top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

कोरा कागद..काळी शाई…

  • Apr 12
  • 7 min read

अनिता जोशी


आज मुद्रण तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे लिहिणे, छापणे अगदी सहज आणि सोपे झाले असले, तरी पूर्वी लेखन ही एक अत्यंत कष्टसाध्य प्रक्रिया होती. हस्तलिखिते लिहिताना केवळ अक्षरे उतरवणेच नव्हे, तर कागद तयार करणे, शाई बनवणे आणि लेखनासाठी आवश्यक साधनांची तयारीसुद्धा करावी लागत असे. या साऱ्या प्रक्रियांचा मागोवा घेणारा, लेखनाच्या प्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे.

भावनांच्या अभिव्यक्तीचे साधन म्हणजे शब्द. तीच वैखरी, तिचे चित्रांकन म्हणजे लिपी, आपण उच्चारलेला मजकूर दीर्घकाळ टिकावा या उद्देशाने मानवाने शब्द हे लिपी बद्ध केले. त्या लेखनाचे साहित्य हे काळ, स्थळ आणि उद्देश यानुसार भिन्न भिन्न आहेत. भटक्या मानवाने गुहेत चित्र काढली, राजा आणि व्यापारीनी शिलालेख कोरले. चिरकाल टिकणे हा जरी शिलालेखांचा गुणधर्म असला तरी तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येत नाही त्यामुळे तुलनेने वजनास हलके असे ताम्रपत्र कोरले गेले तर साहित्य लिखाणासाठी ताडपत्र, भूर्जपत्र, कागद उपयोगात आणले. पाश्चात्य देशात प्राणीजन्य पदार्थ वापरले गेले. भारतातील बहुतांश लिखाण धार्मिक स्वरूपाचे असल्याने प्राणीजन्य पदार्थ टाळले असावेत किंवा प्राणीजन्य पदार्थ जास्त काळ टिकवण्याचे वातावरण भारतात नाही. प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून आपण पूर्वीच्या काळी कागद व शाई कशी तयार करत होते आणि ते खराब होताना वातावरणाचा त्यावर कसा परिणाम होतो याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात.

उच्चारण शुद्धतेसाठी वैदिकांनी मौखिक परंपरा श्रेष्ठ मानली, यावरून पाश्च्यात्यांनी भारतीयांना लेखन कला अवगत नव्हती अशी टीका केली. वैदिक साहित्य हे जगातील आज उपलब्ध असणारे प्राचीनतम साहित्य आहे. इतकी वर्ष प्रवाहीपणे ते पुढे आले त्याचे कारण म्हणजे मौखिक परंपरा. आज भारतात गावोगावी चारशे-पाचशेवर्षा पूर्वीचे हस्तलिखित ग्रंथ सुरक्षित आहेत, इतकी वर्ष होऊनही ते कसे टिकले याचे कारण म्हणजे त्याची बनावट, आणि ग्रंथाप्रति असलेली श्रद्धा.


कागद

दीडशे वर्षा पूर्वीपर्यंत कागद हा हाताने बनवला जायचा, तंत्रज्ञानाचा शोध लागल्यावर तो मशीनवर बनवला जाऊ लागला. कागदा त सेल्युलोज, लीग्निन व पेक्टिन हे तीन मुख्य घटक असतात. सेल्युलोज म्हणजे मजबूत तंतू, लीग्निन म्हणजे तुलनेने मऊ तंतू, तर पेक्टिन म्हणजे डिंकासारखा पदार्थ , यामुळे सगळे घटक एकत्र रहातात. हातकागद आणि यांत्रिक कागद यात घटक सारखेच असलेतरी हातकागद हा जास्त काळ टिकतो.


हातकागद – हातकागद बनवतांना वनस्पतीची पानं, कापूस, जुना हातकागद पाण्यात भिजवतात. त्याच पाण्यात हिरडा, बेहडा आदी औषधी फळ घातली जातात. या सगळ्याचा चांगला लगदा तयार होतो, तो लगदा कुटून पुन्हा भिजवला जातो, लगदा एकजीव होईपर्यंत हि प्रक्रिया केली जाते. शेवटी हा सगळा लगदा मोठ्या हौदात पाण्यात विरघळवून बारीक छिद्राच्या चाळणीने जमिनीला समांतर वर उचलला जातो. हि चाळणी सावलीत वाळवली जाते, वाळल्यावर पापुद्रा सुटा होतो त्याला सायझिंग करून तो लिहिण्यायोग्य केला जातो. काहीसा मळकट रंग याचा असतो.


यांत्रिक कागद – रसायनशास्त्रात जशी प्रगती झाली, विद्रावक द्रव्य सापडत गेली तसं कागद बनवण्याच्या प्रक्रियेत वेग आला. यंत्रावर हि क्रिया जलद होऊ लागली आणी कागद मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागला. यांत्रिक कागद बनवतांना झाडाच्या फांद्या, खोडाचे मजबूत लाकूड आदी कच्चा माल रासायनिक पाचकांमध्ये भिजवला जातो. हॉट अल्कली (Na2OH3) हे प्रमुख पाचक द्रव्य. या रसायनांमुळे मजबूत असलेले लाकूड विरघळते आणि मळकट रंगाचा लगदा तयार होतो. हा लगदा पांढराशुभ्र करण्यासाठी त्यावर क्लोरीन वायू सोडला जातो, तो लिहिण्यायोग्य होण्यासाठी पिष्टमय पदार्थ , तुरटी, पोटॅश आदी पदार्थ घातले जातात, आवश्यकतेनुसार रंग घालतात. हा लगदा एकजीव करून त्यातील अतिरिक्त पाण्याचा अंश काढला जातो त्यानंतर तो लगदा रोलर वरून फिरवला जातो, फिरत असतांनाच तो वाळवनू त्याच्या गुंडाळ्या केल्या जातात.


हातकागद हा यांत्रिक कागदापेक्षा जास्त टिकण्याचे कारण - हातकागदा त झाडाची पाने असतात तर यांत्रिक कागदा त खोडाचा भाग जास्त असतो. झाडाच्या पानांत सेल्युलोजचे तंतू खोडाच्या तुलनेत अधिक असतात. यांत्रिक कागदात सेल्युलोजचे तंतू तुटतात, रसायनांमुळे लीग्निन ची हानी होते, हातकागदा त ते कायम रहातात. यांत्रिक कागद बनवतांना त्यावर क्लोरीन वायू सोडतात त्यामुळे तो शुभ्र होतो, त्या क्लोरीनचा हवेतील बाष्पाशी संयोग होऊन हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते त्यामुळे कागद झडण्यास सुरवात होते, तसेच तो पिवळा पडतो. हातकागदातील तंतू विस्कळीत पसरलेले असतात त्यामुळे तो सहज फाटत नाही किंवा फाडता येते नाही तर यांत्रिक कागदात तंतू रोलरमुळे एकाच दिशेने फिरवले जातात त्यामुळे त्या दिशेने कागद फाटतो किंवा फाडला जाऊ शकतो. या कारणामुळे जे महत्वाचे कागदपत्र जास्त काळ टिकवण्याची इच्छा असेल त्यासाठी आपण हातकागद वापरण्यास आग्रही असायला हवे.


काळी शाई

परंपरागत शाई बनवण्याच्या पद्धती स्थानपरत्वे निरनिराळ्या आहेत. प्रामुख्याने काजळी/ कोळसा आणि तेल - डिंक हे त्यातील मुख्य घटक. साधारणतः सर्वत्र आढळणारी पद्धत म्हणजे तिळाच्या तेलाची काजळी तांब्याच्या पत्र्यावर गोळा करून त्यात आवश्यकतनुसार डिंक व पाणी घालनू घोटून-घोटून शाई तयार करत असत. दुसऱ्या एका पद्धतीनुसार बाजरीचे कणीस किंवा हिरडा/बेहडा हे जाळून त्याच्या कोळश्याची वस्त्रगाळ भुकटी डिंकात आणि तिळाच्या तेलात घोटून शाई तयार केली जात असे. याबरोबरच लोखंडाचे क्षार मिसळलेली शाई देखील काहीवेळा आढळते, परंतु ती जड असल्याने त्या शाईने लिहिलेला कागद मजकुरावर विरलेला आढळतो, या शाईचा वापर क्वचितच सापडतो. काजळी घोटतांना त्यात डिंक कमी आणि पाणी जास्त असले तर त्या शाईनी लिहिलेला मजकूर हवेतील आर्द्रतेने किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यावर पसरलेला आढळतो. त्यातुलनेत कोळश्याच्या पुडीपासून बनवलेल्या घट्ट शाईने लिहिलेला मजकूर पाण्याच्या संपर्कात आल्यावरही तसाच राहिलेला आढळतो.


विविध रंग

जुन्या ग्रंथात वैदिक मंत्रांचे स्वर, समास आणि चित्र यासाठी काळ्याशाई व्यतिरिक्त काही रंगांचा उपयोग केला जात असे ते रंग खनिजांपासून मिळवलेले असत. लाल रंगासाठी अळीता, लाख, शेंदूर, हिंगुळ, पिवळ्या रंगासाठी हरताळ, निळ्या रंगासाठी नीळ, भुऱ्या रंगासाठी गेरू, हिरव्या रंगासाठी तांब्याच्या पत्र्यावरील कळंक, पांढऱ्या रंगासाठी शंख, चुनखडी, जस्ताचा क्षार, चंदेरी रंगासाठी चांदीचा रंग अथवा वर्ख, कथिल, सोनेरी रंगासाठी सोन्याचा रंग अथवा वर्ख या सगळ्यात आवश्यकतेनुसार पाणी व डिंक घालून उपयोगात आणत. शाई बनवतांना हिरडा/बेहडा आदी औषधी वनस्पतींचा आणि खनिज द्रव्यांचा रंगासाठी केलेला उपयोग यांचा वर्षानुवर्ष वातावरणातील धुळीशी संपर्क होऊन काही रासायनिक प्रक्रिया होत असतात त्याचा परिमाण ते हाताळणाऱ्याच्या आरोग्यावर होऊ शकतो म्हणून हस्तलिखिते हाताळतांना काळजी घेणे आवश्यक आहे.

कागद, शाई कशी तयार होते हे समजून घेतल्यावर ते खराब का होतात याची कारण बघुयात. कागद खराब होण्यास काही अंतर्गत तर काही बाह्य घटक जबाबदार असतात. अंतर्गत घटकामुळे झालेले नुकसान भरून काढणे किंवा होणारे नुकसान टाळणे बऱ्याच अंशी टाळणे अशक्य असते. तर बाह्यघटकामुळे झालेले नुकसान भरून काढणे किंवा होणारे नुकसान टाळणे बऱ्याच अंशी शक्य असते.


अंतर्गत घटक

काही ग्रंथातील रंग आणि शाई आम्लीय असतात तर काही कागद-शाईच्या बनावटीत त्रुटी असतात.

रंग – आम्लीय रंग आणि बाह्य घटक यांची रासायनिक प्रकिया होऊन ग्रंथाचे नुकसान होते.

शाई – लोखंडाचा क्षार असलेल्या शाईमुळे कागद अक्षरावर फाटतो. पाण्याचा अंश असलेल्या शाईने लिहिलेला ग्रंथ पाण्याच्या संपर्कात आल्यावर त्यावरची शाई पसरते, आणि मजकूर कळत नाही. काही शाई कालांतराने पूसट होतात. कागद बनवण्याच्या प्रक्रियेत तो पांढरा स्वच्छ दिसावा यासाठी त्यावर क्लोरीन वायू सोडला जातो. त्या क्लोरीनचा वातावरणातील घटकांशी संपर्क आल्यावर रासायनिक प्रक्रिया सुरु होते आणि कागदाचे नुकसान होते.


बाह्य घटक

यात धूळ आणि हवेतील प्रदूषके, प्रकाश, तापमान आणि सापेक्ष आर्द्रता, कीटक, बुरशी यांचा समावेश होतो.

धूळ आणि हवेतील प्रदूषके - उन्हाच्या कवडशात दिसणाऱ्या तरंगत्या कणांना धूळ असे म्हणतात. या धुळीच्या कणात धातूंची संयुगे, काजळी, बाष्प सेंद्रिय पदार्थ आणि बुरशीचे बीज, तांब /लोखंड / मँगेनिझ इत्यादी धातूची संयुगे हे घटक असतात. हवेतील प्रदूषकांमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बनडायऑक्साईड, सल्फरडायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, अमोनिया आणि क्लोरीन हे वायू असतात. याशिवाय अनेक विषारी रसायने हवेतील काजळीत सामावलेली असतात.

प्रकाश - सूर्य आणि दिवे हे प्रकाशाचे स्रोत आहेत. या प्रकाशात अल्फा, बीटा, गॅमा, इम्फ्रारेड आणि अल्ट्राव्हॉइलेट हे किरण असतात. लक्स (LUX) या एककात प्रकाश मोजला जातो. ४० लक्सपेक्षा जास्त प्रकाशात ग्रंथ राहु नयेत असा या शास्त्राचा दंडक आहे.

तापमान – उष्णतेचे माप म्हणजे तापमान. ते तापमापाकाच्या सहाय्याने सेंटीग्रेड अथवा फॅरनहाइट या एककात मोजले जाते. २० ते २५ सेल्सिअस इतके तापमान ग्रंथ संरक्षणासाठी आदर्श मानले जाते. यात सावकाश होणारी वाढ अथवा घट फारशी हानिकारक नसते, मात्र अचानकपणे बदल टाळणे आवश्यक आहे.

सापेक्ष आर्द्रता – हवेच्या विशिष्ट आकारमानामध्ये विशिष्ट तापमानाला असणारी आर्द्रता आणि तेवढ्याच हवेमध्ये त्याच तापमानाला राहु शकणारी अधिकतम आर्द्रता म्हणजेच त्या तापमानाला तेवढी हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणारी आर्द्रता यांची तुलना म्हणजे सापेक्ष आर्द्रता. हस्तलिखितांकरिता हवेतील सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण ४० ते ४५ % असणे आदर्श असते.

कीटक – कीटकांना रहाण्यासाठी आणि आपले अन्न मिळवण्यासाठी उबदार जागेची गरज असते. कीटकांच्या अळ्या हस्तलिखितांची पाने, पुठ्ठे इत्यादींपासून अन्न मिळवतात, उबदार जागेची त्यांची गरजही येथे पूर्ण होते, परंतु त्यांचे पोषण म्हणजे ग्रंथाची हानी. यांत कसर, वाळवी, भुंगे, झुरळे आणि इतर काही लाकूड पोखरणारे, कागद खाणारे किडे यांचा समावेश असतो.

बुरशी – अंधाऱ्या कुबट हवेत बुरशीची वाढ होते. हवेतील आर्द्रता ही बुरशीची वाढ करण्यास कारणीभूत ठरते.


या सगळ्या बाह्य घटकांचा परिणाम - हवेतील आर्द्रतेशी सल्फर-डाय-ऑक्साईडचा संपर्क होऊन सल्फ्युरिक आम्ल म्हणजे H2SO4 तयार होते. या आम्लाशी धुळीतील लोखंड तांबे इत्यादी धातूंचा संयोग होऊन कागदावर गंजासारखा थर तयार होतो. कागदाचा सल्फ्युरिक आम्लाशी संपर्क आल्याने कागदाचे रासायनिक विघटन होते. धुळीतल्या धातूंशी हायड्रोजन सल्फाइडचा संयोग होऊन क्षार तयार होतात आणि कागदातल्या सेल्युलोजचे रासायनिक विघटन होते. अमोनिया वायू आर्द्रता शोषून घेतो आणि ती साठवून ठेवतो. या वायूचे हवेतील प्रमाण अधिक असल्यास त्या ठिकाणच्या हवेतील प्रमाण अधिक असल्यास त्या ठिकाणच्या आर्द्रतेचे प्रमाण वाढते आणि त्याबरोबर हवेची रासायनिक क्रियाशीलताही वाढते. क्लोरीन वायूचा हवेतील आर्द्रतेशी संयोग होऊन हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होऊन ते कागदाचे विघटन घडवते. हवेतील काजळी ही आम्लशोषक असते. ती विशेषतः सल्फ्युरिक आम्ल शोषून स्वतःमध्ये साठवते. प्रकाशातील अल्फा, बीटा, गॅमा, इम्फ्रारेड आणि अल्ट्राव्हॉइलेट या किरणांमुळे शाई आणि रंग फिकट होतात. इम्फ्रारेड आणि अल्ट्राव्हॉइलेट किरण उष्ण असतात. त्यांच्या संपर्कामुळे कागद कोरडा होऊन त्यातील सेल्युलोजच्या साखळ्या खंडित होतात. परिणामी ते वाकडे होतात, फाटतात अथवा विरतात. अधिक प्रकाशात उष्णतेमुळे अनेक रासायनिक क्रियांची साखळी सुरु होते अथवा तिला बळ मिळते. वाढणाऱ्या तापमानाबरोबर कागद, हवा, फर्निचर इत्यादी घटक सुक्ष्म प्रमाणात प्रसारण पावतात तर घटणाऱ्या तापमानाबरोबर त्यांचे आकुंचन होते. अधिक तापमानामध्ये कागदातील आर्द्रता कमी होऊन ते ठिसूळ बनतात. तापमान कमी असतांना आर्द्रता कमी असली तरी परिणाम घडू शकतो. तापमान वाढले की रासायनिक प्रक्रियांना उर्जा मिळून त्यांचा वेग वाढतो. उबदार वातावरणात कीटक आणि बुरशी यांची वाढ जलद गतीने होते. कसर हा चंदेरी रंगाचा कीटक कागदाचे वरचे पापुद्रे खातो त्यामुळे कागदावरील मजकूर निघून जातो. वाळवी हे पांढऱ्या रंगाचे कीटक मातीचे बोगदे बांधून त्यातून प्रवास करतात. यांना मोकळी हवा, सूर्यप्रकाश यांचे वावडे असते. हे कीटक पुस्तकाची पाने, लाकूड इत्यादी खातात. भंगुरेे अनेक प्रकारचे असतात. कागद गुळगुळीत करण्यासाठी वापरली जाणारी द्रव्ये ते खातात. हस्तलिखितांना बांधलेल्या कापडाची खळ, पुस्तकाच्या बांधणीत वापरला गेलेला डिंक अथवा सरस हे पदार्थ झुरळे खातात. पुस्तकाची बांधणी फाडतात. बुरशीमुळे कागदावर डाग पडतात, तसेच ती कागदातील आर्द्रता शोषून घेते.


मानवी निष्काळजीपणा

ग्रंथ हाताळणे, एकाठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाणे, ठेवणे या मानवी क्रियांमध्ये अव्यवस्थितपणा असल्यास नुकसान होते. हल्ली कागदाचे रक्षण म्हणजे प्लॅस्टिक लॅमिनेशन करणे अशी एक पद्धत रूढ झाली आहे, ते कधीही करु नये. कारण कागद आणि प्लॅस्टिक यांचे गुणधर्म भिन्न आहेत. कागद हा नैसर्गिक घटकांपासून बनवलेला असतो तर प्लॅस्टिक हे कृत्रिम घटकांपासून बनवलेले असते. त्यांच्या मजबुतीतही फरक असतो. वातावरणातील बाह्यघटकांचा प्लॅस्टिकवर परिणाम होतो आणि हस्तलिखिताचे नुकसान होते. आज मुद्रण आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे लिहिणे व वाचणे खूप सोपे झाले आहे. मात्र पूर्वी लेखन ही अत्यंत कष्टसाध्य प्रक्रिया होती. हस्तलिखिते लिहिताना फक्त अक्षरे उतरवायची नसत; कागद तयार करणे, शाई बनवणे आणि लेखनासाठी लागणारी साधने तयार करावी लागत. या मोठ्या मेहनतीतूनच आपली ज्ञानपरंपरा घडत गेली. ही हस्तलिखिते म्हणजे केवळ जुने कागद नाहीत, तर आपल्या इतिहासाची आणि विचारांची सजीव साक्ष आहेत. त्यामुळे त्यांचे जतन आणि अभ्यास करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आधुनिक साधनांचा वापर करताना या अमूल्य वारशाचे महत्त्व विसरू नये, इतकेच या लेखामागचे उद्दिष्ट आहे.


(लेखिका हस्तलिखित जतनकार असून राष्ट्रीय पांडुलिपी मिशन साठी २००५ पासून कार्यरत आहेत.)

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page