आदिपशुक
- Aug 18, 2025
- 3 min read
डॉ. पुरुषोत्तम काळे
आदिपशुक (प्रोटोझोआ) हे सूक्ष्म, सुकें द्रीय, एकपेशीय सजीव असून विविध अधिवासांत स्वयंपोषी, परपोषी, परजीवी, सहजीवी वा मृतोपजीवी स्वरूपात आढळतात. त्यांच्या रचनात्मक व कार्यात्मक वैशि ष्ट्यांमुळे त्यांना स्वतंत्र संघ मानले गेले. आदिपशुके जैवसंवर्धन, पर्यावरणीय समतोल, अपघटन प्रक्रिया, व अन्नसाखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. काही जाती उपयोगी ठरतात तर काही रोगकारकही असतात. वर्गीकरणात त्यांच्या हालचालीच्या रचनांवर, पोषण प्रकारांवर आणि पेशिकांगांच्या वैशिष्ट्यांवर आधारित अनेक अधिराज्ये व गट सुचवले गेले आहेत.

व्हिटेकरच्या पंचसृष्टी वर्गी करण पद्धती (१९६९) प्रमाणे प्रोटिस्टा या सृष्टीतले आणि वूस-फॉक्स यांच्या त्रिसृष्टी वर्गीकरण पद्धती (१९९०) नुसार सुकेंद्रीय या सृष्टी तले एकपेशीय व सुकेंद्रीय प्राणी म्हणजे आदिपशुक (प्रोटोझोआ). आदिपशुक ही संज्ञा एकपेशीय आदीम प्राण्यांसाठी १८१८ साली गोल्डफब या प्राणी शास्त्रज्ञाने प्रथम वापरली. सुरुवातीला या संघात स्पॉन्जेस, जेलीफिशेस, रोटीफर्स , कोरल्स, ब्रायोझोअन्स व अगदी वलयांकित कृमी अशा निम्न स्तरातील प्राण्यांचा देखील अंतर्भाव केला होता. सुधारित सूक्ष्मदर्शक उपलब्ध झाल्यावर १८४८ मध्ये आदिपशुके एकपेशीय असल्याचं कळल्यावर सि बोल्ड या प्राणिशास्त्रज्ञानं हा स्वतंत्र संघ केला व प्रपशुके (मेटाझोअन्स) यांना दुसऱ्या संघांत समाविष्ट केले. जॉन हॉग यानं १८६० मध्ये प्रतिपादन केलं की आदि पशुकांच्या काही जातींमध्ये वनस्पती व प्राणी या दोहोंचे गुणधर्म दिसत असल्याने आदि पशुक ऐवजी त्यांना प्रोटोकटिस्टा संबोधलं पाहिजे. वनस्पती आणि प्राणी अधिराज्ये (किंग्डम) मोठ्या पिरॅमिड सारखी असून त्यांच्या पायथ्याशी ते प्रायमिजेनम या प्रोटोकटिस्टाचा समावेश असणाऱ्या वेगळ्या अधिराज्यात एकत्र येतात. या तिसऱ्या अधिराज्याला अर्न्स्ट हॅकेल यानं १८६६ मध्ये ‘प्रोटिस्टा ’ असं नाव दिलं. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर प्रपशुकांच्या स्वतंत्र अधिराज्याला अनेक जीवशास्त्रज्ञांनी मान्यता दिली. हॉनिसबर्गच्या १९६४ च्या वर्गीकरण पद्धतीत प्रपशुकांना त्यांच्या हलचालींसाठीच्या लघूंद्रियांवरून वर्गीकृत केलं गेलं. रुगिरो व त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१५ मध्ये अधिराज्य प्रपशुक यांत यूग्लिनोझोआ, अमीबोझोआ, मेटामोनाडा, कोआनोझोआ, लौकोझोआ, परकोलोझोआ, मायक्रोस्पोरिडिआ आणि स्लकोझोआ या संघांचा समावेश केला. परंतु यात रोमकी (सिलिएटस), डायनोफ्लॅजेलेट्स, फोरॅमिनीफेरा आणि परजीवी अपि कॉम्प्लेक्सा समाविष्ट नव्हते.
आज रेण्विक व वंशाहीतीहासिक वर्गीकरण पद्धतीप्रमाणे आदि शुकांचे, आदीम कवकांशी साधर्म्य असणारे व तौलनिक दृष्ट्या उन्नत आणि शैवलांशी साधर्म्य असणारे असे, दोन प्रमुख गट बनविले असून पहिल्या गटात अन्सायरोमोनाडीडा (चपटे, दोन असमान कशाभिका असणारे), मलावि मोनाडीडा (केवळ तीन जाती असणारा स्वतंत्र आदीम गट), सिरूम्स (कशाभिका आणि छ्द्मपाद दोन्ही असणारे), अमीबोझोआ (छ्द्मपाद असणारे), ब्रेव्हियाटिया (परजीवी असणारे), होलोमायकोटा (एकपेशीय कवके) आणि होलोझोआ (पूर्णपणे प्राण्यांसारखे पोषण असणारे) अशा आदिपशुकांचा समावेश केला जातो.

आदिपशुके आदीम सजीव असून अश्मीभूत आदिपशुके ८० कोटी वर्षांपूर्वीच्या प्रीकॅम्ब्रियन महाकल्पात (इरा) बनलेल्या अश्मात सापडली आहेत. आदिपशुकांच्या ६५००० हून अधिक जाती आज अस्तित्वात आहेत. आदि पशुके सुकेंद्रीय, सूक्ष्म, एकपेशीय सजीव असून अनेक प्रपशुके अनावृत्त असली तरी पॅरामोशीयम सारख्या काही आदि पशुकांच्या प्रद्रव्यपटला बाहेर लवचिक गुलिका (पेलिकल) तर फोरॅमिनीफेरन्स मध्ये चुनखडीचे (कॅल्शियम कार्बोनेट) आणि रेडिओलॅरिअन्स मध्ये सिलिकेट्सचे कवच असते. पॅरामोशीयम सारख्या आदि पशुकांमध्ये रोमकांच्या रांगा पेशींभोवती असतात (हॉलोट्रीकस) तर व्होर्टीसेला सारख्या आदिपशुकांत रोमकांच्या एक ते अनेक कंकणाकृती कड्या पेशींच्या एका व दोन्ही टोकांना असतात. कशाभिक (फ्लॅजेलेट) आदिपशुकांत यूग्लिना सारखे प्रकाशपोषी; नॉकटिल्युका, सीरॅशियम सारखे द्विकशाभिक; मोनोसिगा सारखे प्रपटलाची कॉलर असणारे कशाभिक, ट्रिपॅनोसोमा सारखे कायनेटोप्लास्टी ड्स; जियार्डिया सारखे यटोकोण्ड्रिया नसणारे मेटामोनाडा इत्यादींचा समावेश होतो. आदिपशुकांच्या पेशीतली पेशिकांगे (सेल ओर्गनेल्स) इतर सुकेंद्रीय पेशींच्या पेशिकांगांसारखीच असतात व तशीच कार्ये करतात पण रोमके असणाऱ्या बहुतेक आदिपशुकांच्या पेशीत एक मोठे, डीएनएचे अनियमित प्रमाण असणारे व पेशींच्या अलैंगिक क्रियांचे नियंत्रण करणारे बृहद-केंद्रक (मेगा- नुक्लियस) आणि एक तुलनेने लहान, डीएनएचे नियमित प्रमाण असणारे व लैंगिक प्रजननासाठी आवश्यक असे लघु-केंद्रक (मायक्रो-न्यूक्लियस) असते.
आदिपशुके गोड/ निमखाऱ्या / खाऱ्या पाण्यात, जमिनीवर अशा विविध अधिवासांत एक-एकटे अथवा समूहाने आढळतात. ते स्वयंपोषी, परपोषी, परजीवी, सहजीवी अथवा मृतोपजीवी देखील असतात ज्यामुळे ते विविध पर्यावरणीय स्थाने (इकोलॉजिकल निश) व्यापतात. अधिकतम आदिपशुके प्राण्यांप्रमाणे संचरण करू शकतात. यासाठी त्यांना छ्द्मपाद (सुडोपोडीय), रोमके (सिलिया) अथवा कशाभिका (फ्लॅजेला) असतात. संचरण न करणारी आदिपशुके अधिकतर सहजीवी असतात. हे सहजीवी आपल्या आश्रयदात्यांना (होस्ट) मदत करतात (साहोपकारिता/ म्युच्युऍलिझम), मदत वा इजा करत नाहीत (सहभोजिता/ कोमेन्सालीझम) किंवा इजा करतात (परजीवी/ पॅरासायटीझम).
अधिकतम आदिपशुके परपोषी (हेटेरोट्रॉफिक) असली तरी यूग्लिना सारखी प्रपशुके मिश्र पोषी (प्रकाशपोषी/ फोटोट्रॉफिक व पूर्णपशुक/ होलोझोइक) असतात. प्रकाशपोषींमध्ये हरित लवके (क्लोरोप्लास्ट्स ) असतात तर पूर्णपशुक पोषणासाठी अन्न-रिक्तिका (फुड-व्हॅक्युओल्स) असतात. श्वसनवायुंची (रेस्पिरेटरी गॅसेस) थेट देवाणघेवाण भवतालशी होत असल्याने श्वसनासाठी स्वतंत्र यंत्रणा नसते. उत्सर्जनासाठी प्रामुख्यानं गोड्यापाण्यातील आदिपशुकांत संकोचशील रिक्तिका (काँट्रॅकटाईल व्हॅकुओल्स) असतात. आदिपशुकांचे प्रजनन पेशी-द्विखंडन/-बहुखंडन,
बीजाणुकजनन (स्पोरुलेशन) याअलैंगि क पद्धतीने अथवा संयुग्मन (कॉन्ज्युगेशन) सारख्या लैंगिक पद्धतींनी होते.

अमिबासारखी प्रपशुके पाण्यातील सेंद्रिय कण आणि जीवाणू यांच्यावर उपजीविका करीत असल्याने ते सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी उपयुक्त असतात. मातीत वास्तव्य असणारे आदिपशुक मातीला सुपीक बनवतात. आदि पशुकांच्या अनेक जाती- प्रजाती जलस्रोतांच्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्या परिसंस्थांतील अन्न-साखळीत त्यांना महत्वाचे स्थान असते. माणसांसह अनेक प्राण्यांमध्ये आदिपशुके साहोपकारीत (म्युच्युऍलिस्ट) अथवा सहभोजीत (कोमेन्सल) म्हणून राहतात व त्यांना विविध प्रकारे सहाय्य्य करतात. फोरॅमिनीफेरान्सची, रेडिओलॅरिअन्सची रिकामी कवचे विविध उद्योगांमध्ये कामाला येतात (टूथपेस्ट, गाळपे, भरडा/ रफेज, म्हणून). परजीवी आदिपशुके मानव, प्राण्यांमध्ये मलेरिया, आव, जियार्डियासिस, काळा-आजार, सारखे विविध आजार निर्माण करतात. जलचरांच्या निरनिराळ्या आजारांसाठी पाण्यात वाढणारे प्रपशूक कारणीभूत असतात. काही प्रपशूक जाती पाण्याची पेयता व मातीची सुपीकता घटवतात.

Comments