top of page
logo.png
  • Instagram
  • Facebook
  • Youtube

आपत्कालीन प्रसंगी विमानछत तोडणारी प्रणाली

  • Mar 17
  • 3 min read

श्री काशीनाथ देवधर


स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ व प्रशिक्षण विमानांसाठी विकसित करण्यात आलेली विमानछत विच्छेदन प्रणाली (कॅनॉपी सेवरन्स सिस्टम – CSS) ही वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची जीवरक्षक यंत्रणा आहे. या लेखात डीआरडीओच्या एआरडीई व एचईएमआरएल संस्थांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानावर आधारित CSS प्रणालीची संकल्पना, रचना व कार्य पद्धती स्पष्ट केली आहे. उड्डाणातील (In-flight) आणि भूतलावरील (Ground) आणीबाणीच्या परिस्थितीत वैमानिकास सुरक्षित निर्गमनाचा मार्ग उपलब्ध करून देणे हे या प्रणालीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नियंत्रित प्रस्फोट तरंग तंत्रज्ञानामुळे अवघ्या 14 मिलि सेकंदांत विमानछत विच्छेदन शक्य झाले असून, हे जागतिक मानकांपेक्षा लक्षणीय प्रगत आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानातील हे तंत्रज्ञान भारताच्या संरक्षण क्षमतेतील महत्त्वाचा टप्पा ठरते.

स्वदेशी ‘तेजस’ लढाऊ विमान व ‘तेजस’ प्रशिक्षण विमानांचे भारतीय हवाई दलासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन बेंगळुरू येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून सुरू आहे. या विमानासाठी विकसित करण्यात आलेल्या विमानछत विच्छेदरेिन प्रणाली (Canopy Severance System) चे संपूर्ण तंत्रज्ञान वापरून विकासकार्य करण्यात मला सहभागी होता आले. या प्रणालीच्या विकास गटाचे नेतृत्व करून तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यात आले. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानातील या योगदानाबद्दल ‘पिनाक पुरस्कार’ मिळाल्याने मला विशेष धन्यता वाटते.


दि. २ डिसेंबर २०२५ रोजी DRDO ने चंदीगड येथे, प्रत्यक्ष ८०० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या परिस्थितीत वैमानिक निर्गमन प्रणाली (Emergency Escape System) ची कार्यान्वयन चाचणी प्रथमच यशस्वीरीत्या पार पाडली. या यशस्वी चाचणीमुळे भारत अशा सुविधा असलेल्या मोजक्या देशांच्या पंक्तीत सामील झाला आहे. यापूर्वी अशा चाचण्या करण्यासाठी रशिया व इंग्लंडसारख्या देशांवर अवलंबून राहावे लागत असे.


आपल्या देशात केवळ ‘०–० चाचणी’ (शून्य उंची व शून्य वेग) एवढीच सुविधा उपलब्ध होती. प्रत्यक्ष ८०० किमी प्रतितास वेगात कार्यान्वयन चाचणी घेण्याची क्षमता प्राप्त होणे हा समर्थ भारताच्या विकासातील महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. या चाचणीत माझी विकसित केलेली विमानछत विच्छेदन प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित झाल्याचा मला सार्थ अभिमान आहे.


हवाई दलाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रशिक्षित आणि कुशल वैमानिक. लढाऊ विमानाला अपघात झाल्यास किंवा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास, वैमानिकाला खुर्चीसकट विमानातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अत्यंत कमी वेळात विमानछत तोडणे आवश्यक असते. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ विमानातील या महत्त्वाच्या यंत्रणेची माहिती या लेखात सादर करण्यात आली आहे.


भारतीय बनावटीचे ‘तेजस’ हे हलक्या वजनाचे लढाऊ विमान (Light Combat Aircraft – LCA) भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यातील एक महत्त्वाचा घटक बनले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला ८३ ‘तेजस’ विमाने निर्मितीचा कार्यादेश मिळाला असून, त्यापैकी ३६ विमाने दोन स्क्वॉड्रनमध्ये भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल झाली आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ अभि यानांतर्गत ही संरक्षण मंत्रालयाची मोठी कामगिरी आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) आणि वैमानिकी विकास संस्था (ADA) यांनी डॉ. कोटा हरिनारायण यांच्या नेतृत्वाखाली या विमानाचे अभिकल्पन व विकास (Design and Development) कार्य केले. सर्व प्रकारच्या उड्डाण प्रमाणपत्र चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, ४ जानेवारी २००१ रोजी मा. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते या विमानाचे ‘तेजस’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर HAL च्या बेंगळुरू येथील प्रकल्पात नियमित उत्पादन सुरू झाले असून सध्या वर्षाला १२ विमाने तयार होत आहेत. पुढील काही वर्षांत ही क्षमता वर्षाला ५० विमाने करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळत आहे.


‘तेजस’ विमानासाठी अत्यंत महत्त्वाची जीवरक्षक यंत्रणा म्हणजे खुर्ची सह वैमानिक निर्गमन प्रणाली (Seat Ejection System). या प्रणालीची पहिली व अत्यावश्यक क्रिया म्हणजे, वैमानिकाचे शिरस्त्राण पारदर्शक विमानछतावर आदळण्यापूर्वीच ते छत काढून टाकणे किंवा विच्छेदन करणे. यासाठी विकसि त करण्यात आलेली विमानछत विच्छेद न प्रणाली (CSS) ही पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून, पुणेस्थित आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ARDE) आणि हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी (HEMRL) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. सुरुवातीला मर्यादित गरज असल्याने या संस्थांनीच अंतर्गत उत्पादन केले. त्यानंतर माझ्या नेतृत्वाखाली हैदराबादस्थित खाजगी उद्योगाला हे तंत्रज्ञान हस्तांतरित करून उत्पादनक्षम बनविण्यात आले. याच कार्यासाठी ‘पिनाक पुरस्कार ’ प्रदान करण्यात आला. ही प्रणाली पुढे HJT-36 व HTT-40 या भारतीय प्रशिक्षण विमानांसाठीही वापरली जाणार आहे. CSS अंतर्गत दोन स्वतंत्र प्रणाली विकसित केल्या आहेत.

  1. उड्डाणांतर्गत निर्ग मन प्रणाली (IES)

  2. भूतल निर्ग मन प्रणाली (GES)

या प्रणालींमध्ये नियंत्रित प्रस्फोट तरंग तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या १४ मिलिसेकंदांत विमानछताचे विच्छेदन केले जाते, जे जागतिक मानकांपेक्षा अत्यंत प्रगत आहे. CSS शि वाय कोणत्याही लढाऊ किंवा प्रशिक्षण विमानाला उड्डाणास परवानगी दिली जात नाही , इतकी ही प्रणाली महत्त्वाची आहे. आज भारत अशा कठीणतम चाचण्यांच्या सुविधा स्वदेशात उभारण्यात अग्रेसर ठरत असून, हीच वाटचाल भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर सक्षम बनवेल.

भारत माता की जय।



(लेखक हे संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मधील वरिष्ठ वैज्ञानिक असून, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमधून ग्रुप डायरेक्टर म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.)

 
 
 

Comments


मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९७ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

संपर्क: srushtidnyan1928@gmail.com 

फोन - +91 86689 78401

जलद लिंक

मुख्य पृष्ठ
संपादकीय
मुखपृष्ठ कथा
उपक्रम
संग्रहण

सदस्यत्व 

आमच्या मासिकाची सदस्यता घ्या

Thanks for subscribing!

© 2025 Srushtidnyan. Design by Estrella Communication 

bottom of page