top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

सूक्ष्मजीवशास्त्रीय विज्ञान कथांचे अद्भुत विश्व !

  • May 22
  • 3 min read

पुस्तक परीक्षण


समीक्षक: डॉ. मुकुंद बोधनकर


रंजन गर्गे यांचा ‘डीएनए चा आक्रोश’ हा विज्ञानकथा संग्रह आधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर उभा राहणारा एक वेधक साहित्य प्रयोग आहे. या संग्रहातून विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळतो. सूक्ष्मजीवशास्त्रातील गुंतागुंतीच्या संकल्पना—जसे की क्लोनिंग, जीन एडिटिंग, अवयवरोपण—यांना कथारूप देत लेखकाने भविष्यातील शक्यता आणि त्यातील नैतिक प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत. त्यामुळे हा संग्रह केवळ मनोरंजन करत नाही, तर वाचकाला विचार करायलाही प्रवृत्त करतो.


मराठी साहित्यातील ‘कथा’ हा प्राचीन व रोचक काव्यप्रकार आहे. संस्कृत वाङ्मयातही विष्णु शर्म्याने सांगितलेल्या कथा म्हणजेच पंचतंत्र, बृहत्कथासरित्सागर इ. ग्रंथ प्रसिध्द आहेत. उद्बोधन व आनंद हे दोन्ही काव्याचे निकष लेखक मूळ कथाबीजावर कल्पनेने शब्दांकित करतो व ते साध्य करतो. रंजन गर्गे ह्यांच्या ‘डी एनए चा आक्रोश’ ह्या नांवातच कथांचे स्वरुप लक्षात येते. डॉ. रंजन गर्गे यांचा जैवतंत्रज्ञानावर आधारित विज्ञान कथा संग्रह नुकताच वाचनात आला. सूक्ष्मजीवशास्त्रातील विविध संकल्पनांचे भविष्यात प्रक्षेपण करून डॉ. रंजन गर्गे यांनी ‘डी एनए चा आक्रोश’ हा विज्ञान कथा संग्रह सकारलेला आहे हे विशेष.


यात लेखकाने क्लोनिंग, सरोगसी, डी एनए एडिटिंग, अवयव रोपण, जीन थेरपी, बायोब्रिक्स आणि क्रिस्पर तंत्रज्ञान असे अनेक आधुनिक विषय हाताळलेले आहेत. डॉ. गर्गे यांचे भविष्याचा वेध घेणारे प्रभावी कथानक आणि व्यक्तिरेखांमधील संघर्ष यामुळे या कथा उत्कंठावर्धक झाल्या आहेत. या कथा संग्रहात एकूण ११ कथा समाविष्ट आहेत. पुस्तकाला प्रसिद्ध विज्ञान लेखक श्री. अ. पां. देशपांडे यांची अनुरूप अशी प्रस्तावना लाभलेली आहे. यात जैवतंत्रज्ञान या विज्ञान क्षेत्रा तील वैज्ञानिक मूळ संकल्पना व त्यावर काल्पनिकतेचे आवरण कथेच्या माध्यमातून मांडले आहे.


मुळात लेखकाचा पिंड हा विज्ञानाचा... सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापकाचा.... सूक्ष्मजीवशास्त्रातील सूक्ष्म जीवाचे प्रकार शास्त्रीय शैलीत पहिल्या कथेत मांडले आहेत. ‘मी सूक्ष्मजीव बोलतोय’ या कथेत इन्फ्लुएंझाचा विषाणू हा जणू सूक्ष्मजंतूंच्या राज्याचा अध्यक्ष आहे अशी कल्पना केली आहे. करोनाच्या संदर्भात तो एका वेबसाईटवर अवतरतो आणि पृथ्वीवरील शस्त्रज्ञांना चांगलीच तंबी भरतो. सूक्ष्मजीवाच्या आत्मकथनाच्या माध्यमातून विज्ञानकथा लेखनाचा आगळा प्रयोग वाचकाला आंतर्मुख करून टाकणारा आहे. सामान्य वाचकाला त्यांची यथार्थ माहिती होते. मानवी अवयवरोपण ही कल्पना यशस्वी पणे विज्ञानाने आज राबवलीय पण जिची मूळे आपल्या पुराणकथेत आहेत. जसे गजवदन इ. प्राण्यांची तोंडे व मानवी शरीर ही कल्पना सत्यात उतरली तर काय होईल? हे ‘हयवदन’ या कथेत ऋत्विक ह्या नायकाच्या वर्णनाने मांडलीय. नाळ ही कथा ‘क्लोनिगं ’ या तंत्रावर आधारलेली आहे. यामध्ये मानवासारखेच व त्याच वयाचे क्लोन झाले तर त्यात विधायकता किती? हा विचारही अंतर्मुख करणारा आहे. तो कितपत श्रेयस्कारक होईल? ‘विज्ञान विधायक का विध्वंसक’ ही जाणीवही लेखकाला आहे मूल्यात्मक जीवनाची जोड असेल तर मानवी जीवन श्रेयस्कारक होईल हा विचार त्यात आहे. ’बीजांकुर’ ह्या कथेत वैज्ञानिकता व भावनिकता ह्यांचे संमिश्रण आहे. मूळात लेखकाची भ्रमणाची आवड व अनुभव ह्यांचाही प्रत्यय अनेक वेळा येतो. नेपाळमधील पोखरा व्हॅली व तेथील भौगोलिक सविस्तर वर्णन त्याची साक्ष देते. ‘कॅन्यन’ कथेत नायक डॉ. विल्यम स्वतःचा पाय अनन्याला कापायला सांगून सुटका करण्यास सांगतोय. खरचं अंगावर काटा येतो. त्यातील रोमहर्षक वर्णन उल्लेखनीय आहे. सहवासातून निर्माण झालेल्या प्रेमाचे संयमित वर्णनही त्यात आहे. सहज सुंदरता त्यात आहे. कथेला साहित्यिक रुप देतांना लेखकाचे शब्दप्रभुत्व जाणवते. संस्कृत भाषेचा अभ्यास व आवड ‘वेद’ ह्या कथेत वेदप्रकाशच्या निवेदनात आहे. सुश्रुताच्या शल्यक्रियेची माहि ती लेखनातून जाणवते. पुराणकथेतील विचाराला आधुनिक जोड भविष्यात कशी असेल ही काल्पनिकता त्यात आहे. परग्रहवासी पृथ्वीवर येऊन कथेत एक शल्यचिकित्सक पात्र होतो. टाइम मशीनच्या सहय्याने अद्भूततेचा स्पर्श विज्ञानाला दिलाय.


अगदी २०५० ते ३१ साव्या शतकापर्यंत ही कल्पनेची भरारी आहे पण त्यातील वैज्ञानिक पाया भक्कम आधार आहे ही लेखकाची खरी ताकद आहे आणि कथांचा तो लवचिक कणा आहे. विज्ञानाबरोबर भूगोल, इतिहासाचा स्पर्श भाषेत आहे. वैज्ञानिकतेचा आग्रह मात्र निश्चितच जाणवतो. त्यामुळे वाचकांच्या ज्ञानात विज्ञानाची भर पडते. वैज्ञानिक सत्याचा लख्ख प्रकाश कथासंग्रहात आहे. कथाबीजाला कल्पनेचे पंख लावून केलेले वर्णन रोचक आहे, केवळ भाषेचा फुलोरा नाही तर वैज्ञानिक अनुभवाचे व प्रायोगिकतेचे खडे बोल आहेत. सध्या त्यांच्या ‘अनुबंध’, ‘बीजांकुर’, ‘मंगळ कुजबुजला’ हे त्यांचे इतर कथा संग्रह आणि ‘ऑक्सिजन’, ‘भुवनेश्वरीचा कल्लोळ’, ‘मंदाकिनी’ आणि ‘प्लानेट ऑफ दी न्यूड्स’ या विज्ञान कादंबर्‍या प्रकाशित आहेत. डॉ. गर्गे यांचे भविष्याचा वेध घेणारे प्रभावी कथानक आणि व्यक्तिरेखांमधील संघर्ष यामुळे या कथा उत्कंठावर्धक झाल्या आहेत. विज्ञानविषय वैविध्य व तदनुरुप उद्बोधनही ह्यामुळे हा कथासंग्रह वाचनीय झाला आहे. २१८ पानांचा हा कथा संग्रह ‘ऑथर्स प्रेस’ यांनी प्रकाशित केला असून ‘अमेझॉन’ वरती उपलब्ध आहे.

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page