न प्रकाशता चंद्राचे प्रकाशणे
- Jun 3
- 8 min read
श्री. विठ्ठल रायगावकर
या लेखात चंद्राभोवती गुंफलेल्या लोककथा, पौराणिक संदर्भ आणि वैज्ञानिक माहिती यांचा सुंदर संगम आहे. सुरुवातीला मुल्ला नसरुद्दीन यांची विनोदी कथा सांगितली आहे, ज्यात ते विहिरीतील चंद्राचे प्रतिबिंब खरे मानून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पुढे गणपती आणि चंद्राची कथा तसेच दक्ष प्रजापती, रोहिणी आणि चंद्र यांची पौराणिक कथा दिली आहे, ज्यातून चंद्राच्या कला समजावून सांगितल्या आहेत. लेखात चंद्राचे सांस्कृतिक महत्त्वही अधोरेखित केले आहे—सण, व्रतवैकल्य, पौर्णिमा, ईद इत्यादींमध्ये त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर वैज्ञानिक भागात सूर्य , पृथ्वी आणि चंद्र यांचे आकारमान व अंतर यांची तुलना करून विश्वाच्या विशालतेची जाणीव करून दिली आहे. प्रकाशाचे स्वरूप, परावर्तन, अल्बेडो, तसेच चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरे यांचे स्पष्टीकरण दिले आहे. चंद्र स्वयंप्रकाशित नसून सूर्य प्रकाश परावर्तित करतो, ही महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. तसेच चंद्रावरील दिवस-रात्र चक्र, तापमानातील तीव्र फरक आणि तेथील कठीण परिस्थिती यांचा आढावा घेतला आहे. शेवटी, विद्यार्थ्यांना चंद्राबद्दल अधिक अभ्यास करण्यास प्रवृत्त करून “स्वतःच्या प्रकाशाने चमकण्याचे” मूल्य अधोरेखित केले आहे.

तेराव्या शतकात मुल्ला नसरुद्दीन हे एक प्रसिद्ध विनोदी व्यक्तिमत्व तुर्की देशांमध्ये होऊन गेले. हा मुल्ला नसरुद्दीन एकदा एका पौर्णिमेच्या रात्री पायी प्रवास करत करत एका विहिरीच्या काठाजवळ पोहोचला. विहीर पाण्याने जवळजवळ भरली होती आणि त्यामध्ये पौर्णिमेच्या चंद्राचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. हळुवार वाहणाऱ्या हवेच्या झोताबरोबर पाण्याच्या पृष्ठभागावर लहान लहान तरंग उठत होते आणि त्यामुळे ते चंद्रबिंब किंचित हलल्यासारखे वाटत होते. त्याला आश्चर्य वाटले. त्याची अशी समजूत झाली की आकाशातला चंद्र विहिरीत पडला आहे आणि आता तो पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहे. त्याला चंद्राची दया आली आणि त्याला असे वाटले की आपण काहीतरी करून चंद्राला पाण्यातून बाहेर काढले पाहिजे. त्याने इकडे तिकडे पाहिले. विहिरीच्या जवळच त्यांला एक दोर व बादली पडलेली दिसली. त्याने लगेच तो दोर बादलीला बांधला आणि बादली विहिरीत सोडली. आता त्या बादलीचे तोंड आणि चंद्राच्या प्रतिबिंबाचा आकार सारखाच होता. त्यामुळे त्याला वाटले तो चंद्र त्या बादलीमध्ये बसेल आणि मग त्याला आपण वरती ओढू. तसा प्रयत्न करत असताना बादली विहिरीतल्या खडकाला अडकली आणि हा ओढतोय ओढतोय. त्याला वाटले चंद्र बादलीत बसल्यामुळे बादली जड झाली. म्हणून त्याने बादलीला वर काढण्यासाठी जास्त जोर लावला. शेवटी गंमत काय झाली, तर त्याने एक हिसका दिला आणि त्या हिसक्याबरोबर तोही विहिरीत पडला. झाले बाकी लोकांनी कसं तरी त्याला वरती काढल. त्याची शुद्ध हरवली होती. थोड्या वेळाने तो शुद्धीत आला. तेव्हा त्याला वरती आकाशात चंद्र दिसला आणि मग तो लोकांना सांगू लागला, “बघा, हा चंद्र विहिरीत पडला होता मी बादली विहिरीत सोडून त्याला बादलीत घेतला आणि एक हिसका दिला तसा तो वर आकाशात आपल्या जागी फेकला गेला. त्यामुळे वाचला. अन्यथा पाण्यात बुडून त्याचा जीव गेला असता. मी चंद्राला विहिरीतून बाहेर काढले” आणि पुढे तो चंद्राला म्हणाला, “बाळ , नीट काळजी घे. आता पुन्हा विहिरीत पडू नको.” अशा पद्धतीच्या कितीतरी लोककथा चंद्राबद्दल सांगितल्या जातात. तुम्हाला माहिती आहे का अशी एखादी कथा?

आपला गणपती बाप्पा आणि चंद्र या दोघांची पण एक छान कथा आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांनी खूप मोदक खाल्ले आणि त्यामुळे त्यांना जागेवरून उठणे सुद्धा मुश्किल झाले. चंद्राने हे पाहिले आणि तो हसला. त्यामुळे गणपतीला खूप राग आला आणि मग गणपतीने चंद्राला शाप दिला की जो कोणी गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे दर्शन घेईल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. पुढे अनावधानाने श्रीकृष्णाने चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेतले. झाले. त्याच्यावर स्यमंतकमणी चोरल्याचा आळ आला. मग त्यांनी गणपतीची आराधना केली व संकष्टी चतुर्थीचे व्रत करून तो दूर केला. अशी पौराणिक कथा आहे. अशीच आणखी एक पौराणिक कथा आपण पाहू आणि मग चंद्राच्या प्रकाशाबद्दल माहिती घेऊ.

दक्ष प्रजापती राजाला 27 कन्या होत्या. या 27 कन्या म्हणजे 27 नक्षत्र. या सर्व कन्यांचा विवाह चंद्राशी झाला. परंतु चंद्राला रोहिणी जास्त प्रिय वाटायची आणि त्यामुळे तो आपला बराच वेळ रोहिणी सोबत घालवायचा. बाकीच्या कन्यांना त्यामुळे राग आला आणि त्यांनी आपल्या वडिलांच्याकडे चंद्राची तक्रार केली. दक्ष प्रजापतीला चंद्राचे वागणे आवडले नाही आणि त्यांनी चंद्राला मग शाप दिला की तुला क्षयरोग होईल आणि मग त्यामुळे चंद्र कलेकलेने क्षीण होऊ लागला. नंतर चंद्राच्या विनंतीवरून व रोहिणीच्या प्रेमामुळे दक्षाने त्याला पूर्ण नष्ट न करता तो पुन्हा वाढेल असा उ:शाप दिला. चंद्राने शंकराची तपश्चर्या केली. आणि त्यामुळे शंकराने प्रसन्न होऊन त्याला आपल्या डोक्यावरती स्थान दिले. त्यामुळे त्याचे तेज त्याला अंशतः परत मिळाले.
सणवार, वृत्तवैकल्य यामध्ये सुद्धा चंद्राचे विशेष महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास करणारे भाविक चंद्रोदयानंतर अन्नग्रहण करतात. दीपावली
उत्सवाच्या दरम्यान भाऊबीजेला बऱ्याच भगिनी भाऊ म्हणून चंद्राला ओवाळतात. त्याशिवाय प्रत्येक पौर्णिमेला एक विशेष नाव दिलेले आहे. उदाहरणार्थ वटपोर्णिमा, नारळी पौर्णिमा म्हणजे राखी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा इत्यादी आणि त्याप्रमाणे विशिष्ट प्रकारची पूजा विधी त्या त्या पौर्णिमेला आयोजित केली जाते. मुस्लिम बांधवांमधे ईदच्या सणासाठी द्वितीयेच्या चंद्र कोरीचे विशेष महत्त्व आहे. अशा पद्धतीच्या अनेक मजेदार कथा चंद्राबद्दल प्रचलित आहेत. रामायण, महाभारत, अकबर बिरबलाच्या गोष्टीमध्ये, त्याचप्रमाणे कृष्णदेवराय आणि तेनाली रामा यांच्या गोष्टींमध्ये, संतवान्मयांमध्ये इ. अनेक ठिकाणी चंद्राचा संदर्भ आपल्याला मिळतो. असे काही संदर्भ मिळवण्याचा आपणही प्रयत्न करा. “सुपरभर लाह्या आणि मधेच एक रुपैय्या’’ सांगा पाहू कोण. ज्याचा बद्दल आपण हा लेख लिहितोय तो... चंद्र. एका सुपामध्ये लाह्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये रुपया ठेवायचा कस दिसेल हे. जस आकाशामध्ये अनेक चांदण्यांच्या मध्ये चंद्र दिसतो तस. कसं छान रूपक आहे पहा. सूप म्हणजे आकाश, लाह्या म्हणजे चांदण्या आणि रुपया म्हणजे चंद्र.
मित्रांनो, आम्ही अकरावीला असताना कुसुमाग्रजांनी लिहिलेला “हे शशांका, स्वप्नांच्या सौदागरा’’ नावाचा धडा आमच्या अभ्यासक्रमामध्ये मराठीच्या पुस्तकात होता. त्यामध्ये चंद्राची खूप छान माहिती त्यांनी सांगितली होती. आणि मला आठवतं ते असे म्हणाले होते की, एका दीडशे फूट उंचीच्या पडद्यावर पेनाने एक ठिपका द्यावा तेवढे स्थान या संपूर्ण विश्वामध्ये आपल्या सूर्यमालिकेचे आहे. आता पहा मित्रांनो, त्या ठिपक्यामध्ये आपण आपली पृथ्वी कुठे शोधायची, चंद्रमा कुठे शोधायचा? एवढं विशाल विश्व आहे आपलं अवाढव्य.
चला आता आपण चंद्र, पृथ्वी, सूर्य त्यांचे आकार आणि अंतर याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. (इथे मी दिलेले सर्व आकडे जवळच्या पूर्णांकाशी जुळवून घेतलेले आहेत. कृपया याची नोंद घ्यावी).
आपला सूर्य किती मोठा आहे? हे समजण्यासाठी आपण अशी कल्पना करूया की, सूर्य एक मोठा डबा आहे आणि आपली पृथ्वी लाडू. तेंव्हा या सूर्यरूपी डब्यामध्ये पृथ्वीरुपी किती लाडू बसतील? काही अंदाज, याचे उत्तर आहे. तेरा लाख. आता पुढे. आपल्या चंद्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांश आहे. पृथ्वीचा व्यास 12756 किलोमीटर इतका आहे. यावरून तुम्हाला चंद्राचा व्यास काढता येईल आणि नंतर सूर्यरुपी डब्यामध्ये चंद्राच्या आकाराचे किती लाडू बसतील हे गणित तुम्ही करा. ह्या तुलनेवरून यांच्या आवाढव्य आकाराची आपल्याला कल्पना येते. सूर्याचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या 109 पट मोठा आहे आणि पृथ्वीचा व्यास हा चंद्राच्या व्यासाच्या चार पट मोठा आहे. म्हणजे सूर्याचा व्यास चंद्राच्या व्यासाच्या साधारण चारशे पट मोठा आहे.

आता अंतरं बघू या. सूर्यप्रकाशाला सूर्यापासून निघून पृथ्वीवर पोहोचायला साधारणतः आठ मिनिटे लागतात. तुम्हाला माहिती आहे की प्रकाश किरण एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर इतक्या भन्नाट वेगाने प्रवास करतात. तर मग आठ मिनिटांमध्ये किती किलोमीटर जातील. एवढे अंतर सूर्य ते पृथ्वी यामध्ये आहे. म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये आपली पृथ्वी ही सूर्यापासून आठ प्रकाश मिनिटांच्या अंतरावरती आहे. आता चंद्र किती दूर आहे आपल्यापासून? तर चंद्रावरून परावर्तित होऊन निघालेल्या प्रकाश किरणांना आपल्यापर्यंत पोहोचायला 1.3 सेकंदाचा वेळ लागतो. म्हणजे चंद्र आपल्यापासून साधारणता 1.3 प्रकाश सेकंदाच्या अंतरावरती आहे असे म्हणावयास हरकत नाही. आठ मिनिटांचे सेकंद केले असता ते 480 इतके येतात म्हणजे पृथ्वी सूर्यापासून 480 प्रकाश सेकंदाच्या अंतरावरती आहे आणि चंद्र 1.3 प्रकाश सेकंदाच्या अंतरावरती आहे याचा अर्थ सूर्य ते पृथ्वी हे अंतर चंद्र ते पृथ्वी या अंतरापेक्षा साधारण चारशे पट जास्त आहे. त्यामुळे सूर्याच्या बिंबाचा कोणीय आकार आणि चंद्राच्या बिंबाचा कोणीय आकार हा सारखाच येतो आणि म्हणून मग पूर्ण सूर्यग्रहणामध्ये चंद्राच्या बिंबामुळे सूर्याचे बिंब पूर्ण झाकले जाते.
चला आता आपण थोडेसे चंद्राच्या प्रकाशाबद्दल बोलूया.
तत्पूर्वी एक साधा प्रश्न.... प्रकाश आपल्याला दिसतो का? काय वाटतं तुम्हाला. बघा फार मजेदार प्रश्न आहे हा. याचे उत्तर शोधण्यासाठी आपण एक छान प्रयोग करूया. हा प्रयोग करण्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागेल, तर साधारण अडीच ते तीन इंच व्यासाचा चार-पाच फूट लांबीचा एक पीव्हीसी पाईप घ्या. आता या पाईपच्या साधारण मध्यावरती दीड इंच व्यासाचे छिद्र करा. पाईपच्या एका बाजूने इलेक्ट्रिक बल्ब किंवा सूर्यप्रकाश पाईप मध्ये येईल अशा पद्धतीची रचना तयार करा. आता पाईपच्या आत मध्ये प्रकाश आहे हे नक्की. तर मग पाईपच्या मध्यभागावर केलेल्या छिद्राच्या आत मध्ये पाहिल्यानंतर तो दिसायला हवा. दिसतो का, नाही दिसत. परंतु एखादी पेन्सिल किंवा दुसरी एखादी लहान वस्तू त्या छिद्राच्या आत मध्ये धरली तर आपणास ती वस्तू स्पष्ट दिसते. म्हणजे काय तर प्रकाश स्वतः अदृश्य असतो. आपले डोळे प्रकाश पाहू शकत नाहीत. परंतु एखाद्या वस्तूवरून परावर्तित होऊन प्रकाश किरण आपल्या डोळ्यांमध्ये गेले तर आपल्याला ती वस्तू दिसते. म्हणजेच एखादी वस्तू दृश्यमान होण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते आणि प्रकाशाची जाणीव होण्यासाठी दृश्याची आवश्यकता असते. सूर्याचा प्रकाश दाही दिशांना विखुरला जातो. अंतराळातील ग्रह गोलावर पडलेला प्रकाश त्यांच्या पृष्ठभागावरून परावर्तित होतो. प्रत्येक ग्रह गोलाच्या पृष्ठभागाची प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता वेगवेगळी असते. एखाद्या पृष्ठभागाच्या प्रकाश परावर्तित करण्याच्या क्षमतेला अल्बेडो असे म्हणतात. बर्फ, ढग अशा ज्या वस्तू आहेत त्यांचा अल्बेडो महत्तम असतो. तर डांबर किंवा यासारख्या काळ्या रंगाच्या पदार्थाचा अल्बेडो कमीत कमी असतो. चंद्राचा अल्बेडो 0.12 तर पृथ्वीचा अल्बेडो 0.31 आहे. चंद्राच्या संपूर्ण पृष्ठ पृष्ठभागावरून सारख्याच तीव्रतेचा प्रकाश परावर्तित होतो असे मात्र नाही कारण चंद्राचा पृष्ठभाग एकदम सपाट नाही. तो ओबडधोबडच आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर पडलेल्या उल्कांमुळे त्यावर विविध आकाराचे लहान मोठे, कमी जास्त खोलीचे खड्डे किंवा विवर तयार झालेले आहेत. त्यामुळे त्या विवरांच्या आतून कमी प्रकाश परावर्तित होतो. विवरांचा आकार वेगवेगळा असल्यामुळे आपणास चंद्राच्या पृष्ठभागावर विविध आकाराचे काळे डाग दिसतात. हे आकार अक्षरशः ससा किंवा हरिणाच्या आकृती प्रमाणे भासतात.
चला, आता आणखी थोडी गमतीदार माहिती घेऊ. आपणा सर्वांना हे माहित आहे की पृथ्वीला स्वत: भोवती फिरायला 24 तास लागतात आणि पृथ्वीवर बारा तासाचा दिवस व बारा तासाची रात्र असते. पण चंद्राचे काय ? चंद्राला स्वत: भोवती फिरायला असे तास मिनिटे वगैरे नाही, दिवस दिवस लागतात. किती दिवस ? माहिती आहे ? चक्क 27.3. दिवस. म्हणजे त्या ठिकाणी एकदा दिवस मावळला की तेथे पुन्हा दिवस उगवे पर्यंत आपले 14 दिवस संपतात. आणि तेथे एकदा का दिवस उगवला की पुन्हा रात्र व्हायला आपल्या 14 रात्री संपतात. पण त्यामुळे तेथे दिवसाच्या व रात्रीच्या तापमानामध्ये जमीन आसमानचे अंतर असते. तेथे दिवसाचे तापमान जवळजवळ 120° सेंटीग्रेड आणि रात्रीचे तापमान -130° सेंटीग्रेड पर्यंत असू शकते . पृथ्वीवर नोंद झालेले महत्तम तापमान हे जवळजवळ 55° सेंटीग्रेड होते आणि न्यूनतम तापमान जवळजवळ - 82° सेंटीग्रेड होते. यावरून आपण अंदाज करू शकतो की चंद्रावर वास्तव्यास जाऊन तेथे भटकंती करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रणच.

चला, आता आपण थोडं दीप्तीच्या गावात फेरफटका मारून येऊ. सर्वसाधारणपणे आपली अशी धारणा असते की एखाद्या स्त्रोतामधून प्रकाश निर्माण होत असेल तर त्या स्त्रोताचे तापमान खूप जास्त असते. परंतु प्रकाश किरणांचे प्रत्येक उगमस्थान हे गरम असतेच असे नाही. रानावनातून किंवा पर्वत रांगांच्यामधून प्रवास करताना रात्रीच्या वेळी कदाचित आपण लुकलुकणारा प्रकाश निर्माण करणाऱ्या काजव्यांचे थवेच्या थवे पाहिले असावेत. ते दृश्य अतिशय मनमोहक असते. त्याचप्रमाणे समुद्रात सुद्धा काही सूक्ष्मजीव रात्रीच्या वेळी स्वतःच्या शरीरामधून प्रकाशाची निर्मिती करतात. (Bio-luminescence) पण मग या कृमी कीटकांच्या शरीराचे तापमान हे इतके भीषण नसते. त्यांच्या शरीरात असणाऱ्या विशिष्ट रासायनिक पदार्थामुळे हे शक्य होते. अशा प्रकारच्या प्रकाशाला कोल्ड लाईट असेही म्हणतात.

अशाच पद्धतीने प्रयोग शाळेमध्ये सुद्धा कोल्ड लाईटची निर्मिती आपण करू शकतो. दोन विशिष्ट रसायन एकमेकात मिसळली की त्यातून प्रकाश निर्मिती होते. त्यालाच Chemi-luminescence किंवा रासायनिक दीप्ती असे म्हटले जात. अशी काही रसायन आपणास माहित आहेत काय. असा एक छान प्रयोग आहे. शक्य असल्यास करून पहा. काय साहित्य लागेल ? काचेचे फनेल व त्याचे स्टॅन्ड, स्टॅन्डच्या खालच्या बाजूला जोडता येणारी पारदर्शक प्लास्टिकची स्प्रिंगच्या आकाराची नळी आणि बिकर. प्रयोगाची रचना अगदी सोपी आहे. फनेलच्या खालच्या भागाला पारदर्शक प्लास्टिकची नळी जोडा व त्या नळीचे दुसरे टोक बिकर मध्ये टाका. आता आपणास दोन विशिष्ट रसायन प्राप्त करावयाची आहेत. त्यांची नावं आहेत. लुमिनॉल आणि हायड्रोजन पेरॉक्साइड. या दोन्हीपैकी हायड्रोजन पेरॉक्साईड आपणास सहजासहजी मिळेल. परंतु लुमिनॉल मात्र विद्यापीठांमध्ये किंवा एखाद्या रासायनिक अनुसंधान प्रयोग शाळेमध्ये मिळू शकते. प्रयोग करतेवेळी अंधाऱ्या खोलीमध्ये वेगवेगळ्या काचेच्या पात्रात घेतलेली ही दोन्ही रसायन एकाच वेळी फनेलमध्ये ओता. ही दोन्ही रसायन फनेल मधून पारदर्शक नळीतून खाली उतरताना एक दुसऱ्याशी अभिक्रिया करतात आणि त्या अभिक्रियेतून प्रकाशाचे उत्सर्जन होते परंतु उष्णता निर्माण होत नाही. ह्या प्रकाशाला सुद्धा कोल्ड लाईट असे संबोधले जाते. नेहरू विज्ञान केंद्र मुंबईमध्ये असताना हा प्रयोग अनके वेळा मी विद्यार्थ्यांना दाखवला आहे. हा विशिष्ट प्रकाश पाहताना आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद अनुभवायला येतो.
वरील कोल्ड लाईटचा अपवाद वगळता प्रकाश किरणांचे उगमस्थान हे गरमच असते पण मग ते किती गरम असते. कमीत कमी किती तापमान असले म्हणजे प्रकाशाची निर्मिती होते. तर साधारणतः एखाद्या पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्याचे तापमान 500 ते 600° सेंटीग्रेड इतके झाले की त्यामधून लाल प्रकाश बाहेर पडतो आणि त्याचे तापमान बाराशे ते पंधराशे डिग्री सेंटीग्रेड इतके झाले की त्यातून सफेद रंगाचा प्रकाश बाहेर येतो. मेणबत्तीच्या ज्योतीचे तापमान 1500° सेंटीग्रेड इतक असते. पावसाळ्यामध्ये आकाशात प्रखरपणे चमकणाऱ्या विजेचे तापमान जवळजवळ 30 हजार डिग्री सेंटीग्रेड असते. अशा पद्धतीने जितका प्रकाश जास्त प्रखर तितके तापमान जास्त होत जाते. सूर्याच्या बाह्यतम भागाचे तापमान हे 6000° सेंटीग्रेड इतके आहे तर सूर्याच्या केंद्राचे तापमान जवळजवळ 1.5 करोड डिग्री सेंटीग्रेड इतके असते. बापरे. इतके महाभयंकर तापमान असलेल्या सूर्यापासून निघालेले प्रकाश किरण चंद्रावर पोहोचतात आणि तिथून तो प्रकाश परावर्तित होऊन आपल्याकडे येतो. चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही. तो पर प्रकाशित आहे. स्वकर्तुत्वाची महती सांगण्यासाठी एका संस्कृत सुभाषितकाराने चंद्राच्या या परप्रकाशित असण्याच्या वास्तविकतेचा अत्यंत खुबीने उपयोग केला आहे.
चन्द्रः सूर्यप्रभाम् भुङ्क्ते , न स्वप्रकाशः कदाचन ।
परप्रभोपजीवित्वं, नैव श्रेष्ठेषु शोभते ॥
म्हणजेच चंद्राप्रमाणे दुसऱ्या च्या प्रकाशात चमकण्यापेक्षा स्वतःच्या तेजाने तळपणे हे अधिक गौरवशाली असते.
चला, आता इतके वाचन झाल्यानंतर काय काय गृहपाठ कराल? पहिल्यांदा तर तुम्हाला चंद्राबद्दल जेवढी माहिती आहे ती लिहून काढा आणि त्यानंतर त्या संदर्भात आणखी माहिती गोळा करा. उदाहरणार्थ चंद्राच्या कला का असतात? चंद्राची नेहमी एकच बाजू आपल्याला का दिसते? आपल्या इस्रोची चांद्रमोहीम, चंद्राचे गुरुत्वाकर्षण, चंद्राचा जन्म कसा झाला ? चंद्रग्रहण कसे होते ? कालगणनेमध्ये चंद्राचे काय महत्त्व आहे ? असे कितीतरी वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा.
“न चालता सूर्याचे चालणे” या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊलीच्या ओवीवरून मला या लेखाचे शीर्षक सुचले - “ न प्रकाशता चंद्राचे प्रकाशणे.”
(लेखक नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथून सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आहेत.)

Comments