भारतीय कालगणनेची वैशिष्ट्ये
- Apr 24, 2025
- 8 min read
Updated: May 11, 2025

भारतीय कालगणना आपल्याला काळाच्या अति सूक्ष्म ते अति विराट रूपाचे विश्वरूप दर्शन घडवते. काल अनादी आणि अनंत आहे याचे भान भारतीयांना होतेच शिवाय, खगोलीय घटनांच्या आधारे कालगणना करताना त्याची ऋतुंशी सांगड कायम रहावी यासाठीची गणिते जुळवीण्याइतका सखोल अभ्यासही प्राचीन भारतात केला गेला होता. भारतीय कालगणनेच्या अशा काही वैशिष्ट्यांची ही तोडंओळख....
विनय जोशी
अगदी आत्ता, मगाशी, गेल्या आठवड्यात असे मोघम उल्लेख असोत कि १.२ सेकंदात, रात्री ९:२३ वाजता, जानेवारीच्या २५ तारखेला असे स्पष्ट निर्देश असोत. यांचा हेतू एकच काळाचे मोजमाप करणे. खरं तर महाविस्फोट होऊन विश्व अस्तित्वात आले तेव्हा पासून काल अव्याहत चालू आहे. आपल्या सोईसाठी आपण सेकंद, तास, दिवस, महिना, वर्ष, शतक अशा परिमाणात काळाचे मोजमाप करतो.
अगदी आदिम काळापासूनच माणसाला कालनिर्देशनाची गरज भासली. हिंस्र श्वापदांकडून भीती असल्याने सूर्य मावळायच्या आत गुहेत लपणे असो किंवा पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात शिकारीला जाणे असो, जगण्यासाठी काळ समजून घेणं गरजेचे होते. या कामात विविध खगोलीय घटनांची मदत झाली. पृथ्वीचे परिवलन, चंद्राचे पृथ्वीभ्रमण, पृथ्वीचे परिभ्रमण या तीन गोष्टींवरून अनुक्रमे दिवस, महिना व वर्ष ही काळाची मूलभूत एकके मोजता येऊ लागली. पुढे नवाश्मयुगात शेती सुरु झाल्याने ऋतूंचा अंदाज बांधण्याची देखील गरज भासू लागली. सूर्याच्या त्याच्या भासमान मार्गाच्या पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या तारकासमूहातील प्रवेश आणि त्या वेळी असणारे ऋतू यांचा सहसंबंध माणसाच्या लक्षात आला. प्रगत संस्कृतीचा उदय झाल्यानंतर धार्मिक उत्सवांचे आयोजन तसेच राज्यसत्तेसाठी राज्यकारभार, शेतसारा किंवा इतर करांची वसुली यासाठीदेखील अधिक अचूक कालगणना आवश्यक बनली. माणसाच्या व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र अशा सामाजिक विकासात कालमापन देखील विकसित होत गेले.
ईजिप्शियन, मेसोपोटेमियन, ग्रीक, चिनी, रोमन अशा जभरातल्या प्राचीन संस्कृतीत कालमापनाच्या विविध पद्धती अस्तित्वात होत्या. जगभरातील अशा संस्कृतीतील अनेक खगोलविदांनी कालमापनाची गणिते तयार केली. प्राचीन रोमन आणि त्यातुन विकसित झालेले आजचे ग्रेगेरियन कॅलेंडर सारखी काही कालगणना सूर्यावर आधारित आहेत तर इस्लामी कालगणना पूर्णपणे चंद्रावर आधारित आहेत.
भारतीय कालगणनेची अचूकता
जगातील सगळ्या संस्कृतीतील कालगणनेचा इतिहास बघितला तर सगळ्यात काहींना काही त्रुटी असल्याचे लक्षात येते. शुद्ध सौर पंचागातून आकाशाची माहिती मिळत नाही, तर शुद्ध चांद्र पंचांगांचा ऋतूंशी ताळमेळ उरत नाही. चंद्राला पृथ्वी प्रदक्षिणा तसेच पृथ्वीला सूर्य प्रदक्षिणा करायला लागणार वेळ पूर्ण दिवसांत नाही. उरलेली बाकी साठत जाऊन कालपमानात दोष येतात. आज जगभर प्रचलित असणाऱ्या ग्रेगेरियन कॅलेंडरचा इतिहास पहिला तर ज्युलियस सीझर ते पोप ग्रेगरी यांच्यापर्यन्त अनेकवेळा यात सुधारणा झाल्या आणि तरी काही त्रुटी शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय कालगणनेची आरंभीपासूनची शास्त्रीयता आणि अचूकता उठून दिसते.
"कलयति सर्वाणि भूतानि स्वचक्रे इत्यत: काल:।" अशी काळाची व्याख्या भारतीयांनी केली. जो सगळ्या जगाला निर्माण करतो, व्यापून उरतो आणि शेवटी सगळ्यांना स्वतः सामावून घेतो तो काळ. सूक्ष्मामापि कलां न् लीयते इति काल:। या आणखी एका व्याख्येतून काळाचे निमिषमात्र सुद्धा न थांबता अव्याहतपणे सुरु राहणे अधोरेखित होत. भारतीयांच्या घरात हमखास असणारे पंचांग म्हणजे भारतीय कालगणनेचे मूलभूत पुस्तक म्हणता येईल. यात तिथी, वार, योग, नक्षत्र, करण या पाच प्रमुख अंगांसोबतच पक्ष, अयन, ऋतू, सूर्य आणि इतर ग्रहांचे राशिप्रवेश, राशिचक्राच्या आरंभ स्थानापासून अंतर, विशिष्ठ वेळी पूर्व क्षितिजावर उगवारी राशी, अशी अनेक प्रकारची खगोलीय माहिती यात असते.
भारतीय खगोलशास्त्राचे अभ्यासक शं बा दीक्षित यांनी भारतीय कालगणनेच्या विकासाचे तीन टप्पे मानले आहेत.
अज्ञात भूतकाळ ते इसपु १५०० - वैदिक कालखंड
इसपु १५०० ते इस ४०० - वेदांग ज्योतिष कालखंड
इस ४०० ते आधुनिक कालखंड - सिद्धांत ज्योतिष कालखंड
भारतीय कालगणनेचे लिखित उल्लेख वैदिक वाङ्मयातून आढळतात. तिथी, पक्ष, महिने, अयन, ऋतू, वर्ष यांचे उल्लेख वेदांत आहेत. पण, आजच्या भारतीय पंचांगातील वार, योग, करण तसेच राशी, सूर्याचे राशीप्रवेश अशा संकल्पना वेदात आढळत नाही. महिन्यांची मधु, माधव, शुक, शुची, नभ, नभस्य, ईश, उर्जा, सहस, सहस्य, तपस, तपस्य अशी ऋतू निदर्शक नावे यात आहेत.
ऋग्वेदाच्या १-१६४ सूक्तात वैशिष्टपूर्ण कालचक्राचे वर्णन येते.
द्वाद॑शारं न॒हि तज्जरा॑य॒ वर्व॑र्ति च॒क्रं परि॒ द्यामृ॒तस्य॑ ॥
आ पु॒त्रा अ॑ग्ने मिथु॒नासो॒ अत्र॑ स॒प्त श॒तानि॑ विंश॒तिश्च॑ तस्थुः ॥
ऋग्वेद -- १ -१६४ -११
या कालचक्राला १२ आऱ्या (१२ महिने) आहेत आणि यावर सातशे वीस जोडपी (३६० दिवस आणि रात्री) बसले असून हे चक्र सतत फिरत आहे.
याच सूक्तातील पुढच्या एका ऋचेत या चाकाच्या तीन नाभी (२ अयनदिन आणि १ विषुवदिन) आणि या भोवती होणाऱ्या ३६० दिवसांचे वर्णन आहे.
वेदात संसर्प, अहंस्पती, मलीम्लुच अशा नावाने अधिक मासाचे उल्लेख आढळतात. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ चांद्रमास ३५४ दिवसात पूर्ण होतात. पण पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला सुमारे ३६५ दिवस लागतात. म्हणजे चांद्रमान व सौरमान यांत ११ दिवसाचा फरक पडतो. हा फरक विचारात घेतला नाही तर ऋतूंशी सांगड उरत नाही. हा फरक भारतीयांना अगदी आधीपासूनच लक्षात आला होता असे दिसते. म्हणून हा फरक दूर करायला ठराविक कालांनंतर एक अधिक मास घेतला जातो आणि कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.
वैदिक काळात यज्ञसंस्था ही भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासातील अत्यंत प्रभावशाली संस्था होती. किंबहुना वैदिक धर्माचे आरंभीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून यज्ञकर्मे म्हणता येऊ शकतील. वेदांतील विधिनिषेधांच्या पालनाने यज्ञकर्मे केल्यास अपेक्षित फल मिळू शकते अशी वैदिकांची श्रद्धा होती. याच हेतूने शिक्षा, कल्प, व्याकरण, निरूक्त, छंद आणि ज्योतिष अशी एकूण सहा वेदांगे प्रचलनात आली. वेदमंत्रांचे अचूक उच्चारण, शब्दांचे अर्थ, छंद यांचे जरी यथार्थ ज्ञान असले तरी निर्धारित मुहूर्तावर यज्ञीय कर्मे न केल्यास इच्छित फलप्राप्ती संभवत नाही. उदाहरणार्थ अग्निहोत्रात आहुती टाकण्यासाठी आपल्या स्थानाप्रमाणे सूर्योदय आणि सूर्यास्ताची नेमकी वेळ माहिती हवी. याच धारणेतून सहा वेदांगांमध्ये वेदांग ज्योतिषाला मोराच्या तुऱ्याप्रमाणे आणि नागाच्या मण्याप्रमाणे शिरोस्थान देण्यात आले आहे. याच संदर्भात विष्णुधर्मोत्तर पुराण म्हणते
वेदा हि यज्ञार्थमभिप्रवृत्ताः कालानुपूर्वा विहिताश्च यज्ञाः ।
तस्मादिदं कालविधानशास्त्रं यो ज्योतिषं वेद स वेद सर्वम् ॥
कालगणनेची मूलभूत एकके असणाऱ्या दिवस, पक्ष, मास, ऋतू यांच्या संधीकाळात इष्टी म्हणजे यज्ञ केले जात. पृथ्वीभोवती असणाऱ्या खगोलावरील आयनिक वृत्त आणि खगोलीय विषुववृत्त यांचे छेदनबिंदू - वसंत संपात, शरद संपात तसेच सूर्याच्या उत्तरतम आणि दक्षिणतम क्रांतीचे बिंदू विष्टंभ आणि अवष्टंभ या चार बिंदूंवर सूर्याचे आगमन अशा खगोलीय विशेष दिनी हविर्यज्ञसंस्थेतील इष्टी केल्या जात. या खगोलीय घटनांची अचूकता टिपण्यासाठी ऋत्विजाला कालगणना आणि त्याचे गणित या विषयी परिपूर्ण ज्ञान असणे गरजेचे होते. चंद्राच्या अवस्था, सूर्याचे संक्रमण, ऋतूंची परिवर्तने या सर्वांचे पद्धतशीर परिगणन यज्ञाच्या निमित्ताने वेदांगज्योतिषाच्या माध्यमातून काळजीपूर्वक करावे लागे.
वेदांगज्योतिषाचे बहुतांश ग्रंथ काळाच्या ओघात लुप्त झाले. लगध आचार्यांचा ‘ज्यौतिषम्’ हा एकच स्फुट ग्रंथ सध्या शिल्लक आहे. इसपू १४०० हा याचा रचनाकाळ मानला जातो.
वेदांग ज्योतिष कालखंडात युग म्हणजे पाच वर्ष असे कालगणनेचे एकक आढळते. संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, अनुवत्सर, इद्वत्सर अशी यातील पाच वर्षांची नावे आहेत. एका युगात १८३० सावन दिन, १८६० तिथि, ६२ चान्द्रमास, ६० सौरमास, युगमध्यवर आणि युगांती असे दोन अधिक मास, ३० ऋतू आणि १० अयने होतात. युगातील पहिल्या वर्षाची सुरवात शिशिर ऋतूत, सूर्य आणि चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असताना माघ प्रतिपदेला होत असे. या पंचवार्षिक कालगणनेचे गणन याच बरोबर दिनमान, ऋतूंचा आरंभ, अयन, वसंत व शरद संपात दिनाची तिथी, अधिक मास कधी घ्यावा, पर्व समाप्ती इत्यादी बाबी काढण्यासाठी गणितीय सूत्रे यात आहेत. हा सध्या उपलब्ध असणारा जगातील पहिला खगोलशास्त्रीय ग्रंथ आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
उत्तर वैदिक काळात पौराणिक धर्माचा उदय होत यज्ञयागादि कर्मे मागे पडू लागली. यामुळे यज्ञ संस्थेसाठी रचलेल्या वेदांगज्योतिषाचे महत्व कमी झाले. पण विविध व्रते, सणवार यांच्यासाठी कालगणना अचूक असण्याची गरज कायम होती. यामुळे या नंतरच्या कालखंडातदेखील अनेक ज्योतिषशास्त्रीय ग्रंथातून कालमापन विषयी उहापोह झाला.
इथे ज्योतिषशास्त्र म्हणजे आजच्या व्याख्येप्रमाणे फलज्योतिष नसून खगोलशास्त्र अपेक्षित आहे. ज्योतिः सूर्यादीनां ग्रहाणां गत्यादिकं प्रतिपाद्यतया अस्ति अस्य इति ज्योतिषशास्त्रम। आकाशातील सूर्य, चंद्र आणि डोळ्यांनी दिसू शकणाऱ्या पाच ग्रहांच्या गती, स्थितीविषयक खगोलीय ज्ञान देणारे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र होय. याच्या सिद्धांत, संहिता आणि होरा या तीन भागांपैकी सिद्धांत ज्योतिषात कालमापनाची गणिते आणि पद्धती दिल्या आहेत. किंबहुना सिद्धांतांचे लक्षण सांगताना म्हटले आहे त्रुट्यादिप्रलयान्तकालकलना मानप्रभेदः। लघुत्तम एकक त्रुटी ते महत्तम एकक प्रयलापर्यंत कालपमानाचे विविध एकके तसेच वर्षमापनाच्या सौर, सावन, चान्द्र, बार्हस्पत्य, नाक्षत्र, ब्राह्म, दिव्य, पित्र्य, प्राजापत्य अशा विविध पद्धती आणि इतर माहिती ज्यात आहे तो सिद्धांत स्कंध होय.
कालमापनाची सूक्ष्म एकके
पौलिशसिद्धांत, रोमकसिद्धांत, वासिष्ठसिद्धांत, सूर्यसिद्धांत, पैतामहसिद्धांत यांसह अनेक सिद्धांत ग्रंथ या काळात रचले गेले. या विविध सिद्धांत ग्रंथांत अति सूक्ष्म पासून तर अति विराटपर्यंत विविध कालमापनाची एकेक आढळतात. यापैकी ज्या काळाची गणना करता येते तो मूर्त काळ होय तर ज्याची गणना करता येत नाही तो अमूर्त काळ अशी विभागणी केलेली आढळते. वेगवेगळ्या ग्रंथात मापनाची वेगवेगळी परिमाणे आढळतात.
त्रुटी हे कालपमानाचे सर्वांत लहान एकक आहे. सिद्धांत शिरोमणीनुसार पापण्यांची उघडझाप होण्यासाठी लागणार वेळ म्हणजे निमेष. निमेषचा ३० वा भाग म्हणजे तत्पर आणि तत्पर चा १०० वा भाग म्हणजे त्रुटि होय. तर, अन्य एका व्याख्येप्रमाणे सूच्या पद्मपत्रभेदनकालः म्हणजे कमळाच्या पानाला सुईने भेदण्यासाठी लागणार काळ अशी याची व्याख्या सांगितली आहे. १ त्रुटी म्हणजे १/३३७५० सेकंद = ०.००००२९६३ म्हणजेच २९.६३ मायक्रो सेकंद होय. ६० त्रुटी = १ रेणु, ६० रेणु = १ लव, ६० लव = १ विपल हा काळ थेट मोजता येत नसल्याने अमूर्त अथवा सूक्ष्म काळ आहे.
श्रीमद्भागवत महापुराणात देखील सूक्ष्म काळाविषयी विवेचन आढळते. झरोक्यातून येणाऱ्या सूर्यप्रकाशात जो अतिसूक्ष्म कण दिसतो त्याचा एक षष्ठमांश भाग म्हणजे परमाणु. असे २ परमाणु = एक अणु, आणि तीन अणु = एक त्रसरेणु. या त्रसरेणूला ओलांडण्यासाठी सूर्यप्रकाशाला लागणाऱ्या वेळेला त्रुटी म्हणतात.
३०० त्रुटि - १ बोध
३ बोध - १ लव
३ लव - १ निमेष
३ निमेष - १ क्षण
५ क्षण - १ काष्ठा
पण काळ या पेक्षाही सूक्ष्म आहे याचेहि भान प्राचीन भारतीयांना दिसते.
त्रुटेः सहस्रभागं यो लग्नकालः स उच्यते।
ब्रह्माऽपि तं न जानाति किं पुनः पामरो जनाः।।
त्रुटीचा हजारावा भाग म्हणजे लग्न याविषयी प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा अनभिज्ञ आहेत तर सर्वसामान्यांची काय कथा?
१० विपल म्हणजे १ प्राण. इथपासून काळ मोजता येऊ शकतो. हा साधारण दशगुर्व-क्षरोच्चारणकालसमः म्हणजे १० दीर्घाक्षर उच्चारणासाठी लागणाऱ्या कालावधी इतका आहे. ६ प्राण (६०विपल) = १पल (विघटी), ६० पल = १ नाडी (घटी) हा काळ म्हणजे २४ मिनिटे होय. २ घटी म्हणजे १ मुहूर्त (४८ मिनिटे) असे ३० मुहूर्त किंवा ६० घटी म्हणजे एक दिवस.
तीस दिवसांचा एक महिना होतो यात शुक्ल आणि कृष्ण असे २ पक्ष होतात. २ महिन्यांचा एक ऋतू आणि ३ ऋतू मिळून एक अयन होते. एका वर्षात अशी दोन अयने असतात. अशा प्रकारे १२ महिन्यांचे वर्ष पूर्ण होते.
कालमापनाची विराट एकके
अति सूक्ष्म प्रमाणेच कालमापनाची विराट एकेक देखील भारतीय परंपरेत आढळतात. मानवांच्या सौर, सावन, चान्द्र बार्हस्पत्य, नाक्षत्र यांच्या प्रमाणेच ब्राह्म, दिव्य, पित्र्य, प्राजापत्य या विविध पद्धतीने वर्षाचे मापन करता येते. पित्र्य मान प्रमाणे १५ मानवी दिवस म्हणजे एक पक्ष हा पितरांचा एक दिन आणि तेवढी त्यांची रात्र असते. ३० मानवी महिने झाले की पितरांचा एक महिना होतो आणि १०,८०० मानवी दिवस झाले की एक पित्र्य वर्ष बनते. दिव्य मानाप्रमाणे उत्तरायण म्हणजे देवांचा १ दिन आणि दक्षिणायन म्हणजे देवांची १ रात्र या मापनाने १ मानवी वर्ष म्हणजे देवांची १ अहोरात्र होते. ३६० मानवी वर्षे झाली कि देवांचे एक वर्ष होते. याला दिव्य वर्ष म्हटले गेले आहे.
दिव्य वर्ष हे प्रमाण मानून युगांची कालगणना केली जाते. प्रत्येक युगाला संध्या, मुख्य युग आणि संध्यान्त असतो.
४००० दिव्य वर्षांचे १ कृत युग असते आणि त्यात ४०० दिव्य वर्षांची संध्या आणि तेवढाच संध्यान्त असतो. तसेच बाकीच्या तीन युगांमध्ये युगांची सहस्त्रवर्षे एक हजार वर्षाने आणि संधीकाळाची शतवर्षे १०० वर्षाने कमी होतात. या नुसार
१ कृत युग म्हणजे ४८०० दिव्य वर्षे
१ त्रेता युग म्हणजे ३६०० दिव्य वर्षे
१ द्वापर युग म्हणजे २४०० दिव्य वर्षे
१ कलि युग म्हणजे १२०० दिव्य वर्षे
अशी चार युगे एकदा झाली कि १ महायुग होते. म्हणजे १ महायुग = १२००० दिव्य वर्षे म्हणजेच ४३,२०,००० मानवी वर्षे.
अशी ७१ महायुगे म्हणजे एक मन्वंतर आणि अशी १४ मन्वंतरे झाली कि ब्रह्मदेवाचा १ दिवस होतो.
ब्रह्माच्या एका दिवसाला कल्प असे म्हणतात. एका कल्पात ७१x१४ = ९९४ महायुगे आणि मन्वंतरानंतरची संधीकाळ धरून १००० महायुगे होतात. तेवढीच त्याची १ रात्र असते.
ब्रह्मदेवाचा एक दिवस = २ x १००० महायुगे = २,४०,००,००० दिव्य वर्षे
म्हणजेच ८,६४,००,००,०००मानवी वर्षे.
ब्रह्मदेवाच्या एका वर्षात ३६० दिवस असतात. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या एका वर्षात ३६० x ८,६४,००,००,००० = ३,१,१,०,४०,००,००,००० मानवी वर्षे होतात. अर्थात ३ महापद्म, १ निखर्व, १ खर्व, ४० कोटी मानवी वर्षे!!!
ब्रह्मदेवाचे आयुष्य १०० वर्षे असते. असे १००० ब्रह्मदेव झाले की विष्णूची एक घटका होते. असे १००० विष्णु झाले की रुद्राचा एक पळ होतो आणि असे १००० रुद्र झाले की आदिमायेचा अर्थात महाशक्तीचा अर्धा पळ होतो.
हि विराट कालगणना मानवी वर्षात मांडणे आवाक्या बाहेरचे आहे. महाकवि क्षेमेन्द्र म्हणतात -
अहो कालसमुद्रस्य न लक्ष्यन्ते तिसंतता:।
मज्जन्तोन्तरनन्तस्य युगान्ता: पर्वता इव।।
काळाच्या या महासागराला काही थांग नाही. युगांसारखे मोठमोठे कालखंड देखील यात पर्वतांसारखे बुडून जातात. आज व्यावहारिक सोइसाठी आपण ग्रेगेरियन कालगणना स्वीकारली असली प्राचीन भारतीय कालगगणनेचे महत्व देखील टिकून आहे. प्रत्येक सश्रद्ध भारतीय रोजच्या पूजेत किंवा इतर नैमित्तिक धार्मिक कार्यात पूजेआधी संकल्प करतो त्यात या विराट कालगणनाची आठवण काढली जाते.
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे कलियुगे प्रथमचरणे… अशा उच्चारणातुन विराट काळापुढचे आपले अस्तित्व किती नगण्य आहे याची जाणीव होते. तरी याच्या पुढच्या शालिवाहन शके अमुक नाम संवत्सरे अमुक अयने अमुक ऋतौ अमुक मासे.. या आपल्या मानवी कालगणनेच्या उच्चारातून आपल्यासाठी काळाची ही एकके किती महत्वपूर्ण आहेत याची जाणीव होते.
अथर्व वेदातील सूक्त १९.५३ व १९.५४ यांची देवता ‘काल’ असून, यात काळाचे अतिशय सुरेख विवेचन केले गेले आहे.
कालो ह भूतं भव्यं च पुत्रो अजनयत् पुरा ।
कालादृचः समभवन यजु: कालादजायत ॥
(१९.५४.३)
काळ हा पित्यासारखा आपल्या मागे असतो व मुलासारखा आपल्या पुढे देखील चालत असतो. सृष्टीच्या उत्पत्तीपासून असणारा प्रदीघ भूतकाळ आणि सृष्टीच्या अंतापर्यंत असणारा अथांग भविष्यकाळ यांना उद्देशून वापरलेली ही रूपके. भारतीय कालगणना आपल्याला काळाच्या अति सूक्ष्म ते अति विराट रूपाचे विश्वरूप दर्शन घडवते. हे पाहून विस्मित होऊन आपण इतकंच म्हणू शकतो कालाय तस्मै नम:।

Comments