top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

देशी मागूर संवर्धनातील आवश्यक बाबी - महेश शेटकार, मंगेश बिरादार

  • May 16, 2025
  • 4 min read

Updated: May 20, 2025

मागूर गोड्या पाण्यातील चवदार माशांपैकी एक आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, पंजाब, हरियाना आणि बिहार यांसारख्या अनेक राज्यांमधील ग्राहक इतर कोणत्याही माशांपेक्षा मागूर माशाला प्राधान्य देतात. हा मासा शिकारी (मांसाहारी) स्वभावाचा आहे. तो पाण्यातील विविध जलचर प्राणी खातो. चांगली मागणी आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करण्याची क्षमता यामुळे मत्स्यपालनासाठी निवडला जातो. मानवी आहारात एक पोषक व चविष्ठ अन्न म्हणून वापर केला जातो. या माशामध्ये सुमारे १५% प्रथिने, १.८% चरबी, ४.२०% कर्बोदके आणि ६.७०% लोहाचे प्रमाण असते. मासळीला भारतात जास्त मागणी आणि उच्च बाजार मूल्य आहे. गोड्या पाण्याच्या भागात देशी मागूर संवर्धनाला चांगली संधी आहे.


देशी मागूर (क्लॅरियस मागूर), ज्याला सामान्यतः वॉकिंग कॅटफिश म्हणून ओळखले जाते. मागूर हा मासा त्याच्या लांब मिशांमुळे कॅटफिश माशांमध्ये समाविष्ट होतो. देशी मागुर हा बिहार राज्याचा राज्य मासा आहे. मागूर गोड्या पाण्यातील चवदार माशांपैकी एक आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, पंजाब, हरियाना आणि बिहार यांसारख्या अनेक राज्यांमधील ग्राहक इतर कोणत्याही माशांपेक्षा मागूर माशाला प्राधान्य देतात. हा मासा शिकारी (मांसाहारी) स्वभावाचा आहे. तो पाण्यातील विविध जलचर प्राणी खातो. चांगली मागणी आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करण्याची क्षमता यामुळे मत्स्यपालनासाठी निवडला जातो. मानवी आहारात एक पोषक व चविष्ठ अन्न म्हणून वापर केला जातो. या माशामध्ये सुमारे १५% प्रथिने, १.८% चरबी, ४.२०% कर्बोदके आणि ६.७०% लोहाचे प्रमाण असते.

मासळीला भारतात जास्त मागणी आणि उच्च बाजार मूल्य आहे. गोड्या पाण्याच्या भागात देशी मागूर संवर्धनाला चांगली संधी आहे.

 

तलावाची बांधणी

तलाव शक्यतो आयताकृती असावा. शेतीचे क्षेत्रफळ हे १००० ते १०००० चौ.फू इतके असावे. तळ्याची खोली कमीत कमी दोन मिटर तरी असावी. ज्या बाजूने पाणी बाहेर काढणार आहात, तिकडे जमिनीस हलकासा उतार असावा. पाणी बाहेर सोडण्याच्या ठिकाणी बारीक मेशच्या जाळ्या असाव्यात, जेणेकरून पिल्लावळ बाहेर जाणार नाहीत. बाहेरच्या बाजूला सेटलिंग टॅंक आणि बायोफिल्टर टॅंक तयार केलेले असावेत. यामुळे वापरलेले पाणी पुन्हा वापरता येते किंवा हे खतयुक्त पाणी शेतीसाठी सुद्धा उपयुक्त ठरते. मासे बाहेर पडू नयेत म्हणून बांधाची उंची जास्त असावी. जैव सुरक्षेच्या दृष्टीने तलावाला पक्षीविरोधक जाळे लावणे अनिवार्य आहे. 

देशी मागूर संवर्ध नासाठी तलावाची बांधणी
देशी मागूर संवर्ध नासाठी तलावाची बांधणी

साठविल्या जाणाऱ्या बीजांचा आकार

तलावामध्ये ०. ३ ग्रॅमपेक्षा कमी आणि १ ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे बीज शक्यतो सोडू नये. त्याची साठवण्याची घनता हि: ८-१० नग प्रति चौ.मी. इतकी असावी. मे ते सप्टेंबर या कालावधीत देशी मागूर माशाचे खात्री लायक बीज सीफा (केंद्रीय गोड्यापाण्यातील मत्स्यसवंर्धन संस्था, भुवनेश्वर) केंद्रामध्ये उपलब्ध असते. त्याचबरोबर खाजगी मत्स्य बीज उत्पादन केंद्रावरून खरेदी करतांना तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच म्हणजेच, देशी मागूर (क्लॅरियस मागूर) हेच बीज आहे का ? हे तपासून पहावे.


देशी मागूर (क्लॅरियस बॅट्रॅकस)                                                           हायब्रीड थाई मागूर (क्लॅरियस गैरीपीनस)
देशी मागूर (क्लॅरियस बॅट्रॅकस) हायब्रीड थाई मागूर (क्लॅरियस गैरीपीनस)

पाणी व्यवस्थापन

माशांसाठी पाण्याचे गुणधर्म हे अत्यंत महत्त्वाचे असतात. पाण्याच्या गुणवत्तेवर मासळीची वाढ अवलंबून असते, त्यामुळे तलावातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असते. सर्वसाधारणपणे मत्स्यसंवर्धन तलावाची पाणी व्याप्त खोली १-१.५ मीटर असावी. यापेक्षा अधिक खोली असल्यास पाण्याचे व्यवस्थापन करण्याकरिता अडचण निर्माण होते. तापमान साधारणपणे २७ ते ३१ अंश सेल्सिअस असणे आवश्यक आहे.पाण्याचा सामू हा ७-८.५, विद्राव्य प्राणवायू हा ५-७ पीपीएम, पाण्याची क्षारता हि ०.१-०.५ पीपीएम, अल्कनिटी हि ५०-१५० मिलिग्रॅम प्रति लिटर, जडता ७५-२०० मिलिग्रॅम प्रति लिटर आणि अमोनिया ०.१ पेक्षा कमी असे अत्यंत आवश्यक आहे. पाणी खूप हिरवट व वास येत असल्यास संवर्धनास अयोग्य असते.


खाद्य व्यवस्थापन

साधारणपणे एक महिन्यापर्यंत बोटुकली आकारची मागूर मासे हे प्लवंकावरती वरती पूर्णतः अवलंबून असतात, मात्र मागूर मांसाहारी असल्यामुळे पूरक खाद्य देणे भाग पडते. त्यासाठी गोड्या पाण्यातील लहान-लहान ताज्या माशांचा खाद्य म्हणून समावेश करावा .अशा माशांची भुकटी तयार करून माशांना खाण्यासाठी दिली जाते . कोंबडी किंवा प्राण्यांपासून मिळणारे ताजे मांस टाकले असता, माशांना चांगल्या प्रतीची प्रथिने मिळतात. काहीवेळेस गांडूळाचे लहान-लहान तुकडे करून तलावात टाकावेत जेणेकरून माशांना चांगला फायदा होईल.त्याचबरोबर पेलेटेड फीडचा सुद्धा वापर करू शकतो. या माश्यांच्या आहारात ३०-३५ % प्रथिने असणे गरजेचे आहे. खाद्य देत असताना पाण्याची गुणवत्ता खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

 

माशांची वाढ

मागूर हा ९-१२ महिन्यांच्या संवर्धनानंतर १००-१५० ग्रॅम वजनाचा होतो. तलावातील पूर्ण पाणी काढूनच मागूर मासे पकडावेत. कारण थोडेजरी पाणी शिल्लक असेल तर पकडण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. १००+ वजनाच्या मागूर माशाला बाजारात चांगला भाव मिळतो. या माशाची चव व जिवंत राहण्यामुळे, भारतीय बाजारात हा मासा ४०० ते ८०० रु प्रति किलो प्रमाणे विकला जातो. हा मासा जिवंत मासळी विक्री केंद्रात मोठ्या प्रमाणावर विकला जातो. १००० चौ.फू तलावातून ६० ते ७० किलो उत्पादन मिळवले जाऊ शकते, ज्यामुळे ३५०००/-रु. ते ४००००/-रु इतकी आमदनी मिळवता येते.

 

भारतात विदेशी थाई मागूरवर बंदी का ?

आशिया खंड आणि प्रामुख्याने भारतात मागूर ही मत्स्य प्रजात खूप प्रसिद्ध आहे. देशी मागूर (क्लॅरियस मागूर) व हायब्रीड थाई मागूर (क्लॅरियस गैरीपीनस) या दोन प्रकाराच्या माशांचे भारतात संवर्धन आणि विक्री केली जाते. परंतु विदेशी थाई मागूर मासा मानवी आरोग्यासाठी हानिकारक असून तो दिसायला देशी माशासारखाच दिसतो, त्यामुळे देशी आणि विदेशी थाई मागूर माशांतील फरक ओळखणे आवश्यक आहे. विदेशी थाईमागुर १९८९ च्या अखेरीस थायलंड येथून बांगलादेशामध्ये आणण्यात आला. त्यानंतर बांगलादेशमधून हा मासा अनधिकृतरीत्या भारतात दाखल झाला. २००० च्या सुमारास केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मासेमारी विभागातर्फे विदेशी थाई मागूर माशाचे प्रजनन, मत्स्यपालन, वाहतूक व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे कारण,

१.     थाई मागूर पूर्णतः मांसाहारी असून पाण्यातील नैसर्गिक व जलीय परिसंस्था आणि तेथील जैवविविधतेसाठी अत्यंत घातक आहे.

२.    या माशाच्या खाद्यपद्धतीमुळे हा मासा नैसर्गिक परिसंस्थेमध्ये असलेल्या इतर स्वदेशी माशांकरिता हानिकारक ठरत आहे.

३.     अनेक शास्त्रीय अभ्यासांतून असे निदर्शनास आलेले आहे, की विदेशी मागूर माशाचे सेवन हे शरीराकरिता हानिकारक आहे.

४.    हा मासा कमी खर्चात मोठ्या प्रमाणात उत्पन्न देत असल्याने या माशांच्या संवर्धनासाठी अनधिकृत पध्दती वापरल्याचे दिसून येते.

५.    या माशांमुळे देशी प्रजाती लुप्त होताना दिसत आहेत.

६.    माशाच्या मांसात अनेकदा जड धातू जसे झिंक, कॅडमिअम आणि आर्सेनिक इत्यादीचे संक्रमणसुद्धा आढळून आलेले आहे. हे धातू मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत.

 

(लेखक मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे पदव्युत्तर पदवी विद्यार्थी आहेत.)

 



 

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page