विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) – भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा पाया
- Aug 14, 2025
- 5 min read
Updated: Sep 9, 2025
श्रीमती मीना माळगावकर
विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) ही विज्ञान भारती, NCERT व NCSM यांच्या सहकार्याने घेतली जाणारी भारतातील सर्वात मोठी ऍप-आधारित विज्ञान प्रतिभा शोध परीक्षा आहे. इयत्ता ६वी ते ११वी साठी घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, भारतीय वैज्ञानिक परंपरेची ओळख करून देणे व राष्ट्रीय वैज्ञानिक चळवळीला चालना देणे आहे. VVM मध्ये परीक्षा, शिबिरे, सर्जनशील सादरीकरण, आणि संशोधन वृत्ती यांचा एकत्रित अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो. अधिक माहितीसाठी www.vvm.org.in

भारतातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक क्षमतेचा शोध घेण्यासाठी ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ (Vidyarthi Vigyan Manthan - VVM) हा एक अत्यंत प्रभावी आणि राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम ठरला आहे. VVM ही परीक्षा विज्ञान भारती (VIBHA), राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT), आणि राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (NCSM) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते. भारत सरकारचे शिक्षण मंत्रालयचेही या उपक्रमाला सक्रिय पाठबळ लाभले आहे. विज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रात नवभारतासाठी वैज्ञानिक मनांची उभारणी हे या उपक्रमाचे मुख्य ध्येय आहे. हा उपक्रम इयत्ता ६वी ते ११वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि तो इंग्रजीसह १४ भारतीय भाषांमध्ये घेतला जातो. त्यामुळे VVM ही भारतातील सर्वात मोठी ऍप-आधारित विज्ञान प्रतिभा शोध परीक्षा म्हणून ओळखली जाते.
विविएम (VVM) ची संकल्पना

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी उल्लेखिलेल्या “Ignited Minds” या संकल्पनेचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारे व्यासपीठ म्हणजेच विद्यार्थी विज्ञान मंथन. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर भारतीय वैज्ञानिक वारसा, आधुनिक विज्ञानातील आघाडीचे संशोधन, तर्कशक्ती, निरीक्षण कौशल्ये आणि वैज्ञानिक वृत्ती यांची चाचणी करणारी व विद्यार्थ्यांची वैज्ञानिक प्रवृत्ती ओळखून तिचे संवर्धन करणारी एक सुसंघटित स्पर्धा म्हणून VVM हे नाव प्रस्थापित झाले आहे. VVM च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा नाही तर भारतीय वैज्ञानिक परंपरेची ओळख, विज्ञानातील मूलभूत संकल्पना, विचारशक्ती, लॉजिक आणि निरीक्षण कौशल्य यांचा अनुभव मिळतो. या परीक्षेची रचना अशा प्रकारे केली आहे की विद्यार्थ्याच्या संपूर्ण विज्ञान आकलन क्षमतेचे मूल्यमापन होते. यामध्ये विद्यार्थ्यांची निवड चार टप्प्यांत केली जाते – शालेय परीक्षा , प्रगत परीक्षा , राज्यस्तरीय शिबीर आणि राष्ट्रीय शिबीर. प्रत्येक टप्पा हा आधीच्या टप्प्यावर आधारित आहे, आणि शैक्षणिक गुणवत्तेसह संशोधनवृत्ती, सर्जनशीलता, गटकार्य, नेत्रुत्व गुण याचेही मूल्यांकन केले जाते.
परीक्षेचे स्वरूप

स्तर-१ म्हणजे शालेय स्तरावरील ऑनलाइन परीक्षा ९० मिनिटांची असते, ज्यामध्ये १०० बहुपर्यायी प्रश्न असतात. हे प्रश्न दोन विभागांमध्ये विभागले जातात – विभाग अ (भारतीय वैज्ञानिक योगदान व सत्येंद्रनाथ बोस यांचे जीवनचरित्र) आणि विभाग ब (विज्ञान, गणित, लॉजिक व रिजनिंग). विभाग अ मध्ये ५०% गुण मिळाल्यास विभाग ब ची उत्तरे तपासली जातात. ही परीक्षा Android वा Windows आधारित ऍपवर घेतली जाते. २०२५ सत्रासाठी इयत्ता ६वी-७वी साठी २८ किंवा ३१ ऑक्टोबर, ८वी-९वी साठी २९ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर, आणि १०वी-११वी साठी ३० ऑक्टोबर किंवा २ नोव्हेंबर हे परीक्षा दिवस आहेत. प्रत्येक विद्यार्थी फक्त एकदाच लॉगइन करू शकतो.
स्तर-२ ही प्रगत ऑनलाइन परीक्षा असून, ती ४५ मिनिटांची असते आणि ५० प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नास २ गुण असून चुकीच्या उत्तराला -०.५ गुण वजा होतात. ही परीक्षा सुद्धा ऍपच्या माध्यमातून घेतली जाते. यात विद्यार्थ्याची अडचणी सोडवण्याची क्षमता, विश्लेषण, आणि वस्तुनिष्ठ तर्कशक्ती तपासली जाते. ही परीक्षा १९ किंवा २३ नोव्हेंबर २०२५ ला आयोजित होणार आहे.
स्तर-३ म्हणजे राज्यस्तरीय शिबीर. प्रत्येक इयत्तेतून राज्यातील २५ विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या एकदिवसीय शिबिरामध्ये हातावर आधारित प्रयोग, निरीक्षण, सर्जनशील सादरीकरण, गटचर्चा व परिस्थितीजन्य समस्या सोडवण्यावर भर दिला जातो. यामध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ₹५,०००/₹३,०००/₹२,००० चे रोख पारितोषिक, स्मृति चिन्ह व NCSM संग्रहालय भेट मिळते. परीक्षेला येण्याजाण्याचा खर्च विद्यार्थ्यांना स्वतः करावा लागतो.
स्तर-४ म्हणजे राष्ट्रीय शिबीर. राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रत्येक इयत्तेतील २ विद्यार्थी (एकूण १२) राष्ट्रीय शिबिरासाठी पात्र ठरतात. हे शिबीर दोन दिवसांचे असते. यामध्ये विद्यार्थ्यांचे सादरीकरण, वैज्ञानिक समज, नावीन्यपूर्णता, नेतृत्व गुण आणि कल्पकता यावर आधारित चाचण्या घेतल्या जातात. यामधून हिमालयन विजेते आणि झोनल विजेते घोषित केले जातात. हिमालयन विजेत्यांना ₹२५,०००, ₹१५,००० आणि ₹१०,००० चे रोख पारितोषिक दि ले जाते. त्यांना वर्षभरासाठी ₹२,०००/ महिना ‘भास्कर शिष्यवृत्ती ’ मिळते आणि DRDO, ISRO, CSIR, BARC, IITs, IISERs यांसारख्या संस्थांमध्ये ‘SRIJAN इंटर्नशिप’ दिली जाते.

महाराष्ट्राची कामगिरी

२०२४-२५ या सत्रात महाराष्ट्राने VVM मध्ये अतिशय उल्लेखनीय सहभाग नोंदवला. राज्यातून एकूण सुमारे २१,०००+ विद्या र्थ्यांनी नोंदणी केली. यातील ४८० हून अधिक विद्यार्थी राज्यस्तरीय शिबि रासाठी निवडले गेले तर ४८ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. त्यापैकी ६ विद्यार्थ्यांनी ‘हिमालयन विजेते’ म्हणून राष्ट्रीय गौरव प्राप्त केला. मुंबई, पुणे, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांतील विजेते म्हणजे – आध्या अवभारत (६वी – मुंबई), अर्णव भांबरे (७वी – अकोला), आध्या पॉल (७वी – मुंबई), ख़ुशी मदन ओफळकर (८वी – बुलढाणा), अहान दामले (९वी – मुंबई), आणि अमृतवर्षीणी ए. (१०वी – पुणे). याशिवाय पश्चिम क्षेत्रातून पुणे, ठाणे, यवतमाळ, वर्धा, अकोला ह्या जिल्ह्यांतील १० विद्यार्थ्यांनी झोनल विजेते म्हणून नावलौकिक मिळवला.

विविएम नोंदणी

VVM चा अभ्यासक्रम अत्यंत समतोल आहे. त्यात ५०% भाग हा शालेय विज्ञान आणि गणितावर आधारित असतो, तर उर्वरित ५०% मध्ये भारतीय विज्ञानाचा इतिहास, डॉ सत्येंद्रनाथ बोस यांचे जीवनचरित्र, आणि लॉजिक समाविष्ट असतो. विद्यार्थ्यांना www.vvm.org.in पोर्टलवरून नोंदणी करता येते, आणि त्यासाठी फक्त ₹२०० शुल्क आहे. शाळा स्तरावर गटनोंदणी शक्य असून, एका इयत्तेतूनत किमान १० विद्यार्थी असावेत. परीक्षा ऍप द्वारे घेतली जाते. Mock Tests १ सप्टेंबरपासून सुरू होतील. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी त्यांचे प्रमाणपत्र पोर्टलवरून डाउनलोड करू शकतात.
उपक्रमाचे वैशिष्ट्य
या परीक्षेमुळे मुलांना परीक्षा केंद्राचे बंधन नसल्याने तणावमुक्तपणे विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो. मुलांच्या आत्मविश्वासात वाढ होते. शिक्षक व पालकांना सुद्धा आपल्या पाल्याच्या विज्ञान क्षमतेचा योग्य अंदाज येतो. आज VVM मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण पुढे IIT, NISER, IISER, AIIMS, ISRO सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यांचे वैज्ञानिक करिअर VVM मुळे घडते, असे अनेक विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत. या उपक्रमाची एक मोठी विशेषता म्हणजे त्याचा संपूर्णपणा. ‘विज्ञानाचा इतिहास’ आणि ‘भारतीय वैज्ञानिकांचे योगदान’ यांचा अभ्यासक्रमात समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मगौरवाची भावना निर्माण होते. अशा अभ्यासक्रमामुळे सत्येंद्रनाथ बोस, सर सी.व्ही. रामण, आचार्य जगदीशचंद्र बोस, होमी भाभा, मेघनाद साहा, आणि विविध आधुनिक भारतीय वैज्ञानिकांची कार्ये मुलांना समजतात. हे केवळ ज्ञान नाही, तर एक वैज्ञानिक संस्कार आहे.

शैक्षणिक अनुरूपता

आज राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता, कौशल्याधिष्ठित शिक्षण, आणि मूलभूत संकल्पनांवर आधारित आकलन या बाबी महत्त्वाच्या मानते. VVM हे या धोरणाशी पूर्णतः सुसंगत आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष कृतीतून अनुभव’ (hands-on activity), संवादाधारित परीक्षण, आणि प्रत्यक्ष सहभागावर भर दिला जातो. म्हणूनच अनेक नामांकित शिक्षणतज्ज्ञांनी VVM ला “भारतीय पारंपरिक मूल्ये आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम” असे गौरवले आहे. विज्ञानाचे भवितव्य हे केवळ प्रयोगशाळांमध्ये नव्हे, तर समाजात रुजणाऱ्या विज्ञानदृष्टीत आहे. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच वैज्ञानिक प्रश्न विचारणे, प्रयोग करून पाहणे, आणि ज्ञानाचा वापर समाजोपयोगी कामांसाठी करणे शिकवले पाहिजे. VVM हे केवळ एक ‘टॅलेंट हंट’ नाही, तर ‘साइंटिफिक कॅरेक्टर बिल्डिंग’चा उपक्रम आहे. म्हणूनच ही परीक्षा पारंपरिक परीक्षेपेक्षा अधिक सखोल आहे.
आपली भूमिका
शिक्षक व पालक VVM मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, वेळेवर नोंदणी करून घेणे, अभ्यासक्रम समजावणे, तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे महत्त्वाचे आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षक स्वतः अध्ययन सत्र घेतात आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा दाखवतात. अशा अनेक शिक्षकांच्या प्रयत्नामुळेच VVM मध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. VVM च्या माध्यमातून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विज्ञानासाठी एक नवीन चळवळ निर्माण झाली आहे. या चळवळीला शालेय शिक्षण संस्थांचा, शासकीय यंत्रणांचा, विज्ञान प्रेमी नागरिकांचा व स्वयंसेवी संस्थांचा पाठिंबा लाभल्यास आपण वैज्ञानिक भारत घडवण्याच्या दिशेने अधिक आत्मविश्वासाने पावले टाकू शकतो. अधिक माहितीसाठी www.vvm.org.in ह्या संकेतस्थळास भेट द्यावी.
(लेखिका ह्या विद्यार्थी विज्ञान मंथन, पश्चिम महाराष्ट्राच्या राज्य समन्वयक आहेत.)


उत्कृष्ट लेख