कथा 84 mm LWL च्या निर्मितीची
- Aug 17, 2025
- 8 min read
श्री. काशीनाथ देवधर
१९९९ मधील कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर DRDO मध्ये ८४ मिमी हलक्या वजनाच्या रॉकेट लाँचरची (LWL) निर्मिती करण्यात आली. युद्धाच्या गरजेनुसार तातडीने विकसित केलेली ही शस्त्रप्रणाली प्रत्यक्ष युद्धात वापरली गेली आणि ती पूर्णतः स्वदेशी, हलकी व कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले. पुढे या तोफेच्या यशस्वी चाचण्या, उत्पादन तंत्रज्ञान हस्तांतरण आणि भारतीय लष्करातील स्वीकार झाला.

कारगिल युद्धात सहभाग १९९९ साली भारताचे तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आदेशानुसार भारतीय सैन्याने आपल्या जितक्या चौक्या पाकिस्तानने काबीज केल्या होत्या त्या सर्वांवर भारतीय लष्कराने पुन्हा ताबा मिळविला. दिनांक 26 जुलै 1999 रोजी संपूर्ण विजय प्राप्त केला. युद्धाच्या दरम्यान डीआरडीओचे तत्कालीन प्रमुख डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी दूरभाष वरून 84 एमएम एलडब्लूएलच्या सद्य:स्थितीबद्दल विचारणा केली. “दोन शस्त्रे सिद्ध आहेत, मात्र त्याच्या केवळ प्राथमिक चाचण्याच झाल्या आहेत, अन्य सर्व चाचण्या, सर्व खडतर परिस्थितीतील चाचण्या (Qualification Tests) व्हायच्या आहेत” असे मी सांगितले. यावर डॉ. कलामांनी मला माझ्या आत्मविश्वास पातळीवर प्रश्न विचारला, तेव्हा “मला पूर्ण विश्वास आहे की ही शस्त्रे अगदी योग्य ती कामगिरी करतीलच”. माझा आत्मविश्वास पाहून डॉ. कलाम म्हणाले, “शस्त्रे तयार आहेत ना, मग झालं तर, चाचण्या आता सरळ पाकिस्तान विरूद्धच घेऊ. शस्त्रे पाठवून द्या.” मग आम्ही युद्धपातळीवर दोन 84 एमएम एलडब्लूएल शस्त्रे मी स्वतः दिल्लीला घेऊन गेलो. शस्त्राची पूर्ण माहिती, प्रदर्शन, त्या शस्त्राची तांत्रिक माहिती, गुणधर्म, त्याबद्दलचे शंकानिरसन, फायदे-तोटे व सुरक्षा संबंधीची काय करावे, काय करू नये ही माहिती प्रथम डीआरडीओच्या मुख्यालयात मुख्य नियंत्रक श्री. पी. यु. देशपांडे नंतर डीआरडीओचे चेअरमन डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम व त्यानंतर सेना मुख्यालयात तत्कालिन सेनाध्यक्ष जनरल व्ही. पी. मलिक यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार उधमपूर येथे आर्मी कमांडर ले.ज.एच. एम. खन्ना (उत्तर कमांड) यांच्याकडे शस्त्रे सुपूर्त केली. त्याचा प्रत्यक्ष उपयोग द्रास-कारगिलच्या युध्दात पाकिस्तानी सैनिकांविरूद्ध केला गेला. 4 एमएम आरएल एम-2 ही स्वीडनची शस्त्रे 1982 पासून भारतीय सैन्य वापरत होते. मात्र ती प्रणाली 26.5 किलोग्रॅम वजनाची होती. आम्ही कोणतीही क्षमता कमी होऊ न देता त्याचे वजन 13.5 ते 14 किलोग्रॅम केले होते. उच्च पर्वतीय युद्ध प्रणालीमध्ये जवळपास निम्मे वजन केल्यामुळे सैनिक सहजतेने ते हाताळू शकत. चार जास्तीचे तोफगोळे नेणे शक्य असल्याने त्यांची कार्यक्षता व मारकक्षमतेत वाढ झाली. त्याचा चांगला उपयोग प्रत्यक्ष युद्धात पाकिस्तान विरोधात झाल्याने कारगिल युद्धात अप्रत्यक्षपणे आपले योगदान दिल्याचा आनंद झाला. अशी पूर्ण चाचण्यांच्या आधीच कारगिल युद्धात जी तोफ पाकिस्तान विरुद्ध वापरली त्या 84 मिमि एल डब्लू एल तोफेच्या निर्मितीचीच कथा आपण पाहू.
प्रस्तावना व पार्श्वभूमी

1996 मध्ये तत्कालीन सेना अध्यक्ष जनरल शंकर रॉय चौधरी यांनी आयुध अनुसंधान तथा विकास संस्थापन, अर्थात एआरडीई पुणे या माझ्या कार्यालयास भेट दिली. तेव्हा आम्ही विकसित केलेल्या व करत असलेल्या विविध शस्त्रास्त्रांची सविस्तर माहिती दृकश्राव्य माध्यमाद्वारे संमेलन कक्षा मध्ये, प्रदर्शन कक्षा मध्ये विदित केली. त्यानंतर पाषाण रेंज येथे काही लहान शस्त्रास्त्रांच्या फायरींगचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यावेळी त्यांनी एआरडीईचे निर्देशक डॉक्टर सुदर्शन कुमार सलवान यांचेकडे सूचना केली की वजनाला हलके 84 mm रॉकेट लाँचर अत्यंत तातडीने आम्हास हवे आहे, तर एआरडीई ने ते बनवून द्यावे. माझे भाग्य असे की त्याची जबाबदारी माझ्याकडे दिली गेली. ‘फिल्ड गन ग्रुप’ ने अभ्यास करून अत्याधुनिक व अद्ययावत भारतीय तंत्रज्ञान विकसित केले. स्वदेशी बनावटीचे शस्त्र केवळ दोन वर्षांत अभिकल्पन व विकास (Design & Development) करून क्षमतांमध्ये कोणतीही तडजोड न करता हलक्या वजनाचे बनविले. देशात प्रथमच कार्बन कंपोझिट तंत्रज्ञान तोफनळीसाठी विकसित केले होते. हे शस्त्र धक्कारहित तोफ या संकल्पनेवर आधारित आहे. या शस्त्रातून सध्या उपलब्ध असणारे व नवीन येऊ घातलेले सर्व प्रकारचे तोफगोळे डागता येतील. जवानाच्या खांद्यावरून फायर करायचे असल्याने जवानांची जीवाची सुरक्षा (safety) आणि विश्वासार्हता (reliability) राखण्यास परमोच्च स्थान दिले.
शस्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये
या आवश्यक शस्त्राची अपेक्षित प्रमुख वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:
जवानास सहज हाताळता येणे (Man Portable)
खांद्यावरून फायर करू शकणे (Shoulder Fired)
रणगाडा व बंकर वि रोधी (Anti-tank & Antibunker)
वजनाला हलके (Light Weight Gun)
या सर्व शस्त्र वि कसनामध्ये इतक्या कमी वेळात देशात पहिल्यांदाच सर्वात महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित केले गेली ते म्हणजे कंपोझिट गन बॅरल. कंपोझिट गन बॅरल एक आदिप्रारूप एकक बनवून पहिली चाचणी प्रत्यक्ष चार TPT (Target Practice Tracer) तोफगोळे फायर करून यशस्वी झाली.
तोफेची पहिलीच फायरींग चाचणी

पहिल्याच बॅरलच्या पहिल्याच फायरींग चाचणीत तोफेचा प्रतिसाद उत्तम मिळाला आणि फायरयंत्रणा खूपच छान झाली असल्याने Misfire चा दोष आला नाही. मात्र दुसरा दोष Hard Extraction यामध्ये आढळून आला. मग तो दोष पहिल्या चाचणीच्या चारही तोफगोळ्यांच्या फायरींगच्या वेळी दिसून आला. तो घालवणे साठी फायबर ओरीएंटेशन हे अधिक स्ट्रेसच्या दिशेला करून या समस्यांचे निराकरण केले. पुढील बॅरल फायर चाचणी मध्ये दोषरहित झाले व यशस्वी झाले. त्यानंतर अनेक चाचण्या होऊन त्याची गुणवत्ता सिध्द केली. त्याप्रमाणे सर्व आरेखन व गुणवत्ता योजना, चाचणी वेळापत्रक आणि स्वीकृती योजना निश्चित करून त्याप्रमाणे पाच प्रारूप (Prototype) तोफा बनविल्या. या तोफांवर सर्व प्रकारच्या विकास चाचण्या केल्या. त्यानंतर एकाच दिवशी शंभर सराव तोफगोळे म्हणजेच 84 mm TPT फायर करून त्याची खूप जास्ती तोफगोळे कमी वेळेत फायर करण्याची चाचणी यशस्वी झाली. अशाप्रकारे सर्व R& D चाचण्या यशस्वी झाल्यावर भारतीय सैन्य दलाच्या ‘General Staff - WE Branch’ ला सूचना दिली.

जून 1999 मध्ये अत्यंत कमी वेळात दोन 84 mm LWL तोफा बनवून सर्व प्रकारच्या गुणवत्ता चाचण्या यशस्वी करून त्या उधमपूर येथिल सैन्य दलाच्या उत्तर कमांड येथे नेऊन दिल्या, तसेच या तोफची वैशिष्ट्ये, ते चालवण्यासाठी आवश्यक सूचना, सुरक्षेसंबंधी घ्यावयाची काळजी आणि जवानांच्या शंकांचे समाधान करून तेथे जवानांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. त्यावेळी कारगिल येथील पाकिस्तान विरूध्द अघोषित युध्द सुरू होते तिथे प्रत्यक्ष युद्धात तोफांचा चांगला उपयोग झाला. त्या दरम्यानच उंच पर्वत रांगांमध्ये उपयोग करायला सोपे व अतिशय चांगले, हाताळायला सहज सुलभ आहे हे पायदळाच्या जवानांनी सांगि तले. तसे भूसेनेचे पत्र मिळाले.
केवळ शस्त्र वजनाला हलके असल्याने खालील फायदे प्रामुख्याने उच्च पर्वतीय युध्दभूमीवर वापरताना लक्षात आले, ते असे-
जवानांची युध्दभूमीवरील हालचालींची गति मानता (mobility) वाढली.
शस्त्रप्रणालींचे मृतवजन (dead weight) कमी झाल्याने जास्तीचे चार तोफगोळे वाहून नेण्याची जवानाची क्षमता वाढली.
जास्तीच्या तोफगोळ्यांमुळे त्याची फायर पॉवर वाढली त्यामुळे जवानांचे मनोधैर्य वाढले.
जवानाचे शारिरीक ताणतणाव कमी झाले त्यामुळे कार्यक्षमता वाढली.
कार्य संपल्यानंतर परतीचा मार्ग सुकरतेने व जलद करणे शक्य झाले.
कारगिल युध्द समाप्तीनंतर फेब्रुवारी 2000 मध्ये भारतीय सैन्यदलाच्या शस्त्रविभागाचे प्रमुख उपमहासंचालक यांना 84mm LWL तोफेची सर्व प्रकारे माहिती देऊन बैठकीमध्ये त्यांच्या सर्व शंकांचे समाधान केले गेले. त्यानंतर प्रत्यक्ष फायरींग करून अचूक लक्ष्यभेद करून दाखविले. त्यावेळी तोफेचे प्रात्यक्षिकासह प्रदर्शन त्यांना इतके आवडले की ते भारावून गेले व त्वरित पाच शस्त्रे Users Trials म्हणजेच उपभोक्ता चाचण्यासाठी द्यायला सांगितले. त्यावेळी केवळ तीन शस्त्रे / तोफांसहित उपभोक्ता चाचणी द्यायची स्वीकृती दिली, कारण या तोफांची भारतीय सेनेस अत्यंत गरज होतीच व आम्ही स्वदेशी तोफा त्यांना हव्या तशा तयार केल्या होत्या.
84mm तोफगोळे (Ammunition)
या तोफेतून पुढील प्रकारचे 84mm तोफगोळे (Ammunition) वापरुन शत्रूलक्ष्यानुरूप हवा तो परिणाम मिळवू शकतो.
84 mm High Explosive Anti-Tank (HEAT), रणगाडा विरोधी तोफगोळे
84 mm High Explosive (HE), अति विस्फोटक तोफगोळे
84 mm High Explosive Air-Burst (HEAB), हवेत फुटणारे अति विस्फोटक तोफगोळे.
84 mm Illuminating, तिमिर नाशक तोफगोळे.
84 mm Target Practice Tracer (TPT), सराव तोफगोळे.
84 mm High Explosive Anti-Tank Rocket Assisted Projectile (HEAT-RAP), अग्निबाण सह रणगाडा विरोधी तोफगोळे जवळच्या भविष्यात येऊ घातलेले नविन अत्याधुनिक व अद्ययावत तोफगोळे.
84 mm Smoke (SMK), धूम्र कारक तोफगोळे.
84 mm Incendiary (INCY), आग प्रज्वलक तोफगोळे.
84 mm High Explosive Duel Purpose (HEDP), द्विलक्षी तोफगोळे.
84 mm High Explosive Confined Space (HECS), मर्यादित अवकाश अति विस्फोटक तोफगोळे
84 mm High Explosive Anti-Structure (HEAS). ढाच्याविरोधी अति विस्फोटक तोफगोळे.
उपभोक्ता चाचणी (User Trial)
भारतीय सैन्य दलाच्या शस्त्र खरेदी विभागाने उपभोक्ता चाचणीसाठी 84mm LWL तोफा स्वीकारल्या व लगेच एप्रिल 2000 मध्ये आम्ही महू येथे Infantry School यांच्याकडे सुपूर्त केल्या. सर्व प्रकारच्या चाचण्या, सर्व प्रकारचे तोफगोळे तसेच त्याच्या सर्व प्रकारच्या बाबींवर विचार विनिमय करून, शंकासमाधान, प्रात्यक्षिक व प्रत्यक्ष फायर करून निष्कर्ष काढला की या तोफा भारतीय सैन्य दलाच्या सेवेत घ्यायला हरकत नाही. अर्थात छोटे-छोटे काही मुद्दे सुधारण्यासाठी सांगितले आणि एक टप्पा पार पडला. आता तोफांच्या पुढील चाचण्या म्हणजे टूप ट्रायल्स.
उपभोक्ता चाचणीच्या दरम्यानची महत्त्वाची आठवण

इन्फेंट्री स्कूल, महू येथील हेमा फील्ड फायरिंग रेंज येथे झालेल्या उपभोक्ता चाचणीच्या दरम्यानची एक महत्त्वाची आठवण. 84 mm LWL दोन-दोन TPT तोफगोळे स्टँडवरून फायर करून दाखविले. त्यानंतर Colonel Trials ने सांगितले की आम्ही तुमच्या शस्त्रावर त्याच्या सुरक्षिततेबाबत (Safety) भरवसा ठेवू शकत नाही. एका मिनिटात सहा तोफ गोळे फायर करण्याची चाचणी तुम्ही करून दाखवा तरच आम्ही या शस्त्राला हात लावू. आमचे जवान आम्ही मरायला पाठवू शकत नाही. मी विचारले की असे का? तुम्ही तर नेहमी फायरिंग करता! आम्ही सिविलियन लोक, आम्हाला साधे पिस्तुल जरी फायर करायचे असेल तर लाइसेंस लागते, परवानगी लागते, अथॉरिटी लागते, ट्रेनिगं लागते आणि हे तर मोठे शस्त्र आहे. आपण जे छोटे शस्त्र वापरतो त्याच्या 250 पट ताकतीचे हे शस्त्र आहे. मी म्हटले, तुम्ही सगळे फौजी लोक रात्रं दिवस फायर करता, मग ह्याची फायरिंग का करत नाहीत? तर त्यांनी माझ्यापुढे एक एक्क्सिडेंट रिपोर्ट ठेवला अश्याच एका परदेशी तोफेचा अपघात फायरिंगचे वेळी झाला होता बॉम्ब शत्रुकडे जाउन फुटायच्या ऐवजी तो गनरच्या खांद्यावरच फुटला आणि दोन्ही जवान यांची मुण्डकी 100 मीटर उडून गेली होती. भयानक अपघात होऊन दोन जवान जागीच हुतात्मा झाले होते, अशा परिस्थितीत मी फायरिंगची रिस्क घेऊ शकत नाही, कारण हे तर अंडर डेव्हलपमेंट असणारे शस्त्र आहे. अशा परिस्थितीत ट्रायल्स गुंडाळून परतच यावे लागले असते. पण मी लहानपणा पासून संघाच्या शाखेत जात होतो व तिथे देशासाठी काहीतरी केले पाहिजे हे शिकलो होतो. त्या संस्कारानुरूप मी निर्णय घेतला कि स्वयंप्रेरणेने हे फायरिंग आपणच करून दाखवायचे.
माझ्या शस्त्रावर माझा पूर्ण विश्वास असल्याने मी स्वतः तोफ खांद्यावरून फायर करायला तयार आहे असे सांगितले व स्वतः सहा 84mm HE हे अति विस्फोटक तोफगोळे केवळ पन्नास सेकंदात योग्य पध्दतीने फायर केले. माझा स्वतःवर व स्वतःच्या शस्त्र प्रणालीवर असणारा विश्वास, केवळ यामुळेच हे शक्य झाले. त्यावेळी मनात एकच विचार होता की जर जवानाने फायर केले असते तर जवानाचे जे होईल तेच माझे होईल असा विचार करून आपण देशकार्यच करत आहोत हाच भाव मनात येत होता व मी स्वतःला भाग्यवान समजत आहे. अर्था अशा पध्दतीचे कोणतेही प्रशिक्षण माझे नव्हते व प्रशिक्षित सैनिकही हे शस्त्र चालवताना घाबरलेले मी पाहिलेत. मला याचीही मनोमन कल्पना होती की जर आपण ही चाचणी यशस्वी करू शकलो तर 84mm LWL ही तोफ भारतीय सैन्यदलाच्या सेवेत जाऊ शकेल, मात्र दुर्दैवाने जर माझं काही बर वाईट झालं तर किंवा अपघाताने मला अपंगत्वासमान काहीही झालं तर नक्की ते माझ्यावरच शेकणार होतं. प्रशिक्षणच नाही, शस्त्र चालवण्याचा अधिकार अथवा परवाना नाही. आणि असं काही नसताना कशाला शहाणपणा करायला जायचं? असे म्हणून त्याची जबाबदारी माझ्यावरच ढकलून व्यवस्थापन आपली जबाबदारी झटकून मोकळं झालं असतं तर? असो!
परंतु काहीही वावगं घडलं नाही व या शस्त्राच्या पुढील तीनही दिवसात विविध प्रकारच्या सर्व चाचण्या झाल्या व उपभोक्ता चाचण्या यशस्वी पार पाडून 84mm LWL तोफा ट्रूप ट्रायल साठी सज्ज झाल्या अशा चाचणीचे वेळी विविध एककांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित असतात व प्रत्येकजण वेगवेगळ्या दृष्टीकोनातून चाचणीकडे बघत असतो. म्हणजे कोणताही पैलू दुर्लक्षित राहत नाही.
उपभोक्ता चाचण्या नंतर ट्रूप ट्रायल्स तीन भागात घ्यायच्या असे निर्देश सेनामुख्यालयाने दिले.
भाग 1 - अति उष्ण व वाळवंटी प्रदेशातील चाचण्या
भाग 2 - अति शीत व उच्च पर्वतीय प्रदेशातील चाचण्या
भाग 3 - देखभालक्षमता (maintainability) चाचण्या
त्याप्रमाणे उपभोक्ता चाचण्यामध्ये ज्या सुधारणा सांगितल्या त्यांचा समावेश करून जी नवीन पाच शस्त्रे बनविली त्याचे प्रूफ फायरींग यशस्वी झाल्यावर सर्व सामानासह ती ट्रूप ट्रायल्स साठी सैन्यदलाच्या तुकडीकडे सुपूर्त केली. सर्व महत्त्वाच्या चाचण्या होऊन 84 mm LWL तोफप्रणाली सेवेमध्ये दाखल होण्यासाठी सिध्द झाली. या दरम्यान 84 mm HEAT-RAP हे तोफगोळे तंत्रज्ञानासह भारताने M/s SAAB स्वीडनकडून वि कत घेतले. त्यामुळे सेना मुख्यालयाने या तोफगोळ्यांचा 84 mm LWL शी अनुरुपता (Compatibility) चाचण्या घेण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे या चाचण्या यशस्वीपणे घेतल्या, तसेच आवश्यक अचूकता व सातत्यही तपासून योग्य असल्याचे सैन्यदलास दाखवून 84 mm LWL शस्त्रप्रणाली सिध्द झाली. 84 mm LWL शस्त्रप्रणाली सैन्यदलांना सुपूर्त करताना लागणारे सर्व साहित्य व कागदपत्रे तयार करण्यात आली व एक एकक देण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण साधनसामग्री योजना (Complete Equipment Schedule (CES) तयार करण्यात आली. त्याच बरोबर विविध प्रकारच्या माहिती पुस्तिका तयार केल्या त्या खालीलप्रमाणे -
84 mm LWL तोफ प्रणाली मॅन्युअल (Gun System Manual)
माहिती हस्त पुस्तिका (Handbook)
दुरूस्ती तथा देखभाल हस्त पुस्तिका (Repair and Maintenance Handbook)
सुट्टे भाग, वि शेष हत्यारे तथा मोजमाप करण्याची साधने यांची सविस्तर सूची (Illustrated Spare Parts List ISPL)
उत्पादकांनी शिफारस केलेल्या, सुट्टेभाग इत्यादीची विस्तृत यादी (Manufacturer’s Recommended List of Spares MRLS)
84 mm LWL तंत्रज्ञान हस्तांतरण
अशारीतीने 84 mm LWL तोफ सिध्द व स्वीकृत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शस्त्र निर्मितीसाठी, उत्पादन सुरू करण्यासाठी OFB/ GSF म्हणजेच आयुध निर्माणीच्या Gun & Shell Factory (GSF), काशीपुर, कलकत्ता यांच्या कडे हे तंत्रज्ञान हस्तांतरण (TOT- Transfer of Technology) करण्यात आले.
(लेखक हे DRDOच्या पुणे येथील संशोधन संस्थेतून निवृत्त शास्त्रज्ञ आहेत.)

Very technical and informative Article sir
मी श्री देवधर सरांचे लेख अनेकदा वाचलेत, लेखनाची पद्धत खुप सोपी असल्याने वाचन करतच रहावं वाटतं, लहान मुले ही आनंदाने वाचतात. हा लेख ही खुप माहीती देनारा आहे, मनःपूर्वक आभार.
माझी श्री देवधर सरांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे अनुभव असेच मांडत रहावे 🙏🏻
माननीय देवधर सर ,
आपला पूर्ण लेख मी निवांतपणे वाचला , खुप नवीन माहिती मिळाली. आपली लिखाणाची पद्धतही अगदी सोपी, वाचनीय आहे.
सर्वात आवडलेला भाग म्हणजे तुम्ही स्वतः घेतलेली चाचणी , ह्यासाठी केलेल्या कामाप्रती प्रचंड आत्मविश्वास हवा, ते होता म्हणूनच तुम्ही यशस्वीरित्या ही चाचणी स्वतःच्या खांद्यावरून घेऊ शकलात.
परमेश्वर असेच देशकार्य तुमच्या हातून घडवून घेवो, या कार्यासाठी उदंड आयुष्य लाभो, पुढील उपक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा.
अत्यंत माहितीपूर्ण लेख
इन्फन्ट्री आणि मॅक इन्फंन्ट्री बटालियन्स साठी अत्यंत महत्वाचे आणि भरवश्याचे असे weapon म्हणजे 84 mm रॉकेट लॉन्चर.... आणि ते आपल्या देवधर साहेबांनी डिझाइन आणि डेव्हलप केले याचा गर्व आहे.... जय हिंद