.

हल्लीचाच एक अहवाल सांगतो कि, पुणे शहरात IT क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असताना, ई-कचऱ्याचे व्यवस्थापन मोठं आव्हान बनलं आहे. पुणे महापालिकेने काही स्वयंसेवी संस्थांशी भागीदारी केली असली तरी, प्रत्यक्षात ९०% ई-कचऱ्याची विल्हेवाट अनौपचारिक ( Informal sector ) मार्गांनीच होते. यामागे पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळाची कमतरता हे प्रमुख कारण आहे. ई -कचरा पर्यावरण दृष्ट्या खूपच हानिकारक आहे. ई-कचऱ्यात असलेले विषारी रसायनं माती व पाण्याला दूषित करून पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. श्वसनविकार, त्वचारोग, कर्करोग यांचा धोका वाढतो. अनौपचारिक पद्धतीने कचरा जाळल्यास हवा प्रदूषित होते, जैवविविधतेवरही परिणाम होतो. तसेच पुनर्वापरयोग्य मौल्यवान घटक वाया जातात आणि कचरा व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण येतो.पूर्णमने यां समस्येला खूपच गांभीर्याने घेतलं आहे. सध्या पूर्णमशी पुण्यातील १०० पेक्षा अधिक निवासी सोसायटी, ५० शाळां-कॉलेज व ५० हून अधिक व्यावसायिक आस्थापने संलग्न आहेत. यां ठिकाणी नियमित ड्राईव्ह आयोजित करून मोठ्याप्रमाणात ई-कचरा व प्लास्टिक गोळा केले जाते. संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिवशी मेगा ड्राईव्ह म्हणजेच ‘ Plastic and E-waste Handling for Ecofriendly Lifestyle’ (PEHEL) उपक्रम आयोजित करून ई-वेस्ट व प्लॅस्टिक गोळा केले जाते. यां गोळा केलेल्या कचऱ्यात काही अशीही उपकरणे असतात ज्यांना दुरुस्त करणे सोपे असते. परिणामी अशा दुरुस्त केलेल्या उपकारणांना (उदा. लॅपटॉप, मोबाईल ) गरजू व्यक्तींना किंवा शाळांना दान केले जाते व अन्य सर्व ई-कचरा शासन मान्यताप्राप्त ई-वेस्टचे विल्हेवाट करणाऱ्या संस्थांना दिले जाते.


ई-वेस्ट कडे विद्यार्थ्यांनी नव्या दृष्टिकोनातून बघावे यासाठी “Best Out of E-Waste (BOEC) अशी स्पर्धा आयोजित केली जाते. जी इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थी त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानाचा आणि सर्जनशीलतेचा वापर करून नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करतात. गेल्या सहा वर्षांपासून सुरू झालेली ही स्पर्धा, जी फक्त तीन शाळांपासून सुरू झाली होती, आज पुणे शहरातील ५३ शाळांपर्यंत पोहोचली आहे.या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना ई-वेस्टचे सर्जनशीलतेने पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करणे. त्यांच्या कल्पकतेचा आणि कौशल्याचा उपयोग करून विद्यार्थी फेकून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना उपयोगी आणि देखण्या वस्तूंमध्ये रूपांतरित करतात. २०२४ मध्ये राबविलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी २३२ प्रकल्प सादर केले होते. पूर्णमने संस्थेने २०२४ मध्ये पर्यावरणसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या कालावधीत सुमारे ९७,००० किलोग्रॅम ई-वेस्ट आणि २३,००० किलोग्रॅम पेक्षा जास्त प्लास्टिक कचरा गोळा केला गेला. संस्थेच्या पुढाकाराने ४७५ हून अधिक घरांना थेट भेट देऊन ई-वेस्ट आणि प्लास्टिक गोळा करण्यात आले. यासाठी वर्षभरात सुमारे ८०० छोटे-मोठे ड्राइव्ह आयोजित केले गेले, ज्यामुळे स्थानिक समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता वाढली. गोळा केलेल्या ई-वेस्टमधील १०६ लॅपटॉप व कॉम्प्युटर दुरुस्त करून विद्यार्थ्यांना, ग्रामपंचायतला आणि गरजू व्यक्तींना दिले गेले, ज्यामुळे त्यांचा पुन्हा उपयोग होऊन नवी दिशा मिळाली. पूर्णमच्या या ई-वेस्ट व प्लास्टिक व्यवस्थापनासाठी पूर्णमला पुणे महानगरपालिकेसोबतच काही संस्था आर्थिक साहाय्य करतात तर काही संस्था किंवा कंपन्या मनुष्यबळाचा पुरवठा करतात.

 

प्लास्टिक

काळाच्या ओघात काही टिकत नाही असे म्हणतात. काही लोक विनोदाने म्हणतात, टिकणारी एकच गोष्ट आता शिल्लक आहे. ती म्हणजे प्लास्टिक होय. विनोदाने जरी म्हटलं तरी हे तथ्य नाकारता येत नाही. कारण पृथ्वीवरील प्रत्येक घटक हा नाशवंत आहे; तो आज-ना-उद्या नष्ट होणार आहे किंवा त्याचे दुसऱ्या घटकात परिवर्तन तरी होणार आहे. प्लास्टिक मात्र पाच -दहा वर्षे नव्हे तर चक्क ५०० ते १००० वर्षे विघटित होण्यासाठी घेतो. पूर्णमने मागच्या एका वर्षात २३००० कि. ग्रॅमपेक्षा जास्त प्लास्टिक गोळा केले होते.अशा यां प्लास्टिकला पूर्णम गोळा करते व रिसायक करणाऱ्या संस्थांना देते. नंतर अशा संस्था त्यावर प्रक्रिया करून त्यापासून इकोब्रिक्स (विटा),बाक,कचरा पेट्या, फुलदाण्या, शोभेच्या वस्तू व अन्य कलाकृती बनवतात.

 

स्वयंसेवक जोडणी प्रकल्प

पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारा “स्वयंसेवक जोडणी प्रकल्प” (Volunteer Engagement Program – VEP) हा एक उपक्रमशील, सामाजिकदृष्ट्या बांधिल आणि नेतृत्वक्षम तरुण घडविणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. पर्यावरण रक्षणासाठी काहीतरी योगदान देण्याची इच्छा असलेल्या शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी तसेच विविध कंपन्यांतील कर्मचारी यांना स्वयंसेवक म्हणून या प्रकल्पात सामावून घेतले जाते. संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून त्यांच्यात कार्यकुशलता, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणिवा विकसित करण्याचे कार्य या प्रकल्पाद्वारे केले जाते.

जुन्या वर्तमानपत्रांपासून पर्यावरणपूरक पेपर बॅग तयार करणे, गणपती विसर्जनानंतर शाडू मातीचे संकलन, ई-वेस्ट, फॅब्रिक आणि प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण व संकलन, नदी घाट आणि किल्ल्यांची स्वच्छता मोहीम, पर्यावरणीय समस्यांवर आधारित लघु संशोधन प्रकल्प यासारख्या उपक्रमांमध्ये स्वयंनसेवकांचा मानव संसाधन म्हणून प्रभावी सहभाग करून घेण्यात आला. स्वयंसेवकांच्या माध्यमातून केवळ सेवा नव्हे, तर पर्यावरण संवर्धनासाठी एक सकारात्मक सामाजिक बदल घडवण्याचे कार्य या प्रकल्पाने साधले आहे.

२०२४-२५ या वर्षात या प्रकल्पाअंतर्गत एकूण ३३ पेक्षा जास्त उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले, ज्यात पेपर बॅग निर्मिती, शाडू मातीचे संकलन, ई-वेस्ट, फॅब्रिक व प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण, नदी घाट व किल्ल्यांची स्वच्छता मोहिमा, पर्यावरणीय समस्यांवर आधारित लघु संशोधन प्रकल्प आणि ‘पेहेल’, ‘स्नेहमेळावा’, ‘वर्धापन दिन’ यांसारखे विशेष कार्यक्रम समाविष्ट होते. या सर्व उपक्रमांमध्ये ३००० हून अधिक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवून ६००० तासांहून अधिक सेवा दिली.

 

Center for Applied Research in Environment (CARE):-

आज पर्यावरणात जशा अनेक समस्या आहेत तशाच त्या समस्यांमध्ये अनेक संधी देखील आहेत. या संधी ओळखून भारतातील शेतकरी आपल्या कल्पनेच्या जोरावर नवीन नवीन तंत्रे विकसित करत असतो. अशा तंत्रांना मोठ्या स्तरावर वापरण्यासाठी काय केल पाहिजे व अशाच प्रकारची तंत्रे अजून कशी विकसित केली जाऊ शकतील याचा अभ्यास या प्रकल्पात केला जातो. पर्यावरणात आज अनेक समस्या आहेत. त्यावर आधुनिक पद्धतीच्या काय उपाययोजना असू शकतात यावर संशोधन करण्यासाठी संशोधक तशेच इंटर्नना घेऊन या प्रकल्पात संशोधन केले जाते.

या प्रकल्पात पर्यावरण आणि शाश्वत विकासा संदर्भातील संशोधन, धोरणे आणि विद्यार्थी सहभाग वाढवण्यासाठी कार्य केले जाते. G20 च्या भारतीय अध्यक्षतेदरम्यान, यांअंतर्गत C20 अंतर्गत “LiFE & Waste” या विषयाचे समन्वयन केले. मार्च २०२३ ते मे २०२३ या कालावधीत C20 LiFE च्या “LiFE & Waste” या विषयाचे समन्वयक म्हणून पूर्णमने सामाजिक जनजागृतीसाठी अनेक प्रभावी उपक्रम राबवले. देशातील ८ शहरांमध्ये ९ चौपालांचे (बैठकिंचे )आयोजन करून ५४ सामाजिक संस्था, ५० व्यावसायिक आणि ९४ विद्यार्थ्यांचा सहभाग मिळवण्यात आला. या चौपालांमधून प्रत्यक्ष अनुभव आणि सैद्धांतिक गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास करून धोरणात्मक त्रुटी स्पष्ट करण्यात आल्या. त्यानंतर “Towards Sustainable Future” या शिर्षकाखाली ६ वेबिनार घेण्यात आले, ज्यामध्ये ३३० हून अधिक सहभागींनी भाग घेतला आणि ६ नामवंत वक्त्यांनी शाश्वत वापर, वेस्ट-टू-एनर्जी उपाय, ई-वेस्ट व्यवस्थापन, तसेच वैयक्तिक जीवनशैलीचा कचऱ्यावर होणाऱ्या प्रभावावर विचार मांडण्यात आले. तसेच २ पॅनल चर्चासत्रांमधून ‘ कचराव्यवस्थापन ‘ संदर्भातील प्रभावी उपाययोजना आणि धोरणात्मक दृष्टीकोनांचा सखोल विचार झाला. या सर्व उपक्रमांच्या आधारावर ५ धोरणात्मक आराखडे तयार करण्यात आले, जे G20 शिफारसींसाठी मार्गदर्शक ठरले. या आराखड्यांमधून १० महत्त्वाच्या धोरणात्मक क्षेत्रांचा व ४० कृतीयोग्य उपाययोजनांचा समावेश करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश व्यक्ती, कुटुंब आणि समुदायाच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून पर्यावरणीय संकटे आणि हवामान बदल यावर उपाय शोधणे आहे. त्यांनी ‘You Are The Light’ या संकल्पनेनुसार लोकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रसार करण्यावर भर दिला आहे.


यां सर्व उपक्रमांतून शाश्वत विकास म्हणजे नक्की काय  व कचऱ्याचा एक संसाधन म्हणून कसा उपयोग केला जाऊ शकतो हे पूर्णमने स्वकृतीतून दाखवून दिले आहे. पूर्णम इकोव्हीजन फाउंडेशनची स्थापना होऊन फक्त १४-१५ वर्षे झाली आहेत. एवढ्या अल्पकाळात नक्कीच फार नाही पणं विमानतळाच्या रन-वे वरील धावपट्टीचे काही अंतर संस्थेने मागे टाकले आहे. पणं अजूनही संस्थेच्या डोळ्यांसमोर ती विस्तीर्ण धावपट्टी स्पष्टपणे तरळते आहे. त्या धावपट्टीला मागे टाकून आकाशात झेप घेण्याचं संस्थेच स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्णम आटोकाट प्रयत्न करत आहे. पण आम्हाला वाटते जेवढं हे स्वप्न स्वर्गीय आनंद देणार असलं तरी ते काही मोजक्या संस्था, शासन व काही पर्यावरण कार्यकर्त्यांच्या हातून होणार नाही आहे. तर त्यासाठी सर्व भारत वासियांनी यां चळवळीत उतरले पाहिजे व आपापला वाटा उचलून कार्य केले पाहिजे. पूर्णमला युवकांवर जास्त विश्वास वाटतो. युवकांकडे असलेल्या क्षमता व नाविन्यपूर्ण कल्पना यामुळे युवकांकडून पर्यावरण संरक्षण क्षेत्रात भरीव कार्य पार पडेल अशी आशा संस्था बाळगते. पूर्णमला एवढंच वाटतं कि “युवकांच्या धैर्याचा, क्षमतांचा, जिद्दीचा पुरेपर वापर करण्यासाठी गरज आहे ती त्यांना योग्य मार्गदर्शनाची. युवकांनी पर्यावरणीय समस्यांत संधी शोधल्या पाहिजेत व त्यांचा संसाधन-कच्चा माल म्हणून उपयोग करून लघु, मध्यम आकाराचे उद्योग स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”


कचऱ्यातून संपत्ती निर्माण करणारे पूर्णम इकोविजन फाउंडेशनचे कार्य म्हणजे पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक परिवर्तन यांचे अद्वितीय मिश्रण आहे. त्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे केवळ कचऱ्याचे व्यवस्थापन सुलभ झाले नाही, तर त्यातून उपयुक्त उत्पादने निर्माण करून रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या वाटाही खुल्या झाल्या आहेत. ‘कचराही संसाधन ठरू शकतो’ हे या संस्थेने कृतीतून सिद्ध केले आहे. पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत अशा या संकल्पनेतून ग्रामीण व शहरी युवकांसमोर स्वावलंबनाचे नवे दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा प्रसार करतानाच तरुण पिढीला रोजगारनिर्मितीची आणि समाजसेवेची दुहेरी संधी मिळते आहे. ही प्रेरणा इतरांसाठीही मार्गदर्शक ठरावी, हीच खरी ‘पूर्णम’ची यशकथा आहे.

 

(लेखिका या पूर्णम इकव्हिजन फाउंडेशनमध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून पर्यावरणजागृती आणि शाश्वत उपक्रमांसाठी कार्यरत आहेत.)

 
 
 

1 Comment


vnshukla52
Jun 18, 2025

सर्व प्रकारच्या कचऱ्याचा कसा विनियोग होतो आणि त्यासाठी पूर्णम् इकोव्हिजननेइकोव्हिजनने यंत्रणा कशी उभी केली याचा आढावा खूप छान रीतीने घेतलाय. मणेरीकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. शुभेच्छा.

Like

मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page