top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

धोंड्याचा महिना

  • Jun 4
  • 6 min read

विठ्ठल रायगावकर


अलीकडे वर्गामध्ये “ काय, नुसता धोंडा आहेस तू. “धोंड्यासारखा बसून राहू नको.’’ वगैरे प्रकारची वाक्य ऐकायला मिळत नाहीत. परंतु आमच्या लहानपणी विद्यार्थ्याला गणित येत नसलं किंवा तो काहीही काम करत नसेल तर वरील प्रकारचे वाक्य नेहमी ऐकायला यायची. धोंडा या शब्दाच्या नशिबाला असा एक काहीतरी वेगळा अर्थ आलेला आहे. धोंडा म्हणजे बिन कामाचा, ज्याचा काही उपयोग नाही असा. विदर्भ आणि खानदेशामध्ये मात्र एका प्रसिद्ध गोड पदार्थाच्या नावा मध्ये धोंडा हा शब्द आलेला आहे बरं.



पुरणाचे धोंडे साधारणता अधिक महिन्यांमध्ये हा पदार्थ आवर्जून केला जातो. पुरणाची पोळी कशी करतात हे आपणा सर्वांना माहित आहेच. पुरणाचे धोंडे करताना कणकेच्या आवरणामध्ये पुरण घालून गोळे तयार करतात किंवा सोयीप्रमाणे काही वेगळे आकार पण देतात आणि हे उकडून घेतात याच पदार्थाला पुरणाचे धोंडे असे म्हटले जाते. म्हणजे धोंडा हा शब्द अगदीच बिन कामाचा किंवा बिन अर्थाचा असतो असे मात्र नाही.


रस्त्यांची लांबी मोजताना आरंभबिंदूपासून एक मैल ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी खूण म्हणून एक धोंडा ठेवला जातो. त्या धोंड्याला मैलाचा धोंडा असे संबोधले जाते. म्हणजे इथे धोंडा या शब्दाला एक विशेष अर्थ प्राप्त होतो. प्रगतीच्या मार्गातील एक टप्पा इथे संपला हे सांगण्यासाठी मैलाचा धोंडा किंवा मैलाचा दगड हा वाक्प्रचार बोली भाषेमध्ये वापरला जातो. “धोंडा ही तिकडेच व गोफणही तिकडेच“ अशा अर्था ची एक म्हण प्रचलित आहे. मराठेशाहीच्या काळात गोफण हे एक शस्त्र म्हणून वापरले जायचे. किल्ल्यावरून दिसणाऱ्या दूरच्या शत्रूला गोफणीने धोंडे मारत असत. त्याचप्रमाणे शेतातील पिकांचे पाखरांपासून संरक्षण करण्यासाठी गोफणीचा उपयोग केला जात असे. आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे अशाही अर्थाची एक म्हण प्रचलित आहे. पूर्वी काही रोगांच्या साथीमुळे किंवा अन्य काही कारणामुळे बालमृत्यूचे प्रमाण थोडे जास्त होते. त्यामुळे आपली मुले जगावीत म्हणून त्यावेळी बऱ्याच ठि काणी मुलांचे नाव धोंडीराम किंवा दगडू असे ठेवले जात असे. कारण असा एक समज त्यावेळी होता की मुलाचे नाव दगडू किंवा धोंडीराम असे ठेवल्याने मुलं दगडाप्रमाणे किंवा धोंड्याप्रमाणे कणखर बनू शकतात.


म्हणजे धोंडा हा शब्द अगदीच निरर्थक किंवा बिनकामाचा आहे, असे मात्र नाही. एखाद्या महिन्याला, “तू धोंडा आहेस’’ किंवा तुझे नाव “धोंड्याचा महिना आहे’’ हे ऐकायला थोडे कर्णकटू वाटते. पण जेव्हा धोंड्याच्या महिन्याला हे समजेल की पृथ्वीच्या आणि चंद्राच्या गतीच्या विशिष्ट संयोगातूनच त्याचा जन्म होतो, त्यावेळी त्यालाही खूप आनंद वाटेल. ‘आपणा सर्वांना माहित आहेच की आपल्या कालगणने प्रमाणे वर्षाचे बारा महिने असतात आणि या प्रत्येक महिन्याला कोणीतरी स्वामी म्हणून लाभलेला आहे. चैत्राला राम, वैशाखला श्रीविष्णू, ज्येष्ठाला ब्रह्मा, आषाढाला व्यास, श्रावणाला शंकर, भाद्रपदाला गणेश, अश्विनला दुर्गा, कार्तिकला विष्णू, मार्गशीर्षला दत्त, पौष महिन्याला सूर्य, माघ महिन्याला गणेश आणि फाल्गुन महिन्याला कृष्ण. यामध्ये गावोगावी पंचांगानुसार थोडाफार फरक असू शकतो. परंतु गंमत अशी की हा जो धोंड्याचा महिना येतो त्याला कोणीही स्वामी नाही. त्यामुळे भगवान विष्णूने स्वतःहून या महिन्याचे स्वामित्व स्वीकारले आणि त्याला पुरुषोत्तम असे नाव दिले म्हणून याच महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. पुरुषोत्तम मासासंदर्भामध्ये धर्म शास्त्रात एक छान संस्कृत सुभाषित आहे.


मलमासे तू संप्राप्ते, क्रिया सर्वा विवर्जयेत I दानं जपास्तपो होम: , पुरुषोत्तम दुष्टये II


याचा अर्थ असा आहे की जेव्हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास येतो तेव्हा सर्व मंगल कार्य वर्ज करावीत. परंतु दान, तप, होम ही कर्मे मात्र देवाच्या प्रसन्नतेसाठी करावीत. आणखी एक ओळ प्रचलित आहे:

अधिकस्य अधिकं फलम्।

म्हणजे “जो अधिक आहे त्याचं फळही अधिकच मिळतं.” म्हणूनच धोंड्याच्या महिन्यात केलेलं थोडंसं पुण्यही इतर महिन्यांपेक्षा जास्त फळ देतं. परंपरा अशी आहे की या महिन्यांमध्ये कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. किंवा एखादी नवीन खरेदी केली जात नाही. परंतु या महिन्यांमध्ये दानधर्माचे खूप महत्त्व सांगितले आहे. या महिन्यांमध्ये जावयाला वाण देण्याची प्रथा आहे. तेहतीस अनारसे तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटामध्ये घालून जावयाला हे वाण दिले जाते. त्यामुळे सर्व जावई वर्गासाठी अधिक मास हा अत्यंत लाभप्रद ठरतो. बऱ्याच जावयांना श्वशुरांच्या सांपत्तिक स्थितीनुसार भरपूर फायदा होतो.


सहस्त्र चंद्रदर्शन

अनेक वेळा तुमच्या आसपास तुम्ही तुमच्या परिचितांपैकी किंवा नातेवाईकांपैकी कोणाचातरी सहस्त्र चंद्रदर्शन विधी आहे हे ऐकले असेल किंवा तो पाहिलाही असेल. काय असतो हा सहस्रचंद्रदर्शन विधि. तर याचा सरळ अर्थ आहे की त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये 1000 पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमेचे चंद्र पाहिलेले आहेत. म्हणजेच 1000 पौर्णिमा त्यांनी अनुभवल्या आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून 1000 पौर्णिमा येऊन गेल्या त्यावेळी त्याचे वय किती असते. बघा. आपण सरळ सरळ असे म्हणूया की प्रत्येक वर्षी 12 पौर्णिमा असतात. म्हणजे 1000 ला आपण 12 ने भागले तर किती येते. 83 वर्ष आणि चार महिने. परंतु आपण असे ऐकले आहे की सहस्त्रचंद्रदर्शन हा विधी 81 वर्ष आणि एक महिना पूर्ण झाल्यानंतर होतो. आता हे कसे काय? 81 गुणिले बारा अधिक एक. किती होतात पहा. 81 गुणिले बारा हे 972 होतात. अधिक एक केल्यावर 973 होतात. 1000 होत नाहित. नाहीत मग उरलेल्या 27 पौर्णिमांचे काय. या कुठून आल्या. तर या पौर्णिमा आहेत अधिकमासाच्या. म्हणजे 81 भागिले तीन बरोबर 27. 81 वर्षांमध्ये 27 वेळा अधिक मास येतो. त्या अधिक मासाच्या 27 पौर्णिमा मिळवल्यानंतर 81 वर्ष व एक महिन्याने 1000 पौर्णिमा होतात आणि म्हणून मग सहस्रचंद्रदर्शन विधी हा 81 वर्ष आणि एक महिन्यांनी केला जातो. वा छान. चला. आता आपण थोडा अधिक मासाच्या गणिताचा भाग बघूया.


आपणा सर्वांना हे अत्यंत चांगल्या पद्धतीने माहितच आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरताना लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरते. आणि तिला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवसाचा कालावधी लागतो. सूर्य आपणास ज्या भासमान मार्गातून प्रवास करताना दिसतो, त्या मार्गा ला क्रांतीवृत्त असे म्हणतात. या क्रांतीवृत्ताचे 12 भाग केलेले आहेत. प्रत्येक भाग हा 30° चा आहे. त्यालाच आपण राशी असे म्हणतो. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन अशा या बारा राशी आहेत. पृथ्वीच्या गतीमुळे आपणास सूर्य एका राशीमध्ये एक महिना राहतो असे जाणवते. तो ज्यावेळेला एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो त्याला संक्रमण असे म्हणतात. वर्षभरामध्ये अशी बारा संक्रमणे होतात.


आता थोडा चंद्राचा विचार करूया.

चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला 29.5 दिवस लागतात. त्यामुळे पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी पूर्ण होईपर्यंत चंद्राच्या पृथ्वीभोवती 12 फेऱ्या पूर्ण होतात. पण चंद्राच्या या बारा फेऱ्यांना 365 दिवस लागत नाहीत तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या बारा फेऱ्यांना केवळ 29.5 X 12 म्हणजे 354 दिवस लागतात. त्यामुळे चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यामध्ये प्रत्येक वर्षी 11 दिवसाचा फरक पडतो. हा फरक आपण असाच चालू ठेवला तर आपले ऋतू, सण यांचा मेळ लागत नाही. यामध्ये बरीच तफावत येते. दरवर्षी पडणाऱ्या या अकरा दिवसाच्या फरकाचा आपण मुळीच विचार केला नाही तर दिवाळी उन्हाळ्यामध्ये येऊ शकते. पाडवा पावसाळ्यामध्ये येऊ शकतो. (मुस्लिम कालगणनेमध्ये केवळ चंद्राच्या गतीचा विचार केला जातो. त्यामुळे त्यांचे सण उदाहरणार्थ रमजान वेगवेगळ्या ऋतूमध्ये येतो हे आपणास माहित आहेच) अशा पद्धतीचे निसर्गाचे गणित बिघडू नये म्हणून वैदिक काळापासूनच अधिक महिन्याची योजना करून चांद्र वर्षांमध्ये एक जास्तीचा महिना मिळवून चांद्रवर्ष व सौरवर्ष यांची उत्कृष्ट पद्धतीने सांगड घातलेली आहे. म्हणजे ते वर्ष तेरा चांद्रमासाचे होते.


आता कोणत्या महिन्याला अधिक मास म्हणायचे ?

सूर्याचे राशी संक्रमण हे प्रत्येक सौर महिन्यात होते. तसेच ते चांद्रमासाच्या प्रत्येक महिन्यात पण व्हावयास पाहिजे. परंतु अकरा दिवसाच्या या फरकामुळे चांद्रमासाचा एखादा महिना असा येतो की त्या महिन्यांमध्ये सूर्य संक्रमण येत नाही. तो महिना अधिकमास धरला जातो. त्या महिन्याच्या नावा मागे अधिक हा शब्द जोडला जातो. त्या पुढच्या महिन्याला मग निज शब्द जोडून त्याच महिन्याचे नाव दिले जाते. यावर्षी आपण पाहिले तर आपणास असे लक्षात येते की ज्येष्ठ महिना हा अधिक महिना आहे. ज्येष्ठाच्या अगोदरचा महिना वैशाख आणि वैशाख अमावस्याला सूर्य मेष राशीतून वृषभ राशित प्रवेश करतो. नंतर अधिक जेष्ठ महिन्यात सूर्याचे संक्रमण नाही. पुढच्या निज जेष्ठ महिन्याच्या प्रतिपदेला सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करतो. आता इंग्रजी तारखा पहा. 16 मे रोजी वैशाख अमावस्या आहे. त्या दिवशी सूर्याचे संक्रमण मेष राशीतून वृषभ राशीत झालेले आहे. पुढे 16 जूनला निज जेष्ठ प्रतिपदा आहे. त्या दिवशी सूर्याचे संक्रमण वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये झालेले आहे. म्हणजे ज्या मराठी महिन्यांमध्ये किंवा चांद्रमासामध्ये सूर्य संक्रमण होत नाही, तो महिना अधिक मास धरला जातो. चैत्र ते कार्तिक या आठ महिन्यापैकीच कोणता तरी एक महिना अधिक असतो. मार्गशीर्ष पौष व माघ हे महिने कधीच अधिक येत नाहीत. चैत्र ज्येष्ठ व श्रावण हे 12 वर्षांनी तर आषाढ 18, भाद्रपद 24, अश्विन 141 व कार्तिक 700 वर्षांनी अधिक येतात.


क्षयमास

आता ज्याप्रमाणे अधिक मास असतो त्याप्रमाणे क्षयमाससुद्धा असतो. आपण पाहिले की ज्या चांद्रमासामध्ये सूर्याचे एकही राशी संक्रमण नसते तो महिना अधिक मास धरला जातो. पुढे कालचक्रा नुसार अनेक वर्षानी एखादा चांद्रमास असा येतो की त्या चांद्रमासामध्ये सूर्याची दोन राशी संक्रमण होतात. असे होते तेव्हा तो महिना क्षयमास म्हणून संबोधला जातो. ज्या वर्षी क्षयमास येतो त्यावर्षी निश्चितपणे अधिकमास सुद्धा असतो. ही स्थिती प्रत्येक 19 वर्षांनी व 141 वर्षांनी येते. क्षयमासाची परिस्थिती कशी निर्माण होते हे जाणून घेऊ. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना लंब वर्तुळाकृती कक्षेत फिरते. लंब वर्तुळाचे दोन केंद्रबिंदू असतात. त्यापैकी एका केंद्रबिंदूवरती सूर्य असतो. आता या लंबवर्तुळाचा जो दीर्घ व्यास आहे त्या व्यासावर आणि सूर्याच्या जवळ ज्या वेळेला पृथ्वी येते त्यावेळी तिचा वेग सरासरी वेगापेक्षा जास्त असतो आणि त्यामुळे अर्थातच सूर्याचा दोन राशी संक्रमणा मधील वेळ कमी होतो. परिणामतः एकाच चांद्र महिन्यात दोन वेळा सूर्याची राशी संक्रमण येतात. मार्गशीर्ष, पौष व माघ या चांद्रमासा दरम्यान पृथ्वी सूर्याच्या उपसूर्य बिंदू (पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेवरील सूर्यापासून जवळचा बिंदू) जवळ असते. त्यामुळे ह्या तीन चांद्रमासा दरम्यानच सूर्याची एका चांद्रमासात दोन राशी संक्रमण होतात आणि म्हणून क्षयमास हा या तीन चांद्रमासांपैकीच एक असतो.


चंद्राची गती, पृथ्वीची गती यामुळे अशा पद्धतीच्या खूप मनोरंजक घटना अनुभवायला मिळतात. घरी असलेल्या पंचांगामध्ये या संदर्भामध्ये माहिती दिलेली असते. तिथे तिथीची वृद्धी म्हणजे काय ? तिथीचा क्षय असतो म्हणजे काय होते ? योग म्हणजे काय? त्याशिवाय प्रत्येक दिवशी प्रत्येक तासाला पृथ्वीच्या पूर्वक्षितीजावर कोणती रास असते याचे कोष्टक सुद्धा पंचांगामध्ये दिलेले असते. त्याशिवाय कोणता ग्रह कोणत्या राशीमध्ये आहे. कोणत्या नक्षत्रात आहे. तो कधी एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणार आहे. इतकी माहिती पंचांगांमध्ये असते.


(लेखक नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथून सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आहेत.)

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page