प्राण्यांचे वर्गीकरण
- Jul 9, 2025
- 3 min read
डॉ. पुरुषोत्तम काळे

प्राणिवर्गाचे वर्गीकरण विविध निकषांवर आधारित आहे, ज्यात पेशींची रचना, शरीर सममिती, जननस्तर, देहगुहा, खंडीभवन, पृष्ठरज्जूची उपस्थिती, आणि भ्रूण विकासातील वैशिष्ट्ये यांचा समावेश होतो. प्राणी हे सुकेंद्रीय, बहुपेशीय व हालचालक्षम परपोषी असतात. पंच-सृष्टी व तरी-सृष्टी वर्गीकरणांत त्यांच्या स्थानांचे स्पष्टीकरण दिले जाते. यामध्ये आधुनिक वर्गीकरणातील ‘निर्मोची पशुक’ व ‘चक्रशीर्ष पशुक’ यांसारख्या गटांची माहिती दिली आहे. ही सर्व वैशिष्ट्ये प्राण्यांच्या उत्क्रांती व वर्गीकरणाच्या अभ्यासासाठी महत्त्वाची ठरतात.
प्राचीन काळापासून सजीवांच्या वर्गीकरणाच्या पद्धती विकसित होत गेल्या. आपण या पूर्वीच्या लेखांतून या पद्धतीचं विवेचन वाचलंय. या लेखात आपण रॉबर्ट व्हिटाकर या अमेरिकन जीवशास्त्रज्ञाने रूढ केलेल्या पंच-सृष्टी वर्गीकरणातल्या प्राणी-सृष्टी आणि कार्ल वूस- जॉर्ज फॉक्स यांच्या तरी-सृष्टी वर्गीकरतल्या सुकेंद्रीय अधिक्षेत्रातल्या प्राणी-सृष्टी गटा विषयी माहिती घेऊयात.

प्राणी अधिक्षेत्रात सुकेंद्रीय, बहुपेशीय व पेशी-भित्तिका विरहित पेशी असणाऱ्या सजीवांचा समावेश होतो. हे सजीव परपोषी असून त्यांना हालचाल करता येते. या मूलभूत गुणांव्यतिरिक्त इतर अनेक गुणधर्मांचा विचार प्राणी-सृष्टीचं वर्गीकरण करतांना केला जातो. हे गुणधर्म खालील प्रमाणे आहेत.
रचनात्मक संगठन (स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन): आदी-पशुक अथवा प्रोटोझोआ या संघातील (फायलम) प्राणी एकपेशीय असून पंच-सृष्टी वर्गीकरणातल्या प्रोटिस्टा या अधिक्षेत्रात त्यांचा समावेश केला जातो. तरी-सृष्टी वर्गीकरणात सुकेंद्रकी गटात या संघाचा समावेश होतो. याहून वरचढ संरचना बहुपेशीय 'प्रपशुक' (मेटाझोआ) प्राण्यांत असते. असे प्राणी दोन गटांत विभागता येतात. नि-प्रपशुक (पॅरा-झोआ) ज्यांत अनेक पेशी तर असतात पण ऊती असत नाहीत (पेशीस्तरीय संगठन) आणि सु-प्रपशुक (यू-मेटाझोआ) ज्यात एकाच प्रकारची रचना व कार्य असणाऱ्या पेशी एकत्र येऊन ऊती बनतात (ऊती-स्तरीय संगठन), विशिष्ठ कार्य करण्यासाठी मूलभूत ऊती एकत्र येऊन इंद्रिय बनवतात (ऊती-अवयव-स्तरीय संगठन) तर अनेक इंद्रिये एकाच उद्दिश्टाने गुंफली जाऊन इंद्रिय-संस्था बनवतात (अवयव-संस्था-स्तरीय संगठन). नि-प्रपशुक गटात केवळ छिद्री (पोरिफेरा) संघाचा समावेश होतो तर सु-प्रपशुक गटांत इतर सर्व संघांचा समावेश होतो.
शारीरिक सममिती (बॉडी सिमेट्री): अमिबा सारख्या प्राण्याला कोणत्याही अक्षांत कापून दोन सान भाग मिळू शकत नाहीत ज्यामुळे ती असममिती (असिमेट्री) ठरते. जल-व्याल (हायड्रा) सारख्या प्राण्यांना कोणत्याही व्यासातील उभ्या छेदानं दोन सामान भागात कापता येतं ज्याला अरीय-सममिती (रेडियल सिमेट्री) म्हणतात. घरमाशी अथवा बेडूक केवळ एकाच लंब-अक्षांत कापल्यास दोन सामान भाग मिळू शकतात ज्याला द्विपार्श्व्-सममिती (बाय-लॅटरल सिमेट्री) म्हणतात.
आद्यस्तर/ जननस्तर (जर्मायनल लयेर्स): बहुपेशीय भ्रूणावस्थेत शरीर किती आद्यस्तरांपासून अथवा जननस्तरांपासून बनतं त्यावरून प्राणी द्विस्तरीय (डिप्लोब्लास्टिक) अथवा त्रीस्तरीय (ट्रिप्लोब्लास्टिक) असतात. द्विस्तरियांत बहिर्जनस्तर (एक्टॉडर्म) व अंतर्जनस्तर (एन्डोडर्म) या दोनच जननस्तरांपासून तर त्रीस्तरियांत बहिर्जनस्तर, मध्य-जननस्तर व अंतर्जनस्तर या जननस्तरांपासून शरीराची रचना होते.
देहगुहा (बॉडी कॅव्हीटी): वर उल्लेखलेल्या जननस्तरांपासून शरीराची रचना होतांना एकतर जननस्तरांत पोकळीचा निर्माण होत नाही (देहगुहाहीन/ असिलोमेट), छद्म-गुहा/ सुडो-बॉडी कॅव्हिटी (जिला सलग पेशी-आवरण नसतं) निर्माण होते किंवा मध्य-जननस्तरापासून निर्माण झालेल्या पेशींचे आवरण असणारी सत्य-देहगुहा तयार होते. प्लानेरिया सारखे चपटे कृमी देहगुहाविहीन, जंतांसारखे गोलकृमी छद्म-देहगुहा असणारे तर गांडूळे, बेडूक, मानव हे सत्य-देहगुहा असणारे प्राणी होत.
खंडीभवन (सेगमेंटेशन): शरीर जेंव्हा बाह्य, अंतर अथवा बाह्यांतर खंडांमध्ये विभागलं जातं तेंव्हा त्याला खंडीभवन म्हणतात. गांडुळांसारख्या वलयांकित कृमींचे शरीर बाहेरून व आतून सामान खंडांत विभागलेलं असतं, ज्याला सम-घटकीय खंडीभवन म्हणतात. पृष्ठवंशीय प्राण्यांचं शरीर आतून व असमान खंडांत विभागलेलं असतं.
पृष्ठरज्जू: शरीराच्या सूर्याकडे असणाऱ्या पृष्ठ भागात किमान भ्रूणावस्थेत एक लवचिक पण भरीव कणा/ रज्जू असल्यास अशा प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. ज्या प्राण्यांत तो नसतो त्यांना अपृष्ठवंशीय म्हणतात. या पृष्ठरज्जू पासून पुढे कवटी (क्रॅनियम) व कशेरू (व्हर्टिब्रल कॉलम) बनतो व हे असणाऱ्यांना कशेरू प्राणी (व्हर्टीब्रेट्स/ क्रॅनिएट्स) आणि नसणाऱ्यांना अकशेरू (इन्व्हर्टिब्रेट्स/ अक्रॅनिएट्स) म्हणतात.
आद्यमुखी (प्रोटोस्टोमिया) व पश्चमुखी (ड्युटेरोस्टोमिया): सत्य-देहगुहा असणाऱ्या प्राण्यांत युग्मजाच्या (झायगोट) प्राथमिक विभाजनातून पेशींच्या एकाच थराने वेढलेला एक पोकळ व द्रवाने भरलेला गोळा बनतो ज्याला भ्रुणगोलक (ब्लास्तुला) म्हणतात. या थरातील पेशींचं भविष्य (त्यांच्यापासून कोणत्या ऊती/ इंद्रिये बनणार या संबंधी) पूर्वनिर्धारित असतं. पुढील भ्रुण विकासात या पेशी योग्य स्थानी पोचणं गरजेचं असतं, त्याकरता पेशींचं विभाजन व रूपजननीय चलन (मॉर्फोजेनेटिक मुव्हमेंट) होऊन द्विस्तरीय उदरोलक (गॅस्त्रुला) बनतो. उदरोलकात सुरुवातीला एक वर्तुळाकार भ्रूणगोलरंध्र (ब्लास्टोपोर) असते. ज्या प्राण्यांत भ्रूणगोलरंध्रा पासून भविष्यात मुख तयार होते त्यांना आद्यमुखी तर ज्या प्राण्यांत भ्रूणगोलरंध्रा पासून भविष्यात गुदद्वार बनते त्यांना पश्चमुखी म्हणतात. आद्यमुखिंमध्ये युग्मजाचं आद्य खंडन मळसूत्री (स्पायरल) व निर्धारित (डिटर्मिनेट) स्वरूपाचं असतं तर पश्चमूखींत ते अरीय (रेडियल) व अनिर्धारित (इंडिटर्मिनेट) पद्धतीनं होतं.
आद्यमुखी प्राण्यांमधील संधिपाद (आर्थ्रोपोडा) व गोलकृमी (नेमॅटोडा) संघातील प्राणी निर्मोचीपशुक (एकडायसोझोआ/ कात टाकणारे पशुक) तर चपटकृमी (प्लॅटिहेल्मीनथेस), वालयांकितकृमी (अंनिलिडा), मृदुकाय (मॉलस्का) संघांतील प्राणी चक्रशीर्षपशुक (लोफोट्रोकोझोआ/ ऊर्ध्वभागी चक्राकार रोमके असणारे पशुक) असतात.
प्राण्यांचे आधुनिक, रेण्विय व वंशैतिहासिक वर्गीकरण या चित्रात दाखल्याप्रमाणे आहे.

(लखेक हे मुंबईतील रामणी रंजन झनुझनुवाला महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख आणि प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.)

Comments