भारतीय नौसेनेची युद्धनौका: तमल - श्री काशीनाथ देवधर
- May 20, 2025
- 3 min read
Updated: May 27, 2025
INS तमल युद्धनौका ही मुळातच ब्लू-बॉटर ऑपरेशन्स म्हणजेच खोल व दूर समुद्रातील कारवाईसाठी असून नौसेनेच्या सर्व मितीच्या युध्दासाठी उदा. हवाई, जमिनीवर, पाण्याखालील युद्ध अथवा इलेक्ट्रॉनिक युद्ध या सर्व बाजू भक्कम असून युद्ध सिद्ध असणार आहेत.
इथून पुढे अशा युद्धनौका सुध्दा भारतातच बनतील व स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून हे क्षेत्र ही आपण पादाक्रांत केलेले असेल. "आत्मनिर्भर भारत" जगात या प्रमाणेच प्रत्येक क्षेत्रातील आपली ताकद वाढवत असून "रक्षा तंत्रज्ञानात" तर प्रामुख्याने स्वावलंबी होऊन विश्वगुरुत्वा कडे वाटचाल तेजीने करतोय.

भारतीय नौसेनेच्या कार्यादेशानुसार तलवार-वर्गातील शेवटची युद्धनौका रशिया मध्ये बांधून तयार आहे आणि भारतीय नौसेनेकडे सुपूर्त करून सेवेत दाखल करण्यासाठी पीटर्सबर्ग येथे सिध्द आहे. २०० भारतीय नौ-सैनिक सर्व प्रकारच्या स्विकृती चाचण्या घेण्यासाठी रशियाला गेले असून जून २०२५ मध्ये भानौपो-तमल ही युद्धनौका भारतीय नौ सेनेच्या सेवेत दाखल होईल.
धारदार तलवारी प्रमाणे भानौपो-तमल या युद्धनौकेची अचूक प्रहार आणि उच्च गतिशीलते साठीची रचना व बांधणी केली आहे. एकाच मोहिमेवर ३००० किमी जाण्याची तमलची कार्यक्षमता असून ही ३० नॉट्स (समुद्र मैल) अर्थात ५५ किमी प्रति तास वेगाने मार्गक्रमण करू शकते. स्टेल्थ तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून या युद्धनौकेची बांधणी केली आहे. स्टेल्थ तंत्रज्ञान म्हणजे ही युद्धनौका सहजतेने दिसणे, शोधणे दुरापास्त असेल, अगदी दूर्बीण, रडार, सोनार, अवरक्त किरणे (Infrared) अशा पध्दतीने बघणे अथवा किंवा शोधणे कठीण असते. भानौ पो-तमल याचे अजुन वैशिष्ट्य म्हणजे ही युद्धनौका निर्देशित क्षेपणास्त्र ही अद्ययावत व अत्याधुनिक पद्धतीने डागण्याची क्षमता शत्रूसाठी भयंकर ठरते. या प्रकारच्या युद्धनौका विनाशिका वर्गातील युद्धनौकांपेक्षा लहान असतात आणि तलमची लांबी केवळ १२५ मीटर असून ३९०० टन पाणी विस्थापित करते त्यामुळे अतिशय हलकी व लहान आहे. असे असूनही जबरदस्त प्रहारक्षमता हे या प्रकारच्या युद्धनौकांचे वैशिष्ट आहे.
या युद्धनौका बांधणीत २६% वाटा हा भारतीय उत्पादकांचा, उद्योगांचा आहे, अशा तलवार वर्गातील अत्यंत प्रगत तंत्रज्ञानयुक्त रशियाने बांधलेल्या या भारतीय नौदलाच्या शेवटच्या युद्धनौकेचे स्वागत करायला आपण तयार आहोत व जून २०२५ मध्ये ही सेवारत होऊन आपले सामुद्री सामर्थ्यात भर पडेल.
भानौपो- तलवार वर्गातील, तलवार, त्रिशूल आणि तबर या तीन युद्धनौका भारताने २००२-२००३ मध्ये रशिया कडून खरेदी केल्या होत्या. त्यानंतर २००६ च्या जुलै मध्ये भारत-रशिया यांच्या मधे त्याच वर्गातील अजून तीन युध्दनौका, ज्यावरून ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असणाऱ्या युद्धनौका विकत घेण्याचा करार झाला. तेग, तर्कश आणि त्रिखंड २०१२-२०१३ मध्ये त्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
सप्टेंबर २०१६ मध्ये रशिया सोबत भारताने करार करून दोन अद्ययावत व अत्याधुनिक अशा भानौपो-तलवार वर्गाच्याच युद्धनौका रशिया मध्ये निर्मिती व बांधणी करून भारतीय नौसेनेत सेवेमध्ये येणार आणि त्याच वर्गातील अजुन दोन युद्धनौका मात्र गोवा शिपयार्ड लिमिटेड या भारतातील जहाज बांधणी कारखान्यात उत्पादन / निर्माण करणार, मात्र रशिया व भारत दोन्हींच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून युद्धनौका अधिक सरस बनवणार आहेत. याच करारा नुसार भानौपो तुशील (INS-TUSHIL) ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत डिसेंबर २०२४ मध्ये संमिलीत झाली आणि आत्ता दुसरी म्हणजेच रशियातून येणारी शेवटची युद्धनौका जून २०२५ मध्ये नौसेनेच्या सेवेत रुजू होईल. राहिलेल्या दोन युद्धनौका भारतातच 'गोवा शिपयार्ड लिमिटेड' येथे निर्माण केल्या जातील त्यासाठी रुपये १३,००० कोटींचा रशिया बरोबर करार झाला आहे, तसे भारत सरकारने ३० जानेवारी २०१९ ला 'गोवा शिपयार्ड लिमिटेड' ला कळवले.
या दोन युध्द नौकांमध्ये भारतीय प्रणाली / उप-प्रणाली यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जाणार आहे. या युद्ध नौकांच्या वर्गाला त्रिपूट (Triput) नाव देण्यात आले आहे. या नवीन वर्गाच्या युध्द नौकांवर BHEL (Bharat Heavy Electricals Limited) या भारतीय कंपनी निर्मित ७६mm Gun, आणि बाकीची शस्त्रास्त्र प्रणाली आणि संयंत्रे (sensors) उपयोगात आणण्यात येतील. जुलै २०२४ मध्ये उत्पादन / निर्मिती सुरु झाली असून ४३,००० kW शक्तिचे (५८,००० अश्वशक्तीचे पॉवर प्लांट आणि 'मायक्रो प्रोसेसर कंट्रोल सिस्टीम' लावणार असून २०२६-२०२७ मध्ये त्या दोन्हीही युद्धनौका भारतीय नौसेनेच्या सेवत सहभागी होतील.
INS तमल युद्धनौका ही मुळातच ब्लू-बॉटर ऑपरेशन्स म्हणजेच खोल व दूर समुद्रातील कारवाईसाठी असून नौसेनेच्या सर्व मितीच्या युध्दासाठी उदा. हवाई, जमिनीवर, पाण्याखालील युद्ध अथवा इलेक्ट्रॉनिक युद्ध या सर्व बाजू भक्कम असून युद्ध सिद्ध असणार आहेत.
INS-TAMAL भानौपो-तमल वर्गात असलेल्या युद्धनौकांकरता सुसज्य अशी ७६ मिमी एस आर जी एम (Super Rapid Gun Mount) यामुळे नौदलीय युद्धशास्त्रांत तोफखान्याचे कार्यक्षमता वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे मुख्य क्षेपणास्त्रे डागण्या साठी ८ नलिकांद्वारा उर्ध्वगामी अग्निबाण प्रक्षेपक, दोन स्वदेशी त्रिपल टॉर्पेडो लाँचर (ITTL), ३२४ मिमी व्यासाच्या टार्पिडोसाठी निर्देशन आणि नियंत्रण प्रणाली तसेच Shtil SAM हे जमिनीवरून हवेतील शत्रू नष्ट करण्यासाठी असून स्व-संरक्षण आणि आक्रमण दोन्हीसाठी प्रभावी क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता ही अन्य शस्त्रास्त्रे बरोबर विशेषत्वाने असेल.
अशा या रशियातून येणाऱ्या शेवटच्या क्षेपणास्त्र स्टेल्थ बोटीचे स्वागत करण्याने भारताची समुद्री शक्ती वाढतेच आहे पण अत्यंत आनंदाची बाब, म्हणजे इथून पुढे अशा युद्धनौका सुध्दा भारतातच बनतील व स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून हे क्षेत्र ही आपण पादाक्रांत केलेले असेल. "आत्मनिर्भर भारत" जगात या प्रमाणेच प्रत्येक क्षेत्रातील आपली ताकद वाढवत असून "रक्षा तंत्रज्ञानात" तर प्रामुख्याने स्वावलंबी होऊन विश्वगुरुत्वा कडे वाटचाल तेजीने करतोय.
।। भारत माता की जय ।।
(लेखक भारत सरकारच्या संरक्षण संशोधन व विकास खात्यात सह-वर्गसंचालक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत.)

Comments