राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
- May 4, 2025
- 1 min read
Updated: May 11, 2025

शर्वरी कुलकर्णी
११ मे १९९८ रोजी पोखरण (राजस्थान) येथे पहिली पूर्णतः 'भारतीय' असणारी अणुचाचणी भारताने यशस्वीरित्या पूर्ण केली. ही भारताच्या विज्ञान आणि विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्राला आत्मनिर्भरतेकडे दिग्दर्शित करणारी एक महत्वपूर्ण घटना होती. तिचे स्मरण म्हणून ११ मे हा दिवस 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.
आधुनिक मानवासाठी तंत्रज्ञान हे एक मूलभूत अंग बनत चालले आहे. मानवी जीवन सुलभ आणि वेगवान करण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका निर्णायक ठरली आहे. निसर्गात घडणाऱ्या घटनांची सुसूत्रतेने नोंद घेऊन त्यांचा आपल्या जीवनाच्या सुलभतेसाठी वापर करण्यात मानवाने खूप मोठी झेप घेतलेली आहे. एका ठिणगीपासून उत्पन्न झालेल्या आगीचा स्वसंरक्षणासाठी किंवा अन्नपदार्थ बनविण्यासाठी मानवाने केलेला वापर यापासून सुरुवात झालेली ही परंपरा आज अगदी आपल्या आकाशगंगेच्या पलीकडे असणाऱ्या घटनांचा वेध घेण्यापर्यन्त पोहोचलेली आहे.
माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, औद्योगिक ऑटोमेशन, वैद्यकीय उपकरणे, अंतराळ संशोधन, जैवतंत्रज्ञान इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाने क्रांती घडवली आहे. काही दशकांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तंत्रज्ञानाने सहज साध्य झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, मागील काही दशकांमध्ये घडलेली डिजिटल क्रांती ही याचे ठळक उदाहरण आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जग अगदी एका क्लिकद्वारे संपर्कात आले आहे. शिक्षण, व्यापार, आरोग्य सेवा, बँकिंग, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांत डिजिटल पद्धतीने व्यवहार होऊ लागले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि यंत्रमानव (Robotics) हे तर भविष्यातील तंत्रज्ञानाचे आधारस्तंभ ठरणार आहेत.
आपल्या रोजच्या जगण्यात असे कोणतेही क्षेत्र उरले नाही जिथे तंत्रज्ञानाने आपला प्रभाव दाखवलेला नाही आणि त्याला मानवी मन देखील त्याला अपवाद नाही. भौतिक जीवन सुलभ होत असतानाच तंत्रज्ञानाने Intellectual Property rights, कायदे, समाजव्यवस्था, पर्यावरण या क्षेत्रांसमोर नवीन आव्हानं उभी केलेली आहेत. एका क्लिकच्या माध्यमातून जग जवळ येत असतानाच अत्यंत विनाशकारी तंत्र आणि शस्त्र उपलब्धीमुळे आंतरराष्ट्रीय सीमा प्रश्न देखील आपलं अस्तित्व दाखवू लागले आहेत. अत्याधुनिक शस्त्रक्रिया विकसित होण्यासोबतच निसर्गाचा बिघडलेला तोल आरोग्यासमोर नवीन आव्हानं निर्माण करत आहे. अशा अंतर्गत विरोधाभासाच्या पार्श्वभूमीवर भारत यावर्षीचा तंत्रज्ञान दिवस ' उद्याच्या शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञान नवोन्मेष (Empowering a Sustainable Tomorrow Through Innovation) ' अशी सकारात्मक थीम घेऊन साजरा करत आहे. शाश्वत विकासासाठी पूरक अशा उचित तंत्रज्ञान निर्मितीकरीता भारत विश्वाचा मार्गदर्शक बनो याकरिता विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व योद्ध्यांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या शुभेच्छा!

Comments